नारायण मेघाजी लोखंडे – भारतीय कामगार चळवळीचे जनक (Father of the Indian Labour Movement – Narayan Meghaji Lokhande)

1
129

नारायण मेघाजी लोखंडे यांना भारतीय कामगार चळवळीचे जनक असे सार्थपणे म्हटले जाते. ते महात्मा जोतीराव फुले यांचे सहकारी होते, रावबहादूर होते.

मुंबईच्या गिरणी उद्योगात 1870 नंतरच्या कालखंडात भरभराट होत गेली. त्यामुळे मँचेस्टरच्या गिरण्यांना मुंबईच्या गिरणी उद्योगाच्या स्पर्धेचा धोका जाणवू लागला. त्यांनी त्यावर निर्बंध घालण्यासाठी प्रयत्न सुरू केले. त्यातून मुंबईच्या गिरणी कामगारांच्यासाठी फॅक्टरी अॅक्ट लागू करण्याची मागणी पुढे आली. ब्रिटिश सरकारने त्यासाठी एक कमिशन मार्च 1875 मध्ये नेमले. त्यात अधिकांश गिरणीमालक किंवा कंपनी संचालक होते. बऱ्याच चर्चा, मतमतांतरे आणि गदारोळ घडून आला. फॅक्टरी बिल अखेर, नोव्हेंबर 1879 मध्ये सरकारपुढे मंजुरीसाठी आले. त्यात मजुरांच्या कामाच्या तासांवर मर्यादा घालण्याची तरतूद होती. परंतु त्यामुळे गिरण्या आणि मजूर अशा दोघांचेही नुकसान होईल अशी हाकाटी ‘मिल ओनर्स असोसिएशन’ने सुरू केली. त्यांचे म्हणणे, की त्यामुळे मुंबईतील गिरणी उद्योगाला खीळ बसेल असे होते. त्यांचा युक्तिवाद उद्योगात मंदी आहे, बेकारी आहे, कामगार प्रशिक्षित नाहीत तेव्हा कामाचे तास कमी करू नयेत असा होता. ‘दीनबंधू’ हे पत्र ‘सत्यशोधक चळवळी’चे नेते नारायण मेघाजी लोखंडे यांच्या संपादकत्वाखाली त्याच काळात 9 मे 1880 पासून निघू लागले.

‘दीनबंधू’ने सुरुवातीपासूनच उपेक्षित वर्गाच्या, कष्टकऱ्यांच्या दुखण्यांना वाचा फोडली. लोखंडे यांनी स्वतः मांडवीच्या गिरणीत स्टोअर कीपर म्हणून काम केलेले होते. त्यांनी गिरणी कामगारांचे हाल पाहिले होते. त्यांनी ‘दीनबंधू’तील लेखनासोबतच गिरणी कामगारांना संघटित करणे आरंभले. दरम्यान, 15 मार्च 1881 रोजी गव्हर्नर जनरलच्या कायदे कौन्सिलने फॅक्टरी बिल मंजूर केले. मालकवर्गाच्या विरोधामुळे त्यातील तरतुदी सौम्य केल्या होत्या. लहान मुलांना कामावर घेण्याचे वय सात वर्षे नमूद केलेले होते. लोखंडे यांनी त्यावर टीका करत ते किमान सोळा वर्षे असावे, नोकरीमुळे शिक्षणास मुकावे लागणाऱ्या मुलांच्या शिक्षणाची व्यवस्था सरकारने करावी, गिरणी कामगारांना मिळणारा तुटपुंजा पगार वाढवावा अशा मागण्या केल्या. ते नुसत्या मागण्या करून थांबले नाहीत. त्यांनी कामगारांना एकत्र करून 1884 साली ‘बॉम्बे मिल हँड्स असोसिएशन’ ही देशातील पहिली कामगार संघटना सुरू केली. त्याच साली कायद्यात सुधारणा करण्यासाठी कलेक्टर डब्ल्यू.बी. मूलक यांच्या अध्यक्षतेखाली एक फॅक्टरी कमिशन नेमले गेले.

गिरणी कामगारांची पहिली ऐतिहासिक सभा त्यांच्या मागण्या मांडण्यासाठी सुपारीबाग (परळ) येथे 23 सप्टेंबर 1884 रोजी झाली. सुमारे चार हजार कामगारांच्या एकजुटीचे दर्शन त्या सभेत घडले. लोखंडे यांनी त्याच सभेत कामगारांना साप्ताहिक सुटी दिली जावी अशी मागणी केली. पगार नियमित त्या-त्या महिन्याला व दर महिन्याच्या पंधरा तारखेपर्यंत दिला जावा, कामावरून काढणे असल्यास पंधरा दिवसांची नोटिस द्यावी, फॅक्टरी कमिशनवर कामगार प्रतिनिधींची नेमणूक केली जावी या मागण्याही मांडल्या. त्या सभेचा वृत्तांत ‘टाइम्स ऑफ इंडिया’ या वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाला. तशीच भव्य सभा पुन्हा, 26 सप्टेंबर रोजी भायखळा येथे झाली. पाच हजार पाचशे कामगारांच्या सह्यांचे निवेदन कलेक्टरांना दिले गेले आणि मग सुरू झाला आंदोलनांचा सिलसिला.

