सोळा संस्कार विधी (Hindu Code of Sixteen Rituals for Human Life)

0
328

सोळा संस्कार हे सनातन हिंदू धर्माचे आगळेवेगळे वैशिष्ट्य मानले जाते. संस्कार म्हणजे गुणांचा गुणाकार आणि दोषांचा भागाकार. म्हणजेच स्वतःमधील गुण वाढवणे आणि दोष कमी करणे. संस्कार हे भारतीय संस्कृतीतील आचारधर्माचे वैशिष्ट्य मानले जाते. आचारधर्म म्हणजे आचरणाचे, वर्तनाचे, वागण्या-बोलण्याचे नीतिनियम. सोळा संस्कार हे मानवी आयुष्याशी आणि माणसाने जपावयाच्या मूल्यांशी निगडित आहेत. गर्भधारणेपासून ते अंतेष्टीपर्यंत म्हणजे मृत्यूवेळेपर्यंत हिंदू व्यक्तीवर आईवडील, गुरू आणि पुरोहित यांच्याकडून वैदिक विधी केले जावे असे गृहित आहे. त्यांना संस्कार असे म्हटले जाते. मनुष्याने सात्त्विक वृत्तीची जोपासना करावी, त्याला जीवन जगताना येणारे अडथळे पार करता यावेत हा संस्कार विधी करण्यामागील उद्देश आहे. संस्कार विषयावर लिखाण अनेक ग्रंथांमध्ये केले गेले आहे. माणसाचे व्यक्तिगत जीवन निरामय, संस्कारित, विकसित व्हावे आणि त्याद्वारे उत्तम, चारित्र्यसंपन्न, सुसंस्कारित व्यक्ती निर्माण व्हाव्यात व चांगला समाज घडावा हा प्रमुख उद्देश सोळा संस्कारांमागे आहे. संस्कारांची संख्या इतिहासक्रमात वेळोवेळी बदल होऊन निश्चित झाली आहे. चाळीस प्रकारचे संस्कार गौतम स्मृतीत सांगितले आहेत. महर्षी अंगिरा यांनी त्यांना पंचवीस संस्कारांत सीमित केले. तर ती संख्या व्यासस्मृतीत सोळापर्यंत आली आहे. हे सोळा संस्कार पुढीलप्रमाणे – गर्भाधान, पुंसवन, अनवलोभन, सीमंतोन्नयन, जातकर्म, नामकरण, सूर्यावलोकन, निष्क्रमण, अन्नप्राशन, वर्धापन, चूडाकर्म, अक्षरारंभ, उपनयन, समावर्तन, विवाह आणि अंतेष्टी.

1. गर्भाधान:  गर्भाधान हा पहिला संस्कार आहे. तो संस्कार व्यक्तीने गृहस्थ जीवनात प्रवेश केल्यानंतर तिचे प्रथम कर्तव्य म्हणून ओळखला गेला आहे. व्यक्तीला तिचे मूल (अपत्य) निरोगी असावे, सर्वोत्तम असावे असे वाटत असते. ते मूल गुणवान व्हावे यासाठी गर्भधारणेपूर्वी शरीर आणि मन यांच्या शुद्धीसाठी गर्भाधान संस्कार करतात. त्या संस्कारात मंत्र आणि होमहवन यांद्वारे देहशुद्धी करून अध्यात्मशास्त्रीय व विशिष्ट आरोग्याच्या दृष्टीने समागम करणे अपेक्षित आहे. त्या संस्कारात मंत्रांद्वारे सुप्रजा-जनन, कार्यशक्तीचा योग्य वापर, कामवासनेवर नियंत्रण, रजोदर्शन स्थिती, समागमातील विविध आसने आणि उच्च आनंदप्राप्ती या विषयसंबंधीत मार्गदर्शन आहे. स्त्रीला या विषयात समज यावी, यासाठी गर्भाधान संस्कार आहे.

2. पुंसवन:  हा दुसरा संस्कार स्त्रीच्या गर्भधारणेच्या तिसऱ्या किंवा चौथ्या महिन्यात केला जातो. गर्भाला लिंगभेद गर्भात पहिले चार महिने नसतो. हा विधी गर्भ मुलगा किंवा मुलगी हे लिंग ठरण्यापूर्वी करणे अपेक्षित आहे. पुंसवन-विधी करण्याचे मुख्य उद्देश दोन आहेत. पहिला उद्देश म्हणजे मुलगा होणे आणि दुसरा म्हणजे संतती निरोगी, सुंदर आणि सद्गुणी होणे. मातेच्या उदरातील गर्भाचे लिंग कळण्यासाठी सोनोग्राफी तंत्रज्ञानाचा दुरुपयोग होऊ लागल्यावर अशा परीक्षणा़ंना बंदी सरकारने आणलेली आहे.

