विधवा स्त्रियांची उपेक्षा – दोनशे वर्षांचा प्रतिकार! (History of social reforms against ill treatment of widows by the society)

1
383

विधवा स्त्रीला समाजाने कायम दुय्यम स्थान दिलेले आहे. त्या या विधवा प्रथेला बळी पडल्या आहेत. त्या त्या काळातील विचारवंतांनी, समाजसुधारकांनी त्याविरुद्ध आवाज उठवून, त्याबाबत समाजात प्रबोधन केले, चळवळीही उभारल्या. परंतु एकविसाव्या शतकातील विज्ञानवादी व प्रगतशील समाजात विधवा प्रथेसारख्या जोखडात स्त्री भरडली जाते. त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने विधवा प्रथा निर्मूलनासाठी घेतलेला निर्णय स्वागतार्ह आहे…

विधवा स्त्रीची केविलवाणी निराधार प्रतिमा समाजापुढे उभी असते. तिच्या कपाळावरील हिरवे गोंदण उघडे पडलेले असते. अंगावरील दागिन्यांचा साज निघून गेलेला असतो. तिच्यासाठी ‘गंगा भागीरथी’ अशी उपाधी वापरली जाते. तिला समाजात स्थान नसतेच, तिचे नाव कुटुंबातही सर्वांच्या शेवटी टाकलेले असते. तिला स्त्री म्हणून समाजाने कायम दुय्यम स्थान दिलेले आहे. विधवेला पुरुषप्रधान संस्कृतीत अनेक हालअपेष्टा आणि अपमान सहन करावे लागतात. तिचे महिला म्हणून हाल होत असतातच, विधवा महिला म्हणून तर तिची किती अधिक उपेक्षा होत असते! विधवा महिलांना स्वातंत्र्यपूर्व काळात तर खूपच वाईट जिणे सोसावे लागलेले आहे. गेल्या दोनशे वर्षांत त्या त्या काळातील विचारवंतांनी, समाजसुधारकांनी त्याविरुद्ध आवाज उठवून, त्याबाबत समाजात प्रबोधन केलेले आहे. चळवळीही उभारलेल्या आहेत.

महिलेचा पती वारल्यानंतर त्या महिलेला तिच्या पतीच्या चितेवर सती जावे लागत असे. पतीबरोबरच तिलाही जिवंतपणी जाळले जाई. त्या दुष्ट अमानवी प्रथेबद्दल समाजसुधारक राजा राम मोहन रॉय यांनी बंगालमध्ये आवाज उठवला, लढा दिला. त्याबाबत प्रबोधन समाजात केले. त्यांनी ब्रिटिश सरकारला ती प्रथा बंद करण्यासाठी आवाहन केले, मागणी केली, तेव्हा ब्रिटिश सरकारने सती प्रथेवर कायद्याने बंदी 4 डिसेंबर 1829 रोजी आणली. ब्रिटिश अधिकारी विल्यम बेंटिंग यांनी त्यासाठी पुढाकार घेतला. बंगाल बरोबरच इतर राज्यांतही त्याबाबत कायदे बनले. राणी व्हिक्‍टोरियाद्वारे पूर्ण भारतात सती प्रथेवर बंदी पुढे, 1861 मध्ये आणली गेली.

इकडे महाराष्ट्रात महात्मा ज्योतिराव फुले यांनी विधवांच्या आत्महत्या तसेच घडून येणाऱ्या बालहत्या रोखण्यासाठी ‘बालहत्या प्रतिबंधक गृह’ 1863 साली स्थापन केले. त्यांनी विधवा पुनर्विवाहासाठीही मदत केलेली आहे. विधवा स्त्रियांना त्या सती गेल्या नाहीत तर ‘केशवपना’सारख्या दुसऱ्या एका वाईट प्रथेला सामोरे जावे लागत असे. त्यामध्ये विधवा महिलांच्या डोक्यावरील सर्व केस काढले जात. त्यांचे मुंडन केले जाई. मुंडन केलेल्या महिलेला विद्रूपता येत असे. तिला लाल वा पांढरे आलवण अशा प्रकारची साडी नेसण्यास देण्यात येत असे. तिला सर्वतोपरी दुर्लक्षित केले जाई, हीन लेखले जाई. फुले यांनी त्या केशवपन प्रथेला विरोध केला. त्यांनी केस कापणाऱ्या नाभिक बांधवांचा संपही घडवून आणला!

ताराबाई शिंदे यांनी ‘स्त्री पुरुष तुलना’ हे क्रांतिकारी पुस्तक विधवांच्या व स्त्रियांच्या प्रश्नांसंबंधी 1882 साली लिहिलेले आहे! ताराबाई शिंदे यांनी महिलांना अन्याय्य प्रथांवर कडाडून टीका केली आहे. त्यांनी त्यांच्या त्या ग्रंथात अनेक पौराणिक ग्रंथांचे आणि साहित्याचे दाखले दिलेले आहेत. ताराबाई शिंदे लिहितात, “….तर पतिराज स्वर्गवासी झाले म्हणजे या बाईसाहेबांचे हाल कुत्रे खात नाहीत. त्यांच्या कपाळी मग काय माथ्यावरील केसांवर नाभिकाचा हात फिरला म्हणजे तुमचे डोळे थंड झालेले? सर्व अलंकार गेले. सारांश, तिला सर्व तऱ्हेने उघडी करून देशोधडी केल्याप्रमाणे नागवून सांदीचे खापर करायचे. तिला कोठे लग्नसमारंभात जेथे काही सौभाग्यकाळ असेल तेथे जाण्यास बंदी! ती बंदी का? तर तिचा नवरा मेला! ती अभागी, करंट्या कपाळाची! पण तिचा पती मेला नाही असे कोण म्हणतो? पण तो का तिने मारिला?”

