रुक्मिणी स्वयंवर (Rukmini Swayamvar)

1
340

मध्ययुगीन मराठी साहित्यात रुक्मिणीच्या स्वयंवराची कथा वारंवार लिहिली गेली. आद्य मराठी कवयित्री महदाइसा उर्फ महदंबा हिने ‘मातकी रुक्मिणी स्वयंवर’ हे आख्यानकाव्य लिहिले आहे. रामदेवराय यादवाने त्याच्या पदरी असलेल्या कवी नरेन्द्राकडे, त्याने लिहिलेले ‘रुक्मिणी स्वयंवर’ त्याच्या नावावर करावे म्हणून आग्रह धरला आणि प्रत्येक ओवीसाठी एक सोन्याचे नाणे देण्याची तयारी दाखवली. त्यावर “ना राजे हो आमचेया कवीकुळा बोलु लागैल” असे बाणेदारपणे सांगून कवी नरेन्द्र व-हाड प्रांतात निघून गेला अशी आख्यायिका आहे. महानुभाव पंथातल्या अनेक कवींनी नंतर हे आख्यानकाव्य लिहिले आहे. नंतरच्या काळात लिहिलेले आणि (साहित्यबाह्य कारणासाठी) आजही लोकप्रिय असलेले रुक्मिणी स्वयंवर म्हणजे संत एकनाथांचे ‘रुक्मिणी स्वयंवर’. या कथेच्या नंतरही अनेक आवृत्त्या निघत राहिल्या.

मध्ययुगातील परचक्रांच्या पार्श्वभूमीवर या काव्यांनी मराठी मनाला स्वत्वाची जाणीव करून दिली, सामाजिक, नैतिक मूल्यांचे भान दिले, मराठी भाषा जतन केली. या काव्यांची सांगोपांग माहिती सांगत आहे आदिती जाधव ही विद्यार्थिनी.

‘मोगरा फुलला’ या दालनातील इतर लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

-सुनंदा भोसेकर

रुक्मिणी स्वयंवर

मध्ययुगीन काळात मराठीमध्ये भरपूर प्रमाणात वाङ्मय निर्मिती झालेली दिसते. त्यात प्रामुख्याने सांप्रदायिक, अध्यात्मिक स्वरूपाची ग्रांथिक रचना आढळते. ह्या सांप्रदायिक, अध्यात्मिक स्वरूपाच्या रचनांमध्ये कृष्णभक्तीवर आधारलेल्या अनेक रचना आहेत. त्यातील मध्ययुगीन काळातील लोकप्रिय म्हणता येईल अशी वाङ्मयीन रचना म्हणजे रुक्मिणी आणि श्रीकृष्णाच्या प्रेमविवाहावर आधारित ‘रुक्मिणीस्वयंवर’ हे आख्यानकाव्य होय.

रुक्मिणी ही विदर्भाच्या भीमक राज्याची कन्या. महाकाव्यांमध्ये किंवा पौराणिक वाङ्मयामध्ये आढळणा-या स्वयंवरांपेक्षा तिचे स्वयंवर वेगळ्याप्रकारे झाले. रुक्मिणीकरता भावी वर निश्चित करण्याच्या दृष्टीने भीमक राजाच्या दरबारी वेगवेगळ्या देशांतल्या राजकुमारांची वर्णने करण्यात आली. तेव्हा त्या दरबारात एक किन्नर आला होता, त्याने द्वारकेचा राजा श्रीकृष्ण याचे वर्णन केले आणि ते वर्णन ऐकूनच रुक्मिणीचे कृष्णावर प्रेम जडले. पण तिचा भाऊ, रुक्मी ह्याला ते मान्य नव्हते. त्याला रुक्मिणीचा विवाह मित्र शिशुपाल ह्याच्याशी लावावा, असे रुक्मीने भीमक राजाला पटवून दिले. तेव्हा प्रेमविव्हळ झालेल्या रुक्मिणीने कृष्णाला प्रेमपत्र लिहिले. त्या पत्रात तिने व्यक्त केलेल्या इच्छेला अनुसरून कृष्णाने रुक्मिणीच्या सहमतीने तिचे हरण केले आणि तिच्याशी विवाह केला. ही रुक्मिणीस्वयंवराची कथा बहुतेक सर्व भारतीय माणसांना ठाऊक असते. महाभारतातले हे उपकथानक मध्ययुगीन मराठी साहित्यात सांप्रदायिक रचनेतून आणि पंडिती काव्यातून आख्यानरूपाने मांडले गेले आहे. त्याआधी ही कथा मौखिक परंपरेत स्त्रियांच्या ओव्यांमध्येही दिसून येते.