हिंदू धर्मग्रंथांमध्ये,सुश्रुत संहिता, यजुर्वेद इत्यादी ठिकाणी, पुत्रप्राप्तीशी संबंधित असलेल्या पुंसवन संस्काराची माहिती मिळते. स्मृतिसंग्रहात लिहिले आहे – गर्भाद् भावेच्च पुंसुते पुनस्त्वस्य प्रतिपदनम्. याचा अर्थ पुंसवन करून गर्भातील बाळाचे लिंग बदलता येते. या संस्कारात गर्भवती महिलेच्या नाकपुड्यांतून एक विशेष औषध आतमध्ये टोचले जाई. तो विधी विशेष पूजा आणि मंत्रपठण यांद्वारे केला जाई.

3. अनवलोभन : हा संस्कार पुंसवन गर्भधारणेनंतर तिसऱ्या महिन्यात करण्याची प्रथा आहे. वीर्यवान (बलशाली, तेजस्वी), इंद्रावर विजय मिळवेल अशी पराक्रमी संतती निर्माण व्हावी असा या संस्काराचा हेतू आहे. संस्कारात ‘माहं पौत्रमघं नियां’ या मंत्राचे उच्चारण करत अश्वगंधा वनस्पतीचा रस पतीने पत्नीच्या उजव्या नाकपुडीत सोडण्याचा असतो. यामुळे तीन हेतू साध्य होतात – गर्भ बलवान होतो, गर्भपाताची शक्यता कमी होते आणि मूल दिवस पूर्ण भरल्यानंतर जन्माला येते.

4. सीमंतोनयन : सीमंतोनयनाला सीमांतीकरण किंवा सीमांतविधी असेही म्हणतात. सीमंतोनयन म्हणजे सौभाग्याने धन्य होणे. गर्भपात रोखण्यासोबत गर्भ आणि गर्भाची आई यांचे रक्षण करणे हा या संस्काराचा मुख्य उद्देश आहे. या संस्काराद्वारे गरोदर स्त्रीचे मन प्रसन्न राहण्यासाठी पती गर्भवती महिलेची मागणी पूर्ण करतो. हा संस्कार गर्भधारणेच्या सहाव्या किंवा आठव्या महिन्यात करण्यात येतो. त्याची तुलना हौसेने केल्या जाणाऱ्या डोहाळजेवणाशी होऊ शकेल.

5. जातकर्म:  मूल जन्माला येताच जातकर्म संस्कार केले जातात. जन्मत: जे कर्म केले जाते त्याला जातकर्म असे म्हणतात. त्यामध्ये बाळाला अंघोळ घालणे, मध किंवा तूप चाटवणे, स्तनपान इत्यादींचा समावेश होतो. असे मानले जाते, की या संस्काराने मूल बुद्धिमान आणि बलवान बनते. त्याच्या मदतीने मातेच्या गर्भातील रस पिण्याशी संबंधित दोष, सुवर्ण वायू, लघवी दोष, रक्त दोष असे दोष दूर होतात. तो संस्कार नवजात बाळाच्या नाभीपुढे करण्याची पद्धत आहे. मातेच्या उदरातून बाहेर आल्यानंतर जगाच्या थेट संपर्कात येणार्‍या बालकाला बुद्धी, शक्ती आणि दीर्घायुष्य यांसाठी वेदमंत्रांच्या पठणासह सुवर्णाच्या किंवा सुवर्णलेप असलेल्या भांड्यातून मध आणि तूप चाटवले जाते. तो संस्कार विशेष मंत्र आणि विधी यांनी केला जातो. वडील बाळाने दोन थेंब तूप आणि सहा थेंब मध यांचे मिश्रण चाटल्यानंतर यज्ञ करतात ! नऊ मंत्रांचा विशेष उच्चार करून मूल शहाणे, बलवान, निरोगी आणि दीर्घायू होण्यासाठी प्रार्थना करतात. त्यानंतर आई मुलाला स्तनपान करते.

