फलटण हे पुण्याजवळचे संस्थानी छोटे गाव, पण ते सांस्कृतिक दृष्टया पुण्यासारख्या शहरापासून फार वेगळे वाटत नाही. त्याचे श्रेय मालोजीराजे नाईक निंबाळकर या द्रष्ट्या समाजाभिमुख संस्थानिकाकडे जाते. त्यांचा राज्याभिषेक 15 ऑक्टोबर 1917 रोजी झाला. त्यांनी त्यांच्या हाती राज्य कारभार घेताच, तीन घोषणा दरबारात केल्या- स्त्रियांचे समान हक्क, हरिजनांना दरबारात प्रवेश आणि कुलाचार म्हणून देवीला मांस व मद्य यांच्या नैवेद्याला बंदी. तिन्ही घोषणा केवढ्या पुरोगामी व प्रगल्भ ! त्यावेळी त्यांचे वय होते अवघे एकवीस वर्षे. असा राजा फलटण गावाला शंभर वर्षांपूर्वी मिळाला हे त्या गावाचे भाग्यच म्हटले पाहिजे ! मालोजीराजे केवळ फलटणसाठी नव्हे तर महाराष्ट्रातील गरजू आणि वंचित लोकांसाठी उभे राहिले.
मालोजीराजांच्या उदारमतवादी विचारसरणीचे उदाहरण म्हणजे त्यांनी फलटणमध्ये पार्लमेंटही सुरू केले. संस्थानाचा कारभार पार्लमेंटच्या माध्यमातून सुरू करणारे मालोजीराजे हे काळाच्या दोन पावले पुढेच होते. त्यांनी पार्लमेंटच्या माध्यमातून फलटणमध्ये भविष्यातील लोकशाही व्यवस्थेचा पायाच घातला. विशेष म्हणजे नंतरच्या काळात फलटण नगरपालिकेमध्ये स्त्रियांचा सहभागही जाणीवपूर्वक वाढवण्यात आला; एवढेच नव्हे तर 1972 साली शैलजा शांतिलाल शहा या नगराध्यक्षपदी विराजमान झाल्या. अर्थात, ती पुढील काळातील गोष्ट, परंतु त्याची पदचिन्हे मालोजीराजे यांच्या काळात उमटू लागली होती.
मालोजीराजे यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेकानेक गोष्टी साधल्या. फलटण हा कायम दुष्काळी प्रदेश. तेथे पावसाच्या पाण्यावर अवलंबून राहणे म्हणजे दगडावर डोके आपटण्यासारखे होते. मालोजीराजे यांनी भाटघर धरणातून नीरा उजवा कालवा हा प्रकल्प पूर्ण करून शेतकऱ्यांना दिलासा दिला. त्यांनी तो प्रश्न त्यांच्या बुद्धिकौशल्याने सोडवला. त्यांनी त्यात राजकीय हक्क आणि तांत्रिक ज्ञान यांच्या मुद्यांवर काम केले. त्यासाठी त्यांनी जागतिक कीर्तीचे स्थापत्यशास्त्रज्ञ भारतरत्न सर विश्वेश्वरैय्या मोक्षगुंडम यांची मदत घेतली. विश्वेश्वरैय्या यांनी मालोजीराजांना सर्व पातळ्यांवर मदत केली आणि मोलाचा सल्ला दिला. त्यांनी त्यासाठी फलटण संस्थानाकडून कसलाही मोबदला घेतला नाही. त्या प्रकल्पामुळे फलटणच्या माळरानावर ऊस डौलात डोलू लागला.
मालोजीराजांना त्यांच्या भागात एकादा साखर कारखाना असावा अशी गरज भासू लागली. त्यांनी संस्थानातील श्रीमंत शेठजी मफतलाल; तसेच, उद्योगपती आपटे यांच्याशी बोलणी सुरू केली. साखर कारखान्यासाठी लागणाऱ्या सर्व सोयीसवलती देऊ केल्या. त्यांच्या प्रेरणेतूनच साखरवाडी येथील शुगर वर्क्स लिमिटेड या नावाचा पहिला खाजगी साखर कारखाना 1933 मध्ये अस्तित्वात आला. साखरवाडी येथे फलटण साखर कारखाना सुरळीत सुरू राहवा, त्याला ऊस कमी पडू नये यासाठी त्यांनी ऊसाच्या लागवडीसाठी तीस वर्षे मुदतीच्या कराराने जमिनी मिळवून दिल्या. लोकांच्या शेतात आडसाली, खोडवा ऊस भरपूर पिकू लागला. चांगले टनेज मिळू लागले. लोकांच्या हातात कधी नाही तो पैसा खेळू लागला. गाव श्रीमंत झाले.
