छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय (Chhatrapati Shivaji Maharaj Vastusangrahalay)

0
264

म्युझियम म्हणजेच वस्तुसंग्रहालय हे अनौपचारिक शिक्षणाचे प्रभावी माध्यम आहे. छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयाच्या कलादालनात चित्रांचा अभ्यास करणारे विद्यार्थी पाहिले किंवा ‘नैसर्गिक इतिहास’ विभागातली लहान मुले पाहिली की या विधानाचा प्रत्यय येतो. छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय हे मुंबई शहराचा मानबिंदू आहे. देशातील कला-इतिहास-संस्कृतीचा वारसा काळजीपूर्वक जतन करणारे आणि त्याचबरोबर समकालीन कला-संस्कृतीच्या वाढीकडेही तितक्याच डोळसपणे व कृतिशीलतेने पाहणारे ते देशातील एक महत्वाचे सांस्कृतिक केंद्र बनले आहे.

एक परिपूर्ण संस्था असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयाचा सर्वांगीण परिचय करून देत आहेत कला इतिहासाच्या अभ्यासक शर्मिला फडके. त्या शहरातल्या इतर वैविध्यपूर्ण वस्तुसंग्रहालयांचा आणि कला-दालनांचा परिचयही यथावकाश ‘थिंक महाराष्ट्र’च्या वाचकांना करून देणार आहेत.

‘मोगरा फुलला’ या दालनातील इतर लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

-सुनंदा भोसेकर

छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय

“Real museums are places where Time is transformed into Space.”  Orhan Pamuk, The Museum of Innocence

म्युझियम म्हणजे रोजच्या बोलण्यातले CSMVS (सीएसएमव्हीएस). त्याचे पूर्ण नाव ‘छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय’. आजपर्यंत इथे किती वेळा येणे झाले ते आठवतही नाही. प्रदर्शन पहायला, लेक्चर्स ऐकायला, पारंपरिक हस्तकला कारागिरांच्या कार्यशाळेत, कधी काही संदर्भ शोधायला लायब्ररीमधे, कधी म्युझियम शॉपमधून खास असे काही खरेदी करायला किंवा सरत्या उन्हाळ्यात अनेकदा म्युझियमच्या देखण्या बगिच्यातील सळसळत्या सोनेरी अमलताशला बघायला म्हणूनही येणे झाले.

पहिल्यांदा बहुधा शाळेच्या सहलीबरोबर किंवा त्याही आधी आईबाबांसमवेत मे महिन्यातल्या एखाद्या सुट्टीत इथे आले असेन. त्यावेळी त्याचे नाव ‘प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम’ होते. अजूनही मुंबईच्या टॅक्सीवाल्यांना ’प्रिन्स ऑफ वेल्स चलो’ हीच भाषा कळते. नेणीवेतल्या स्मृतीमधेही इथे येणे हा परंपरेचा अपरिहार्य भाग असावा असेच वाटत रहाते इतका या म्युझियमचा सहवास नेणीवेत रुजलेला आहे.

प्रचंड गजबजलेल्या हुतात्मा चौकातून, जहांगीर आर्ट गॅलरीचा कोपरा ओलांडला की पुढे कुलाब्याच्या दिशेने जाणाऱ्या महात्मा गांधी रस्त्याच्या डाव्या बाजूला, अर्धचंद्राकृती जमिनीवर म्युझियमच्या आयताकृती इमारतीचा पसारा आहे. प्रचंड, नक्षीदार, लोखंडी प्रवेशद्वारातून आत पाऊल टाकताच जाणवणाऱ्या भव्यतेसोबतच मनाला नीरवतेची प्रसन्न जाणीव होते. बाहेरची गजबजलेली मुंबई, तुकडा काढून वेगळा करावा तशी अलगद दूर होते. प्रवेशद्वारापासून पुढे म्युझियमच्या मुख्य इमारतीपर्यंत जायचा मार्ग अतीशय देखणा. हिरवागार, नियोजनबद्ध बगिचा, आवारातली विलायती फणसापासून, पाम, शिरीष, कदंबाची दाट वृक्षराजी, अधे मधे शिल्पांची मनोरम रचना; पाहताना पाय हमखास रेंगाळतातच.