6. नामकरण म्हणजेच बाळाचे नाव ठेवण्याचा बारसे हा संस्कार विधी आहे. नामकरण सोहळा सामान्यतः जन्मानंतर दहाव्या किंवा बाराव्या दिवशी केला जातो. पूर्वी तो विशेषतः बाराव्या दिवशी केला जात असे. काही ग्रंथ जन्माच्या दहाव्या दिवसानंतर येणाऱ्या पहिल्या अमावास्येला किंवा पौर्णिमेला नामकरण समारंभ करण्याचे सुचवतात. बारशाच्या दिवशी बाळाला अंघोळ घालून नवीन वस्त्रे परिधान केली जातात. जन्माच्या वेळी असलेल्या नक्षत्रावर नाव ठेवले जाते, त्याला ‘नावरस नाव’ असे म्हटले जाते. नंतर पालकांनी निवडलेले बाळाचे औपचारिक नाव जाहीर केले जाते. नामकरण विधीद्वारे बाळाला समाजात एक व्यक्ती म्हणून मान्यता मिळते. जगात बाळाला व्यवहार करणे सोपे जावे म्हणून नामकरण केले जाते. तो समारंभ ‘हौसेला मोल नसते’ या म्हणीप्रमाणे भेटवस्तूंची देवाणघेवाण करत आणि मेजवानी देत साग्रसंगीत साजरा केला जातो.

प्राचीन संस्कृत ग्रंथ पालकांना नावे निवडण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे प्रदान करतात. मुलाचे नाव सामान्यत: दोन किंवा चार अक्षरांचे असावे, जे मध्यभागी अर्धस्वर आणि विसर्गाने समाप्त होते. मुलीचे नाव सामान्यत: विषम अक्षरांच्या संख्येत असावे, त्याचा उच्चार करणे सोपे असावे. त्याचा प्रतिध्वनी आणि उच्चार करणे सोपे असावे. अप्रिय, अशुभ किंवा सहजपणे वाईट अर्थात रूपांतरित होणारे शब्द टाळले पाहिजे, गृहसूत्रांमध्ये सांगितल्याप्रमाणे पसंतीची नावे ही देवदेवता, चांगले गुण, भाग्यवान तारे, नक्षत्रे, नावाची व्युत्पत्ती यांच्याशी संबंधित असावीत. आईवडिलांचे जन्माचे ठिकाण, निसर्गातील झाडे, वेली-फुले-पक्षी-प्राणी असे सुंदर घटक, राशी, नक्षत्र, मास, कुलदेवता यांच्या नावानुसार नवजात बाळाला पाच नावे देता येतात.

7. सूर्यावलोकन: सूर्याचे तेज आणि ऊर्जा नवजात बालकामध्ये यावी यासाठी त्याला सूर्यदर्शन घडवण्याची प्रथा आहे. पूर्वीच्या काळी बाळ आणि बाळंतीण यांची व्यवस्था अंधाऱ्या खोलीत केलेली असे. त्यांनी काही काळानंतर प्रकाशाचा, उजेडाचा पहिला अनुभव घेणे यासाठी या संस्काराची योजना केली असावी.

8. निष्क्रमण: निष्क्रमण किंवा निर्गमन म्हणजे बाहेर पडणे. सूर्य आणि चंद्र यांचा प्रकाश बाळाला दाखवण्याची पद्धत या समारंभात आहे. बाळाला सूर्याचे तेज आणि चंद्राची शीतलता यांची जाणीव करून देणे हा त्यामागील उद्देश. बालक तेजस्वी आणि नम्र बनवण्याची दृष्टी त्यात असावी. देवतांचे दर्शन आणि त्यांच्याकडून मुलाच्या दीर्घ आणि यशस्वी आयुष्यासाठी आशीर्वाद त्या दिवशी घेतले जातात. हा संस्कार जन्मानंतरच्या चौथ्या महिन्यात करण्याचा नियम आहे. बाळाला तीन महिने घरात ठेवावे. त्याला बाह्य वातावरणाच्या संपर्कात त्यानंतर, हळुहळू येऊ दिले पाहिजे, हा या संस्काराचा अर्थ.

