दापोलीचे लोकनेते : बाबुराव बेलोसे (Baburao Belose – The man who shaped Dapoli’s tourism map)

कोकणच्या सर्वांगीण प्रगतीचा पाया ज्यांनी रचला, अशा महनीय व्यक्तींमध्ये रामचंद्र विठ्ठल तथा बाबुराव बेलोसे यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. ते लोकनेते म्हणूनच गणले जातात- लोकांमध्ये मिसळून गेलेला असा पुढारी विरळाच. कोकणच्या समस्या बाबुरावांनी धाडसाने व तडफदारपणे विधानसभेत मांडल्या – त्यांचा पाठपुरावा केला. म्हणून त्यांना त्यांचे सहकारी ‘कोकणची सिंहगर्जना’, ‘कोकणची धडाडणारी तोफ’ असे म्हणत असत.

बेलोसेवाडी हे गाव सभोवतालचा डोंगर, निसर्गरम्य वनराई, पालगडचा किल्ला व सानेगुरुजी यांच्यामुळे बरेच परिचित आहे. तेथे बाबुरावांचा जन्म 21 जानेवारी 1922 रोजी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण पालगडला झाले. त्यांनी पुणे येथील फर्ग्युसन कॉलेजमधून बी ए (ऑ) ही पदवी संपादन केली. त्यांचे शिक्षण बी ए पर्यंत पुण्याच्याच कॉलेजांमधून झाले. बाबुरावांना पुण्याच्या शिक्षण काळात महात्मा फुले यांच्या ‘सत्यशोधक चळवळी’चा परिचय झाला. कर्मवीर भाऊराव पाटील यांचे शैक्षणिक कार्यही तेव्हा त्यांनी जवळून पाहिले. बाबुरावांना साने गुरुजींचा सहवासही लाभला होता. ते त्या वेळी पुण्याच्या शुक्रवार पेठेत अल्प पगाराची नोकरी करत होते.

बाबुरावांचा विवाह 5 मे 1942 रोजी बीरबाडच्या हिराबाई मोरे यांच्याशी झाला. आश्चर्य नमूद करायचे म्हणजे हिराबाई त्या काळी पर्वतारोहण, अश्वारोहण, पोहणे अशा क्रीडाप्रकारांमध्ये पारंगत होत्या. त्यांनी इंग्रज राजवटीत भूमिगत कार्यकर्त्यांना निरोप, वस्तूंचा पुरवठा अशा कामांत सहभाग घेतला होता. बाबुरावांच्या राजकारणात हिराबार्इंनी बरोबरीने कार्य केले. बाबुराव व हिराबाई यांना आठ अपत्ये झाली. ती सारी उच्च विद्याविभूषित व कर्तबगार ठरली.

बेलोसे घराण्याचे माहीत असलेले मूळ पुरुष म्हणजे बाजीराव बेलोसे. बाजीराव बेलोसे शिवरायांच्या ‘गनिमी कावा’ या युद्धतंत्रात वाकबगार होते. ते शूर पराक्रमी सरदार होते. त्यांनी चिमाजी अप्पा यांच्या बरोबर वसईच्या लढ्यात शौर्य दाखवले. त्यांनी तोफा, गलबते व दीडशेचे शूर सैन्य यांच्यासह वसईच्या मोहिमेत भाग घेतला. त्यांनी वसईला रसद पुरवणाऱ्या अवतीभोवतीच्या प्रदेशाची व वसईच्या किल्ल्याची नाकेबंदी केली. त्यांनी साष्टी, अर्नाळा, पाली, उरण, खालापूर असा प्रदेश काबीज केला. साताऱ्याच्या छत्रपतींनी बाजीराव बेलोसे यांच्या पराक्रमाची दखल घेऊन त्यांच्या वारसांना कोकणची सुभेदारी दिली. कोकणवर नियंत्रण ठेवणे ही त्यांची कामगिरी होती. कोकणच्या गड-कोट प्रदेशाची देखभाल व रयतेचे रक्षण अशी जबाबदारी त्यांची होती. बेलोसे यांचा अंमल छत्रपतींच्या वतीने मंडणगड, पालगड, हर्णे या परिसरात होता. इंग्रजांनाही बेलोसे यांच्या पराक्रमाची दहशत होती. त्यामुळे त्यांनी बेलोसे यांना कोकणात डिवचण्याचा प्रयत्न कधीही केला नाही.

