परतवाडा सुपर ! (Many many good old memories of Paratwada-Amaravati ST bus)

5
645

“फलाट क्रमांक तीन वर लागलेली गाडी ही सहा वाजताची परतवाडा सुपर बस असून बस प्रवासात मध्ये कोठेच थांबणार नाही. परतवाड्याला थेट जाणाऱ्या प्रवाशांनीच गाडीत बसून घ्यावे !” अशी घोषणा लाऊडस्पीकरवरून अमरावती बस स्थानकाच्या बाहेरसुद्धा ऐकू येई आणि प्रवाशांची पावले जलदगतीने बसकडे वळत !

परतवाडा एसटी डेपोने अमरावती विनाकंडक्टर बस 1980 च्या सुमारास सुरू केली आणि ती बस प्रचंड लोकप्रिय झाली ! त्याआधी अमरावतीला जाणाऱ्या बस भूगाव आसेगाव, पूर्णानगर, वलगाव अशा ठिक ठिकाणी थांबत आणि मजल-दरमजल करत अमरावतीला पोचत किंवा परत येत ! अमरावती हे जिल्ह्याचे ठिकाण असल्यामुळे परतवाड्याहून अमरावतीला जाणारे लोक खूप असत. व्यापारी, नोकरदार, विद्यार्थी, कोर्टकचेरीवाले, हॉस्पिटलला जाणारे… लोक अनेक असत ! त्यांना अमरावतीला लवकरात लवकर पोचून, कामे आटोपून पुन्हा रात्रीच्या आधी घरी परतायचे असे ! त्यांच्यासाठी ही ‘सुपर’ बस म्हणजे वरदानच ठरली ! या बसेस परतवाडा आणि अमरावती या ठिकाणांहून दर एक तासाने निघत.

संध्याकाळी सहाच्या अमरावती-परतवाडा ‘सुपर’मध्ये खिडकीजवळची जागा मिळणे म्हणजे एखादे अढळपद मिळाल्यासारखे वाटे ! ते मग खिडकीतून ज्या लोकांना जागा मिळाली नाही, त्यांच्याकडे तुच्छतेने पाहत ! पण बहुतेक मंडळी एकमेकांना चांगली ओळखत असल्यामुळे “अबे, माझ्यासाठी जागा ठेव जो” अशी विनंतीही करण्यात येई. मी त्यावेळी अमरावतीला शिकत होतो आणि दर शनिवार-रविवारी घरी परतवाड्याला धाव घेत असे. त्यामुळे शुक्रवारी संध्याकाळी सहाच्या बसमध्ये खिडकीजवळची जागा मिळणे म्हणजे मोठा पराक्रम गाजवण्यासारखे वाटे !

अमरावती ते परतवाडा हे अंतर जेमतेम पन्नास किलोमीटर आणि प्रवास एक तासाचा ! पण तो मनावर कायमचा कोरला गेलेला आहे. बाकी गाड्या अमरावती शहरातून गर्दीतून वाट काढत जात, ‘सुपर’ बस मात्र त्याला अपवाद होती ! ती बस गाडगेनगर, विदर्भ महाविद्यालय, इंजिनीयरिंग कॉलेज या रमणीय मार्गाने, भन्नाट वेगाने अमरावती शहरातून बाहेर पडे. वृक्षांच्या रांगा संपूर्ण रस्त्यावर दुतर्फा होत्या. त्यामुळे थंड, स्वच्छ वाऱ्याच्या झुळका बसमध्ये येत. त्यावेळी एसी बसची संकल्पना नव्हती, पण अनुभव एसीसारखाच येई.

