संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे आंदोलन हा स्वतंत्र भारतातील एक ऐतिहासिक संघर्ष मानला जातो. स्वातंत्र्यापूर्वी कॉंग्रेसने भाषावर प्रांतरचनेचे तत्त्व मान्य केले होते. परंतु स्वातंत्र्य मिळाल्यावर काँग्रेस श्रेष्ठी भाषावार प्रांतरचनेला विरोध करू लागले. लोकशाही स्वराज्य पक्षाच्या उद्देशपत्रिकेत व त्या पक्षाच्या कार्यक्रमातही प्रांतरचनेचा आग्रह धरलेला होता. त्यानुसार त्यांनी महाराष्ट्र हा स्वतंत्र एकभाषिक प्रांत व्हावा अशी घोषणा केली होती. न.चि. केळकर यांनी ‘केसरी’तून महाराष्ट्र एकीकरण चळवळीला चालना देण्यास सुरुवात केली होती. महात्मा गांधी यांनी भाषावार प्रांतरचनेचा ठराव नागपूर अधिवेशनात 1921 साली मांडला. वि.दा. सावरकर यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत भरलेल्या मराठी साहित्य संमेलनात वऱ्हाड-मुंबईसह महाराष्ट्राचा एकभाषिक प्रांत त्वरित बनवावा अशी मागणी 15 ऑक्टोबर 1938 रोजी करण्यात आली. लगेच पुढील वर्षी नगर येथे भरलेल्या साहित्य संमेलनात त्या मागणीचा पुनरुच्चार करण्यात आला. तेथे मराठी भाषा प्रदेशांचा मिळून जो प्रांत असेल त्याला संयुक्त महाराष्ट्र हे नाव द्यावे असे ठरले. तेथून पुढे संयुक्त महाराष्ट्र हा शब्द रूढ झाला. विदर्भातील प्रभावशाली नेते रामराव देशमुख यांनी मुंबईत वऱ्हाडच्या मागणीसाठी संस्था स्थापन करण्याचे 1940 मध्ये ठरवले. ग.त्र्यं.माडखोलकर यांनी संयुक्त महाराष्ट्राचा ठराव पुन्हा 12 मे 1946 रोजी बेळगाव येथे भरलेल्या साहित्य संमेलनात मांडला. त्यात मुंबई, मध्यप्रांत, वर्हाड, मराठवाडा, गोमंतक यांच्या सरहद्दीवरील सर्व मराठी भाषा प्रांतसुद्धा संयुक्त महाराष्ट्रात सामील करण्याची मागणी होती. त्याच संमेलनात संयुक्त महाराष्ट्र समिती स्थापन करण्यात आली.
विदर्भ हा मध्य प्रांताचा एक भाग स्वातंत्र्यपूर्व काळापासून होता. विदर्भातील लोकप्रतिनिधी मध्य प्रांताच्या सरकारमध्ये निवडून जात होते, पण विदर्भाचे भाषिक दृष्ट्या भिन्न असणाऱ्या त्या प्रांताशी मनोमीलन कधीही झाले नाही. विदर्भ मनाने मध्यप्रांतात एकरूप कधीच होऊ शकला नाही. मध्यप्रांतामधील हिंदीभाषक प्रांतातून मराठी भाषा विदर्भ प्रांत स्वतंत्रपणे बनवण्यात यावा यासाठी बॅरिस्टर रामराव देशमुख यांच्या नेतृत्वात महाविदर्भ (1940) चळवळ चालू झाली होती. त्या मागणीतून वेगळ्या विदर्भ राज्याची मागणीही नंतरच्या काळात पुढे आली.
संयुक्त महाराष्ट्राची मागणी दार कमिशनसमोर करणे व वऱ्हाड-नागपूरच्या मनात संयुक्त महाराष्ट्राच्या मागणी संदर्भात कोणतीही शंका नाही हे दाखवणे यासाठी अकोला करार 8 ऑगस्ट 1947 ला करण्यात आला. त्या करारावर सतरा नेत्यांनी स्वाक्षऱ्या केल्या होत्या. त्यात शंकरराव देव, ग.त्र्यं.माडखोलकर, रामराव देशमुख, पंढरीनाथ पाटील यांचा समावेश होता. त्या करारानुसार विदर्भाचे स्वतंत्र अस्तित्व अबाधित ठेवण्यात आले होते. आम्ही संयुक्त महाराष्ट्राच्या सोबत आहोत, पण जर संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती होऊ शकली नाही तर आमच्याकडून महाविदर्भ हा स्वतंत्र प्रांत निर्माण करण्याचे प्रयत्न सर्वतोपरी केले जातील, असेही कलम त्यामध्ये नमूद केले होते.