बेलोसे घराणे वारकरी सांप्रदायिकदेखील होते. त्यांच्या घरी भजने, ज्ञानेश्वरीची पारायणे, कीर्तने होत असत. कोकणची पारंपरिक नृत्ये, दशावतारी खेळ असे मनोरंजनाचे कार्यक्रमदेखील होत असत. गणेशोत्सव, होळी-शिमगा, दसरा या पारंपरिक सणांना बेलोसे यांच्या घरात महत्त्व होते. बाबुराव यांना घरच्या या सर्व परंपरा परिचयाच्या होत्या. त्यांनी त्यासाठी काम केले होते. त्यामुळे त्यांच्यावर तशा प्रकारचे, लोकाभिमुखता व लोकसेवा असे संस्कार घडले होते.

बाबुराव करारी होते, अभ्यासू म्हणून प्रसिद्धही होते. त्यांनी आमदार म्हणून दापोली मतदार संघाचे प्रतिनिधीत्व तीन वेळा (1962 ते 1977) केले. त्यांतील एका कारकिर्दीत (एक टर्म) ते मंत्री होते. त्यांनी त्यांच्या त्या शासकीय पदाचा वापर दापोली, रत्नागिरी व एकूणच कोकणच्या विकासासाठी केला. बाबुराव राज्यमंत्री 1975 साली बनले. त्यांच्याकडे बंदरे, मत्स्यव्यवसाय, पर्यटन आणि दारुबंदी व उत्पादन शुल्क असे कार्यविभाग होते. बाबुराव यांनी सहकार, पर्यटन, मत्स्य व्यवसाय, शिक्षण, संस्कृती, उद्योग-व्यवसाय, संशोधन, साहित्य, कला अशा सर्व क्षेत्रांत प्रभावी कामगिरी केली. त्यांचे सामाजिक-सांस्कृतिक-कला-क्रीडा या क्षेत्रांतही कोकणमधील कार्य महत्त्वपूर्ण असे ठरले. त्यांनी कोकणची सामाजिक-सांस्कृतिक, धार्मिक आणि राजकीय बांधणी करून तेथे आधुनिकीकरणाचा पाया घातला. बाबुराव यांनी विधानसभेत प्रभावी भाषणे करून कोकणवासीयांच्या अंतर्मनातील भावना व्यक्त केल्या, समस्या मांडल्या. बाबुराव यांनी कोकणच्या प्रगतीची बीजे पर्यटन क्षेत्रात आहेत हे ओळखले. त्यांनी त्या क्षेत्राच्या विकासातून कोकणचे परिवर्तन होईल, भारतीय अर्थव्यवस्थेला गती मिळेल असा विचार पन्नास वर्षांपूर्वी मांडला ! त्यामुळे शासनाची तिजोरी कोकणवासीयांना खुली केली गेली. ‘कोकणचा कॅलिफोर्निया’ ही संज्ञा त्या काळात रूढ झाली. बाबुराव यांच्या प्रयत्नांनी निसर्गसौंदर्याचे माहेरघर असलेल्या कोकणाकडे जगाचे लक्ष वेधले गेले.