म्युझियमची तीन मजली इमारत हा स्थापत्यकलेचा एक उत्कृष्ट नमुना आहे. ग्रेड वन हेरिटेज असणाऱ्या या इमारतीची बांधणी इंडो-सारसेनिक शैलीची आहे. इमारतीसाठी बफ व ब्लू (पीतवर्णी व नीलवर्णी) बेसॉल्ट दगडाचा वापर केला आहे. हा दगड मुंबई परिसरातील मालाड आणि कुर्ला येथील दगडांच्या खाणींमधूनच काढलेला आहे. स्थानिकरित्या उपलब्ध बांधकाम साहित्याचा वापर हे या इमारतीचे मोठे वैशिष्ट्य आहे. पारंपरिक हिंदू आणि सारसेनिक (Saracenic) वास्तुशैलीचा उत्तम मिलाफ असणाऱ्या या इमारतीत पाश्चात्य वास्तुशैलीचेही काही घटक मिसळलेले आहेत. मुख्य दालनात भारतीय पद्धतीचे खांब, कमानी, एकमेकींना छेदून जाणाऱ्या प्रचंड कमानींवर पेलला गेलेला उमललेल्या कमळाच्या पाकळ्यांवरचा उत्तुंग घुमट, त्यातून निर्माण झालेल्या अद्भूत, सुंदर भौमितीक रचनांमुळे म्युझियमची वास्तु आतून अत्यंत देखणी दिसते. म्युझियमच्या इमारतीचा घुमट बाहेरुन बघताना बराचसा विजापूरच्या गोल घुमटासारखा भासतो. म्युझियमच्या हिरवळीवर एका संध्याकाळी म्युझियम बंद होण्याच्या सुमारास उभे राहून इमारतीच्या कमानींवर पेलल्या गेलेल्या निळसर घुमटाकडे पाहिले होते, मावळत्या सूर्याचा गुलाबी, केशरी रंग घुमटावरुन ओघळत होता.

पहिल्या मजल्यावरील वर्तुळाकार रेलिंगकरता नाशिक येथील खानदानी वाड्याच्या डौलदार, सागवानी लाकडी कमानींचा अत्यंत कौशल्यपूर्ण वापर केला आहे, सारसेनिक शैलीच्या मनो-यांच्या शिखरांवरचे छोटे गोलाई असलेले आकार, कमानींमधील नक्षीदार जाळ्या, राजपूत डौलाचे झरोके, हिंदू देवालयातले कोनाडे आणि अर्धोन्मिलित गूढ व्हरांडे अशा विविध शैलींच्या अनेक असमान घटकांचा इथे सहज आणि सुंदर मिलाफ आहे. म्युझियमचे प्रशस्त व्हरांडे, देखणे, वळणदार, भव्य जिने, सज्जांना केलेले बारीक, कलाकुसरीचे जाळीकाम, गवाक्षांमधून पाझरणारा प्रकाश आणि सुखद वारा यामुळे म्युझियमच्या राजेशाही, देखण्या रुपात भर पडते. मधल्या मुख्य दालनातून उजव्या हाताच्या प्रशस्त कॉरिडॉरमधून पुढे जात असताना आपण इतिहासाचे असंख्य टप्पे ओलांडत पुढे जात रहातो.

