झिंजाडे यांनी जे घडवले ते सर्वत्र पसरले! (Pramod Zinjade-The man who initiated the campaign against ill treatment to widows)

0
557

प्रमोद झिंजाडे यांनी विधवा प्रथेतून होणारी स्त्रीत्वाची विटंबना नष्ट व्हावी यासाठी विधवा प्रथा निर्मूलनाची संकल्पना मांडली. नुसती मांडली नाही तर आचरणातही आणली. त्यासाठी त्यांनी करमाळा तहसील कार्यालय येथे जाऊन, त्यांच्या मृत्युपश्चात त्यांच्या पत्नीची सौभाग्यलेणी न उतरता तिला मानसिक आधार द्यावा असे प्रतिज्ञापत्र तयार केले. त्याचेच पर्यवसान हेरवाड ग्रामपंचायतीच्या विधवा प्रथा निर्मूलनाच्या ठरावात झाले…

प्रमोद झिंजाडे हे करमाळ्याच्या महात्मा फुले समाज सेवा मंडळ या संस्थेचे अध्यक्ष आहेत. करमाळा तालुका सोलापूर जिल्ह्यात आहे. प्रमोद झिंजाडे हे अभ्यासू, सुधारणावादी व्यक्तिमत्त्व आहे. तेच विधवा प्रथा निर्मूलनाचे नव्या काळातील प्रवर्तक ठरले आहेत. त्यांची व्यक्तिगत कृती समाजाला नवी दिशा सुचवण्यासाठी प्रेरक ठरली आहे. फुले समाज सेवा मंडळ ही संस्था (एनजीओ) मौजे पोथरे (तालुका करमाळा, जिल्हा सोलापूर) येथे आहे. त्या एनजीओने मोलाची कामगिरी पाणलोट विकास प्रकल्प, रोजगार हमी योजना, स्वच्छता अभियान अशा कार्य प्रकल्पांत केलेली आहे.

प्रमोद झिंजाडे यांनी विधवा प्रथा निर्मूलनाची संकल्पना प्रथमत: वैयक्तिक स्वरूपात मांडली व तशी आचरणातही आणली. फुले समाज सेवा मंडळाच्या एका कार्यकर्त्याचे निधन आकस्मिक झाले होते. प्रमोद झिंजाडे हे त्या अंत्यविधीला उपस्थित होते. मृत कार्यकर्त्याच्या पत्नीच्या अंगावरील दागिने, बांगड्या, कपाळावरील कुंकू आदी त्या प्रसंगी काढले गेले. कार्यकर्त्याची पत्नी पतीच्या निधनामुळे दु:खसागरात बुडाली होती. ती धाय मोकलून रडत होती. त्यात हा अनाचार! प्रमोद झिंजाडे म्हणाले, की “त्या अंत्यविधीच्या वेळी मला फार दुःख झाले. एक तर मी कार्यकर्ता गमावला होता, दुसरे म्हणजे ती स्त्री एकाएकी एकटी पडली होती. त्याहून वाईट म्हणजे मृत व्यक्तीची पत्नी रडत असताना दुसरीकडे तिचे बांगड्या, कुंकू, दागिने हेही तिच्या अंगावरून उतरले जात होते. ती शोक व्यक्त करत होती, त्या संदर्भातही बोलत होती. त्या दुःखद प्रसंगाने माझ्या मनाला खूप वेदना झाल्या. समाज कोणी महिला विधवा झाल्यानंतर तिचे दागिने, कुंकू, बांगड्या, जोडवी ही सौभाग्यलेणी काढून तिला अधिक दुःखात लोटत असतो असेच मला वाटले. तिला तशी हीन वागणूक मिळावी ही त्या पराकोटीच्या दु:खात तिची आणखी विटंबना होत आहे याचे मला खूप वाईट वाटले.