मालोजीराजे आधुनिक विचारांचे होते. जगात काय काय सुरू आहे याचे अद्ययावत ज्ञान ते घेत असत. रशियात झालेल्या औद्योगिक आणि शेतीविषयक विकासाची त्यांना माहिती होती. त्यांनी त्र्याण्णव हजार किंमतीचा ट्रॅक्टर फलटणमध्ये 1933 मध्ये आणला होता. त्यांनी त्या द्वारे आधुनिक शेतीपद्धतीचा पाया घातला. विशेष म्हणजे, तो ट्रॅक्टर आशिया खंडातील पहिला ट्रॅक्टर होता.
शेतीशाळा ही अभिनव कल्पना त्यांच्याच कारकिर्दीत फुलली व बहरली. फलटण परिसरातील शेतकऱ्यांची मुले आधुनिक शेतीचे धडे त्या शाळेत गिरवू लागली. शेतकऱ्यांनी आधुनिक पद्धतीने किफायतशीर शेती करावी, स्वतःचा विकास करून घ्यावा या तळमळीतून त्यांनी 1 ते 3 डिसेंबर 1929 या कालावधीत फलटणला तीन दिवसांचे शेतीविषयक प्रदर्शन भरवले. त्यांनी भाजीपाला, फळे, दूधदुभते, ऊस पिके, खते अशा एकूण चौदा विभागांतून आधुनिक शेती कशी करावी याविषयीची माहिती संस्थानातील शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिली, आधुनिक शेतीची प्रेरणा दिली, परिणामी फलटणमधील शेती हिरवीगार झाली. पाण्याच्या समृद्धतेने फलटणमध्ये शेतीव्यवसाय भरभराटीला आला. बागायती क्षेत्र वाढीस लागले. मालोजीराजांनी ऊस संशोधन केंद्र पाडेगाव येथे 1931 साली सुरू केले. ऊस हे नगदी पीक असल्यामुळे लोक मोठ्या प्रमाणावर ऊस लावू लागले.
मालोजीराजे यांनी आधी दि फलटण बँक लिमिटेड ही आणि नंतर दुसरी श्री लक्ष्मी सेंट्रल को ऑपरेटिव्ह बँक या 1926 साली स्थापन करून शेतकरी आणि इतर संलग्न लोक यांना कर्ज कमी दरात उपलब्ध करून दिले. त्यामुळे संस्थानातील अर्थव्यवस्थेस विधायक वळण मिळाले; तसेच, शेतकऱ्यांची खाजगी सावकारांच्या पिळवणुकीपासून सुटका व्हावी यासाठी संस्थानात सहकारी पतपेढ्या आणि सोसायट्या निर्माण केल्या. फलटणचा श्रीराम सहकारी साखर कारखाना हेही त्यांच्याच दूरदृष्टीचे फलित होय. राजांनी सहकार हा शब्द समाजापर्यंत पोचवला.
मालोजीराजे यांच्या मनात शिक्षणाविषयी आस्था होती. त्यांनी एकोणिसाव्या शतकाच्या प्रारंभीच फलटण संस्थानामध्ये शाळा, महाविद्यालये सुरू केली, तसे पाहिले तर मुधोजीराजांनी संस्थानात शैक्षणिक संस्थांचा पाया घातला होता. परंतु, कालानुरूप ती व्यवस्था कमी पडू लागली होती. समाजातील मोठा भाग अजूनही शिक्षणापासून दूर आहे, लोकांमध्ये शिक्षणाचे महत्त्व रूजलेले नाही, हे लक्षात आल्यावर, मालोजीराजांनी फलटण नगरपालिकेतील क्षेत्रात सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाचा कायदा केला. तो कायदा 9 सप्टेंबर 1918 रोजी पास झाला आणि फलटणच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडली. सक्तीच्या शिक्षणाच्या कायद्यामुळे संस्थानात शाळांची संख्या व परिणामी विद्यार्थ्यांची संख्या वाढू लागली. घरोघरी पालक मुलांना शाळेत घालू लागले. त्यांनी मुधोजी हायस्कूलमध्ये कवी गिरीश यांच्यासारखे विद्वान गृहस्थ शिक्षक म्हणून आणले.