उत्कृष्ट स्थापत्य सौंदर्याचे लेणे ल्यालेली, कला-इतिहास-संस्कृतीचे संचित पोटात बाळगणारी म्युझियमची इमारत हे मुंबईचे वैभव आहे. तिच्या स्थापनेचा इतिहासही तितकाच वैशिष्ट्यपूर्ण. सर फिरोजशहा मेहता, जस्टिस बद्रुद्दीन तैय्यबजी, शेठ नरोत्तमदास गोकुळदास, न्यायमूर्ती चंदावरकर, ससून जे. डेव्हिड यांच्यासारख्या तत्कालीन मुंबई प्रांताच्या सांस्कृतिक जडणघडणीत सक्रिय सहभाग असलेल्या काही प्रतिष्ठित, मान्यवर व्यक्ती टाऊन हॉलमधे 14 ऑगस्ट 1905 रोजी एकत्र आल्या होत्या. प्रिन्स ऑफ वेल्स, जो पुढे पंचम जॉर्ज बादशहा म्हणून ओळखला गेला; त्याच्या संकल्पित मुंबई भेटीत त्याच्या स्वागताप्रीत्यर्थ एक कायमस्वरुपी स्मृतीचिन्ह उभारावे असा ठराव या सभेत केला गेला. शहरात एकही चांगले म्युझियम नसल्याची उणीव व खंत सर्वांनाच दीर्घकाळ भासत होती, त्यामुळे हे स्मृतीचिन्ह सार्वजनिक म्युझियमच्या स्वरुपात असावे हाही निर्णय घेण्यात आला.

11 नोव्हेंबर 1905 रोजी म्युझियमचा पायाभरणी समारंभ प्रिन्स ऑफ वेल्स यांच्या हस्ते झाला. नाव दिले गेले ’प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम ऑफ वेस्टर्न इंडिया’. म्युझियमचे वास्तुविशारद होते जॉर्ज डब्लू. विटेट. 1909 साली एक खुल्या स्पर्धेद्वारे म्युझियमकरता प्रमुख वास्तुविशारद म्हणून त्यांची निवड करण्यात आली होती. जॉर्ज विटेट त्यांच्या इंडो-सारसेनिक पद्धतीच्या वास्तुशैलीकरता प्रसिद्ध होते. मुंबईची ओळख असलेले गेटवे ऑफ इंडिया तसेच जनरल पोस्ट ऑफिसची वैशिष्ट्यपूर्ण इमारत जॉर्ज विटेट यांनीच उभारल्या होत्या.

म्युझियमची इमारत सन 1914 साली बांधून पूर्ण झाली. दरम्यान पहिले महायुद्ध सुरु झाले तेव्हा या इमारतीचा उपयोग लष्करी इस्पितळ म्हणून करण्यात आला. त्यात अनाथ, लहान मुलांच्या निवा-याचीही सोय केली गेली. 10 जानेवारी 1923 रोजी मुंबईचे गव्हर्नर जॉर्ज लाईड यांच्या पत्नीच्या हस्ते म्युझियमचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले. बराच काळ म्युझियमबद्दल कुतूहल मनात बाळगलेल्या लोकांची प्रवेशद्वारासमोर रिघ लागली होती. आतील दुर्मिळ, ऐतिहासिक कलावस्तू, प्राचीन मूर्तीसंग्रह बघण्याकरता लोकांनी गर्दी केली होती. त्यानंतर आजतागायत म्युझियममधील ही गर्दी, गजबज कायम राहिली आहे. नंतरच्या काळात अनेक उलथापालथी झाल्या. बॉम्बे प्रेसिडेन्सीचे रुपांतर आधी बॉम्बे सिटीमध्ये आणि नंतर मुंबई शहरात झाले. ‘प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम ऑफ वेस्टर्न इंडिया’चे नामांतर ’छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालया’त झाले.

