संवेदनेची विधायकता – वय कोवळे उन्हाचे (Ashok Limbekar’s new book is nostaljic about childhood days in rural Maharashtra)

अशोक लिंबेकर यांचे लेखन व्यापकत्व धारण करत आहे. त्याची झलक त्यांच्या ‘वय कोवळे उन्हाचे’ या ललित लेखसंग्रहातून पाहण्यास मिळते. ते मलपृष्ठावर लिहितात, लहान मुलाच्या निरागस डोळ्यांनी पाहिलेले ते गाव, रान-शिवार, निसर्ग आणि त्यातील अनेक घटक हा या लेखांचा विषय आहे. पण त्याच बरोबर, त्यांनी समकालाला कवेत घेतील असेही काही ‘आजचे’ विषय या लेखसंग्रहात हाताळले आहेत. त्यांचा ललित लेखसंग्रह मुख्यत: मात्र ग्रामीण जीवनाचा भवताल टिपतो. त्यात सव्वीस लेख समाविष्ट आहेत. अशोक लिंबेकर हे नोकरीनिमित्ताने शहरात आले असले तरी त्यांचे मन गावाच्या ओढीने व्याकूळ असते. त्यांचे बालपण गावखेड्यात गेल्यामुळे त्यांची नाळ ग्रामीण भागाशी जोडलेली आहे. ते शेती-मातीशी एकरूप होतात. त्यांना बदलत्या सध्याच्या वातावरणात खेड्याचे रूप, माती व नाती हरवल्यासारखे वाटतात. तेथील बोलके व मुके सोबती शहरी जीवनात दूरचे व परके वाटू लागले अशी खंत ते या ललित लेखसंग्रहातून बोलून दाखवतात. ते चिंचा, बोरे, निंबूर, हुरडा, टहाळ या गावमेव्याशी असलेली मैत्री दुरावत गेली आहे; भाकरीची चव हरवून बसलो आहे, ही व्यथाही व्यक्त करतात. आश्चर्य वाटते ते त्यांच्या या उलट भावनेचे, की त्यांना गावाशिवाशी एकरूप असलेले ते घटक त्यांच्याशी आता मात्र फटकून वागताना का जाणवतात? जागतिकीकरणाच्या रेट्यात शेतीमातीशी नाते सांगणारा, बोरीबाभळी बरोबर बालपण व्यतीत केलेला लेखक गावात कसा आगंतुक ठरतो त्याचे वास्तव या ललित लेखसंग्रहातून रेखाटले आहे. बालपणचे गाव लेखकाला खुणावते, गाव म्हटले की त्याला आपलेपणा वाटतो, पण या बदलत्या परिस्थितीत गाव मात्र भकास बनत गेले आहे आणि ते जाणवले की लेखक अगतिक, हताश होतो.

लेखक बालपणाचे खेडे आठवून अनुभव मांडत जातो. लेखकाला खेड्यातील काळ्या माईची हाक अस्वस्थ करते. ‘वय कोवळे उन्हाचे’ हा त्याचा पहिलाच ललित लेखसंग्रह आहे. ललित लेखात विषयाच्या अनुषंगाने होणारे आत्म प्रगटीकरण स्वैर आणि लालित्यपूर्ण असते. अनुभव जिवंतपणे उभे करण्याची शक्यता त्या लेखनप्रकारात असते. त्यासाठी स्वचिंतन आणि स्वैर, स्वच्छंद शब्दक्रीडा ही महत्त्वाची साधने ललित लेखकाकडे असतात. त्याचा प्रत्यय ‘वय कोवळे उन्हाचे’ या लेखसंग्रहात येतो.

लेखांची शीर्षके बोलकी आहेत –  वाडा चिरेबंदी, मुके सोबती, आभाळाचा पारा, पिंपळाची सळसळ, मातीचे देणे, आठवणीतील माणसे, गावकुसाबाहेरची माणुसकी, वय कोवळे उन्हाचे अशी. त्यातून लेखकाच्या बालपणचे गाव साकारले आहे. लेखकाला गावाकडील गोतावळा खुणावत आहे. लेखकाचे बालपण झाडाझुडुपात गेले. त्याला त्या झाडांची आठवण येते. ‘पिंपळाची सळसळ’ या लेखात लेखकाचे बालपण ज्या पिंपळाखाली गेले तो पिंपळ शेवटच्या घटका मोजत आहे हे पाहून लेखक गावाकडे धाव घेतो व आठवण म्हणून नवीन पिंपळ तेथे लावतो. लेखकाच्या संवेदनेचे हे वेगळेपण (विधायकता) त्याच्या लेखनातून दिसून येते. बालपणचे सवंगडी चौखूर झाले. माती तेवढी शिल्लक आहे. लेखक आठवणींचे ओझे जड झाले म्हणून भावनांचे विरेचन या लेखसंग्रहातून करताना दिसतो.

लेखकाने शिक्षकी पेशा पत्करल्यानंतर अनेक ठिकाणी भटकंती केली आहे, पण मनाने तो गावाकडेच राहिला आहे. संग्रहातील काही लेख विषयांच्या वेगळेपणाने भिडतात. स्थापत्यकलेतील तेजाचे लेणे, धर्मक्षेत्रे-कुरूक्षेत्रे हे लेख वाचकांना अधिक ज्ञान देतात. नाटकाचे वेड, लोकरंगी यात्रा अशा लेखनातून ग्रामानुभव साकार होतात. अशोक लिंबेकर यांना सूर, ताल, लय यांची जाण असावी. त्या गोष्टींचे बाळकडू खेड्यातून मिळाले हेही ते नमूद करतात.

पुस्तक – वय कोवळे उन्हाचे

लेखक – अशोक लिंबेकर

प्रकाशक – अथर्व पब्लिकेशन, जळगाव

प्रथमावृती – 16 डिसेंबर 2020

किंमत – 295

दत्तात्रय केशव गंधारे 9423045295 gandhare7@gmail.com

About Post Author

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here