मी त्या विधवा प्रथेसंदर्भात विचार करू लागलो व एक छोटेखानी निवेदन तयार केले. त्या निवेदनाचा सारांश महिलेच्या पतीचे निधन झाल्यानंतर त्याच्या पत्नीने बांगड्या, दागिने, मंगळसूत्र, कुंकू आदी काढू नये; उलट, समाजाने तिला मानसिक आधार द्यावा. अशा विधवा प्रथेतून होणारी स्त्रीत्वाची विटंबना नष्ट व्हावी असा होता. मी ते निवेदन शब्दबद्ध करून, तेथेच न थांबता, त्याची प्रत्यक्ष कार्यवाही माझ्यापासून व्हावी अशी सुरुवात केली. मी करमाळा तहसील कार्यालय येथे जाऊन एक प्रतिज्ञापत्र तयार केले. मी त्या प्रतिज्ञापत्रात माझ्या निधनानंतर माझ्या पत्नीचे दागिने, बांगड्या, कुंकू काढू नयेत अशी माझी इच्छा असल्याचे लिहून ठेवले आहे.

मी ते निवेदन महाराष्ट्रातील ‘सरपंच ग्रूप’ या व्हॉट्स अॅप ग्रूपवर शेअर केले. त्यानंतर मला अनेक फोन आले; सकारात्मक प्रतिक्रिया मिळाल्या. कोल्हापूर जिल्ह्यातील हेरवाड या गावचे सरपंच सूरगोंडा पाटील यांनी तर तसा ठराव घेऊन तो पंचायतीत संमतही केला. त्या ठरावाचे सर्वत्र स्वागत झाले. त्या ठरावाला मुक्ताबाई संजय पुजारी व सुजाता केशव गुरव या दोन महिला सूचक आणि अनुमोदक आहेत. तो ठराव जेव्हा समाजमाध्यमांवर प्रसिद्ध झाला; तेव्हा त्याची दखल महाराष्ट्रातील व देशातील अनेक नेत्यांनी, पत्रकारांनी, विचारवंतांनी, संपादकांनी घेतली. सुप्रिया सुळे यांनी त्या प्रश्नात विशेष लक्ष घालून संबंधित खात्याचे मंत्री; तसेच, अधिकारी-पदाधिकारी यांच्याशी चर्चा केली. त्यांनी शासनस्तरावरून तसा विधवा प्रथा निर्मूलनाचा निर्णय करण्यास सुचवले.

राज्य शासनाने त्या ठरावाची दखल खरोखरीच घेतली आहे. शासनाचा विचार विधवा प्रथा निर्मूलनासाठी ग्रामस्तरीय पथके स्थापन करण्याचा आहे. म्हणजेच, एका गावाने राज्याला प्रेरणा दिल्याचे दिसून येत आहे. त्या गावातील सरपंच सूरगोंडा पाटील व त्यांचे सर्व सहकारी यांच्यावर राज्यातून व देशाच्या काही भागांतूनही अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्याच बरोबर, प्रमोद झिंजाडे यांच्या या संकल्पनेची चर्चाही राज्यभरात होत आहे. झिंजाडे यांच्या संकल्पनेची माहिती मिळाली तेव्हा सोलापूरचे पोलिस अधीक्षक हर्षल बैजल यांनी प्रथम प्रमोद झिंजाडे यांना एका कार्यक्रमासाठी निमंत्रित करून त्यांचा व त्यांच्या पत्नी अलका यांचा आदर-सन्मान केला. विधवा प्रथा निर्मूलनाच्या राज्याच्या कमिटीत प्रमोद झिंजाडे यांच्या समवेत त्यांच्या महात्मा फुले समाज सेवा मंडळ संस्थेचे राजू शिरसाठ, अशोक पिंगळे, कालिंदी पाटील आदी कार्यकर्ते काम करत आहेत.

– हरिभाऊ हिरडे 8888148083 haribhauhirade@gmail.com

——————————————————————————————————————-

About Post Author

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here