सच्चिदानंद मनिराम महाराज (Maniram – A Saint from Yavatmal District)

0
92

सच्चिदानंद श्री मनिराम महाराज हे संत, भगवतभक्त, शांतिब्रह्म म्हणून प्रसिद्ध होते. ते अमरावती जिल्ह्यातील बग्गी (जावरा) या गावी होऊन गेले. बग्गी हे गाव चार ते पाच हजारांच्या लोकवस्तीचे. कथा अशी, की मनिराम महाराज बग्गीमध्ये प्रकटल्यानंतर प्रथम शांतिसागर रामजी महाराजांकडे आले. त्यांनी रामजी यांच्याकडे कामठा येथे राहण्यास जागा मागितली व ते तेथे वास्तव्य करू लागले. रामजी महाराज हे सुतार समाजातील होते. त्यांची व मनिराम महाराजांची प्रथम भेट व शेवटपर्यंत वास्तव्य हे कामठ्यामध्येच झाले. रामजी महाराज स्वत: शांतताप्रिय व वैराग्यमूर्ती म्हणून प्रसिद्ध. म्हणूनच त्यांना शांतिसागर रामजी महाराजया उपाधीने संबोधले जाई.

मनिराम महाराज यांच्या पूर्वेतिहासाबद्दल नक्की माहिती नाही. त्यांचा जन्म काशी येथे ब्राह्मण घराण्यात झाला. बाबा बग्गी या गावामध्ये केव्हा प्रकट झाले याबद्दल पुरावा नाही. ते सर्वप्रथम कामठायेथे गेले (सुतारकाम करण्याची जी जागा तिला कामठा असे म्हणतात). कामठा म्हणजेच शांतिसागर रामजी महाराजांचे राहते घर. रामजी महाराज यांनी त्यांच्यामध्ये आध्यात्मिक व नैतिक मूल्यांची बीजे रोवली; गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताहाची सुरुवात केली. संतकृपा झाली | इमारत फळा आल्री || मनिराम महाराज गावामध्ये विविध लोकांची कामे करू लागले. त्यांनी (श्रीकृष्णाप्रमाणे) गुरे चारण्याचे कामसुद्धा कित्येक दिवस केले.

श्री रामजी महाराज समाधी, बग्गी

चंद्रभागा नदी बग्गी या गावाबाहेरून वाहते. त्या नदीच्या पात्रात भक्‍त पुंडलिकाचे मंदिर आहे. बाबांचा नित्यनेम रोज नदीवर आंघोळीला जायचे व आंघोळीनंतर कामठ्यात ध्यान करायचे असा सुरू झाला. गावामध्ये भिक्षा मागायची, त्यातील काही रामजींना द्यायचे, काही धाडश्यानावाच्या कुत्र्याला द्यायचे. मनिराम महाराजांची कीर्ती दूरवर पसरली. भक्तांचा ओघ वाढला. शेगावनिवासी श्री गजानन महाराज हेसुद्धा बग्गीला येऊन गेल्याचा उल्लेख पोथीमध्ये आढळतो. श्री गजानन महाराजांनी गणपती उत्सवाला कामठ्यामध्येच प्रारंभ केला. तो सुरू आहे. त्यांचे समकालीन, जोडमोहा येथील खटेश्वर महाराज हेसुद्धा बग्गीला येऊन गेले. ती संत मंडळी मनिराम महाराजांना गुरुबंधू मानत. एके दिवशी, मनिराम महाराजांनी रामजीबाबांना कामठ्यात जवळ बोलावले, आमचा कार्यकाळ संपन्न झाला. आमची जाण्याची वेळ आली असे सांगितले. ते ऐकून रामजी व त्यांची पत्नी यशोदा, दोघे दु:खी झाले. मनिराम महाराजांनी त्यांची दिव्य शक्ती रामजी महाराजांमध्ये परावर्तित केली. त्यांच्या जवळील काडी आणि झोळीरामजी महाराजांच्या स्वाधीन केली. मनिराम महाराज यापुढे हे तुलाच सांभाळायचे आहे असे रामजीबाबांना सांगून कार्तिक वद्य नवमीला सच्चिदानंद स्वरूपात निजमग्न झाले ! चंद्रभागा नदीच्या काठावर सच्चिदानंद मनिराम महाराजांची समाधी आहे. शिर्डी येथील साईबाबांच्या चावडीप्रमाणे कामठा येथे प्रज्वलित धुनी अखंड चालू असते.

श्री रामजी महाराज

बग्गी गावात सर्वत्र धार्मिक वातावरण आहे. वर्षभरात साधारण बावन्न उत्सव तेथे भक्तिभावाने पार पाडले जातात. त्या उत्सवांपैकी तीन महत्त्वपूर्ण आहेत. पहिला उत्सव म्हणजे भाद्रपद शुद्ध पंचमी. त्या तिथीला शांतिसागर रामजी महाराजांनी देह ठेवला. त्यांचा स्मृतिदिन भक्तिभावाने साजरा केला जातो. त्याच दिवशी दिंडी समाप्तीसुद्धा असते. दुसरा उत्सव म्हणजे कार्तिक वद्य नवमी. त्या तिथीला मनिराम महाराज समाधीमध्ये निजमग्न झाले. भव्यदिव्य असा समाधी शताब्दी महोत्सव 2015 साली साजरा करण्यात आला. तिसरा सर्वात मोठा व महत्त्वपूर्ण उत्सव म्हणजे माघ शुद्ध दशमी. तो उत्सव माघ शुद्ध तृतीया ते माघ शुद्ध दशमीपर्यंत चालतो. त्या दिवसाला वारकरी संप्रदायामध्ये मानाचे स्थान आहे. तुकाराम महाराज यांना त्याच दिवशी गुरूचा साक्षात्कार झाला. मनिराम महाराज आणि तुकाराम महाराज हे एकाच मालिकेतील संत असून त्यांचा अगदी जवळचा संबंधसुद्धा असू शकतो. दशमीच्या दिवशी काला व महाप्रसाद होतो व नंतर माघ शुद्ध द्वादशी या दिवशी पुरणपोळीच्या महाप्रसादाने उत्सवाची सांगता होते. तो नामसंकीर्तन सप्ताह मनिराम महाराजांनी स्वत: सुरू केला.

– अमोल विनोदराव कावलकर 7588189823, 9767166600 sacchidanand30@gmail.com

अमोल विनोदराव कावलकर हे यवतमाळ जिल्ह्याच्या बाभूळगाव तालुक्यातील दिघी गावचे. त्यांचे शिक्षण एम एस्सी, बी एड असे आहे. त्यांनी ऑरगॅनिक केमिस्ट्रीत पीएच डी मिळवली आहे. ते अमोलकचंद महाविद्यालय (यवतमाळ) येथे सहाय्यक प्राध्यापक आहेत.

———————————————————————————————————————————————————–

About Post Author

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here