ताराबाई शिंदे यांनी समाजाला त्या कुप्रथेबद्दल स्पष्ट आणि कडक शब्दांत जाब विचारलेला आहे. त्यांची भाषा पीडित महिला व विधवा यांचे प्रश्न मांडताना आक्रमक झालेली दिसून येते. त्यांनी त्यांच्या लेखणीने पुरुषप्रधान संस्कृतीला अक्षरशः झोडपून काढले आहे. ताराबाई शिंदे पुढे एके ठिकाणी म्हणतात, “…पण स्त्रिया सती जाऊन तुम्ही त्यांच्या मागे काय गोवऱ्या वळायला राहता का? तुमच्या बायका मेल्या म्हणजे तुम्ही त्यांच्याबरोबर का सती जाऊ नये? बरे, तुमच्यापेक्षा त्या सती गेल्याने फार नुकसान होईल, कसे म्हणाल? तर त्या मेल्या म्हणजे त्यांच्या मागे त्यांची लहान मुले असतात, त्यांना कोणी सांभाळावे?”

विधवांवर होणाऱ्या या अन्यायाविरूद्ध कार्य केलेले आणखी एक नाव म्हणजे पुण्यात महर्षी धोंडो केशव कर्वे. कर्वे यांनी स्त्रियांच्या शिक्षणाला प्राधान्य दिले. कर्वे यांनी विधवा-पुनर्विवाहाची चळवळ सुरू केली. त्यासाठी त्यांनी पुण्याजवळील हिंगणे (आता कर्वेनगर) या गावी विधवा महिलांसाठी आश्रम 1896 साली स्थापन केला आणि त्याच ठिकाणी त्यांनी महिलांसाठी स्वतंत्र विद्यापीठ 1907 साली निर्माण केले. त्यांनी स्वतः एका विधवेशी लग्न केले होते.

विधवांचे प्रश्न मराठी साहित्यातही कथा-कादंबऱ्यांतून, नाटकांतून मांडले गेलेले आहेत. हरिभाऊ आपटे यांनी त्यांच्या कादंबऱ्यांच्या माध्यमातून विधवा आणि स्त्रिया यांचे प्रश्न मांडले आहेत. बाबा पदमनजी यांची ‘यमुनापर्यटन’ ही कादंबरी (1857) विधवांचे अनेक प्रश्न मांडते. एवढे सर्व प्रबोधनपर लेखन होऊनही विधवांचे प्रश्न, त्यांच्या हालअपेष्टा संपलेल्या नाहीत. स्त्री पुरुष समानता हे मूल्य विधवा स्त्रियांच्या बाबतीत मुख्यत: त्यांच्या उपेक्षेने पायदळी तुडवले जाते. विधवांचे अनेक प्रश्न वेळोवेळी समोर येत गेले आहेत. विधवांना धार्मिक कार्यात बोलावले जात नाही. त्यांना समारंभात अग्रस्थान असू शकत नाही.

महाराष्ट्र सरकारने विधवा प्रथा निर्मूलनासाठी चांगला निर्णय घेतलेला आहे, त्याचे सर्वत्र स्वागत होत आहे. महाराष्ट्र शासनाने 17 मे 2022 रोजी एक परिपत्रक प्रसिद्ध केले आहे. त्यात म्हटले आहे, “एकविसाव्या शतकात वावरत असताना विज्ञानवादी व प्रगतशील समाज म्हणून आपण वाटचाल करत आहोत. मात्र समाजात विधवा प्रथेसारख्या अनिष्ट प्रथा प्रचलित असल्याचे आढळून येते. पतीच्या निधनावेळी पत्नीचे कुंकू पुसणे, तिच्या गळ्यातील मंगळसूत्र तोडणे, हातातील बांगड्या फोडणे, पायातील जोडवी काढली जाणे यांसारख्या कुप्रथांचे पालन समाजात केले जात आहे. या महिलांना त्यांच्या पतींच्या मृत्यूनंतर समाजात धार्मिक व सामाजिक कार्यक्रमात सहभागी होऊ दिले जात नाही. या कुप्रथांचे पालन होत असल्याने तशा व्यक्तींच्या जीवन जगण्याच्या मानवी; तसेच, संविधानिक अधिकाराचे उल्लंघन होते. सदर महिलांना इतर महिलांप्रमाणे सन्मानाने जगण्याचा पूर्ण अधिकार आहे. त्यामुळे अशा प्रथांचे निर्मूलन होणे आवश्यक आहे. त्या प्रथेचे पालन करणे अनुचित असून त्याबाबत समाजात व्यापक जनजागृती निर्माण करण्यात यावी. या प्रकरणी जनजागृती होण्याच्या अनुषंगाने उचित कार्यवाही करण्याबाबत जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी त्यांच्या स्तरांवरून सर्व ग्रामपंचायत पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी यांना सूचित करावे. तसेच, हेरवाड ग्रामपंचायत (जिल्हा कोल्हापूर) यांनी केलेल्या ग्रामसभा ठरावाप्रमाणे राज्यातील सर्व ग्रामपंचायतींना ठराव घेण्याबाबत प्रोत्साहित करावे. राजर्षी शाहू महाराज यांच्या स्मृतिशताब्दी वर्षात त्यांच्या पुरोगामी विचारांचा वारसा पुढे नेण्याच्या दृष्टीने कृतिशील कार्यवाही करावी.

– हरिभाऊ हिरडे 8888148083 haribhauhirade@gmail.com

———————————————————————————————————————–

About Post Author

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here