ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेले डॉ. भाऊ दाजी लाड म्युझियम (Dr. Bhau Daji Lad Museum- Glorious Heritage of Mumbai City)

4
296

म्युझियम्स म्हणजेच वस्तुसंग्रहालये ही अनौपचारिक शिक्षणाची साधने असतात. समाजाच्या कर्तृत्वाची ओळख असतात आणि एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे वारसा सोपवण्याचे साधनही असतात.

‘मोगरा फुलला’ या दालनात यापूर्वी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसग्रंहालयाचा परिचय करून देण्यात आला होता. याच मालिकेत कलेतिहासाच्या अभ्यासक असलेल्या शर्मिला फडके क्रमश: मुंबईतील म्युझियम्सची आणि कलादालनांची ओळख करून देणार आहेत. त्यापैकी एक डॉ. भाऊ दाजी लाड म्युझियम. हे मुंबई शहरातील पहिले म्युझियम. ते काही काळ विस्मरणात जाऊन आता पुन्हा नव्या झळाळीने उभे राहिले आहे. महाराष्ट्रातील इतर शहरांमधील वैशिष्ट्यपूर्ण म्युझियम्सविषयी माहिती गोळा करण्याचेही काम चालू आहे.

‘मोगरा फुलला’ या दालनातील इतर लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

-सुनंदा भोसेकर

डॉ. भाऊ दाजी लाड म्युझियम

डॉ. भाऊ दाजी लाड म्युझियम हे 1872 साली बांधलेले मुंबईतील आद्य म्युझियम. मुंबई शहराच्या इतिहासाची, संस्कृतीची, तत्कालीन कला-कारागिरीची, धार्मिक-सांस्कृतिक सरमिसळ असणाऱ्या समाजाचे राहणीमान, वेशभूषा, रीतीरिवाज इत्यादी गोष्टींची इत्यंभूत माहिती देणारे हे म्युझियम. एकेकाळी सात बेटांचा, दलदलीने व्यापलेला समूह असणारा मुंबई प्रांत त्याच्या आजच्या आधुनिक, समृद्ध, विविध सुसंस्कृत रूपापर्यंत येऊन पोचला; त्याच्या प्रगतीचे टप्पे आगळ्या त्रिमित रूपात दाखवणारे डॉ. भाऊ दाजी लाड म्युझियम. त्याचे जुने नाव व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियम.

भायखळ्याला राणीच्या बागेत म्हणजेच जिजामाता उद्यानात, प्रवेशद्वारालगत म्युझियमची देखणी, युरोपियन रेनेसान्स रिव्हायवल शैलीत बांधली गेलेली एकशे बेचाळीस वर्षांची इमारत रुंद, दगडी पायऱ्यांवर शानदारपणे उभी आहे. सुखद रंग ल्यालेले सुबक बाह्यररूप, कोरीवकामाने नटलेले, भव्य सागवानी दरवाजे, इमारतीच्या दोन्ही बाजूंना निगा राखलेल्या बागा, त्यातील वृक्षराजी, चाफ्याच्या झाडांच्या रांगा, देखणा, धातूचा नक्षीदार अ‍ॅन्टीक गॅस लॅम्प, दर्शनी भागातील खऱ्या हत्तीच्या आकारातील दगडी हत्ती अशा वैभवशाली खुणांनी ही इमारत नटली आहे.