बस निघताना कंडक्टरने वारंवार “ही बस वलगाव, आसेगावला थांबणार नाही” असे सांगूनही वलगाव, आसेगावला जाणारे काही भिडू सुपर बसमध्ये निघत ! ती मंडळी बसमधील मागील सीटवर जाऊन बसत आणि बस स्थानकाच्या बाहेर पडेपर्यंत काहीच बोलत नसत. कंडक्टरलाही या सगळ्या गोष्टींचा अनुभव असल्यामुळे तो मागील बाकापासूनच तिकीट फाडायला सुरुवात करे! त्यावेळी तसे भिडू बरोबर पकडले जात. त्यावेळी त्याच्या सात नाही, तरी मागील काही पिढ्यांचा उध्दार होई. मग त्याचे काय करायचे यावर बसमधील सगळ्या प्रवाशांमध्ये सामूहिक चर्चा होई. काही लोकांच्या मते त्याला पुढच्या स्टॉपवर उतरवून द्यावे, काही म्हणत की जाऊ द्या, परतवाड्याचे तिकीट घेऊन वलगाव किंवा आसेगावच्या जवळ उतरवावे! मग कंडक्टर त्या प्रवाशाचेही मत विचारी! त्याच्याजवळ परतवाड्यापर्यंत तिकीटाचे पैसे असतील तर त्याला गावाजवळ उतरण्याचा पर्याय दिला जाई! नाहीतर त्याला गाडगेनगर किंवा दुसऱ्या एखाद्या स्टॉपवर उतरवले जाई. तो उतरेपर्यंत बसमधील सगळे प्रवासी त्याच्याकडे पाहत. तोही हार न मानता, त्याचा कसा गैरसमज होऊन तो सुपर बसमध्ये बसला हे सांगे! कधी कधी त्याच्याजवळ तिकीटाचे पैसे नसले तर एखादा माणूस उदारपणे त्याचे तिकीटही काढे! पण असा प्रकार कधी घडला तर त्या दिवशी बसचा प्रवास रंजक होऊन जाई! तो माणूस उतरून गेला तरी लोक त्याच्याबद्दल वलगाव येईपर्यंत चर्चा करत असत !

बस बघता-बघता वडगावच्या पुलाजवळ येऊन पोचे. बसमध्ये उजव्या बाजूला बसलो तर गाडगेबाबांच्या स्मरणस्थळाचे आणि आश्रमाचे दर्शन होई. नदीला पाणी असेल तर वडगावच्या पुलावरून जाताना खूपच मजा येई. बसमधील अर्धे प्रवासी थंड वाऱ्यामुळे वडगाव पार होईपर्यंत गाढ झोपी जात. फार उत्साही मंडळीच जागी राहून बाहेर बघत. ‘सुपर’ बस पूर्णानगर, आसेगावला काही मिनिटांतच येऊन पोचे. आसेगाव ही अर्धे अंतर कापल्याची खूण ! आसेगाव आले की बरेच प्रवासी मधूनच झोपेतून उठून ‘आसेगाव आले का?’ असे विचारत. त्यामुळे त्यांना अर्धे अंतर कापल्याचे समाधान मिळे. ‘मागे गेले’ असे उत्तर मिळाले की ते परत डोळे मिटून झोपण्यास मोकळे ! गाडी भूगावला मग अजून एक डुलकी घेईपर्यंत पोचे.

सुपर बस भन्नाट वेगाने अमरावती शहरातून बाहेर पडे. वृक्षांच्या रांगा संपूर्ण रस्त्यावर दुतर्फा होत्या. त्यामुळे थंड, स्वच्छ वाऱ्याच्या झुळका बसमध्ये येत असत.

तोपर्यंत संध्याकाळ गर्द झालेली असे आणि थोडा अंधार पडलेला असे. इवलेसे भूगाव हे गाव मागे टाकून, बस भूगावच्या पुलावरून वळण घेई ! भूगावच्या नदीला कधी पाणी नसे, पण पाऊस वगैरे चांगला असेल तर नदीला पाणी कधीकधी दिसेसुद्धा ! मग पुलावरून बस जाताना ‘चांगले पाणी आहे यावर्षी नदीला’ असे काही कौतुकास्पद उद्गारही निघत.

भूगाव मागे पडले, की झोपलेली नेहमीची सराईत मंडळी जणू अकस्मातपणे जागी होत ! काहीजण डोळे चोळत, काहीजण सामान व्यवस्थित आहे ना याची खात्री करून घेत, आया मुलांना उठवून स्वेटर वगैरे घालू लागत ! कारण परतवाड्याची चाहूल लागलेली असे, परतवाड्याचे लाईट दुरून दिसू लागत ! त्यातही ज्या मंडळींना अचलपूर फाट्यावर उतरायचे असे, ती मंडळी सरसावून बसत. बस सुपरफास्ट असल्यामुळे ती काही वेळातच तोंडगाव फाटा, अचलपूर नाका पार करून अचलपूर फाट्याला थांबे. अमरावती सोडल्यानंतरचा तो पहिलाच थांबा ! काही लोक तेथे उतरत आणि बस मग पुढे मार्गस्थ होई. एव्हाना बसमधील दिवे लागलेले असत. साधारणतः दिवेलागणीच्या सुमारास ‘सुपर’ बस परतवाडा बस स्थानकावर येऊन थांबे !

