अचलपूरचे एकशेतीस वर्षांचे वाचनालय (One hundred and thirty year old library of Achalpur)

0
150

बाबासाहेब देशमुख यांनी अचलपूर शहरात गेल्या शतकारंभी अनेक संस्था स्थापन केल्या, त्यांतील पहिली ‘सार्वजनिक वाचनालय’ ही होय. त्या संस्थेचा स्थापना दिनांक उपलब्ध नाही. मात्र वाचनालयाच्या सध्याच्या इमारतीची जागा स्थानिक नगरपालिकेने 1893 साली वाचनालयास दिल्याचा उल्लेख आहे. वाचनालयास शहराच्या मध्यभागात प्रशस्त जागा मिळाली, परंतु साजेशी इमारत नव्हती. त्याकरता बाबासाहेब देशमुख यांनी पुढाकार घेतला आणि नागरिकांकडे जाऊन देणग्या मिळवल्या. त्यांनी अनेक लहानमोठ्या व्यक्तींकडे जाऊन वर्गणीदेखील जमवली. त्यांनी त्यात स्वतःचा मोठा वाटा टाकून वाचनालयाची सुंदर इमारत उभी केली. त्यांना त्या कार्यात नरहरराव भगवंतराव ऊर्फ अण्णासाहेब देशपांडे, भाऊसाहेब शाखी ह्यांनी मदत केली. ब्रिटिश अधिकारी कर्नल मॅकेन्झी यांच्या हस्ते नव्या इमारतीतील वाचनालयाचा उद्घाटन समारंभ झाला. बाबासाहेबांनी स्वतः बरीच वर्षे वाचनालयाचे काम पाहिले. त्यामुळे वाचनालयाची सांपत्तिक स्थिती सुधारत गेली.

वाचनालयाच्या एका हॉलमध्ये टेनिस क्लब होता. तेथे डॉ. मुदलियार, नथुसा पाथुसा, अल्ताफ हुसेन, चतुर वकील इत्यादी प्रमुख व्यक्ती खेळत असत. त्यामुळे ते केवळ वाचनालय नव्हते, तर शहरातील क्रीडा आणि सांस्कृतिक केंद्र होते. बाबासाहेबांना स्वतःला वाचनाचा छंद होता. त्यांचा विविध विषयांवरील ग्रंथांच्या वाचनाचा आवाका किती विशाल होता हे वाचनालयाच्या संग्रहातील निरनिराळया ग्रंथांवरील त्यांच्या स्वाक्षरीवरून प्रत्ययास येते. ते स्वतः वाचनालयाकरता पुस्तके खरेदी करत असत.

वाचनालयाचे कार्य कै. पां.व्यं. उपाख्य रावसाहेब देशमुख यांच्याकडे 1918 नंतर सोपवण्यात आले. त्यांच्याच कारकिर्दीत, सध्या वाचनालय जेथे चालू आहे त्या इमारतीचे कामकाज पूर्ण झाले. वाचनालयाने दुसऱ्या नव्या इमारतीत संसार थाटला आणि जुनी इमारत सिटी हायस्कूलला भाड्याने दिली. त्या भाड्यातून वाचनालयाच्या खर्चाची तरतूद करून देण्यात आली. त्यामुळे वाचनालय साठ वर्षांपर्यंत शासनाच्या मदतीशिवाय यशस्वीपणे कार्य करू शकले. रावसाहेब देशमुख यांनी अध्यक्ष या नात्याने वाचनालयाचे कार्य व्यवस्थितपणे चालवले. विश्वनाथ कृष्णाजी कुळकर्णी 1918 ते 1928 पर्यंत, नारायण मानमोडे वकील 1928 ते 1933 पर्यंत, भास्करराव अवधुतराव देशपांडे 1933 ते 1942 पर्यंत आणि नरहर शामराव देशपांडे अमडापूरकर यांनी 1942 ते 1954 पर्यंत चिटणीसपद भूषवले. आर.एस. सफळे आणि नानाजी कुरुमकर यांनी ग्रंथपाल म्हणून 1918 ते 1943 पर्यंतच्या पंचवीस वर्षांच्या कालखंडात काम पाहिले.

