कोल्हापूरच्या सुषमा बटकडली आणि रघुनाथ पाटील या दोघांनी, ती दोघे स्वत: एड्ससह आयुष्य जगत असताना एकत्र येऊन ‘जाणीव’ या संस्थेची स्थापना केली. ती दोघे एच.आय.व्ही. बाधित रुग्णांना औषधोपचाराविषयी मार्गदर्शन आणि महाविद्यालयांमधून एड्सविषयी जनजागृती असे काम करत आहेत. त्याखेरीज त्यांनी एड्स रुग्णांसाठी तात्पुरते आसरा स्थळ चालवले आहे…
कोल्हापुरातील दोन व्यक्ती ती दोघे स्वत: ‘एड्स’ रोगाशी सामना करत असतानाच इतर एड्सग्रस्त रुग्णांना आधार देत आहेत ! सुषमा बटकडली व रघुनाथ पाटील ही त्यांची नावे. ती दोघे गेली बारा वर्षे ‘जाणीव’ नावाची संस्था चालवतात. त्या दोघांच्या स्वत:च्या कहाण्या हृदयद्रावक आहेत.
सुषमा यांचे मूळगाव गडहिंग्लज. त्यांचे वयाच्या अठराव्या वर्षी, 2000 साली लग्न होऊन त्या आप्पाचीवाडी येथील कुर्ली येथे सासरी राहण्यास आल्या, पण लग्न होऊन सहा महिने झाले नाहीत; तोच त्यांच्या पतीला एड्सची बाधा झाली असल्याचे निदर्शनास आले. ते समजल्यावर सुषमा यांना मोठा धक्का बसला. त्यांचे मन त्यांच्या आयुष्याचे काय होणार? या विचाराने पोखरले जाऊ लागले. त्यांची स्वत:ची चाचणी झाली तेव्हा त्यांचाही रिपोर्ट एच.आय.व्ही. पॉझिटिव्ह आला. ते कळल्यावर तर त्या गर्भगळित झाल्या. त्या दोघांना तो आजार झाला असल्याचे त्यांच्या सासरच्यांना कळताच, त्यांनी दोघांसोबत बोलणे टाळले; सुषमा यांच्या हातचे पाणी पिण्यासही नकार दिला. कुटुंबीयांनी नवरा-बायको यांना घराबाहेर जाण्यास सांगितले; पण पती-पत्नी दोघेही असे ठाम व निर्धारी की ती दोघे घराबाहेर पडली नाहीत. तेव्हा सासरकडील मंडळीच राहण्यास दुसरीकडे गेली !
सुषमा यांनी त्यांच्या पतीसह राहत असताना, पती सारखे म्हणत, की आपण आत्महत्या करूया ! पण त्या तयार नव्हत्या. त्या नवर्याला खंबीरपणे म्हणत, “यात माझी काय चूक आहे; मी का आत्महत्या करू?” असेच दिवस जात होते. सुषमा यांचे आई-वडील, भाऊ यांनीही त्यांच्याशी संबंध तोडले होते. त्यांचे पती त्यानंतर नऊ वर्षे जगले. पण पतिराजांनी मृत्यूआधी काही चांगल्या गोष्टी करून ठेवल्या होत्या. सुषमा यांच्या पतीने त्याच्या मालकीची जमीन आजाराच्या एका टप्प्यावर विकली. त्याचे त्यांना साडेसहा लाख रुपये आले. त्यांनी ते स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये फिक्स्ड डिपॉझिट करून सुषमा यांच्या नावावर ठेवले. शिवाय, पतीने त्यांना एकोणीस तोळ्यांचे सोन्याचे दागिने दिले. पतीचा मृत्यू त्यानंतर काही महिन्यांतच झाला. त्यांचे अंत्यसंस्कार बाहेरची माणसे पैसे देऊन बोलावून करावे लागले !