9. अन्नप्राशन : म्हणजे उष्टावण. अन्नप्राशन म्हणजे ‘शिजवलेला भात खाणे’ होय. त्या दिवशी बाळाला तांदळाची खीर चाखवली जाते. अन्नप्राशन हा मानवी जीवनातील महत्त्वाचा टप्पा आहे. त्याला पश्चिम बंगालमध्ये मुखेभट, केरळमध्ये चोरूनू आणि हिमाचल प्रदेशमध्ये भाथ खुलाई म्हटले जाते, तर नेपाळमध्ये त्याला पासनी असे म्हणतात.

10. वर्धापन:  हा दहावा संस्कार. जन्मदिनापासून एक सौरवर्ष पूर्ण झाल्यावर जन्मनक्षत्राच्या दिवशी म्हणजेच तिथीने बालकाचा वाढदिवस साजरा करावा.

11. चूडाकर्म: या संस्कारात बाळाच्या डोक्याचे केस पहिल्यांदा पूर्ण काढले जातात, त्याला ‘जावळ काढणे’ असे म्हटले जाते. केस कापताना बाळाला मामाच्या मांडीवर बसवले जाते. मूल एक वर्षाचे होईपर्यंत किंवा तिसर्‍या वर्षी म्हणजे दोन वर्षे पूर्ण झाल्यानंतर जावळ काढावे असे शास्त्र सांगते.

12. अक्षरारंभ: मुलगा/मुलगी शिक्षण घेण्यास पात्र ठरते, तेव्हा त्याचा विद्यारंभ समारंभ केला जातो. या समारंभाच्या माध्यमातून मुलांमध्ये अभ्यासाचा उत्साह निर्माण होतो; तसेच, पालक आणि शिक्षक यांनाही त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून दिली जाते. मुलामुलीला वर्णमाला, विषयांचे ज्ञान आणि चांगले जीवन जगता यावे ही ती जबाबदारी आहे.

13. उपनयन: हा तेरावा संस्कार आहे. मुलाची मुंज हा हिंदू धर्मातील सोळा संस्कारांपैकी तेरावा संस्कार आहे. तो मनुष्यजीवनाला आकार देतो. गुरूंच्या जवळ जाणे म्हणजे उपनयन. त्याला व्रतबंध किंवा मौजीबंधन असे म्हणतात. गुरूच्या जवळ राहून, ब्रह्मचारी म्हणून चांगल्या प्रकारे, एकाग्र चित्ताने अभ्यास करण्यासाठी काही नियम पाळणे आवश्यक असते. त्या नियमांनी व व्रतांनी स्वतःला बांधून घेणे म्हणजेच व्रतबंध. तो संस्कार ब्राह्मण, क्षत्रिय व वैश्य या तीन वर्णांत जन्मलेल्या पुरुषांसाठी मर्यादित केला गेला होता. त्याने संस्कारित व्यक्ती तिच्या पालकांपासून दूर राहून स्वतःच्या शिक्षणावर लक्ष केंद्रित करत असे. त्या संस्काराद्वारे ब्रह्मचर्य व्रताचे पालन कसे करावे हे शिकवले जाई. उत्तम व निकोप शारीरिक व मानसिक वाढ होण्यासाठी काही बंधने अत्यावश्यक असतात. तीच बंधने विशिष्ट संस्काराच्या माध्यमातून मनावर अधिक प्रभावीपणे ठसतात.

14. समावर्तन:  गुरुकुलातील शिक्षण पूर्ण झाल्यावर जेव्हा शिष्याला गुरुकुलातून निरोप दिला जात असे, तेव्हा त्याला गुरुकडून पुढील जीवनासाठी उपदेश केला जात असे. त्याला संवर्तन किंवा समावर्तन संस्कार म्हणतात. ‘संवर्तन’चा अर्थ ‘परत येणे’ असा होतो. दीक्षांत समारंभ हा समावर्तन संस्कारासारखा आहे. शिक्षण पूर्ण झालेल्या शिष्याला भावी जीवनाच्या जबाबदाऱ्या (गृहस्थाश्रम) आणि त्याने यशस्वीपणे जगण्यासाठी काय केले पाहिजे याबद्दलचे मार्गदर्शन अभिप्रेत आहे.