तीच बस जर अमरावतीला परत जात असेल तर मग प्रवास करून आलेले लोक बसमधून उतरण्याच्या आधीच, जाणारे लोक दाराजवळ चढण्यासाठी गर्दी करत. एकच झुंबड उडे. बसमधून उतरलेले प्रवासी वेगवेगळ्या मार्गाने त्यांच्या त्यांच्या घराचा रस्ता पकडत ! बरेचसे लोक चालतच घराकडे निघत. त्यावेळी परतवाड्यात ऑटो रिक्षा नव्हत्या, साध्या रिक्षा मात्र खूप होत्या ! त्या सायकलरिक्षात बसून घराकडे प्रवास सुरू होई. गाव लहान असल्यामुळे रिक्षावाले सगळ्यांनाच ओळखत. त्यामुळे पत्ता सांगण्याचे काम पडत नसे. रिक्षावाले ‘काय भाऊ खूप दिवसांनी आज गावाकडे?’ किंवा ‘ताई, सध्या कोणत्या गावाला असता?’ अशी आपुलकीने विचारपूस करत ! रिक्षा परतवाड्याची बाजारपेठ पार करून घराजवळ येऊन थांबे आणि तो संस्मरणीय प्रवास संपे !

मी हा प्रवास कितीतरी वर्षे, कितीतरी वेळा केला आहे. पण प्रत्येक वेळी कधी एकदा घरी पोचतो असे वाटे ! घरी येताच आईची विचारपूस, आजीने केलेले लाड, बाबांची चौकशी सुरू होई ! प्रथम गरमागरम चहा आणि मग कांद्याचे थालीपीठ किंवा दुसरा एखादा आवडीचा पदार्थ, या सगळ्यामुळे त्या प्रवासाचा शीण काही क्षणांतच दूर होई.

‘सुपर’ बस हे परतवाड्याचे सांस्कृतिक केंद्र झाले होते. जे लोक एरवी कधी भेटत नसत, ते बसमध्ये अवश्य भेटत ! जुने शिक्षक, जुने मित्र, गावातील सन्माननीय व्यक्ती, लग्न होऊन परगावी गेलेली एखादी ताई… असे अनेक लोक बसमध्येच भेटत. एखादा जुना मित्र भेटला तर मग गप्पांमध्येच एक तासाचा प्रवास संपून जाई आणि पुन्हा ‘सुपर’मध्ये भेटण्याचा वायदा होऊनच प्रवास संपे ! बसमध्ये शिक्षक, वयोवृद्ध व्यक्ती असली किंवा महिला असली तर तिला उठून जागा देण्याचे सौजन्य लोकांमध्ये होते ! एखादे शिक्षक जर बसमध्ये भेटले तर सध्या कोठे असतो, काय करतोस याची आस्थेने चौकशी करत ! बसमधील बहुतेक लोक एकमेकांना ओळखत असल्यामुळे तो जणू एका मोठ्या कुटुंबातील लोकांनी एकत्र केलेला प्रवास वाटे ! तेवढेच काय, तर बसचे चालक-वाहकही त्या मोठ्या कुटुंबाचाच एक भाग असत ! त्यांनाही बहुतेक सगळे लोक ओळखत आणि ‘एवढ्यात या बसवर दिसला नाहीत?’ अशी त्यांचीही चौकशी होई. असे ते दिवस होते !

नंतर, काही वर्षांनी परतवाडा सुटले. नागपूर, मुंबई शिक्षणासाठी-पोटासाठी गाठावी लागली आणि शेवटी, दूरवरच्या बंगलोरमध्ये बस्तान बसवले आहे. माणसाच्या नशिबाच्या रेषा किती विचित्र असतात ! माणसाला कोठूनही कोठेही घेऊन जातात ! आईसुद्धा माझ्यासोबतच बंगलोरला येऊन राहिली. आम्ही परतवाड्याचे घर विकले आणि परतवाड्याशी असलेला संपर्क कमी झाला. आईपण हे जग दोन वर्षांपूर्वी सोडून गेली !