सुषमा सांगतात, “नवरा गेल्यावर माझ्याकडे दागिने व पैसे आहेत हे माहेरच्या लोकांना समजले. तेव्हा माझ्याशी न बोलणारे माझे आई-वडील, बहीण-भाऊ मला भेटण्यास आले, ‘आमच्याकडे राहा’ असे म्हणू लागले. तसे, ते सहा महिने येतजात राहिले. त्यामुळे मलाही विश्वास वाटू लागला, ‘ही माझी माणसं आहेत व मला सांभाळतील, आधार देतील असे मनात आले.’ थोड्याच दिवसांत, बहीण माझ्याकडे आली व मुंबईत जागा घेण्यासाठी माझ्याकडे साडेतीन लाख रुपयांची मागणी करू लागली. आई-वडील व भाऊ तिच्या पाठोपाठ आले. त्यांनीही हमी दिली. ते म्हणाले, ‘ती तुला या पैशांचे व्याज देईल.’ त्यामुळे मी तिला पैसे दिले. आणखी दोन महिन्यांनी बहीण परत आली व गोड बोलून माझे एकोणीस तोळ्यांचे दागिने घेऊन गेली. ते तिने तिच्या नावावर गहाण ठेवले. परत काही दिवसांनी येऊन तिने तशीच आणखी काही अडचण सांगून माझ्या तीन लाखांच्या फिक्स्ड डिपॉझिटवर अडीच लाखांचे कर्ज काढले. पतीनंतर मला कोणाचाच आधार नव्हता. मी स्वत: त्या आजारातून वाचेन याचाही भरवसा नव्हता. त्यामुळे पैसे, दागिने ठेवून तरी काय करणार, असा विचार माझ्या मनात येई.”
रघुनाथ पाटील हे एच.आय.व्ही.सह 2006 पासून जगत आहेत. त्यांची कहाणीही दुर्दैवी आहे. त्यांना एड्सची लागण झाल्याचे कळले, तेव्हा त्यांची पत्नी, दोन मुलांना घेऊन माहेरी निघून गेली. ते छोट्यामोठ्या नोकऱ्या करत होते. रघुनाथ यांनी निराश अवस्थेत एका क्षणी झोपेच्या गोळ्या घेऊन जीवन संपवण्याचा निर्णय घेतला, पण कोणीतरी त्यांना बेशुद्धावस्थेत हॉस्पिटलमध्ये दाखल केले व त्यामधून ते वाचले ! त्यांनी असा प्रकार तीन वेळा केला. ते तिन्ही वेळा वाचले. मग त्यांनी ठरवले, की आता मरायचे नाही ! उरलेले आयुष्य एड्सग्रस्तांची सेवा करायची. ते हॉस्पिटलमध्ये रुग्णांना त्यांना येणाऱ्या अडचणी व होणारा त्रास कमी करण्यासाठी मदत करू लागले. सुषमा कोल्हापुरातील सरकारी दवाखान्यात एड्सवर औषध आणण्यासाठी जात. तेथे सुषमा व रघुनाथ यांची एकमेकांशी ओळख झाली. पाटील एच.आय.व्ही. सेंटरमध्ये विना मोबदला सेवा 2009 पासून करू लागले होते ! सुषमा त्यांना त्यांच्या कामात सहकार्य करू लागल्या.
सुषमा यांनी त्यांचे गहाण ठेवलेले दागिने विकून वडगावला छोटीशी जमीन घेतली. वडगाव हे कोल्हापूरजवळ पाचसात किलोमीटरवर उपनगरासारखे आहे. सुषमा यांनी तेथे स्वतःसाठी एक खोली बांधली. त्या तेथे राहू लागल्या. रघुनाथ पाटीलही तेथेच त्यांच्या बरोबर राहण्यासाठी आले. दोघे मिळून दररोज एच.आय.व्ही. सेंटरला जात, एच.आय.व्ही. बाधित रुग्णांना मदत करत. त्यांनी त्यांचे काम एकवेळ उपाशी पोटी राहूनदेखील निष्ठेने चालू ठेवले.
कोल्हापूर जिल्ह्यात एच.आय.व्ही.सह जगणाऱ्यांची संख्या बारा हजारांच्या आसपास आहे. त्यामध्ये महिला व अठरा वर्षांपर्यंतची मुले सहा हजार आहेत. त्यांपैकी बऱ्याच जणांना एक वेळचे अन्न मिळण्याचीही सोय नाही. त्यांच्याजवळ एसटी प्रवासासाठी सुद्धा पैसे नसतात. एच.आय.व्ही. बाधित महिलांना घरात व बाहेर अत्यंत हीन दर्ज्याची वागणूक मिळते. त्यांच्या औषधोपचारासाठी घरातून कोणीही खर्च करण्यास तयार नसते. रघुनाथ व सुषमा यांनी तशा महिला व मुले यांना ‘संजय गांधी बालसंगोपन, आम आदमी योजना’ यांची माहिती देणे, त्यांना औषधप्रणाली समजावून सांगणे असे मार्गदर्शन सुरू केले.