‘नरेन्द्र अयाचित’ म्हणजेच कवी नरेन्द्र, ह्या प्राचीन ललित वाङ्मयातील अग्रेसर कवीने यादव राजाच्या दरबारी असता इसवी सन 1292 साली ‘रुक्मिणी स्वयंवर’ लिहिले. जे मराठीतील पहिल्या दर्जाचे आख्यानकाव्य ठरले. त्या काव्यात कल्पनाविलासाला अधिक प्राधान्य दिलेले दिसते. ते लिहिताना कवी नरेन्द्राने संस्कृतातील महाकाव्यांची रचना आदर्श मानलेली आहे. नरेन्द्रकृत रुक्मिणी स्वयंवराचे दोन भाग दिसतात. हे दोन भाग होण्याचे कारण म्हणजे यादव राजा रामदेवराय ह्याला हे काव्य अतिशय आवडले. नरेन्द्राच्या काव्यावर रामदेवराय स्वतःचा हक्क सांगू लागला. हे काव्य नरेन्द्राने त्याला दिले तर प्रत्येक ओवीकरता एक सोन्याचे नाणे देईन असे राजाने त्याला सांगितले. तेव्हा, तो “ना राजे हो आमचेया कवीकुळा बोलु लागैल” असे उत्तर देत एका रात्रीत नकललेल्या काव्याचा अर्धा भाग घेऊन वऱ्हाडप्रांती गेला अशी आख्यायिका स्मृतिस्थळ 113 मध्ये आहे. रुक्मिणीचे पत्र घेऊन सुदेव द्वारकेजवळ येतो, एवढीच कथा पहिल्या भागात आलेली दिसते. त्या पुढील भागाचे लेखन नरेन्द्राने महानुभावीय सांप्रदायिक म्हणून केले आहे, जे आध्यात्मिक स्वरूपाचे आहे. महानुभाव पंथात दाखल झालेल्या नरेंद्र कवीचा हा नऊशे ओव्यांचा अपुरा ग्रंथ महानुभावांनी सांकेतिक लिपीत बद्ध केला होता. तो ग्रंथ पुढे इतिहासाचार्य राजवाडे, प्रा. वि.भि.कोलते, प्रा. सुरेश डोळके यांनी सांकेतिक लिपी उलगडून बालबोध लिपीत आणला. महानुभाव पंथाने पवित्र मानलेल्या सात ग्रंथांपैकी नरेंद्र कवीचा हा ग्रंथ आहे.

विरहाने व्यथित झालेल्या रुक्मिणीचे नरेन्द्राने पुढीलप्रमाणे वर्णन केले आहे :

“डावा हातु उसिसा घातला : उजिवा ह्रदयावरि ठेविला : जैसा जीवेंसी देवो धरिला : निसुटैल म्हणौनि।।” 

नरेन्द्र कवी यांच्या आधी महानुभाव सांप्रदायिक कवयित्री महदंबा हिने सुद्धा ‘मातकी रुक्मिणी स्वयंवर’ हे आख्यानकाव्य लिहिले आहे. मराठीतील आद्य कवयित्री महदाइसा उर्फ महदंबा हिने गोविन्दप्रभूंकडील कृष्णविवाह उत्सवाच्या वेळी करवली म्हणून गायलेले ‘धवळे’ हे कृष्णरुक्मिणी विवाहावरील मराठीतील पहिले काव्य होय. तिने ह्याच धवळ्यांवर आधारित ‘मातकी रुक्मिणी स्वयंवर’ लिहिले असावे असा तर्क अनेकांनी काढलेला दिसतो. ह्या आख्यानकाव्याचा विशेष म्हणजे, ह्यात एकशेदहा अभंग असून प्रत्येक कडव्याच्या आद्याक्षरांत मातृका (मुळाक्षरे) आणल्या आहेत.