बाबुराव यांना चौसष्ट वर्षांचे आयुष्य मिळाले. ते खादीचे साधे कपडे वापरत, कार्यकर्त्यांबरोबर त्यांच्या घरची मीठ-भाकरी खात आणि झोकून देऊन काम करत. त्यांच्या कामाचा झपाटा आणि त्या बरोबरच प्रेमळ, शिस्तप्रिय असा स्वभाव यांमुळे ते लोकप्रिय होत गेले. त्यांचे कोकणातील अनन्य स्थान शिक्षणसंस्थांच्या रूपाने चिरंतन ठरले आहे. बाबुरावांनी ‘ज्ञानदीप लावू जगी’ असा मंत्र कार्यकर्त्यांना दिला आणि दापोली-मंडणगड शिक्षण प्रसारक मंडळ, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ अशा शिक्षणसंस्था सुरू केल्या. बाबुरावांनी कोकण विद्यापीठ दापोलीला अक्षरश: खेचून आणले (1965). ते चिपळूण वा रत्नागिरी येथे व्हावे असे सर्वांचे मत होते. परंतु बाबुरावांनी विधानसभेत सलग तीन तास भाषण करून विद्यापीठ दापोलीत असणे कसे योग्य आहे हे सभासदांना पटवून दिले. त्यांनी विद्यापीठासाठी दापोलीत एक हजार एकर जागा उपलब्ध करून दिली.

बाबुराव बांधकाम व्यावसायिक म्हणून प्रसिद्ध होते. त्यांनी दापोलीचा एस टी स्टँड, प्रथामिक शाळा, कुटीर रुग्णालय, मंडणगड व दापोली येथील तहसील कार्यालये, पराडकर-बेलोसे महाविद्यालय अशा काही इमारती जातीने लक्ष घालून उभ्या केल्या. कोकण कृषी विद्यापीठातील काही इमारतींचे श्रेयही बाबुरावांकडेच जाते.

त्यांच्या काही आठवणी नमूद करण्यासारख्या आहेत. त्यातून त्यांची लोकप्रियता प्रकट होते. हर्णेचे वसंत मेहंदळे सांगतात- 1983-84 ची हर्णे ग्रामपंचायतीची निवडणूक. मी सदस्य म्हणून निवडून आलो होतो. सरपंचपदाच्या निवडीबाबत काँग्रेसमध्येच दोन तट पडले होते. मी, अनिल दुधवडकर, रवी पवार, श्याम निवाते, नंदा बोरकर असे, तिशीच्या दरम्यानचे तरुण एका गटात आणि चं.ना. पतंगे, जैनुद्दीन धेणकर, गजानन कांबळे, केतन, दिगंबरशेट पिंपळे अशी ‘सिनियर सिटीझन’ मंडळी दुसऱ्या गटात अशा प्रकारची विभागणी झाली होती. सरपंचपदावर एकमत न झाल्यामुळे, आम्ही सर्वजण बाबुराव यांना भेटण्यास दापोलीला आलो. दोन्ही गटांनी त्यांचे त्यांचे मुद्दे तावातावाने मांडले. दोन्ही गटांनी ‘दादांचा निर्णय शिरोधार्ह मानू’ असेही स्पष्ट केले. दादांनी त्यांचा निर्णय कोणतेही स्पष्टीकरण न करता व विलंब न लावता असा सांगितला, की ‘निवडणूक होऊन जाऊ द्या. जो जितेगा वह सिकंदर बनेगा !’ बोलणी तेवढ्या एका वाक्यावर संपली. गावात दोन्ही बाजूंनी खूप गदारोळ उडाला. अण्णा किडमिडे, केसरीनाथ मुसलोणकर, कृष्णप्पा जोशी, दामोदर पिंपळे असे ज्येष्ठ ग्रामस्थ आम्हा तरुणांच्या पाठीशी राहिले. अखेर, मी सरपंच म्हणून निवडणूक होऊन, केवळ एक मत जादा मिळवून विजयी झालो. मी बाबुरावांना भेटण्यास गेलो असता त्यांनी सहजपणे कोटी केली- ‘एकमताने नाही पण एका मताने का होईना निवडून आल्याबद्दल अभिनंदन !’ त्यांनी माझे कौतुक माझ्या डोक्यावरून हात फिरवत केले. पुढे, मी सरपंचपदाच्या पाच वर्षांच्या कारकिर्दीत यशस्वी झालो. हर्णे विद्यामंदिर संस्थेच्या एन.डी. गोळे हायस्कूल प्रकरणी प्रत्येक वेळी दादांचा आशीर्वाद मिळत असे.