इसवी सन 1936 साली ग्रेगसन बॅटली अ‍ॅन्ड किंग या वास्तुविशारद संस्थेने डिझाईन केलेला ‘नैसर्गिक इतिहास’ नावाचा एक नवा विभाग ‘दि बॉम्बे नॅचरल हिस्टरी सोसायटी’च्या (बीएनएचएस) मदतीने म्युझियमला जोडण्यात आला. सुप्रसिद्ध पक्षीतज्ज्ञ, डॉ. सलिम अली यांच्या मार्गदर्शनाखाली तो उभारला गेला होता. यात भारतीय वन्यजीवनाचे अत्यंत कल्पकतेने मांडलेले आणि थक्क करणारे समृद्ध दर्शन आपल्यासमोर येते. बीएनएचएसच्या सदस्यांनी अनेक वर्षे संग्रहित केलेले प्राण्यांचे नमुने वस्तुसंग्रहालयाला भेट दिले आहेत. प्राणी, पक्षी, सरपटणारे प्राणी, मासे व उभयचर प्राणी या सर्वांचे टॅक्सीडर्मी केलेले (पेंढा भरलेले) नमुने, तसेच हुबेहूब प्रतिमा या दालनात पाहण्यास मिळतात. त्यात फ्लेमिंगो, ग्रेट हॉर्नबिल, गवे, वाघ आहेत, चित्ताही आहे. मुलांना या विभागातून फिरायला अतिशय आवडते. नवलाईने ते इथल्या दुर्मिळ, आता नामशेषही झालेल्या असंख्य प्राणी-पक्ष्यांच्या जिवंत भासणाऱ्या प्रतिकृती न्याहाळतात.

‘प्रेमचंद रॉयचंद गॅलरी’ हे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या प्रदर्शनांसाठीचे दालन 2002 साली सुरू केले गेले. ‘प्रेमचंद रॉयचंद ऍण्ड सन्स’ यांच्या मदतीने वस्तुसंग्रहालयाच्या विस्तारित इमारतीचे नूतनीकरण झाले, त्यामध्ये या दालनाचा समावेश होता. 2008 साली म्युझियमला एका नव्या इमारतीची जोड मिळाली. तीस हजार चौरस फूट जागेत पाच नवी दालने, कॉन्झर्व्हेशन स्टुडिओ, प्रदर्शनीय कलादालन आणि सेमिनार रुम उभारले गेले. म्युझियमसमोरचा बगीचा, त्यातील कलात्मक पुतळे मात्र आजही आपले सौंदर्य मूळ आराखड्यानुसारच अबाधित राखून आहेत.

म्युझियम म्हणजे भूतकाळात डोकावून पाहण्याची एक खिडकी. जगातील विविध संस्कृतींचे ठसे जपण्याचे काम संग्रहालय करते. कलासंग्रह हा त्याचा प्राण. गतकाळातील संस्कृती आणि समाज यावर प्रकाश टाकणाऱ्या अनेक वस्तू म्युझियममधे आहेत. अनेक अभ्यासकांनी आणि रसिकांनी त्यांच्याकडील संग्रह भेट दिल्याने ते ‘श्रीमंत’ झाले आहे.

भारतातील कलावस्तू तसेच चीन, जपान आणि युरोपीय देशांतील कलाकृतींचा यात समावेश आहे. 1915 साली सेठ पुरुषोत्तम मावजी यांचा भारतीय लघुचित्रे तसेच शस्त्रास्त्रे, वस्त्रे व इतर कलावस्तूंचा संग्रह संग्रहालयाला मिळाला. विसाव्या शतकाच्या सुरुवातीला भारतातील अनेक ऐतिहासिक जागी केल्या जाणाऱ्या उत्खननातून मिळणाऱ्या वस्तूही संग्रहालयात आहेत. उदाहरणार्थ, पाकिस्तानातील मिरपूरखास येथील बौद्धस्तुपाचे उत्खनन करून तेथे मिळालेल्या वस्तू उत्खननकार हेन्री कुझेन्स यांनी या संग्रहालयाला भेट दिल्या. सर रतनजी टाटा आणि सर दोराबजी टाटा या टाटा बंधूंचे कलासंग्रह त्यांच्या मृत्यूनंतर अनुक्रमे 1922 व 1933 मध्ये संग्रहालयाला भेट मिळाले. त्यात पेंटीग्ज, पौर्वात्य शस्त्रात्रे, अद्वितीय मौल्यवान जडजवाहिर, चिनी मातीच्या वस्तू, चांदी, रुपे यापासून केलेल्या कलात्मक वस्तू, भारतीय हस्तशिल्पाचे नमुने, ब्रॉन्झ व इतर धातूपासून बनवलेल्या कलाकृती, नेपाळी, तिबेटियन कलाकृती, अशा अगणित गोष्टी आहेत. 1928 मध्ये सर जे. जे. स्कूल ऑफ आर्टचा कलासंग्रहही संग्रहालयाला दिला गेला. 1934 मध्ये सर अकबर हैदरी यांचा संग्रह,1972 मध्ये सर कावसजी जहांगीर यांचा संग्रह वस्तुसंग्रहालयात सामील झाला. व्यवसायाने वकील, छायाचित्रकलेतील तज्ज्ञ आणि कलेचे अभ्यासक कार्ल जे. खंडालावाला वस्तुसंग्रहालाच्या विश्वस्त मंडळाचे प्रदीर्घ काळ सदस्य आणि अध्यक्ष होते. त्यांनी आपल्या संग्रहातील दुर्मिळ कलाकृती संग्रहालयाला भेट दिल्या.