दोन गिरण्यांमधील कामगार पगार कपात आणि पगार देण्यास विलंब या मुद्यांवर नोव्हेंबर 1885 मध्ये संपावर गेले. कुर्ल्याच्या स्वदेशी मिलमध्ये संप 1887 मध्ये झाला. साधी साप्ताहिक सुटी मान्य होईना. शिवाय, रविवारी हिंदू लोकांस सुटी कशाला हवी असे ब्रिटिश अधिकाऱ्यांनाही वाटत होते. सणासुदीच्या सुट्टया पुरेशा आहेत असा युक्तिवाद केला गेला. त्यावर लोखंडे यांनी गिरणी कामगार असणारे बहुसंख्य लोक हे खंडोबाचे भक्त असून रविवार हा खंडोबाचा वार असल्याने साप्ताहिक सुटी रविवारीच असावी ही मागणी जोरदारपणे पुढे रेटली. सुमारे दहा हजार कामगारांची भव्य सभा 24 एप्रिल 1890 रोजी रेसकोर्सवर झाली. जनमताचा हा वाढता रेटा पाहून अखेर, 10 जून 1890 रोजी रविवारची साप्ताहिक सुटी मंजूर करण्याचा निर्णय मालकांना घ्यावा लागला. रविवारची सार्वत्रिक सुटी सध्या रूढ आहे. सर्वच जण रविवारच्या सुटीची आतुरतेने वाट पाहतात. त्यामागे सुमारे एकशेपस्तीस वर्षांपूर्वी हजारो कामगारांनी केलेला संघर्ष आहे !

लोखंडे यांचे कर्तृत्व केवळ कामगार चळवळीपुरते मर्यादित नाही. ते सर्वार्थांनी सत्यशोधक होते. ते हिंदी शेतकरी सभेचे सक्रिय कार्यकर्ते होते. लोकमान्य टिळक आणि समाजसुधारक आगरकर यांची वाजतगाजत मिरवणूक डोंगरी तुरुंगातून झालेल्या सुटकेनंतर काढून त्यांना मानपत्र अर्पण करण्यात लोखंडे यांचा पुढाकार होता. जोतीराव फुले यांना महात्मा हे बिरूद त्यांनी 11 मे 1888 रोजी भायखळा येथे आयोजित केलेल्या सभेत मोठ्या अभिमानाने जाहीरपणे लावले गेले. लोखंडे यांनी न्हावी समाजाची सभा ब्राह्मण विधवांच्या केशवपनाविरूद्ध डोंगरी येथे 23 मार्च 1890 रोजी बोलावली होती. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, त्यांनी 1893 मध्ये झालेल्या हिंदू-मुसलमान दंगलीने व्यथित होऊन शांतता समित्या स्थापन करण्यात पुढाकार घेतला. सहाय्य निधी उभारला आणि 1 ऑक्टोबर 1893 रोजी राणीच्या बागेत एकोपा मेळावा आयोजित केला !

त्यांची भूमिका धर्म, जाती यांवरून कष्टकऱ्यांमध्ये, समाजात फूट पडू नये अशी होती. ते मराठा ऐक्येच्छू सभा, मराठा रुग्णालय यांचे संस्थापक होते. त्यांनी ‘पंचदर्पण’ या पुस्तिकेचे लेखन, ‘सत्यशोधक निबंधमाला’ अथवा ‘हिंदू धर्माचे खरे ज्ञान’ या पुस्तिकांचे लेखन; तसेच, ‘दीनबंधू’तून समाजाभिमुख परंतु परखड लेखन सातत्याने केले. त्यांचे चौफेर काम आणि उदारमतवादी दृष्टिकोन यांनी प्रभावित होऊन ब्रिटिश सरकारने त्यांना ‘जस्टीस ऑफ पीस’ आणि ‘रावबहादूर’ या पदव्या दिल्या. पण त्यांची खरी पदवी ‘सत्यशोधक’ हीच राहिली. त्यांचे निधन वयाच्या अवघ्या अठ्ठेचाळीसाव्या वर्षी, 9 फेब्रुवारी 1897 रोजी प्लेगमुळे ठाणे येथे झाले.

– प्रतिमा जोशी 9821263002 pratimajk@gmail.com

(युगांतर, 3 फेब्रुवारी 2022 वरून उद्धृत, संपादित-संस्कारित)

About Post Author

1 COMMENT

  1. छान माहिती. काळाच्या पडद्याआड गेलेल्या या नेत्याची माहिती वाचण्यात खूप आनंद वाटला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here