रावसाहेब देशमुख यांच्या आकस्मिक निर्वाणानंतर अध्यक्षपद आबासाहेब देशमुख यांच्याकडे आले. ल.वि. उपाख्य बापुसाहेब देशमुख 1954 ते 1958 आणि प्र.बा. शेवाळकर हे 1958 ते 1961 पर्यंत चिटणीस होते. ते राम शेवाळकर यांचे बंधू. त्याच काळात वाचनालयाचे व्यवस्थापन आणि अनुशासन योग्य रीतीने होण्यासाठी वाचनालयास नियम आणि उपनियम यांची आवश्यकता भासू लागली. त्यासाठी समिती नेमण्यात आली. समितीने नियम आणि उपनियम यांचा मसुदा सादर केला आणि वाचनालयाच्या आमसभेने त्यावर कलमवार विचार करून, दुरुस्ती सुचवून ते नियम-उपनियम 29 जून 1958 रोजी मंजूर केले.

रा.मे. उपाख्य आप्पासाहेब देशमुख ह्यांनी अध्यक्षपद 1962 पासून स्वीकारले. कृ.वा. उपाख्य दादासाहेब तारे हे चिटणीस म्हणून बिनविरोध निवडून आले. त्यांनी चिटणीस म्हणून काम 1962 ते 1967 पर्यंत पाहिले. वाचनालय शासनाकडून अनुदानप्राप्त करण्यासाठी रजिस्टर्ड नसल्यामुळे अडथळे येत होते. वाचनालयाचे नियम आणि उपनियम विद्यमान असिस्टंट चॅरिटी कमिशनर (अकोला) यांच्याकडे रीतसर पाठवून एफ 230/अमरावती या नोंदणी क्रमांकाने 31 ऑक्टोबर 1964 रोजी सार्वजनिक वाचनालय रजिस्टर्ड करण्यात आले. त्यामुळे शासनाकडून अनुदान प्राप्त करण्यातील मोठा अडसर दूर झाला. वाचनालयाच्या इमारतीचे इंजिनीयरांकडून पुनर्मूल्यांकन करून इमारत भाडे आठशे रुपयांवरून तेराशे रुपये मंजूर करण्यात आले.

सरकारी दप्तरातील नोंदीवरून वाचनालयास कमीत कमी पंच्याहत्तर वर्षे झालेली आहेत असे मानून, वाचनालयाचा अमृत महोत्सव 20 व 21 मे 1965 ला साजरा करण्याचे ठरले. त्यासाठी विदर्भ साहित्य संघाच्या रौप्य महोत्सवी वर्षातील अध्यक्ष प्रा. वामन कृ. चोरघडे यांना पाचारण करण्यात आले. दुसऱ्या दिवशी नामवंत कवींचे समेलन नागपूर विद्यापीठाचे कुलगुरु वि.भि. कोलते यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आले होते. तसेच, नागपूरच्या कुमार रमेश राजहंस यांचा शास्त्रीय गायनाचा कार्यक्रम झाला. त्या नंतर नेहरू स्मृती व्याख्यानमाला 28-29 मे 1966 ला आयोजित करण्यात आली. त्यासाठी नागपूरचे कायदेतज्ज्ञ आणि विचारवंत चंद्रशेखर धर्माधिकारी ह्यांना बोलावण्यात आले होते. महाराष्ट्रातील थोर इतिहास संशोधक प्रा.र. पाठक यांचे ‘ज्ञानेश्वरीतील भक्तिमार्ग’ या विषयावर व्याख्यान 25 डिसेंबर 1966 ला झाले. नंतर ती नेहरू-सावरकर स्मृती व्याख्यानमाला म्हणून साजरी होऊ लागली. बाबासाहेब देशमुख यांच्या जन्मशताब्दी महोत्सवानिमित्त एकशेऐंशी प्राचीन ग्रंथ आप्पासाहेब देशमुख यांनी वाचनालयास दिले. त्यांतील काही अतिशय दुर्मीळ आहेत.

वाचनालयात त्या काळी तीन रुपये अनामत रकमेवर आणि चाळीस पैसे दरमहा वर्गणीवर बहुमोल व अद्यावत ग्रंथ वाचण्यास मिळत.

वाचनालयाच्या दैनंदिन कारभारात आणि निरनिराळ्या उत्सव समारंभात कार्यकारी मंडळाचे माजी सदस्य गो.ए. राजनेडकर यांचा वाटा मोठा आहे. त्यांची बदली तेथून मोर्शीला झाल्यामुळे वाचनालयाचे काहीसे नुकसान झालेले आहे. पु.द. बारबुद्धे सचिव म्हणून 1967 पासून नियुक्त झाले. त्या काळात कार्यकारी मंडळात पुढील व्यक्ती होत्या- आप्पासाहेब (रा.मे.) देशमुख- अध्यक्ष, राम शेवाळकर यांचे बंधू प्र.बा. शेवाळकर – उपाध्यक्ष, पुं.द. बारबुद्धे – सचिव, र.वा. तारे – सहसचिव, वि.न. बेटे, वि.उ. मुळे, प्र.म. पाठक, मा.रा. हिंगणीकर, पा.या. सरमुकादम हे सदस्य.

