Home वैभव मराठी भाषा लोककलांचा वारसा: भारूड आणि कीर्तन (Folk Arts – A Cultural Heritage)

लोककलांचा वारसा: भारूड आणि कीर्तन (Folk Arts – A Cultural Heritage)

2

महाराष्ट्राला लोककलांची समृद्ध परंपरा आहे. लोकनाट्य, वगनाट्य, दशावतार, तमाशा, कीर्तन, भारूड, पोवाडा अशा लोककलांशी सर्वसाधारण मराठी माणसाचा परिचय असतो. या सर्व कला ही मनोरंजनाची साधने आहेत. ह्या कला मनोरंजनाबरोबर प्रबोधनाचेही कार्य करतात. त्या आजच्या माध्यमस्फोटाच्या युगातही स्वतःचे स्वत्व आणि सत्त्व टिकवून आहेत. या कलांचा परिचय असला तरी त्यातील बारकावे माहीत असतातच असे नाही.

डी. जी रुपारेल महाविद्यालयात कलाशाखेच्या तिसऱ्या वर्षात शिकणाऱ्या तनुजा पाटील या विद्यार्थिनीने तिच्या अभ्यासपूर्ण लेखात भारूड आणि कीर्तन या लोककलांच्या विविध प्रकारांचा परिचय करून दिला आहे. तो निश्चितच या कलांविषयीच्या माहितीत भर घालेल.

‘मोगरा फुलला’ या दालनातील इतर लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

-सुनंदा भोसेकर

लोककलांचा वारसा: भारूड आणि कीर्तन

अभिव्यक्त होणे ही माणसाची मूलभूत प्रेरणा आहे. त्यासाठी माणूस वेगवेगळ्या वाटा शोधतो. त्यातलीच एक वाट म्हणजे लोककला. ज्यातून माणसाला नैसर्गिकपणे अभिव्यक्त होता येते, स्वतःचे विचार मांडता येतात, इतरांना प्रेरित करता येते आणि ह्या साऱ्या प्रपंचातून माणूस माणसाशी जोडलेला राहतो. कला माणसाच्या जीवनाशी किती घट्टपणे जोडलेल्या असतात याची प्रकर्षाने जाणीव करून देतात त्या लोककला. एखादी स्त्री स्वतःची रोजची कामे करत असताना सहज ओवी गुणगुणते. शेतात पीक आल्यावर सर्व गावकरी मिळून आनंदोत्सव साजरा करतात, नाचतात, गातात. सहजता, उस्फूर्तता ही लोककलांची वैशिष्ट्ये. ह्या लोककला निसर्ग, अध्यात्म ह्यांच्याशी जोडलेल्या असल्या तरी त्या पलीकडे जाऊनही त्या अनेक कार्ये करतात. अशा अनेक लोककलांनी महाराष्ट्र समृद्ध आहे. त्यांपैकीच दोन लोककला म्हणजे ‘भारूड‘ आणि ‘कीर्तन’. मनोरंजनातून प्रबोधन हे ह्या दोन्ही लोककला प्रकारांचे वैशिष्ट्य आहे.