आज म्युझियमच्या संग्रहात गुप्त, मौर्य, चालूक्य आणि राष्ट्रकुट कालीन प्राचीन शिल्प, टेराकोटा, ब्रॉन्झच्या कलाकृती, हडाप्पाच्या उत्खननातून मिळालेल्या कलावस्तू, युरोपियन पेंटींग्ज, चीन आणि जपानमधील हस्तीदंती, पोर्सिलिन, जेड इत्यादींच्या मौल्यवान वस्तू, भारतीय लघुचित्रशैलीतल्या अप्रतिम, देखण्य़ा चित्रांचा संग्रह, इत्यादींसहित पन्नास हजारांच्यावर दुर्मिळ, कलात्मक वस्तू आहेत. वस्तुसंग्रहालयात विषयानुसार पुरातन वस्तुसंग्रह, कलासंग्रह, चित्रकलासंग्रह व प्रकृतिविज्ञानसंग्रह असे चार विभाग केले गेले आहेत.

भारतातील शिल्पकलेची सुरुवात ही हडप्पा संस्कृतीच्या काळात सुरू झाली असे म्हणता येईल; परंतु हडप्पा संस्कृतीचा काळ (ख्रिस्तपूर्व सुमारे 1800 वर्षे) ते मौर्यकाळ (ख्रिस्तपूर्व चवथे शतक) यामधील काळातले शिल्पकलेचे नमुने दुर्मिळ आहेत. त्यानंतरच्या काळात शिल्पकलेच्या अनेक शैली विकसित झाल्या. प्रादेशिकता तसेच माध्यम वैशिष्ट्यांच्या अनुषंगाने प्रत्येक शैली निर्माण झाली. महाराष्ट्र, कर्नाटक, मध्य प्रदेश, गुजरात आणि काश्मीर या राज्यांत सापडलेली शिल्पे वस्तुसंग्रहालयात आहेत. पाकिस्तान व अफगाणिस्तान येथील शिल्पेदेखील आहेत. तत्कालीन सामाजिक व सांस्कृतिक परिस्थितीचे दर्शन घडविणारी मिनिएचर पेंटींग्ज किंवा लघुचित्रे, राजपूत शैलीतली रागमाला पेंटींग्ज हा म्युझियमच्या कलासंग्रहातील वैभवशाली खजिना आहे. चित्रकलेच्या अभ्यासकांच्या दृष्टीने या संग्रहाचे संदर्भमूल्यही मोठे. चौदाव्या शतकापासून ते समकालीन चित्रापर्यंतचा समावेश लघुचित्र दालनात आहे.