म्युझियमचा अंतर्भाग तर अक्षरश: डोळे दिपून जावेत असा देखणा. लांबरुंद (एकशेपाच फुट लांब आणि बत्तीस फुट रुंद) हॉल, कोरीवकाम असलेले भव्य छत, हॉलच्या मध्यभागी संगमरवरी लयबद्ध शिल्प, त्यावर प्रिन्स अल्बर्टचा पुतळा, दोन्ही बाजूंना असलेले कलेच्या आणि विज्ञानाच्या देवतेचे पुतळे. नजर जावी तेथे सुंदर, सोनेरी वर्ख ल्यायलेली वेलबुट्टीची कलाकुसर, युरोपीय शैलीतली हंड्या, झुंबरे, टेराकोटाचे डौलदार डॉरिक खांब, नाजूक कोरीव काम केलेल्या व्हेनेशियन काचांची तावदाने असलेल्या प्रशस्त खिडक्या, नक्षीदार ग्रील्स, कठडे असलेला मध्यवर्ती, लांबरुंद, दोन भागातला जिना, वरतीही पूर्ण रुंदीची देखणी दालने, पायतळी दुर्मीळ इटालियन मिंटन टाइल्स, भिंतीवर सुखद सेलाडन ग्रीन (Celadon Green) रंग आणि सभोवती एकोणिसाव्या, विसाव्या शतकातील मुंबई प्रांतातील कला, कारागिरी, व्यापार, औद्योगिक प्रगतीचा प्रत्यय देणाऱ्या आगळ्या कलाकृतींनी भरलेली शिसवी कपाटे. सुयोग्य प्रकाश योजना. म्युझियमच्या झळाळत्या रुपाने मन चकित होऊन जाते.

मात्र म्युझियमचे आज दिसत असलेले हे सुबक, वैभवी रूपडे गेल्या पाच वर्षांमधील आहे. त्या आधीची कित्येक दशके म्युझियमची इमारत एखाद्या जुनाट, पडक्या, शान ओसरलेल्या राजवाड्यासारखी दुर्लक्षित पडून होती. भोवती कायम कसल्या ना कसल्या दुरुस्त्यांकरता उभारलेलेले बांबूंचे जाळे असलेले तिचे ओसाड रूप मुंबईकरांनी वर्षानुवर्षे पाहिले आहे. अंतर्भागातल्या ओल आलेल्या, अंधारलेल्या जागेतली जुनाट लाकडी कपाटे, त्यातल्या कशाही भरलेल्या खेळण्यांसारख्या वस्तू, कोरीव वस्तूंवरची धूळ, भिंतींचा उडालेला रंग, अस्पष्ट झालेला सोनेरी वर्ख, इमारतीच्या भोवती अस्ताव्यस्त वाढलेल्या झाडांचं रान, त्यात दगडी प्रचंड हत्ती केविलवाण्या अवस्थेत लपलेला. हा हत्ती ब्रिटिशांना लंडनमधे घेऊन जायचा होता, पण हलवत असतानाच तो भंगला आणि त्याचा पुढचा प्रवास अशक्य झाला. मग त्याला उचलून इथे आणून टाकले गेले. अशी अनेक तुटकी, फ़ुटकी शिल्पे इथे आणून टाकलेली होती. अनेक भंगलेले संगमरवरी पुतळे कसेही उभे करुन ठेवलेले. मुंबईतल्या रस्त्यांवर जागोजागी असलेले ब्रिटिशकालीन पुतळे तुटले, फुटले किंवा वाहतुकीत अडथळा येतो म्हणून नकोसे झाले की त्यांची रवानगी या बागेत होत असे. या जागेला पुतळ्यांची दफनभूमी असेच नाव पडले होते. म्युझियम कधीच मुंबईकरांच्या विस्मरणात गेले होते.

पर्यटकांचा अविरत वाहता ओघ असलेल्या मुंबईतील मध्यवर्ती पर्यटनस्थळ असलेल्या राणीच्या बागेजवळ मुंबई शहरातले पहिले म्युझियम केविलवाण्या अवस्थेत उभे होते आणि त्याच्या अस्तित्वाची दखलही मुंबईकर घेत नव्हते. दोष त्यांचा नव्हता. त्या म्युझियमचे स्वप्न एकेकाळी मुंबई शहराच्या उभारणीकरता, वाढीकरता मनापासून झटणाऱ्या काही मान्यवर, इंग्रज, हिंदुस्थानी, बुद्धीमंतांनी, कलेची आस्था बाळगणा-यांनी पाहिले. म्युझियमची उभारणी शहरातल्या नागरिकांनी उभारलेल्या फंडातून झाली. म्युझियम शहराची शान होते. म्युझियम उभारणीकरता अनेकांचे अतोनात परिश्रम, धन खर्च झाले आहे याची जाणीव आणि आस्था त्याच्या देखभालीकरता जबाबदार असणाऱ्या कोणालाच नव्हती. महानगरपालिका अनभिज्ञतेमुळे उदासीन होती.