नरेन्द्र, महदंबा यांखेरीज महानुभाव संप्रदायातील इतर ग्रंथकारांनीही रुक्मिणीस्वयंवर लिहिलेले आहे. नरसिंहाचे रुक्मिणीस्वयंवर इसवी सन 1315 साली लिहिलेले असून त्याची ओवीसंख्या 2316 आहे. संतोष मुनिकृत रुक्मिणीस्वयंवर (रुक्मिणी-सैंवर) शके 1646 (इसवी सन 1724) साली लिहिले, त्याची ओवी संख्या 3200 असून अत्यंत प्रासादिक ग्रंथ म्हणून त्याचा उल्लेख होतो. संतोष मुनीचेच एक लघु रुक्मिणीस्वयंवर 85 ओव्यांचे काव्यही उपलब्ध आहे. गोपाळ कवीकृत रुक्मिणीस्वयंवर शके 1506 (इसवी सन 1584) मध्ये लिहिलेले असून त्याची ओवीसंख्या 3000 आहे. (आज अर्धवट स्वरूपात उपलब्ध) कृष्णमुनि कवि डिंभाचे रुक्मिणीस्वयंवर नवखंडात्मक असून अनेक वृत्त रचनांमुळे ते प्रसिद्ध आहे. लक्ष्मीधराचे रुक्मिणीहरण शके 1544, विद्वांस कवीचे रुक्मिणीस्वयंवर शके 1527, कारंजकर यांचे रुक्मिणीस्वयंवर शके 1584; असे तपशील पाहता रुक्मिणीस्वयंवर या कथेची लोकप्रियता आणि उपयुक्तता लक्षात आल्यावाचून राहत नाही.

कवी नरेन्द्र-लिखित रुक्मिणीस्वयंवरानंतर लोकप्रिय झालेले तसेच घरोघरी पोचलेले रुक्मिणीस्वयंवर आख्यान म्हणजे संत एकनाथकृत ‘रुक्मिणी-स्वयंवर’ होय. नाथांचा हा पहिलाच आख्यानपर ग्रंथ. ह्या ग्रंथाचे पारायण केल्याने लग्न जमते आणि अनुरूप वर मिळतो अशी श्रद्धा जनमानसात रूढ आहे. त्यामुळे त्याची पारायणे करणाऱ्या विवाहेच्छुक तरुणी आजही घरोघरी आढळतात. ह्या ग्रंथाची रचना एकनाथांनी काशीच्या वास्तव्यात इसवी सन 1571 साली केली. ग्रंथात एकूण अठरा अध्यायात 1712 ओव्यांची रचना केली आहे. पहिल्या सात प्रसंगात रुक्मिणी-हरणापर्यंतचा मुख्य भाग आलेला आहे.

एकनाथांच्या रुक्मिणीस्वयंवरातील भाषा सुबोध आहे. रुक्मिणीच्या प्रेमपत्राच्या उत्तरादाखल कृष्ण सुदेवाला म्हणतो,

कृष्णेंसांगीतलेंद्विजासी || वेगींजावेंभीमकीपासीं || थोरचिंताहोतसेतिसी || उद्वेगेसींअपार || 77 ||
तिसीद्यावेंआश्वासन || उद‌ईकआहेतुझेंलग्न || तुवांअसावेंसावधान || पाणिग्रहण मीकरीन || 78 ||

पुढील सहा प्रसंग हे युद्ध वर्णनाचे आहेत आणि त्यानंतर शेवटच्या पाच प्रसंगांत विवाहसमारंभाच्या अपूर्व सोहळ्याचे वर्णन केलेले आहे. ह्या ग्रंथाचे रूप हे कृष्णभक्ती आणि अध्यात्मबोधपर आहे.

ह्या संतकवींनंतर पंडित कवींनीही रुक्मिणीस्वयंवर लिहिलेले आहे. त्यात सामराज, नागेश, विठ्ठल इत्यादी कवींचा समावेश होतो. सामराज राजोपाध्ये ह्या पंडित कवींनी ‘रुक्मिणीहरण’ हा काव्यग्रंथ लिहिलेला आहे. ह्या काव्यात भक्तीची पार्श्वभूमी असली तरी सामराजाने ह्या काव्यात शृंगार आणि वीर रसांचा अधिक परिपोष केलेला दिसतो. ह्या काव्यात शृंगार, विरहावस्था, निसर्गवर्णने, युद्धप्रसंग आणि शेवटी लग्नसमारंभ अशी रचना आहे. ह्यातील बराचसा भाग संस्कृत काव्याच्या धर्तीवर कवीने रचलेला दिसतो. हे काव्य ‘महाराष्ट्र सारस्वत’कार वि.ल.भावे यांनी पहिल्यांदा प्रकाशात आणले. गोपाळ विष्णू तुळपुळे यांनी संपादित केलेल्या पंडित कवी सामराजाच्या रुक्मिणीहरण (द्वितियावृती 1 940) ह्या काव्यातील काही ओळी पुढीलप्रमाणे :

रुक्मी म्हणे हें तुज काय झालें ? | कुलास या दूषण थोर आलें ||
विचार तूझा मज हा न माने, | किंवा इचें प्राक्तन कोण जाणें ||1||

नागेश ह्या पंडित कवीने त्याच्या रुक्मिणीस्वयंवर काव्यात संस्कृत काव्यातील वेचक प्रसंगांचा अनुवाद काव्यात योग्य स्थळी योजला आहे. तर विठ्ठल ह्या पंडित कवीकृत रुक्मिणीस्वयंवरात कुटात्मक रचना दृष्टीस पडते.

