मुरुडकरांची भाषा !

1

माझ्या मुरुड गावच्या गावकऱ्यांची भाषा अगदी रोखठोक ! ते बोलताना नाकाचा वापर करतात की काय, असे ऐकणाऱ्याला वाटेल. त्यांनी बरेचसे शब्द मोडून घेऊन मुखात बसवलेले आहेत. म्हणजे घ्यायचं, द्यायचं, करायचं असे म्हणायचे असेल तर ते घैचं, दैचं, कराचं असे बोलतात. हे मुरुड गाव आहे दापोली तालुक्यात. श्री.ना. पेंडसे हे कादंबरीकार आमच्या गावचे. ते प्रादेशिक लेखक म्हणून मराठी साहित्यविश्वात प्रसिद्ध झाले, त्यांच्या त्या लेखनातील एक घटक आमची ही भाषा हा होय.

गावात कोणी कोणाला हाक सरळ नावाने मारत नाही. कोणी तशी हाक मारली तर ऐकणाराही ‘ओ’ देत नाही. म्हणून सीतारामला ‘शित्या’, परशुरामला ‘पर्शा’ असे पुकारले, तरच तो पुकारा त्या त्या व्यक्तीच्या कानात शिरतो !  नावाचा उच्चार विशेषणाने करणे हा येथील आणखी एक विशेष आहे. हे विशेषण त्या माणसाच्या विशिष्ट कृतीवरून किंवा त्याच्या घराण्यात घडलेल्या एखाद्या गोष्टीवरून दिले जाते. उदाहरणार्थ, नाटकाची अती हौस असलेल्या एखाद्या दत्तात्रय नावाच्या माणसाला ‘नाटकी दत्तू’ म्हणून ओळखले जाते. नारळांचा मोठा व्यापारी असलेल्या मधू नावाच्या माणसाला ‘नारळी मधू’ म्हटले जाते. विवाहित स्त्रीचा उल्लेख तर तिच्या नवऱ्याच्याच नावाने होतो. म्हणजे नवऱ्याचे नाव ‘शिवराम’ असेल तर पत्नीला ‘शिवरामी’ असे म्हणतात. स्वतः पैसे देऊन एखाद्या घरी राहिलेल्या व्यक्तीला, म्हणजे ‘पेईंग गेस्ट’ माणसाला चक्क ‘पोष्ण्या’ म्हणून ओळखतात !

निराळ्या नावाने पुकारण्याच्या गावाच्या सवयीने खुद्द देवालाही सोडलेले नाही. देवळामधील देवाचा उल्लेख त्याच्या नावाने न करता फक्त ‘श्री’ असे म्हटले जाते. ‘श्रीच्या देवळात’, ‘श्रीला अर्पण’, ‘श्रीच्या आशीर्वादाने’ असे उल्लेख येतात. अशा तऱ्हेने जवळपास प्रत्येक व्यक्तीला तिच्या मूळ नावापेक्षा इतर नावानेच गावात अधिक ओळखले जाते.

दिवसभरात तोंडातून एकही शिवी गेली नाही, तर तो निश्चितच या गावचा नव्हे ! सांगण्याची गोष्ट शिव्यांच्या वापराने ऐकणाऱ्याच्या मनी व्यवस्थित ठसली जाते, असा आमच्या गावचा दृढ समज असावा. अगदी प्रेमाने सांगितलेल्या गोष्टीतही शिवी ही येणारच.

लोकांच्या तोंडून येणारे वाक्प्रचार, खास लक्ष द्यावे असे आहेत. त्यातील वानगीदाखल अर्थासह पाहू या- ‘बोडकीला न्हाव्याची लाज कशाला?’ बोडकी म्हणजे पतिनिधनानंतर केशवपन केलेली स्त्री. थोडक्यात, ताकाला जाऊन गाडगे लपवणे अशा अर्थी. ‘बेत बाजीरावाचे प्रकाश सनकड्यांचे’. अर्थ असा, की हाती काहीच नाही, पण स्वप्न मात्र भलीमोठी रंगवायची. सनकड्या म्हणजे काटक्याकुटक्या. पूर्वी, अगदी गरीब कुटुंबांच्या घरात त्या पेटवून उजेडाची गरज कशी तरी भागवली जायची ! ‘भट सांगेल, ती आमुश्या (अमावस्या), न्हावी ठेवील त्या मिशा, राजा दाखवेल ती दिशा’. एखादी गोष्ट अगदी अपरिहार्यपणे स्वीकारावी लागणे अशा अर्थी ही म्हण आहे. ‘चौघांत मरण लग्नासमान’ सगळ्यांच्या बरोबरीने दुःख आले, तरी आनंदासारखे मानणे ! या म्हणीला जोडून दुसरी एक म्हण प्रचलित आहे, ती अशी- ‘मेहुणीच्या लग्नात जावई कस्पटासमान’ मेहुणीच्या लग्नाच्या वेळी दुसऱ्या जावयाचे स्वागत करण्यास सासुरवाडी उत्सुक असते ; त्या गडबडीत मोठ्या जावयाकडे लक्ष फारसे दिले जात नाही. थोडक्यात, जुलुमाचा रामराम ! ‘मांडीखाली आरी, चांभार पोरांना मारी’ म्हणजे काखेत कळसा गावाला वळसा. आरी हे चर्मकामातील हत्यार आहे.

काही जुन्या म्हणी – हडळीला नाही नवरा, वेताळाला नाही बायको; अल्लाचा नांगर, खुदाचा बैल आणि महार नांगरी; मरता मरेना, उठता उठेना, जळता जळेना; कामात काम, स्नानात लघवी.

विनायक नारायण बाळ 9423296082 vinayak.bal62@gmail.com

—————————————————————————————————————————————

About Post Author

1 COMMENT

  1. लेख चांगला आहे.
    मजा आली वाचताना.
    अजून असे वाक्प्रचार दिले असते तरी चालले असते
    संध्या जोशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version