पांडुरंग रेळेकर सांगतात – 1970 सालची गोष्ट. बाळासाहेब ठाकरे दापोलीत आले होते. मला दापोलीतील डॉ. मोहन गुजर यांच्या घरी झालेल्या शिवसेनेच्या सभेचा अध्यक्ष केले गेले. ती बातमी 13 मार्च 1970 च्या ‘लोकसत्ता’ या वर्तमानपत्रात छापून आली. ती बातमी वाचून, बाबुरावांनी मला घरी बोलावून सुखा दम दिला. पण त्या दमात गोडवा होता. त्या वेळेपासून मी पॉलिटिक्समध्ये पडण्याचे सोडून दिले ते आजतागायत. आमच्या हर्णे गावची पाणी योजना बाबुराव यांच्या प्रयत्नांमुळेच साकार झाली. शंकरराव चव्हाण, बाळासाहेब सावंत यांच्या उपस्थितीत हर्णे पाणी योजनेचे 4 जुलै 1981 रोजी भूमिपूजन केले गेले. त्या वेळी जी मोठी मिरवणूक हर्णेहून खेम देवळाजवळ गेली, त्यावेळी मी त्या मिरवणुकीच्या बाजूने माझी जीप त्या डोंगरावर चढवून भूमिपूजनाच्या ठिकाणी गेलो होतो. फार मोठा समारंभ होता. त्या वेळच्या भाषणात बाबुराव माझ्याबाबत गंमतीत म्हणाले, की “हा माणूस पायाने अधू असूनही गाडी या डोंगरावर घेऊन येतो. जर तो पायाने अधू नसता तर चंद्रावरही गेला असता !” जीप ओबडधोबड डोंगरी रस्त्यामधून खेमावर गेलेली पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटले. खेमाच्या देवळाजवळ माझी बागायत जमीन असून त्या जमिनीला खेम बंधाऱ्यातून पाणी घेण्याचा माझा शासकीय हक्क असल्यामुळे त्या भाषणाच्या स्रोतात बाबुराव म्हणाले, “हे खेमावरील खोत बाबू रेळेकर, ते धरणाचे काम पुरे होईपर्यंत लोकांना पिण्याकरता पाणी देण्यास निश्चित सहकार्य देतील !” तेवढे म्हणून त्यांनी भाषण संपवले.

बाबुरावांना जनतेने प्रचंड बहुमताने विधानसभेसाठी 1962 साली निवडून दिले. ते पहिल्याच विधानसभेत बोलत असताना म्हणाले, मी ‘अंदमानातील कैदी’ म्हणून बोलत आहे. तेव्हा ‘अंदमानातील कैदी’ या सभागृहात कसा? म्हणून टाळ्यांचा प्रचंड कडकडाट व हशा झाला. सारे सभागृह स्तिमित झाले, पण बाबुरावांनी अवघ्या विधानसभा सदस्यांचे लक्ष त्यांच्या मतदारसंघाकडे लावून घेतले आणि अंदमानाचा डाग धुऊन काढण्यासाठी, ‘अंदमानाच्या शृंखला’ तोडण्यासाठी व दापोली परिसराचा संबंध बाह्य जगाशी जोडण्यासाठी प्रथम पालगड येथील भार्ड्या नदीवरील पूल अकरा महिन्यांत पूर्ण करून घेतला. त्या वेळचे बांधकाम मंत्री शंकरराव चव्हाण यांच्या हस्ते उद्घाटन करून बाह्य जगाशी संबंध जोडून दिला. ते धाडसाचे काम होते. ते घडवून घेण्यात बाबुराव यांचा सिंहाचा वाटा आहे.