भारूड भारूड हे खास करून मराठी वाङ्मयाचे वैशिष्ट्य आहे. समाजाला आध्यात्मिक आणि नैतिक शिकवण देणारे मराठीतील रूपकात्मक नाट्यमयगीत म्हणजे ‘भारूड’. भारूड शब्दाचा शब्दकोशातला अर्थ ‘धनगर’ असा आहे. मराठी व्युत्पत्तिकोशात त्याची व्युत्पत्ति संस्कृत शब्द ‘बहूरूपम्’ पासून झाली आणि अर्थ, ‘अवघड, कूट काव्य’ असा दिला आहे. भारूड हा एक लवचिक असा लोककला प्रकार आहे. त्याला विशेष वेषभूषा, नेपथ्य, रंगमंच यांची जरूरी नाही. अनेक भारूड सादर करणारे एखादे गाठोडे, काठी किंवा फडके घेऊन भारूड सादर करतात. भजनी भारूड, सोंगी भारूड आणि कूट भारूड असे भारुडाचे तीन प्रकार आहेत. पैकी भजनी भारूड हे कीर्तनाप्रमाणे असते. भारुडात लोकांना समजेल अशा भाषेत उपदेश करण्यावर भर दिलेला असतो. सोंगी भारूड सादर करताना भारुडकार विविध सोंगे घेतात. ह्या प्रकारात विविध रूपके वापरली जातात. कधी खंडोबा, बहिरोबा, भटजी, ज्योतिषी, आंधळा, पांगळा, भिक्षुक, तर कधी दळण, कांडण, पिंगा, भोवरा यांसारखे प्रसंग किंवा पशुपक्षी यांवर आधारित रूपके भारुडात रचली जातात. ‘बुरगुंडा होईल गं तुला’ हे अलिकडच्या काळातले लोकप्रिय सोंगी भारूड आहे. भारुडाकडे लोकरंजनाचे साधन म्हणूनही पाहिले जाते. भारुडातील गेयता, रूपके आणि सादरीकरणाचे अंग यामुळेच हा लोकप्रकार मनोरंजन करणारा ठरला. भारूड पेटी, टाळ, ढोलकी, मृदंग यांसारख्या पारंपरिक वाद्यांच्या साहाय्याने सादर करण्यात येते. भारुडाद्वारे मनोरंजनाबरोबर आध्यात्मिक गोष्टी किंवा तत्त्वज्ञान सांगणे, समाजप्रबोधन करण्याचे कामही केले जाते. भारुडाद्वारे माणसाने कसे वागावे, कसे जगावे ह्याबद्दलचे विचार मांडले जात. उदाहरणार्थ, संत एकनाथ यांच्या ‘विंचू चावला’ या भारुडातील ‘विंचू’ हे काम-क्रोधाचे प्रतीक आहे. काम-क्रोधाच्या बाधेमुळे माणूस अविचारीपणे वागतो. त्या बाधेपासून सुटका मिळवण्यासाठी मनुष्याने सत्त्वगुण अंगीकारावेत असा उपदेश एकनाथ यांनी या भारुडातून केला आहे.

भारूड हे जनसंपर्काचे अत्यंत प्रभावी माध्यम आहे. जनसामान्यांना समजायला थोडे कठीण असे विषयही भारुडाद्वारे प्रभावी पद्धतीने लोकांपर्यंत पोचवता येतात. संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ, संत तुकाराम, संत नामदेव, समर्थ रामदास, चोखामेळा, निळोबाराय, बहिणाबाई, जनाबाई यांसारख्या संतांनी अनेक भारुडे लिहिली आहेत. नाथसंप्रदायातील महिपतीनाथ, देवनाथ, तसेच दत्त संप्रदायातील दासोपंत यांनीही भारुडे लिहिलेली दिसतात. तरीही भारूड म्हटले की डोळ्यासमोर येतात ते संत एकनाथ. इतर संतांनी भारुडे रचली तरीही संत एकनाथ यांच्या भारुडात आढळणारा विनोद, गेयता, नाट्यमयता यांमुळे त्यांची भारुडे लोकप्रिय झाली. संत एकनाथांच्या ‘सत्वर पाव गं मला भवानी आई’ ह्या भारुडात त्यांनी सासुरवाशिणीचे रूपक वापरले आहे. त्यात सुनेला सासरच्या मंडळींकडून म्हणजे सासू, सासरा, नणंद इत्यादींकडून होणाऱ्या जाचाचे वर्णन केले आहे. त्यात सासू, सासरा, नणंद, नणंदेचे मूल ही रूपके वापरून वासना, मोह, अहंकार याबद्दल सांगितले आहे. या सगळ्या जंजाळातून सोडवण्याची विनंती भवानी आईला करणाऱ्या जीवरूपी सुनेचे वर्णन ह्या भारुडात आले आहे. अशाप्रकारे लोकांच्या आयुष्यातील विविध प्रसंग किंवा रूपके वापरून लोकांना जागृत करणे हे संत एकनाथ यांच्या भारुडांचे वैशिष्ट्य आहे. भारुडांमधून नाथांनी समाजातल्या अपप्रवृतींवर, अनिष्ट रूढींवर नेमके बोट ठेवले आहे आणि परिवर्तनाची आवश्यकता लोकांच्या लक्षात आणून दिली आहे. आजही ह्या भारुडांचा अर्थ संयुक्तिक आहे आणि त्यामुळे ती लोकप्रिय आहेत.