ह्या संत आणि पंत यांनी लिहिलेल्या रुक्मिणीस्वयंवरावरील काव्याचे पुढे भावानुवादही झालेले दिसतात. उदाहरणार्थ आनंद साधले लिखित, ‘रुक्मिणी स्वयंवर: नरेंद्र पंडित याच्या रुक्मिणीस्वयंवर काव्याचा भावानुवाद’. रुक्मिणीस्वयंवर हे काव्य फक्त संत आणि पंडित कवी यांच्यापुरते मर्यादित न राहता ह्या स्वयंवरावर नालंदा नृत्यकला विद्यालयाच्या त्रिदशकपूर्तीच्या निमित्ताने नृत्यांगना डॉ. कनक रेळे यांनी रुक्मिणीस्वयंवर नावाची मराठी नृत्यनाटिकाही रचली होती. रुक्मिणीस्वयंवराप्रमाणेच सीतास्वयंवर, नल-दमयंतीस्वयंवर अशी अनेक स्वयंवर काव्ये संस्कृतच्या घाटात मराठी भाषेत लिहिली गेली. तरीही तुलनेत रुक्मिणीस्वयंवर हे जास्त प्रमाणात लिहिलेले दिसते.

मध्ययुगीन काळात तुलनेने रुक्मिणीस्वयंवरावरील आख्यानकाव्ये बरीच आढळतात, आणि मग असा प्रश्न पडतो, की एवढ्या मोठ्या प्रमाणावर रुक्मिणी स्वयंवराविषयी आख्यानकाव्ये का लिहिली गेली असावीत? तर, सुरुवातीला नमूद केल्याप्रमाणे मध्ययुगीन काळातली वाङ्मय निर्मिती प्रामुख्याने सांप्रदायिक, अध्यात्मिक स्वरूपाची आणि ईश्वरभक्तीवर आधारित अशी  होती. सांप्रदायिक वाङ्मयात सुरुवातीपासून कृष्णभक्तीवर अधिक लिहिले आहे. तात्विक स्वरूपाच्या वाङ्मयात मांडलेले ईश्वरभक्तीपर तत्त्वज्ञान सर्वसामान्य लोकांना समजणे थोडे अवघड असते हे संतमहात्मे जाणून असावेत, त्यामुळे तात्विक मांडणीच्या पलीकडे जाऊन तत्त्वज्ञानाच्या मांडणीसाठी त्यांनी आख्यानकाव्यांचा आधार घेतला असावा. संस्कृत भाषेत प्रीतीकाव्य, स्वयंवरकाव्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून मराठीतही तशाच प्रकारच्या रचना झालेल्या दिसतात.

कृष्णकथेचे गारूड भारतीय मनावर अनंत काळापासून आहे. रुक्मिणी स्वयंवराच्या कथेत तर एका रोमँटिक कथेला आवश्यक असलेले सर्व घटक ओतप्रोत भरलेले आहेत. यात नायिका सुंदर, सर्वगुणसंपन्न, धाडसी आहे. नायक अतीव देखणा, शूर आणि न्यायी आहे. कथेत प्रेम आहे, विरह आहे, साहस आहे, युद्ध आहे, दुष्टांचा पराजय आणि सुष्टांचा जय आहे आणि सगळ्यात शेवटी अनंत अडचणींवर मात करून प्रेमी जनांचे मीलन आहे. ही कथा मुळात लोकप्रिय असल्याने लोकशिक्षणासाठी, प्रबोधनासाठी ती अगदी आदर्श साधन होती. समाजाला धीर देण्यासाठी, नैतिक, धार्मिक आदर्शांची आठवण करून देण्यासाठी  रुक्मिणी स्वयंवराची कथा साहाय्यभूत झाली आणि म्हणूनच तत्त्वज्ञ कवींनी वारंवार तिचा आधार घेतलेला दिसतो.

आदिती जाधव 9665355974 aaditi2192003@gmail.com
(संदर्भ: पाच भक्तिसंप्रदाय- र.रा. गोसावी, प्रतिमा प्रकाशन, तृतीय आवृत्ती, 2008)

About Post Author

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here