इसवी सन 1550-70 या काळातील लौर-चंदा, अकबराच्या चित्रशाळेत निर्मित अनवर-ए-सुहैली, इसवी सन 1649 मध्ये मनोहर नामक चित्रकाराने चितारलेले मेवाड शैलीतील रामायण इथे आहे. अठराव्या व एकोणिसाव्या शतकातील रोजच्या वापरातल्या वस्तू तसेच घरगुती उपयोगाच्या गोष्टी आणि राजघराण्यात वापरल्या जाणाऱ्या अनेक शोभिवंत वस्तूही संग्रहालयात आहेत. ख्रिस्तपूर्व सातव्या शतकापासून ते आजपर्यंतच्या नाण्यांचा मोठा संग्रहही येथे आहे. एका दिवसात म्युझियम संपूर्ण पहाता येणे अशक्य आहे. इमारतीच्या अंतर्भागात असंख्य प्रेक्षणीय, पौराणिक, ऐतिहासिक महत्त्वाच्या वस्तूंचा संग्रह आहे तसेच बाहेरच्या बगिच्यातही अनेक पौर्वात्य बनावटीचे ब्रॉन्झचे पुतळे आहेत. पंचम जॉर्ज यांचेही नेव्हल कमांडरच्या गणवेशातील ’वेड’ या प्रख्यात शिल्पकाराने घडवलेले एक आकर्षक शिल्प यात आहे. त्याच्या चबुतऱ्यावर पायाभरणी समारंभ आणि महानगरपालिका सदस्यांकडून मानपत्र-प्रदान समारंभ प्रसंगाची चित्रे कोरलेली आहेत.

म्युझियमला 2010 साली सांस्कृतिक वारसा जतनाचा प्रतिष्ठित युनेस्को एशिया-पॅसिफ़िक हेरिटेज अ‍ॅवार्ड मिळाले. आज म्युझियम कला-इतिहास-संस्कृतीचा वारसा काळजीपूर्वक जतन करणारे आणि त्याच बरोबर समकालीन कला-संस्कृतीच्या वाढीकडेही तितक्याच डोळसपणे व कृतीशीलतेने पहाणारे एक महत्वाचे सांस्कृतिक केंद्र बनले आहे. सदाशिव गोरक्षकर, दिलीप रानडे, सव्यसाची मुखर्जी या म्युझियमच्या पूर्वीच्या व आजच्या संचालकांना, विश्वस्तांना आणि क्युरेटर्सना त्याचे संपूर्ण श्रेय जाते.

नव्या पिढीला आपल्या समृद्ध वारशाचा परिचय व्हावा, कला, इतिहासाबद्दल त्यांच्यात संवेदनशीलता निर्माण व्हावी, मनोरंजनासोबत अभ्यास व्हावा या हेतूने अनेक सांस्कृतिक, शैक्षणिक उपक्रम इथे आयोजित केले जातात. प्रागैतिहासिक काळातील दगडी हत्यारे येथे आपल्याला हाताळता येतात, त्यांची वैशिष्ट्ये जाणून घेता येतात. लोकांशी इतके जोडले गेलेले, विविध उपक्रम सातत्याने राबविणारे हे देशातले एकमेव म्युझियम आहे. कलावस्तूंच्या इतिहासाची, सांस्कृतिक वैशिष्ट्यांची थोडक्यात, महत्वाची माहिती, सूचना, कॉम्प्युटर किओस्क, ऑडिओ गाईडची सोय आहे. बाह्यरूपाइतकंच तिचं अंतरंगही देखणे राहील, याची काळजी घेतली जात असल्याचे पदोपदी जाणवते.

म्युझियमचा कॉन्झर्वेशन आणि रिस्टोरेशन (संवर्धन आणि जीर्णोद्धार) विभाग हा देशातील इतर कोणत्याही म्युझियमच्या तुलनेत अद्ययावत आणि कार्यरत विभाग आहे. या विभागातील संशोधन आणि प्रशिक्षण देशभरात नावाजले जाते. सोळाव्या शतकातील अत्यंत दुर्मिळ, महत्वाचे असे सम्राट अकबराच्या खाजगी अभ्यासिकेत त्याच्या प्रत्यक्ष सहभागातून निर्मिले गेलेले रेखाचित्रांनी युक्त ‘अनवर-इ-सुहैली’ या हस्तलिखिताचे रिस्टोरेशन इथे केले गेले. सतराव्या शतकातील मेवाडच्या रामायणाचे सचित्र हस्तलिखितही इथेच पुरुज्जीवित करुन त्याचे अलिकडच्या काळात एक खास डिजिटल प्रदर्शनही भरवले गेले.