भारुडाचा तिसरा प्रकार कूट भारूड हा समजायला अवघड प्रकार आहे. कूट भारुडांमध्ये सृष्टीच्या उत्पत्तीसंबधी, मानवाच्या अध्यात्मिक उन्नत्तीविषयी तत्त्वज्ञानात्मक मांडणी केलेली असते. ‘काट्याच्या अणींवर वसले तीन गांव’ हे संत ज्ञानेश्वरांचे सुप्रसिद्ध कूट भारूड आहे.

कीर्तन: अध्यात्म, प्रबोधन, तत्त्वज्ञान आणि मनोरंजन यांची एकत्रित सांगड असलेली दुसरी लोककला म्हणजे ‘कीर्तन’. भारुडाप्रमाणे कीर्तन हीसुद्धा प्रयोगात्मक कला आहे. त्यात कथन, गायन, नृत्य इत्यादी साधनांचा उपयोग केला जातो. त्यात टाळ, मृदंग, वीणा, मंजिरी, झांज, चिपळ्या, पायपेटी, तबला अशा लयवाद्यांचा आणि तालवाद्यांचा समावेश असतो. परमार्थसाधना, ईश्वरानुभूती, जनप्रबोधन, राष्ट्ररक्षण आणि लोककल्याण असे अनेक हेतू कीर्तन परंपरेमागे आहेत. कीर्तनासाठी स्तवन, संकीर्तन अशा काही इतर संज्ञाही वापरल्या जातात. नारदमुनींना कीर्तनपरंपरेचे आद्य प्रवर्तक मानले जाते.

महाराष्ट्राला कीर्तनाची फार जुनी परंपरा आहे. महाराष्ट्रात वारकरी, नारदीय, रामदासी, गाणपत्य, शाक्त, राष्ट्रीय, चटई असे कीर्तनाचे प्रकार आहेत. संत नामदेव हे वारकरी कीर्तनपरंपरेचे आद्य प्रणेते आहेत. ‘नाचू कीर्तनाचे रंगी । ज्ञानदीप लावू जगी।।’ हे वारकरी कीर्तनाचे ध्येय आहे. वारकरी कीर्तनास ‘निरूपण’ असेही म्हटले जाते. वारकरी कीर्तनात मध्यभागी कीर्तनकार बुवा असतात. बुवांचा पांढरा सदरा, धोतर, कमरेला शेला, डोक्यावर फेटा असा पोशाख तर कपाळी गंध त्यावर बुक्का आणि कानांवर वारकरी गंधाची मुद्रा देखील असते. ते नाचत अभंग म्हणतात. विषयाला अनुसरून विविध उदाहरणे देऊन ते अभंगाचा आशय लोकांपर्यत पोचवतात. या प्रकारच्या कीर्तनात सामुहिकतेवर भर दिलेला असतो. वारकरी कीर्तनात टाळ, वीणा, पखवाज एवढ्याच वाद्यांच्या साहाय्याने कीर्तन केले जाते.

नारदीय कीर्तनाचे पूर्वरंग आणि उत्तररंग असे दोन भाग असतात. पूर्वरंगात वेदांत निरूपण आणि उत्तररंगात आख्यान हे ह्या कीर्तनपरंपरेचे वैशिष्ट्य आहे. मध्यभागी असलेल्या गादीवर कीर्तनकार उभे असतात. त्यास ‘नारदाची गादी’ असे म्हटले जाते. कीर्तनकारांचा पांढरे धोतर, सदरा, उपरणे, डोक्यावर फेटा किंवा पगडी, कपाळी गंध, पायात चाळ असा पोशाख असतो. पूर्वरंगात अभंग, ओवी, श्लोक, पदे गायली जातात आणि उत्तररंगात रामायण, महाभारतावर आधारित आख्याने असतात. संतचरित्रे किंवा साधूचरित्रे यात सांगितली जातात. याप्रमाणेच उत्तररंगात स्वयंवराख्याने देखील सांगितली जातात. त्यात रुक्मिणी स्वयंवर, सीता स्वयंवर, द्रौपदीस्वयंवर, सुभद्रास्वयंवर याचा समावेश होतो.