दार कमिशन भाषावार प्रांतरचनेतील प्रश्न सोडवण्यात अपयशी ठरले. तेव्हा जवाहरलाल, वल्लभभाई, पट्टभी (जेव्हीपी) कमिशन स्थापन करण्यात आले. त्या कमिशननेही वऱ्हाड आणि संयुक्त महाराष्ट्र यांची मागणी फेटाळली. मुंबईसहित महाराष्ट्र निर्मितीला तर कमिशनने स्पष्ट नकार दिला. त्यामुळे अकोला कराराचे ऐतिहासिक महत्त्व संपुष्टात आले. त्यामुळेच संयुक्त महाराष्ट्रात येऊ इच्छिणाऱ्या विभागांना समपातळीवर सामावून घेण्याच्या दृष्टीने 28 नोव्हेंबर 1952 ला नागपूर करार जन्माला आला. त्यात मुंबई, मध्य प्रदेश व हैदराबाद राज्यांतील सर्व मराठी भाषिक प्रदेशांचे मिळून एक राज्य बनवण्यात यावे, मुंबई ही त्याची राजधानी राहील, या तरतुदींसोबत विदर्भ व मराठवाडा यांच्या विकासासाठी काही बाबींची तरतूदही करण्यात आली. त्या करारावर महाविदर्भाच्या वतीने रामराव देशमुख, गोपाळराव खेडकर, रा.कृ.पाटील, पु.का.देशमुख व शेषराव वानखेडे यांनी सह्या केल्या होत्या. स.का. पाटील यांनी या नागपूर करारालाही विरोध केला. संयुक्त महाराष्ट्राच्या या मागणीला कायम विरोध करणाऱ्यांमध्ये स.का.पाटील यांच्यासोबत मोरारजी देसाई होते. मोरारजी देसाई हे तर संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे आंदोलन दडपून टाकण्यात आघाडीवरच होते.
विदर्भात संयुक्त महाराष्ट्राच्या बाबतीत सरळसरळ दोन गट पडलेले होते विदर्भवादी म्हणून प्रसिद्ध असणारे दादासाहेब कन्नमवार, लोकनायक बापूजी अणे, दादासाहेब खापर्डे, ब्रिजलाल बियाणी, रा. कृ. पाटील, पी. के. देशमुख, दीनदयाल गुप्ता, जांबुवंतराव धोटे, खासदार तुमपल्लीवार तर संयुक्त महाराष्ट्राच्या बाजूने रामराव देशमुख, पंजाबराव देशमुख, कॉम्रेड सुदाम देशमुख, कॉम्रेड रामचंद्र घंगारे, व्ही.डी. देशपांडे, रा.सु.गवई हे नेते होते.
अमरावती जिल्ह्याने संयुक्त महाराष्ट्र चळवळीत महत्त्वाचे योगदान केलेले आहे. अगदी रामराव देशमुख यांनी महाविदर्भ संकल्पना स्वातंत्र्यपूर्व कालखंडापासून मांडली होती. त्यामुळे जिल्ह्यात वातावरण निर्मिती झाली होती. पुढे, संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या बाजूने जनमत वाढले. अमरावती जिल्ह्यातील डाव्या विचारांची पुरोगामी मंडळी आणि काँग्रेसमधील संयुक्त महाराष्ट्रवादी नेते यांनी ती चळवळ गतिमान केली. अमरावती जिल्हा संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे केंद्र विदर्भात बनला. बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यास अनुमती दिल्यामुळे त्यांच्या शेड्युल्ड कास्ट फेडरेशनच्या कार्यकर्त्यांचे बळ त्या आंदोलनास मिळाले.
अमरावती येथे संयुक्त महाराष्ट्र मेळावा झाला. कॉम्रेड व्ही.डी.देशपांडे यांनी हैदराबाद विधानसभेत पारित झालेल्या संयुक्त महाराष्ट्र ठरावाचे रोमांचकारी वर्णन त्या वेळी केले. ते डाव्या, पुरोगामी शक्तीच्या बळावर घडून आले हे सांगण्यास कॉम्रेड विसरले नाहीत. त्यांनी शेतकरी, शेतमजूर व श्रमिक जनता यांनी त्यांची शक्ती संयुक्त महाराष्ट्राच्या पाठीमागे उभी करावी असे आवाहन केले. आंध्रात भाषावार प्रांतरचनेसाठी आंदोलन पेटले होते. त्या वेळेस आंध्राबाहेर केवळ अमरावतीमध्ये बंद पाळला गेला !