तद्नंतर बाबुरावांनी सावित्री नदीवरील म्हाप्रळ-आंबेत पूल व्हावा म्हणून विधानसभेत आवाज उठवला आणि नेत्यांचे व सहकाऱ्यांचे लक्ष त्या प्रकल्पावर केंद्रित केले. त्यांनी तो पूल होण्यासाठी मुख्यमंत्री वसंतराव नाईक आणि अंतुले यांचा पूर्ण पाठिंबा मिळवला. त्यांनी पुलाच्या पायाभरणी समारंभासाठी वसंतराव नाईक यांना आणले. त्या पुलाचे काम जलदगतीने झाले. मार्ग वाहतुकीस खुला झाला. आनंदीआनंद पसरला, पण ते काम करण्यासाठी बाबुरावांना बारा वर्षे झगडावे लागले ! ते तो पूल होण्याकरता सातत्याने आणि जिद्दीने झगडले. त्या पुलामुळे मार्केट जवळ आले, उतारूंना तेथे कमी खर्चात व कमी वेळात जाता येते. त्या भागात लहानमोठे कारखाने व्हावेत, हजारो माणसे कामाला लागावीत आणि मुंबईसारख्या शहरी ठिकाणी नोकरीनिमित्त जाणाऱ्यांचा लोंढा थांबवावा या उद्देशाने बाबुराव यांनी कारखानदारांची भेट घेऊन खास प्रयत्न केले होते.

त्यांनी मांदिवली खाडीवरील पूल बांधणीच्या कामी बांधकाम मंत्री शंकरराव चव्हाण यांना आणले आणि त्यांचे स्वागत प्रचंड जनसमुदाय जमवून केले. ‘मांदिवली पूल झालाच पाहिजे’ अशा घोषणा करून दळणवळणाच्या बाबतीत तो भाग मोकळा झाला पाहिजे असे ठणकावून सांगितले. अशा कुशल बुद्धीने, मुत्सद्देगिरीने मंत्र्यांकडून एक-दोन वर्षांत तो पूल बांधून दळणवळणासाठी मोकळा केला जाईल असे घोषित करून घेतले. त्याचा पाठलाग करून तो पूल पूर्ण करून घेतला आणि दळणवळण/रहदारीचा मार्ग खुला केला. बाबुरावांनी दापोली परिसरातील पाणीपुरवठा व जलसंधारण यासाठी तऱ्हतऱ्हेने प्रयत्न केले. त्यातून दापोलीचे नारगोळी, हर्णे, पाजते, खेम, म्हाप्रळ, पांढरी, मुखेड, कडूव अशी काही धरणे उभी राहिली. तीच गोष्ट दापोली, मंडणगड व खेड या तालुक्यांतील विद्युतीकरणाची. वीज वेळीच उपलब्ध झाल्याने या परिसराच्या विकासाला चालना मिळाली आणि त्यातून बाबुरावांचे कार्याचे बळ वाढले. कोकणच्या दुर्गम भागाचे वनीकरण ही त्यांची पर्यावरणीय दूरदृष्टी होय.

राजाराम कालेकर आणि बाबुराव बेलोसे हे दोघे एकमेकांचे सच्चे मित्र होते. त्यांचे मतभेद तात्त्विक मुद्यांवरून दररोज होत असत, पण त्यांनी ते मतभेद मैत्रीच्या नात्याला बाधक ठरू दिले नाहीत. दोघेही परखड विचारांचे स्पष्टवक्ते व विकासात्मक बदलासाठी प्रयत्नशील होते. त्यामुळे त्यांचे त्यांच्यामध्ये वादावादी होऊनही पुन्हा एकमत होत असे. त्यांनी विद्युत पुरवठा केंद्र दापोलीत प्रथम 10 नोव्हेंबर 1968 रोजी सुरू केले आणि ग्रामीण भागात विद्युतीकरणाचे जाळे विणले. त्यामुळे दापोली, खेड, मंडणगड या तालुक्यांत उद्योग-व्यवसायाला गती प्राप्त झाली.

बाबुरावांना 2 मे 1986 या दिवशी मूत्यू आला. बाबुरावांची दुसरी-तिसरी पिढीही त्यांच्याच विचारकार्याचा वारसा घेऊन पुढे जात आहे.

– टीम थिंक महाराष्ट्र (बाबुराव बेलोसे स्मृतिग्रंथावरून संकलित)
————————————————————————————-

About Post Author

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here