कोणत्याही म्युझियमची तीन मुख्य कामे असतात. संग्रह करणे, तो लोकांपुढे मांडणे आणि त्याची देखभाल घेणे. आपली संस्कृती लोकांसमोर येईल, या वस्तूंच्या माध्यमातून लोकांशी संवाद साधता येईल अशा वस्तू मांडल्या गेल्या पाहिजेत. त्यांची रचना करताना आपल्याकडे किती जागा आहे याचा विचार करावा लागतो. फिरायला मोकळी जागा ठेवावी लागते. शोकेस असतील तर टाचा न उंचावता आतली वस्तू नीट बघता आली पाहिजे. त्या वस्तूबरोबर अगदी नेमकी माहिती दिली गेली पाहिजे. मग येतो तो या वस्तूंची देखभाल करण्याचा मुद्दा. या वस्तूंना प्रकाश मर्यादित पाहिजे, हवेत दमटपणा किती आहे याचा विचार करावा लागतो. म्युझियमचा कानाकोपरा अगदी स्वच्छ ठेवावा लागतो. हे सगळे त्या वस्तूंशी नाते जुळल्याशिवाय करता येणार नाही हे नक्की.

म्युझियम हे संवादाचे, अनौपचारिक शिक्षणाचे एक प्रभावी माध्यम आहे. त्यातील वस्तूंची योग्य निगा राखणे, त्यांच्या मांडणीत नवा दृष्टिकोन येणे हे जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत लोक म्युझियमकडे आकर्षित होणार नाहीत हे म्युझियमच्या संचालकपदाचा भार बत्तीस वर्षे वहाणा-या सदाशिव गोरक्षकरांनी ओळखले होते. त्यांच्यामुळे संग्रहालयाकडे पाहण्याच्या पारंपरिक दृष्टिकोनात बदल झाला. संग्रहालयशास्त्रातले आणि धातुमूर्ती शास्त्रातले तज्ज्ञ असलेल्या गोरक्षकरांनी प्रिन्स ऑफ वेल्सला आपल्या अपूर्व योगदानाने केवळ देशात नव्हे, तर जगातही प्रतिष्ठा मिळवून दिली.

म्युझियममधे समकालीन चित्रकलेला स्थान मिळवून देण्याचे श्रेय चित्रकार आणि म्युझियमचे प्रदर्शन सल्लागार दिलीप रानडे यांचे. विद्यमान महासंचालक सव्यसाची मुखर्जी यांचे धोरण आहे ‘जुनी वास्तू, जुन्या वस्तू आणि नवीन विचार’. म्युझियममधील अद्ययावत आर्ट कॉन्झर्वेशन सेंटर, लायब्ररी, दर्शकांशी संवाद साधण्यासाठी सातत्याने कार्यरत शैक्षणिक विभाग, ऑडिओ-व्हिज्युअल माध्यमातून विषयानुसार माहिती दालनातच उपलब्ध करून देण्याची सोय, त्यांनी केली. गेल्या काही वर्षांत वस्तुसंग्रहालयाने जगातील अनेक म्युझियम्सबरोबर सहयोगी (collaboration) उपक्रम सुरू केले आहेत. सन 2012 मध्ये ब्रिटिश म्युझियम, लंडन येथून ‘ममी- दि इन्साईड स्टोरी’ हे प्रदर्शन संग्रहालयात भरविण्यात आले होते. या वर्षी एँटवर्प येथील फ्लेमिश शैलीची तैलचित्रे मुंबईत आणण्यात येणार आहेत. वस्तुसंग्रहालयात येणाऱ्यांना एक परिपूर्ण अनुभव देण्याचा प्रयास सतत सुरू असतो.