पंजाबराव देशमुख यांनी ‘मराठी प्रदेश’ नावाचे वृत्तपत्र संयुक्त महाराष्ट्राचा पुरस्कार करण्यासाठी चालवले. त्या वृत्तपत्राची जबाबदारी त्यांचे सहकारी दौलतराव गोळे आणि श्रीराम अत्तरदे यांच्यावर होती. नागपूरचे विदर्भवादी नेते टी.जी.देशमुख यांनीही तिकडे ‘विदर्भ वाणी’ हे वृत्तपत्र सुरु केले होते. टी.जी. देशमुख आणि श्रीराम अत्तरदे यांचे वाद त्या दोन वृत्तपत्रांमधून झडत असत.
बाबुराव भोसले यांनी संयुक्त महाराष्ट्र परिषद नागपूरला पंजाबराव देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली घेतली होती. पुणे महानगरपालिकेने भारताचे कृषिमंत्री पंजाबराव देशमुख यांना 1955 मध्ये मानपत्र दिले. त्या वेळेस पंजाबराव देशमुख यांनी विदर्भासह संयुक्त महाराष्ट्राची घोषणा केली होती. पंजाबराव देशमुख यांचे भाषण ‘टाइम्स ऑफ इंडिया’ या इंग्रजी वृत्तपत्रातील पहिल्या पानावर प्रसिद्ध झाले होते.
संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे कार्य अमरावतीमध्ये जोमात असताना 1955 च्या फेब्रुवारी महिन्यात कट्टर विदर्भवादी असणारे नामदार मारोतराव कन्नमवार, आमदार ब्रिजलाल बियाणी, खासदार तुमपल्लीवार यांच्या नेतृत्वात विदर्भवाद्यांची सभा अमरावतीत भरली. ती सभा विदर्भ महाविद्यालयातील (किंग एडवर्ड) विद्यार्थी जांबुवंतराव धोटे, अजबराव चोरे, यशवंतराव खापर्डे, सुरेश भट, रामदास पाटील इत्यादी तरुणांनी उधळून लावली होती.
अचलपूरचे सुदाम देशमुख हे संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील एक धगधगते पर्व होते. सुदाम देशमुख यांनी कायम कष्टकरी, शोषित, श्रमिक आणि सर्वहारा यांचा पक्ष घेतला. सुदाम देशमुख यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीला लोकचळवळीचे स्वरूप दिले. त्यांनी खेड्यापाड्यातील जनतेला संघटित करून मोठे मोठे लढे उभारले. त्यांनी संयुक्त महाराष्ट्र समितीच्या एस.एम.जोशी, श्रीपाद अमृत डांगे, नाना पाटील, अण्णाभाऊ साठे, अमरशेख, आचार्य अत्रे या नेत्यांच्या भव्य सभांचे आयोजन जिल्ह्यात ठिकठिकाणी केले होते. रा.सु.गवई हेसुद्धा सुदाम देशमुख यांच्यासोबत चळवळीमध्ये सक्रिय होते.
संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील सत्याग्रहाकरता अमरावतीमधील अनेकांना सक्तमजुरी व जिल्ह्यातील शेकडो सत्याग्रहींना तुरुंगवासाची सजा फर्मावली गेली. सुदाम देशमुख यांच्या नेतृत्वातील तुकडीने शासनाच्या पक्षपाती धोरणाविरुद्ध कारागृहातही तीव्र लढा दिला. श्रीपाद अमृत डांगे यांच्या उपस्थितीत विदर्भ संयुक्त महाराष्ट्र परिषदेच्या बैठकीचे आयोजन नागपूरला झाले होते. त्यात विद्यार्थी संयुक्त महाराष्ट्र समितीचे पहिले अधिवेशन अमरावतीला घेण्याचे ठरले. अमरावती येथील पहिल्या अधिवेशनात विद्यार्थ्यांनी उभारलेले प्रचंड आंदोलन, विराट मिरवणुका- त्या मिरवणुकांमधील तरुणांचा प्रचंड सहभाग वाखाणण्यासारखा होता. संयुक्त महाराष्ट्रासाठी शंकरराव देव यांची एक विराट सभा अमरावतीला झाली. त्या सभेत विदर्भवाद्यांची नाचक्की झाली होती. डॉ.सोमण यांच्या निवडणुकीत विद्यार्थ्यांनी घेतलेला सहभाग. एस.एम.जोशी, आचार्य अत्रे, नाना पाटील, अण्णाभाऊ साठे, अमरशेख यांच्या अमरावती येथील सभांमधील विद्यार्थ्यांचा प्रचंड सहभाग संस्मरणीय होता. विद्यार्थ्यांच्या व तरुणांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचे प्रमुख केंद्र म्हणून मुंबई-पुण्यानंतर अमरावती शहराचा उल्लेख केला जातो. त्यात अचलपूरचा वाटा हा फार महत्त्वाचा आहे. महाराष्ट्राच्या चळवळीतील एक सक्रिय कार्यकर्ते अण्णासाहेब वैद्य यांनी ‘विचार विविधा’ या ग्रंथातील ‘गर्जा महाराष्ट्र माझा’ या लेखात अशी बरीच माहिती नोंदवली आहे.
संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीने विद्यार्थ्यांच्या तत्कालीन पिढीला आंदोलनाची एक दिशा दिली, स्वप्न दिले, जीवनाला अर्थ दिला. सार्वजनिक जीवनाचे पहिले पाठ गिरवण्याचा सराव दिला. त्यातून नवनिर्माण कार्यासाठी एक पिढी उभी राहिली. त्यामध्ये जांबुवंतराव धोटे, बबनराव मेटकर, भैय्यासाहेब देशमुख तळवेलकर, नानाभाऊ एंबडवार, कृष्णा वानखेडे, बाळासाहेब घुईखेडकर, यशवंत शेरेकर, बी.टी.देशमुख, हरीश मानधना, राजाभाऊ देशमुख, भाऊसाहेब चौधरी, इ.डी.देशमुख, देवीसिंह शेखावत अशा, नंतर वेगवेगळ्या क्षेत्रांत मोठ्या होत गेलेल्या व्यक्तींचा समावेश होतो. त्यांनी त्यांच्या राजकीय आणि सामाजिक जीवनाची पहिली बाराखडी संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात गिरवली आहे.
कोणतेही पद न भूषवणाऱ्या यशवंत खापर्डे यांचेही संयुक्त महाराष्ट्र चळवळीत महत्त्वाचे योगदान राहिलेले आहे. त्यांचा केवळ संयुक्त महाराष्ट्राच्या नव्हे तर शहरात झालेल्या कृषी विद्यापीठातील अनेक चळवळींमध्येही सहभाग होता. सुरेश भट, देवराव पोहेकर, बच्चू कुऱ्हेकर, वसंता देवधर, बाळासाहेब मराठे, ग.वा.लहाडकर यानीही संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत सहभाग घेऊन कारावास भोगला आहे. मुलींमध्ये मालती वामनराव जोशी, निर्मला लठ्ठा, गुणवंती चौधरी, कुमुद पुजारी, मंदार देशपांडे, नीता पांगारकर, रसिका पन्नीवार, उषा साठे, रानडे, सुमन बापट व बेबी बापट यांनी सक्रिय सहभाग घेतला होता.
अमरावती जिल्ह्याच्या संयुक्त महाराष्ट्र चळवळीत सक्रिय सहभाग घेणाऱ्यांमध्ये पंजाबराव ढेपे पाटील (मांजरी म्हसला), नारायणराव देशमुख (देवरा), उत्तमराव महल्ले (नवसारी), नानासाहेब वानखडे (मंगरूळ मोर्शी), यशवंतराव सराड (सोनेगाव, चांदूर रेल्वे) कॉम्रेड दत्ता पाटील (धामक नांदगाव खंडेश्वर), कॉम्रेड खंडेराव देशमुख (राजुरा, चांदूर रेल्वे), सुमेरसिंह नाहटा (कुऱ्हा) कॉम्रेड जानरावजी सातपुते (तिवसा), कृष्णराव वानखडे (इत्तमगाव, वरूड), रामकृष्ण बांडे (तळवेल), आबासाहेब टवलारकर (टवलार), साथी हंबर्डे (टाकरखेडा शंभु), अण्णासाहेब वाटाणे, शंकरराव वाटाणे, वामनराव मानकर, बाबासाहेब करडे (आसेगाव पूर्णा), नारायणराव चौधरी (करजगाव), काशीनाथ पाटील सगणे (टाकरखेडा पूर्णा), देविदास बोबडे (विरूळ पूर्णा), महादेव पाटील (कोल्हा), बाळासाहेब देशमुख (जरूड) अण्णासाहेब वाटाणे (हिवरा), बाबासाहेब सांगळूदकर (दर्यापूर), मामराजजी खंडेलवाल (अचलपूर), राजाभाऊ बारलिंगे, हिर्डीकर हे तरुण होते. त्यांच्यासारख्या असंख्य कार्यकर्त्यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या आंदोलनातून त्यांच्या कार्याची दिशा निश्चित केली. नंतरच्या काळात त्यांतील अनेकांनी राजकीय, शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी केली. ते वेगवेगळ्या विचारधारा मानणारे होते. त्यांच्या कार्याचा प्रभाव तत्कालीन समाजजीवनावर सकारात्मकतेने घडून आला. त्यामुळे अमरावती जिल्ह्यातील पुरोगामी आणि विकासोन्मुख चळवळीला बळ मिळाल्याचे दिसते.
– काशीनाथ बऱ्हाटे 9420124714 barhatekv@gmail.com
————————————————————————————————————————————