मुधोजीराजांच्या काळापासूनच मुलींना आणि हरिजनांना मोफत शिक्षण सुरू केले होते. ते व्यवस्थित मिळत आहे, की नाही हे बघण्याची जबाबदारी मालोजीराजांनी संस्थानचे दिवाण रावसाहेब गोडबोले यांच्यावर सोपवली. मोफत शिक्षण देऊनही आर्थिक मागास वर्गातील विद्यार्थ्यांच्या समोर शिक्षण घेण्यात अडचणी उभ्या राहत. त्यातून मार्ग काढण्यासाठी मालोजीराजे यांनी ‘युवराज प्रतापसिंह गरीब विद्यार्थी शैक्षणिक फंड’ स्थापन केला.
फलटण, बारामती, माळशिरस, माण आणि खटाव तालुक्यांतील शेतकऱ्यांच्या गरीब मुलांना महाविद्यालयीन शिक्षण मिळावे याकरता महाविद्यालयासाठी इमारतीचा प्रश्न उभा राहिला, तेव्हा त्यांनी स्वतःचा राहता राजवाडा महाविद्यालयासाठी दिला. त्या मुधोजी मनमोहन राजवाड्यामध्ये ‘मुधोजी महाविद्यालय’ 20 जून 1957 रोजी स्थापन केले. अशा प्रकारे मुधोजी कॉलेज उभे करून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षणाची गंगोत्री खुली केली. ते राजवाड्यात तिसऱ्या मजल्यावर राहत. विद्यार्थ्यांचा आरडाओरडा, इतर सर्व गडबड यांचा बाऊ न करता महाविद्यालयातील सर्व उपक्रमांना प्रोत्साहन देत.
त्यांना शिक्षणाविषयी एवढे प्रेम होते, की नंतरच्या काळात त्यांच्या प्रोत्साहनामुळे त्यांच्या पत्नी लक्ष्मीदेवी राणीसाहेब आणि रामराजे यांच्या पत्नी रेखादेवी या दोघी सासुसुना एकाच वेळी पुण्यात एसएनडीटी महाविद्यालयात पदवीचे शिक्षण घेत होत्या.
मालोजीराजांच्या औदार्याचा अनुभव पुण्यासारख्या महानगरानेही घेतला आहे. किंबहुना, त्यांची पुण्यावर मेहेरनजर होती. त्यांनी महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या ब्याऐंशीव्या वाढदिवसाच्या समारंभाचे आयोजन 19 एप्रिल 1939 रोजी फलटण येथे केले आणि त्या समारंभात त्यांनी ल.र. परांजपे, न.चिं. केळकर, कवी माधव ज्यूलियन अशा विद्वानांचा सत्कार केला. त्या विद्वानांच्या कार्याचा आदरसत्कार करण्याच्या हेतूने त्यांनी महर्षी कर्वे यांना तहहयात सहाशे रुपयांचे वर्षासन सुरू केले. त्यांनी धोंडो केशव कर्वे यांच्या हिंगण्याच्या आश्रमाला सढळ हाताने मदत केली. त्यांचा मोठा आधार पुण्याच्या श्री छत्रपती शिवाजी प्रिप्रेटरी मिलिटरी स्कूललाही होता. पुण्याच्या ‘महाराष्ट्र साहित्य परिषदे’नेही त्यांच्या दातृत्वाचा अनुभव घेतला आहे. त्यांनी ‘सेवासदन’, ‘भांडारकर’ या संस्थांच्या कार्याचे मोल जाणून त्यांना आर्थिक मदत केली. राजांच्या उदार देणगीमुळे पुण्याचे ‘विशाल सह्याद्री’ हे वर्तमानपत्र दीर्घकाळ चालू राहू शकले. त्यांनी त्यांची साताऱ्याची जमीन ‘रयत शिक्षण संस्थे’ला दान देऊन कर्मवीरांच्या शिक्षणप्रसाराला हातभार लावला. ते ‘रयत शिक्षण संस्थे’सारख्या सामाजिक कार्य करणाऱ्या संस्थांना सढळ हाताने मदत करत असत.