दोघांनी मिळून ‘जाणीव’ या संस्थेची स्थापना 2011 साली केली. त्यांना अर्थसहाय्य अनेकांचे होते. त्यामध्ये कोल्हापुरातील नाट्यकर्मी व गायक प्रशांत जोशी यांचा वाटा मोलाचा आहे. जोशी यांनी त्यांच्या ‘प्रतिज्ञा नाट्यरंग संस्थे’मार्फत नाट्यप्रयोग व हौशी गायक-गायिकांच्या साथीने ऑनलाईन कार्यक्रम करून निधी उभा केला. रघुनाथ व सुषमा यांनी त्या निधीतून वडगावलाच दोन खोल्या बांधून घेतल्या. तेथे एका खोलीत सुषमा राहतात व दुसरी खोली खेडेगावातून येणाऱ्या गरीब, गरजू महिला व मुले यांना राहण्यासाठी मोफत देतात. रघुनाथ व सुषमा त्यांच्या जेवण्याखाण्याची सोयही करतात. ती दोघे स्वतः गरिबीत दिवस काढून इतर गरिबांची सोय करतात.
‘जाणीव’ संस्थेच्या माध्यमातून एड्सग्रस्त महिलांना शिलाई मशीन देऊन, त्यांच्याकडून कापडी पिशव्या शिवून घेऊन, त्या वितरित केल्या जातात. त्यांनी एड्सग्रस्त काही स्त्री-पुरुषांची लग्ने लावून दिली आहेत. संस्था लोकसहभागातून अनाथ व पॉझिटिव्ह मुलांना दरवर्षी शैक्षणिक साहित्य, कडधान्य व दीपावलीनिमित्त कपडे, फराळ वाटप; तसेच, महिलांना साड्या वाटप, बचत गट असे उपक्रम राबवते.
कोल्हापूर नगरपालिकेकडून संस्थेच्या ऑफिससाठी छोटासा गाळा मिळाला आहे. तेथे त्यांची इच्छा ‘केअर सेंटर’ सुरू करण्याची आहे. सुषमा यांनी एम एस डब्ल्यू हे सामाजिक कार्याचे प्रशिक्षण बाहेरून पूर्ण केले आहे. त्यांचे लग्न झाले, त्या वेळेस त्या फक्त दहावी शिकल्या होत्या. रघुनाथ पाटील यांचेही बी ए शिक्षण झाले आहे. त्या शाळा-कॉलेजांमध्ये जाऊन एच.आय.व्ही. होऊ नये व एच.आय.व्ही. होण्याची कारणे याबद्दल प्रबोधन करत असतात. एड्स या आजारावरही औषधे उपलब्ध आहेत. ती औषधे जर वेळीच व नियमित घेतली; तसेच, काही पथ्ये पाळली तर एड्सग्रस्त व्यक्ती सर्वसामान्य माणसाप्रमाणे जगू शकते, हा संदेश ती दोघे एड्स रुग्णांना देत आहेत. त्यांना त्यांच्या या कामासाठी पुरस्कारही मिळाले आहेत. संस्था लोकांच्या मदतीने गेली बारा वर्षे काम करत आहे.
एच.आय.व्ही.सह जगत असलेल्या व्यक्तींना त्यांचे जीवन जास्तीत जास्त आनंदात, आरोग्यदायी जगता यावे हा त्या दोघांचा प्रयत्न आहे.
‘जाणीव’ संस्था संपर्क : सुषमा बटकडली : 9326405797, रघुनाथ पाटील : 8446511841
– सुरेश चव्हाण 9867492406 sureshkchavan@gmail.com
————————————————————————————————-
उल्लेखनीय कार्य,
आपल्या कार्याला सलाम
सामान्य माणसेच असामान्य काम करून जातात