मात्र आज पुन्हा हे म्युझियम अनास्थेची जळमटे झटकून, पूर्वीपेक्षाही वैभवशाली, देखण्या रुपात उभे आहे, शहराशी जोडले गेले आहे. काही वर्षांपूर्वी मुंबई महानगरपालिकेने, ’इन्टॅक’ या वारसा संवर्धन करणाऱ्या संस्थेच्या मदतीने इमारतीचा कायापालट केला. दुर्लक्षित, ओसाड अवस्थेत अनेक वर्षे पडून असलेल्या म्युझियमचा आणि त्यातील कलाकृतींचा जीर्णोद्धार इन्टॅकने कसा केला याची कहाणी चित्तथरारक आहे.

मूळात म्युझियमच्या स्थापनेमागची उद्दीष्टे नेमकी काय होती, अनास्थेमागची कारणे काय होती, या प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा कानावर असंख्य कहाण्या पडल्या. म्युझियमकडे अशा कहाण्या असायलाच हव्या. त्यातील संग्रहापेक्षा, संग्रह जमा करताना, संग्रहित वस्तूंच्या उत्पत्तीच्या कहाण्यांमधे लोकांना जास्त रस असतो. डॉ. भाऊ दाजी लाड म्युझियमकडे अशा भरपूर रंजक, ऐतिहासिक आणि समकालीन कहाण्यांचा मोठा संग्रह आहे.

इंग्लंडची राणी व्हिक्टोरिया आणि तिचा पती प्रिन्स अल्बर्ट यांच्या महत्त्वाकांक्षी कल्पनेतून ब्रिटिश अधिपत्याखाली असलेल्या वसाहतींमधली समृद्धी, कला-कारागिरी, उद्योग यांचे दर्शन उर्वरीत जगाला घडवण्यासाठी लंडनमध्ये एक जागतिक व्यापारी महाप्रदर्शन 1851 साली भरवले गेले. त्या प्रदर्शनात भारतातर्फे ज्या कला-कौशल्याच्या वस्तू पाठवायच्या होत्या त्यांची तयारी 1840 सालापासूनच सुरू झाली होती. मुंबई प्रांतातून ज्या वस्तू पाठवण्यात येणार होत्या त्यांची जबाबदारी ब्युइस्ट या कलेची उत्तम जाणकारी असलेल्या अधिकाऱ्यावर होती. ज्या कलावस्तू लंडनच्या प्रदर्शनात पाठवायच्या त्या प्रत्येकाची प्रतिकृती तयार करुन त्या एका वस्तुसंग्रहालयामधे प्रदर्शित कराव्या ही कल्पना ब्युइस्टच्या डोक्यात रुजली. मुंबईच्या गव्हर्नरला, लॉर्ड एल्फिन्स्टनला ही कल्पना पसंत पडली. मग एक म्युझियम कमिटी स्थापन झाली. मुंबई बेटांचे भौगोलिक नकाशे, इथल्या वन्यप्राण्यांच्या भूसा भरलेल्या प्रतिकृती, जवळपासच्या प्रदेशातील उत्खननात सापडलेल्या वैशिष्ट्यपूर्ण वस्तू, मुंबई प्रांतातील आणि इथे बाहेरुन येऊन स्थायिक झालेल्या कारागिरांच्या कौशल्यातून घडलेल्या कलाकृती अशा वस्तू म्युझियमकरता ब्युइस्ट जमा करत गेला. या वस्तू त्या काळच्या एकमेव पक्क्या बांधणीच्या इमारतीमध्ये म्हणजे ’टाउन हॉल’मध्ये (आत्ताच्या एशियाटीक सोसायटीच्या इमारतीत) संग्रहीत केल्या गेल्या. मार्च 1857 मध्ये या वस्तू मुंबईच्या नागरिकांना पहाण्याकरता खुल्या केल्या गेल्या.