फलटण संस्थानातील प्रजेने समाजातील थोर व्यक्तींचे दर्शन घ्यावे, त्यांचे कार्यकर्तृत्व त्यांना समजावे यासाठी ते तशा अनेक व्यक्तींना फलटणमध्ये निमंत्रित करत असत. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांनीदेखील फलटण संस्थानाला 28 जुलै 1941 रोजी भेट दिली होती. त्यावेळी ते बनारस विद्यापीठाचे कुलगुरू होते. त्यांनी मालोजीराजे यांच्याकडे विद्यापीठासाठी देणगी मागितली. तेव्हा मालोजीराजांनी त्यांना सांगितले, “देणगी नक्कीच देता येईल, परंतु त्याआधी तुम्हाला फलटणला येऊन आमच्या लोकांना एक व्याख्यान द्यावे लागेल. त्यामुळे फलटणमधील लोकांना बनारस विद्यापीठाच्या कार्याची ओळख होईल, तुमच्या उपदेशाचा फायदा त्यांना मिळेल आणि तुम्हाला जी देणगी द्यायची त्या कृतीला एक प्रकारे लोकांचा पाठिंबाही मिळेल !” मालोजीराजांच्या त्या उद्गारांनी राधाकृष्णन प्रभावित झाले.
मालोजीराजांना त्यांच्या कामात पत्नी लक्ष्मीदेवी नाईक निंबाळकर यांची समर्थ साथ मिळाली. त्यांना संत साहित्याची विशेष आवड होती. त्यांनी फलटण संस्थानात ‘महिला मंडळा’ची स्थापना केली.
मालोजीराजे यांचा स्त्रियांबद्दलचा दृष्टिकोन सुधारकी, समतेचा होता. मालोजीराजांनी दीपावलीच्या पाडव्याला राज्यारोहण 1917 साली केले, त्या समारंभात त्यांनी लक्ष्मीदेवी यांना आग्रहाने स्वतःसोबत येण्याची विनंती केली. ज्या काळात राजघराण्यातील स्त्रीचे नखसुद्धा लोकांच्या दृष्टीस पडू नये याची दक्षता घेतली जाई, त्या काळात मालोजीराजांनी लक्ष्मीदेवींसह दरबारात प्रवेश केला ! त्यांनी त्यांची भूमिकाही दरबारात स्पष्ट केली. ते म्हणाले, “आम्हाला संस्थानात अनेक सुधारणा करायच्या आहेत. मुख्य म्हणजे स्त्रियांना समान हक्क देणे, हरिजनांना दरबारात आणि सर्वत्र प्रवेश देणे; तसेच, कुलाचार म्हणून आमच्या घराण्याकडून देवीला मांस आणि दारू यांचा नेवैद्य पाठवला जात होता, ती पद्धत आम्ही राज्यारोहण समारंभाच्या निमित्ताने बंद करत आहोत.”
मालोजीराजांनी हरिजनांसाठी फलटणमधील श्रीराम मंदिर आणि इतर मंदिरे खुली केली. ते म्हणत, “मी हिंदुस्तानातील एक हिंदी मनुष्य आहे. मला निराळी अशी जात नाही. हिंदी हीच माझी जात आणि राष्ट्र हेच माझे दैवत आहे.”
ब्रिटिश काळात संपूर्ण भारतात मिळून सुमारे पाचशेत्रेसष्ट संस्थाने होती आणि त्या संस्थानांचे म्हणून काही प्रश्न होते. त्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी मोंटेग्यू-चेम्सफर्ड यांनी केलेल्या शिफारसीनुसार नरेंद्र मंडळ 8 फेब्रुवारी 1921 रोजी स्थापन करण्यात आले. त्या मंडळात अभ्यासू सभासद म्हणून मालोजीराजे यांना आदर आणि मान मिळाला. त्यांनी सरकारसमोर छोट्या संस्थानांचे प्रश्न मांडले. त्यांनी नरेंद्र मंडळात उत्तरेकडील संस्थानांच्या बरोबरीने दक्षिणी संस्थानांना मान मिळवून दिलाच; परंतु त्या माध्यमातून त्यांनी दक्षिणी संस्थानांशी सहकार्य करून सर्व संस्थानांची प्रगती साधण्यात हातभारही लावला.