मी गेल्या काही वर्षांमध्ये अमेरिका, इंग्लंड, स्वीडन, ऑस्ट्रेलिया अशा अनेक देशांमध्ये, वेगवेगळ्या प्रकारच्या वाहनांमध्ये प्रवास केला आहे. पण परतवाडा ‘सुपर’ने केलेला हा प्रवास मात्र मनात कायमचा रुतून बसला आहे ! ते गाव, तेथील माणसे, मित्रमंडळी, आमचे ते घर आणि तेथील आठवणी हृदयात नेहमीसाठी घर करून बसल्या आहेत !

या वर्षीच्या सुरुवातीला अनेक वर्षांनंतर परतवाड्याला कुटुंबीयांसोबत गेलो होतो. आम्ही चांदूरबाजार मार्गाने कारने परतवाड्यात प्रवेश केला. आम्ही तोंडगाव मंदिर, अचलपूर नाका, अचलपूर फाटा, विदर्भ मिल्स, बसस्थानक, जयस्तंभ चौक पार करत गावात शिरलो. गाव ओळखू येऊ नये इतके बदलले आहे. सगळीकडे दुकानेच दुकाने !  बऱ्याच लोकांजवळ कार दिसत होत्या. काही चेहरे ओळखीचे वाटले. पण आता, अनोळखी चेहरेच जास्त !

आमच्या जुन्या घरातही गेलो. तेच घर, तेच घराचे फाटक, स्वयंपाकघर, देवघर… सगळे तसेच होते, पण जीवापाड प्रेम करणारी आपली माणसे मात्र कोठेच नव्हती ! विशेषतः आईची उणीव प्रकर्षाने जाणवली आणि डोळ्यांत पाणी दाटून आले ! मी काही क्षणांतच तेथून बाहेर पडलो !

दूर कोठेतरी रफीचे विद्ध करणारे गाणे मनात जागे झाले.

जिनके साथ लगाये तूने अरमानो के मेले,
भिगी आखो से ही उनकी, आज दुवाये ले ले !
किस को पता अब इस नगरीमे कब हो तेरा आना !
चल उड जा रे पंछी, की अब ये देस हुआ बेगाना !

– अविनाश चिंचवडकर 9986196940 avinashsc@yahoo.com­
———————————————————————————————-

About Post Author

5 COMMENTS

  1. भैया, फार सुंदर वर्णन केलेस. तुझ्या प्रवासाचे चित्र डोळ्यासमोर उभे राहिले. या प्रवासातील लोकांचे आपलेपण, वाटेतील ओळखीची ठिकाण आणी घराची ओढ हे सर्व दुसर्‍या कोणत्याच प्रवासाती मिळणे अशक्य. गेलेले जुने दिवस आणी त्या रम्य आठवणी पुन्हा येणे नाही…..वो फीर नही आते…. 😔🙏

  2. लेख खूप छान लिहीला आहे. लाल,पिवळ्या एस.टी.चा फोटो जुन्या आठवणींना ऊजाळा देणारा.

  3. ‘परतवाडा सुपर’ – अतिशय वाचनीय लेख! आपण स्वतःच त्या काळात गेल्यासारखी भावना होते. तो अनुभव आपणच जणू घेतो. हेच या ठिकाणी लेखकाचे यश आहे.

  4. खूपच सुंदर लेखन! मी मूळचा अंजनगाव सुर्जीचा असल्याने मी ही ‘परतवाडा सुपर’ने प्रवास केला आहे त्यामुळे मी सुध्दा अंजनगावला लवकर पोचत असे. हा लेख वाचताना मी त्या जुन्या कॉलेजच्या दिवसांच्या आठवणीत रमून गेलो. मला पुढे अंजनगावला जायला आणखी एक तास लागायचा. पण परतवाडा सुपरमुळे घरी एक तास लवकर पोचलो याचे खूप समाधान वाटायचे. आणि घरचे लोक पण अरे लवकर पोहोचला! असे म्हटल्यावर मी पण “परतवाडा सुपरने आलो” असे खूष होऊन उत्तर देत होतो. असो. खूप छान अनुभवलेख! लेख वाचताना अमरावतीहून परतवाडा सुपरने सुपर फास्ट प्रवास केला असे वाटते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here