आजवर म्युझियम ही संकल्पनाच माहीत नसलेल्या लोकांनी मोठ्या नवलाईने वस्तूंचा हा वैविध्यपूर्ण संग्रह पहायला गर्दी केली. या अलोट गर्दीमुळे प्रोत्साहित होऊन शहरातल्या काही प्रतिष्ठित नागरिकांनी या वस्तूंकरता एक वेगळी इमारत बांधायची असे ठरवले. टाउन हॉलमधे इमारतीच्या खर्चाची व्यवस्था ठरवण्याकरता सभा भरली. प्रतिष्ठित व्यापारी, जगन्नाथ शंकरशेट सभेचे अध्यक्ष होते. सभेला शहरातील हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, पारसी अशा सर्व धर्मीयांचे प्रतिनिधी हजर होते. म्युझियम कमिटीचे दोन महत्त्वाचे सेक्रेटरी सदस्य होते डॉ. भाऊ दाजी लाड आणि डॉ. जॉर्ज बर्डवुड. त्यांच्यावर इमारतीकरता निधी उभारण्याची, तसेच कलाकृती बनवून घेऊन संग्रह वाढवण्याची मुख्य जबाबदारी टाकली गेली. भाऊ दाजींनी परिश्रमाने 1,61,141 रूपयांचा मोठा निधी उभारला. सरकारने त्यात एक लाख रूपयांची भर घातली.

म्युझियमची इमारत बांधायला दहा वर्षे लागली. ती अतिशय आगळ्या, व्हिक्टोरियन वैशिष्ट्याने परिपूर्ण अंतर्भाग असलेली अशी पॅलेडियन म्हणजे ग्रीक राजवाड्यासदृश वास्तुरचना असलेली देशभरातली एकमेव इमारत होती. ह्या इमारतीचे बांधकाम रोममधील टेम्पल ऑफ ज्युपिटरच्या धर्तीवर आहे. व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियम लोकांना पाहण्याकरता खुले 2 मे 1872 ला केले गेले.

म्युझियमला डॉ. भाऊ दाजी लाड यांचे नाव शंभर वर्षांनी म्हणजे नोव्हेंबर 1975 ला दिले गेले. म्युझियम उभारणीकरता भाऊ दाजी यांनी जे परिश्रम केले त्याची कृतार्थ नोंद या नामांतरातून घेतली गेली. त्यांच्याइतकेच परिश्रम म्युझियमच्या कलासंग्रहाच्या उभारणीकरता घेतले होते डॉ. जॉर्ज बर्डवुडनी. कलेचे उत्तम अभ्यासक असलेल्या बर्डवुड यांचे म्युझियम कसे असावे या संदर्भातले विचार सुस्पष्ट होते.