15. विवाह: गृहस्थधर्मात प्रवेश हा अन्य सर्व संस्कारा़ंपेक्षा अधिक महत्त्वपूर्ण मानला गेला आहे. तरुण पुरुष आणि स्त्रीया जेव्हा कुटुंब तयार करण्याची जबाबदारी घेण्यास शारीरिक व मानसिक दृष्टीने सक्षम होतात तेव्हा विवाह सोहळा केला जातो. विवाह हा केवळ शारीरिक किंवा सामाजिक करार नसून त्यात जोडप्याला आध्यात्मिक साधनादेखील प्रदान करण्यात आली आहे. म्हणूनच महर्षी व्यासांनी म्हटले आहे, की ‘गृहस्थाश्रम हा सर्व धर्मांचा आधार आहे. चारी आश्रमा़ंमध्ये गृहस्थाश्रम धन्य होय.’ सर्व आश्रम गृहस्थाश्रमावर आधारित आहेत. केवळ चांगले गृहस्थ समाजाच्या अनुकूल व्यवस्था व विकास यांत मदत करतात आणि उत्तम नवीन पिढी घडवण्याचे काम करतात. ते त्यांच्या साधनसामग्रीने ब्रह्मचर्य, वानप्रस्थ आणि संन्यास या आश्रमांतील साधकांना अपेक्षित आधार देत असतात. असा चांगला गृहस्थ बनण्याचा असेल तर विवाहाला रूढी आणि दुर्गुण यांपासून मुक्त करून सर्वोत्तम संस्कार म्हणून पुन्हा प्रस्थापित करणे आवश्यक आहे.

16.अंत्येष्टी : हा सोळावा म्हणजे शेवटचा संस्कार. माणसाच्या मृत्यूनंतर केले जाणारे दाहकर्म व श्राद्ध असा तो संस्कार. दिवंगताविषयी आस्था, प्रेम, सद्भावना व्यक्त करण्याचे माध्यम म्हणून दाहकर्म व श्राद्ध या विधींकडे पाहिले जाते. दहनप्रसंगी म्हटल्या जाणाऱ्या प्रार्थनेत मृत शरीराला स्वतःमध्ये सामावून घेण्याची विनंती अग्नीला केली जाते. ब्रह्म पुराणानुसार, जी व्यक्ती खोटे बोलत नाही, आस्तिक वृत्तीची आहे, देवपूजापरायण आहे, कृतघ्नपणे वागत नाही आणि जी कोणाची इर्षा करत नाही अशा व्यक्तीला मृत्यू सुखावह येतो. भारतीय तत्त्वज्ञान असे मानते, की मृत्यूच्या वेळी व्यक्तीच्या मनात जे विचार येतात त्यानुसार त्या व्यक्तीला पुढील जन्म मिळतो. त्यामुळे परमेश्वर सन्निध असण्यासाठी ॐ नमो भगवते वासुदेवाय । असा जप तशा वेळी करावा. गीतेमध्ये श्रीकृष्णाने असे म्हटले आहे, की जी व्यक्ती अंतकाळी त्याचे स्मरण करील ती मृत्यूनंतर त्याच्याजवळ जाईल. उत्तरायणात आलेला मृत्यू हा पुण्यकारक असतो असेही गीतेत सांगितले आहे.

गरुड पुराणात सांगितले आहे, की एक पिंड शव उचलण्यापूर्वी घरात द्यावा. दुसरा पिंड शवयात्रा सुरू करण्यापूर्वी दरवाज्यात द्यावा. आणखी एक पिंड शवयात्रा चौकात आल्यावर द्यावा. पुढील पिंड स्मशानात विसाव्याच्या ठिकाणी द्यावा आणि शेवटचा पाचवा पिंड चितास्थानी द्यावा. त्यानंतर दहनाचा विधी करावा. त्यावेळी पवित्रीकरण, प्राणायाम, संकल्प, जानव्याचे अपसव्य, यमाला नमस्कार, यमाची स्तुती, स्मशानभूमीची प्रार्थना, स्मशानातील जलाची प्रार्थना, भूमिप्रोक्षण, अग्निस्थापना, रेखाकरण, चितीकरण, सूक्त पिंडदान (प्रेताचे कपाळ, मुख, हात व पाय या ठिकाणी सातूचे पिंड ठेवणे), शवाला पाणी पाजणे, अग्निसंस्कार, अग्नी, पितर व मृताला प्रार्थना, घटाचा स्फोट, अप्रदक्षिणा, तिलांजली असे सर्व विधी केले जातात.

विलास पंढरी 9860613872 vilaspandhari@gmail.com
———————————————————————————————-

About Post Author

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here