नारदीय कीर्तनपरंपरेप्रमाणे रामदासी कीर्तनपरंपरेत देखील पूर्वरंग आणि उत्तररंग असतो.  दाढी, जटा, भगवी कफनी आणि उपरणे आणि त्याच रंगाचा फेटा हा रामदासी कीर्तनकाराचा पोशाख असतो. शाक्त कीर्तनपरंपरा माहूर-सप्तशृंग या परिसरापुरतीच मर्यादित आहे. देवीचे ठाणे सोडायचे नाही असा नियम असल्यामुळे ह्या परंपरेतील कीर्तनकार दुसऱ्या गावी जाऊन कीर्तन करत नाहीत. बुवा कीर्तनासाठी हिरवे पातळ दुटांगी धोतरासारखे नेसतात. ते पायात चाळ घालतात तर कपाळावर मळवट लावतात. ह्या कीर्तनात देवीचरित्र, शंकर पार्वती विवाह, शुंभनिशुंभवधाख्यान, लक्ष्मीचरित्र इत्यादी सांगितले जाते.

स्वातंत्र्य चळवळीच्या काळात राष्ट्रीय कीर्तनपरंपरेला सुरुवात झाली. नारदीय कीर्तनपरंपरेचा उपप्रकार असलेल्या राष्ट्रीय कीर्तनाचे आद्य प्रणेते डॉ. दत्तात्रेय पटवर्धन बुवा हे होत. लोकमान्य टिळक यांनी ‘केसरी’ सामान्य लोकांपर्यंत पोचावे यासाठी राष्ट्रीय कीर्तन राबवले. टिळकांप्रमाणे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या सत्यशोधक समाजाने देखील कीर्तनातून प्रबोधनाचे काम केले. संत गाडगे महाराजांनीदेखील कीर्तनाच्या माध्यमातून जातिभेद निर्मूलन, व्यसनमुक्ती, स्वच्छता यांसारख्या विषयांवर प्रबोधन केले.

आजच्या काळात एखादी माहिती कोणापर्यंत पोचवायची असेल तर तंत्रज्ञानाच्या मदतीने ती चुटकीसरशी पोचवता येते. ती माहिती कधी जनजागृती घडवून आणते तर कधी एखादी चळवळ उभी करू शकते. पण ज्या काळात जनसंपर्काची अशी कोणतीच माध्यमे हातात नव्हती, त्या काळात भारूड आणि कीर्तन यांसारख्या लोककलांनी लोकांना एकत्र आणण्याचे, प्रबोधनाचे, त्यांच्या अंगी स्वाभिमान जागवण्याचे काम केले. ह्यातूनच त्यांचे सामर्थ्य लक्षात येते. अजूनही या कलांचे प्रयोजन संपलेले नाही उलट नव्या माध्यमांच्या साहाय्याने त्यांनी कात टाकली आहे. या माध्यमांमुळे मिळणाऱ्या सवंग लोकप्रियतेमुळे त्यात थिल्लरपणाही शिरला आहे. तरीही व्यसनांना दूर करणे, शिक्षणाची, सारासार विवेकाची आवश्यकता; येणाऱ्या परिस्थितीला कणखरपणे तोंड देणे या विषयांवर या कला लोकांचे प्रबोधन करत असतात. त्यामुळे आजही त्यांचे महत्त्व अबाधित आहे.

– तनुजा पाटील 7977668334 tanujapatil0207@gmail.com

About Post Author

2 COMMENTS

  1. ज्ञानेश्वर माउलींचे कूट भारूड ही खरोखरच अद्भुत रचना ! जीवनातल्या आणि समाजातल्या प्रत्येक घटनेला जोडून घेता येते ! अगदी आजही !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version