म्युझियममधे ज्या कलाकृती होत्या त्या बहुतेक तात्कालिन मुंबईस्थित कारागिरांनी आणि जे. जे. स्कूल ऑफ आर्टमधे शिकणाऱ्या कलाकारांनी बनवलेल्या होत्या. त्या व्यापारवृद्धीच्या उद्देशाने बनवल्या गेल्या होत्या. बघायला येणा-यांना त्यापैकी काही आवडले तर त्याची प्रतिकृती बनवून ती विकली जात असे. पण फक्त इतकाच म्युझियमचा उद्देश नव्हता. मुंबई शहराच्या रचनेसंदर्भातल्या नवनव्या कल्पना, पाणी व्यवस्थेच्या पद्धती, रस्ता सुशोभीकरण, प्रकाशयोजनेच्या कल्पना इत्यादींना साकार करण्याआधी त्यांच्या ज्या प्रतिकृती अथवा डायोरामा बनवले जात तेही म्युझियममधे ठेवले जात. शहरातील औद्योगिक, तांत्रिक, वैज्ञानिक, सामाजिक, सांस्कृतिक प्रत्येक महत्वाच्या घटनेचा नमुना म्युझियमकरता राखण्यात येत होता. त्याकरता खास प्रतिकृती बनवल्या जात. मुंबई प्रांताची भौगोलिक स्थित्यंतरे दर्शवणारे सतराव्या, अठराव्या व एकोणिसाव्या शतकातील तीन त्रिमिती नकाशे बनले. मुंबईचा किल्ला बनला. पारशी जमातीतले मृत्यूनंतरचे विधी जेथे चालतात त्या विहिरीची प्रतिकृती बनली. क्यूरेटर सेसिल बर्न्सने लोकांचा प्रतिकृतीतला रस पाहून लखनौवरुन खास कारागीर मागवले होते. त्यांचे जे.जे. कलाशाळेतल्या विद्यार्थ्यांसमवेत म्युझियमच्या आवारात मॉडेल्स, डायोरामा निर्मितीचे काम चाले. या वस्तू विविध आंतरराष्ट्रीय प्रदर्शनांमध्येही पाठवल्या जात. त्यांना पुरस्कार मिळत. चीन, जपान, बर्मा, सीलोन, नेपाळ आदी देशांशी असलेला व्यापार तेथून मागवलेल्या उत्तम कलाकुसरीच्या वस्तुंमधून प्रदर्शित झाला. जे. जे. स्कूल ऑफ आर्टच्या कार्यशाळेत तत्कालीन विद्यार्थ्यांनी केलेली सिरॅमिकची, काचेची भांडी प्रयोगशील होती. अजिंठा लेण्यांचे सौंदर्य पॉटरीमधे उतरवलेले वैशिष्ट्यपूर्ण प्रयोग म्युझियममधे अभिमानाने जपले गेले. मोगलकालीन रागमाला मिनिएचर पेंटींगचा एक मोठा महत्त्वाचा संग्रहही म्युझियमकडे आला.

शहराची संस्कृती, व्यापार, आधुनिकता, कला, पोषाख, मनोरंजनाची, शेतीची साधने, विविध धार्मिक संदर्भ, पुस्तके, नकाशे, छायाचित्रे, छापील कागद, चित्रे, शिल्पे सर्व काही म्युझियममधे जतन केले गेले. तत्कालीन मुंबई शहराच्या जडणघडणीचा, प्रगतीचा उत्तम दस्तावेज त्यातूनच उभारला जात होता. आज संपूर्ण देशभरात एखाद्या शहराचे इतके अचूक आणि सविस्तर डॉक्युमेंटेशन त्रिमिती स्वरुपात कोठेही नाही. डॉ. भाऊ दाजी लाड म्युझियम एक आदर्श सिटी म्युझियम बनले.

एकोणिसाव्या शतकाच्या अखेरच्या टप्प्यात मुंबईला काही दुर्दैवी घटनांचा सामना करावा लागला ज्यात शहराची मोठ्या प्रमाणावर आर्थिक, सामाजिक पिछेहाट झाली. इथल्या व्यापार उद्योगाला उतरती कळा लागली, आर्थिक मंदी आली, त्यातच ब्युबोनिक प्लेगच्या साथीमुळे शहरात हाहाकार माजला. याचा परिणाम म्युझियमची व्यवस्था दुर्लक्षित होण्यात, त्याच्याविषयी अनास्था निर्माण होण्यात झाली. प्रेक्षकांची रीघ ओसरली. म्युझियम हळूहळू एकाकी होत गेले. नंतरच्या क्यूरेटर्सनाही प्रदर्शनाच्या मांडणीमध्ये फारसा रस नव्हता. एकोणिसाव्या शतकाच्या कारागिरीचा उत्तम नमुना असलेल्या वस्तू कोणत्याही संकल्पनेशिवाय म्युझियममधे रचून ठेवल्याने त्यांना खेळण्यांचे स्वरुप येत गेले. म्युझियमचा शहराची सांस्कृतिक, सामाजिक, ऐतिहासिक घडामोडी टिपून ठेवण्यातला आगळेपणा लोकांसमोर न आल्याने त्याचे वैशिष्ट्यच लयाला गेले होते.