मालोजीराजे यांची बुद्धी चौकस होती. त्यामुळेच त्यांना त्यांच्या संस्थानाच्या पलीकडे देशात काय सुरू आहे, समाज सुधारणेचे कोणते प्रयत्न कोण करत आहेत, याचे व्यवस्थित ज्ञान होते. समाजसुधारकांबद्दल त्यांच्या मनात आदर होता. देशातील संस्थाने विलीन करण्याचा फतवा निघाला तेव्हा सर्वांत पहिल्यांदा त्यांनी त्यांचे संस्थान भारतात विलीन केले. देशाच्या स्वातंत्र्यात राजेपण विसर्जित करणारा अग्रणी असा तो राजा होता. त्यांनी देशाच्या स्वातंत्र्यातच संस्थानाचे हित आहे हे ओळखले. त्यांनी संस्थानाचा सर्व खजिना तिजोरीतील सहासष्ट लाख रुपयांसहित भारत सरकारकडे सुपूर्त केला. नि:स्पृहपणाची ही कमाल होती ! मालोजीराजे यांच्या या त्यागाची जाणीव वल्लभभाई पटेल यांना होती. त्यांनी मालोजीराजे यांना स्वतंत्र भारतातील मुंबई राज्याच्या पहिल्या मंत्रिमंडळात महत्त्वाचे स्थान दिले. मोरारजी देसाई यांच्या मंत्रिमंडळात मालोजीराजे यांनी पीडब्ल्यूडी आणि सिंचन विभाग सांभाळले.
त्यांनी त्यांच्या कार्यकुशलतेने सर्वांचा विश्वास संपादन केला. त्यात गांधी, मोरारजी देसाई यांच्यापर्यंत मोठमोठ्या नेत्यांचा समावेश होतो. मालोजीराजे ‘अजातशत्रू’ होते.
त्यांचे आर्थिक तरतुदींची मर्यादा काटेकोरपणे पाळत कोट्यवधी रुपयांच्या योजना वेळेत पूर्ण करण्याचे कौशल्य वाखाणण्यासारखे होते. त्यांचे कामाच्या दर्ज्याकडेही बारीक लक्ष असे. कोयना धरण हे पश्चिम महाराष्ट्राचे वरदान; ते त्यांच्याच मंत्रिपदाच्या कारकिर्दीत उभे राहिले. त्यांनी मंत्रालयाच्या इमारतीचे काम सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून त्यांच्या कार्यकाळात पार पाडले. नीरा राईट बॅक कॅनॉल, वीर तसेच बाणगंगा, गुजराथमधील उकाई धरण योजना, हेळवाकचा (तालुका पाटण) जलविद्युत प्रकल्प, फलटण एज्युकेशन सोसायटी, मुधोजी क्लब ही कामगिरी त्यांच्या नावावर आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारुढ पुतळा प्रतापगडावर उभारावा हा शासनाचा निर्णय तडीस नेण्यात त्यांचा मोलाचा सहभाग होता. त्यांनी प्रतापगडावर पुतळा उभा राहिल्यावर त्याच्या उद्घाटनाला पंतप्रधान पंडित नेहरू यांना आमंत्रित केले व लोकोत्तर कामगिरी केलेल्या राजाचे दर्शन नेहरूंना घडवले आणि छत्रपतींच्या देदीप्यमान इतिहासाची जाणीवही करून दिली. त्यांचे फलटणच्या नागरिकांवर पुत्रवत प्रेम होते.
मालोजीराजे यांचे निधन पुण्यात 14 मे 1978 या दिवशी झाले, तेव्हा संपूर्ण सातारा जिल्ह्यात दुःखाची लहर उसळली. जनतेवर प्रेम करणाऱ्या त्या राजावर जनतेनेही तेवढेच उत्कट प्रेम केले. त्यांचा पूर्णाकृती ब्राँझचा पुतळा फलटणमध्ये 8 जानेवारी 1983 रोजी अधिकारगृहाच्या सुंदर इमारतीच्या कमानीपाशी उभारण्यात आला आहे.
– केशव साठये 9822108314 keshavsathaye@gmail.com
(आधार – अंजली कुलकर्णी यांच्या ‘अजिंक्य राजा’ पुस्तकाद्वारे)
———————————————————————————————————————————-