वाचनालयात पुस्तकांसाठी कार्डपद्धत होती. एकूण ग्रंथसंख्या तीन हजार तीनशेतीस होती. वृत्तपत्रे, साप्ताहिके आणि पाक्षिके वीस येत व मासिकांची संख्या पंधरापेक्षा अधिक असे. वाचनालयात सूचनापुस्तिका ठेवलेली असे. सभासदांच्या सूचनांची दखल घेऊन वेळोवेळी योग्य बदल केले जात. वाचनालयास जिल्हा ग्रंथपाल आणि ग्रंथालय उपसंचालक (नागपूर) ह्यांनी भेटी दिल्या होत्या. त्यांनी कार्याबाबत समाधान व्यक्त केले आहे.

वाचनालयाचे अध्यक्ष सुरेश देशमुख यांनी वाचनालयाच्या प्रगतीसाठी खूप कष्ट घेतले व वाचनालय पुढे नेण्याकरता मोलाचे योगदान दिले. त्यांचे निधन सप्टेंबर 2022 मध्ये झाले. ते वाचनालयाचे अध्यक्ष वीस-बावीस वर्षे होते. विद्यमान अध्यक्ष अनिल देशमुख हे त्यांचे बंधू. सुरेश व अनिल हे दोघेही वाचनालयाचे संस्थापक बाबासाहेब देशमुख यांचे नातू.

ग्रंथालयास तालुका ‘अ’ दर्जा आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट ग्रंथालय पुरस्कार वाचनालयास मिळाला आहे. सध्या ग्रंथालयातील ग्रंथसंख्या बत्तीस हजार सहाशे आहे. दुर्मीळ ग्रंथांची संख्या तेहेतीस आहे. ग्रंथालयातील सभासदसंख्या चारशेहून अधिक आहे. विद्यार्थी वर्गाकरता स्पर्धापरीक्षा अभ्यासिका कक्ष आहे- बाल विभागातील मुलांकरता उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये ‘ग्रीष्मकालीन बाल वाचन कक्ष’ सुरू करण्यात येतो.  ग्रंथालयाकडून झेरॉक्स सुविधा पुरवली जाते. ग्रंथालय सातही दिवस सुरू असते. ग्रंथालयातील वाचक सभासद, विद्यार्थिवर्ग यांच्याकरता ग्रंथालयामध्ये ग्रंथप्रदर्शन, चर्चासत्रे, निबंध स्पर्धा, तसेच स्पर्धा परीक्षा विभागातील विद्यार्थी वर्गाकरता नोकरी संदर्भ मार्गदर्शन करण्यात येते.

अनिरुद्ध गोरे हे वाचनालयाचे गेली तीन वर्षे सचिव आहेत. त्यांच्या मनी माजी अध्यक्ष सुरेश देशमुख यांच्याबद्दल हृद्य आठवणी आहेत. गोरे म्हणाले, की त्यांच्याकडे कोणत्याही बाबतींत ‘नकार’ हा नव्हताच. ते प्रत्येक योजना, घटना यांकडे ‘पॉझिटिव्हली’ पाहायचे आणि माझ्या सगळ्या वाचनालय सुधारणेच्या प्रस्तावांना होकार द्यायचे. गोरे म्हणाले, की मी सचिव झालो व सहा महिन्यांत कोरोना आला. त्यामुळे दोन वर्षे आम्ही काही करू शकलो नाही. आमची शाळा व वाचनालय, दोन्ही इमारती एकमेकींना लागून आहेत, त्यामुळे माझे दिवसातून दोन वेळा तरी वाचनालयात जाणे होते. त्यांच्या बोलण्यात असेही आले, की हल्ली ललित साहित्याचे वाचक संख्येने फारच रोडावले आहेत. मात्र स्पर्धा परीक्षांचे विद्यार्थी मोठ्या संख्येने वाचनालयात येतात. वाचनालयाने त्यांच्यासाठी एक मोठे कपाटभर साहित्य घेऊन ठेवले आहे. मुलांना बसून अभ्यास करण्यासाठी बसण्याची जागाही केली आहे. त्यांची संध्याकाळनंतर वाचनालयात झुंबड उडते.

रंजना नाईक 8087701173

—————————————————————————

About Post Author

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here