शंभर वर्षांनंतर केल्या गेलेल्या म्युझियमच्या पुनरुज्जीवनामध्ये इमारतीचे, त्यातल्या कलावस्तूंचेच फक्त पुनरुज्जीवन झाले नाही, तर म्युझियमच्या नव्या संचालिका तस्निम मेहता यांनी म्युझियमच्या स्थापनेमागच्या मुळ संकल्पनांचाही वेध घेऊन मांडणीचा पुनर्विचार केला. म्युझियम त्याच्या मुळच्या, झळाळत्या रुपात पुन्हा मुंबईच्या नागरिकांसमोर येऊ शकले ते या प्रयत्नांमधूनच. युनेस्कोचा कल्चरल कॉन्झर्वेशनचा प्रतिष्ठित पुरस्कार म्युझियमचे ट्रस्टी अभिमानाने मिरवतात.   

तत्कालीन मुंबई प्रांतातल्या कला-कारागिरीचे दस्तावेजीकरण करणाऱ्या डॉ. भाऊ दाजी लाड म्युझियममधे आजच्या समकालीन कलेची वैशिष्ट्यपूर्ण प्रदर्शने सातत्याने भरतात. आधुनिक आणि समकालीन भारतीय चित्रकलेचा इतिहास शिकवणारा एक शैक्षणिक उपक्रम म्युझियममध्ये चालवला जातो. म्युझियमच्या पूर्वेकडील बागेत शालेय विद्यार्थ्यांकरता कला-कारागिरीच्या कार्यशाळा भरतात. मुंबईकर म्युझियमच्या सर्व कार्यक्रमांना उत्साहाने प्रतिसाद देतात. काळाचे एक चक्र पूर्ण झाले. मुंबई शहराचे प्रतिनिधित्व करणारे हे सिटी म्युझियम पुन्हा एकदा नागरिकांनी गजबजले आहे.

– शर्मिला फडके 9820378244 Sharmilaphadke@gmail.com

About Post Author

Previous articleनारायण मेघाजी लोखंडे – भारतीय कामगार चळवळीचे जनक (Father of the Indian Labour Movement – Narayan Meghaji Lokhande)
Next articleबहनो और भाइयो… (Ameen Sayani)
शर्मिला फडके या लेखक, कला-इतिहास अभ्यासक आहेत. वनस्पतीशास्त्रातील पदवी शिक्षणानंतर त्यांनी पत्रकारिता, जाहिरात कला, प्राचीन आणि समकालीन भारतीय तसेच पाश्चात्य कलेचा इतिहास, आधुनिक भारतीय कला-संस्कृती या विषयांमधे विशेष शिक्षण घेतले आहे. कला संशोधन-लेखन-दस्तावेजीकरण यामधे त्यांना विशेष रस आहे. विविध विषयांवर गेली पंधराहून अधिक वर्षे दैनिके, मासिके, दिवाळी अंकांमधे, तसेच ’चिन्ह’ या कला-वार्षिकामधे त्या सातत्याने लेखन करत आहेत. चित्रकार राजा रविवर्मा यांच्या चित्रनायिका आणि व्यावसायिक कलाजीवन या विषयावरील त्यांचा शोधनिबंध प्रसिद्ध आहे. त्यांची ‘फोर सीझन्स’ ही पर्यावरण आणि मानवी नातेसंबंधांचा वेध घेणारी कादंबरी प्रकाशित झाली आहे. समकालिन तुर्की साहित्यातली पुस्तक मालिका, तसेच इतरही निवडक इंग्रजी पुस्तकांचे अनुवाद त्यांनी केले आहेत. त्या म्युझियम आणि पर्सनल मेमरीज विषयाशी संबंधित शोधप्रकल्पावर काम करत आहेत.

4 COMMENTS

  1. भाऊ दाजी लाड या संग्रहालयाविषयी अतिशय उत्तम लेख वाचला. मनापासून आभार

  2. फार माहितीपूर्ण लेख. भाषा सोपी आणि अभ्यासपूर्ण! खुप धन्यवाद शर्मिला फडके.

  3. अतिशय सुरेख लेख. लेख वाचून संग्रहालयाला भेट देण्याची उत्कंठा वाढली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here