भारतीय कलापरंपरेतील प्राण्यांचं स्थान’, ‘भारतीय साहित्यातून दिसणारा कृष्ण’, राजस्थानातील स्थापत्यशैलीवर प्रकाश टाकणारं ‘हवेली’, महाराष्ट्रातील संस्कृतीच्या प्रवासाचा वेध घेणारं ‘डॉन ऑफ सिव्हिलायझेशन इन महाराष्ट्र’ अशी अनेक यशस्वी प्रदर्शनं सांगता येतील.

टागोरांच्या जन्मशताब्दीनिमित्त भरलेले रवींद्रनाथ जीवनगौरव प्रदर्शनापासून ते शम्मी कपूरच्या चाहत्याने केलेल्या त्याच्या छायाचित्र आणि पोस्टर्सच्या प्रदर्शनापर्यंत ते अगदी परवा पाहिलेल्या बॉम्बे स्कूलच्या ’प्रवाह’ किंवा बिमल रॉय यांच्या चित्रपट कारकिर्दीची ओळख करून देणारे प्रदर्शन पहाण्याकरता, जहांगिर निकोलसनचा अप्रतिम समकालीन चित्रकलेचा संग्रह आणि अतुल दोडिया किंवा सुधीर पटवर्धनांसारख्या आजच्या वेगळ्या, स्वतंत्र विचारांच्या कलाकारांची व्याख्याने ऐकण्याकरता किंवा कलेच्या इतिहासातील काही संदर्भ शोधायला म्युझियमच्या लायब्ररीत जाण्याकरता आजही पावले सातत्याने म्युझियमकडे वळत रहातातच. म्युझियमचे प्रशस्त, लोखंडी, नक्षीदार प्रवेशद्वार ओलांडून आत शिरले की मनात येते की पुन्हा एकदा म्युझियममधे मनसोक्त फेरफटका मारावा, प्रत्येक कलाकृतीसमोर रेंगाळावे, जिन्यांवरुन चढ-उतार करताना, दालने ओलांडताना पाय दुखवून घ्यावेत. शहराला एक म्युझियम असावं आणि ते सीएसएमव्हीएससारखेच असावे.

That’s why we have the Museum, Matty, to remind us of how we came, and why: to start fresh, and begin a new place from what we had learned and carried from the old.”  Lois Lowry, Messenger

शर्मिला फडके 9820378244 Sharmilaphadke@gmail.com

About Post Author

Previous articleमैं वो झेलम नहीं हूँ (I am not that Zelum)
Next articleएव्हीलीन कोब्बोल्ड – स्वेच्छेने केलेले इस्लाम धर्मांतर
शर्मिला फडके या लेखक, कला-इतिहास अभ्यासक आहेत. वनस्पतीशास्त्रातील पदवी शिक्षणानंतर त्यांनी पत्रकारिता, जाहिरात कला, प्राचीन आणि समकालीन भारतीय तसेच पाश्चात्य कलेचा इतिहास, आधुनिक भारतीय कला-संस्कृती या विषयांमधे विशेष शिक्षण घेतले आहे. कला संशोधन-लेखन-दस्तावेजीकरण यामधे त्यांना विशेष रस आहे. विविध विषयांवर गेली पंधराहून अधिक वर्षे दैनिके, मासिके, दिवाळी अंकांमधे, तसेच ’चिन्ह’ या कला-वार्षिकामधे त्या सातत्याने लेखन करत आहेत. चित्रकार राजा रविवर्मा यांच्या चित्रनायिका आणि व्यावसायिक कलाजीवन या विषयावरील त्यांचा शोधनिबंध प्रसिद्ध आहे. त्यांची ‘फोर सीझन्स’ ही पर्यावरण आणि मानवी नातेसंबंधांचा वेध घेणारी कादंबरी प्रकाशित झाली आहे. समकालिन तुर्की साहित्यातली पुस्तक मालिका, तसेच इतरही निवडक इंग्रजी पुस्तकांचे अनुवाद त्यांनी केले आहेत. त्या म्युझियम आणि पर्सनल मेमरीज विषयाशी संबंधित शोधप्रकल्पावर काम करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here