देवरुखचे शहीद स्मारक : कोकणातील एकमेव, अद्वितीय ! (Devrukh’s unique Martyr’s Memorial in Konkan)

0
582
1962 च्या चीन युद्धात वापरण्यात आलेला बजरंग रणगाडा

सैनिकी परंपरा घाटावर अनेक गावांत दिसते, तशी ती कोकणात नाही. रायगड येथील सैनिकी शाळा वगळता अन्य ठिकाणी तशी शाळा नाही. ती शाळाही प्रभाकर कुंटे यांच्यानंतर फार चर्चेत नसते. पण तरी शहीद स्मारक देवरुख येथे 2018 साली तयार करण्यात आलेले आहे. ते कोकणाच्या पाच जिल्ह्यांतील एकमेव स्मारक आहे आणि ते वैशिष्ट्यपूर्ण आहे. शहीद स्मारकच्या जोडीला तयार करण्यात आलेले परमवीर चक्र दालन आणि सैनिक मानवंदना उद्यान तर कोकणाची ओळख होऊ पाहत आहे !

देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सदानंद भागवत आणि उपाध्यक्ष मदन मोडक यांच्या पुढाकारातून ते घडले. मदन मोडक यांचे वडील वामनराव हे सैन्यात होते. त्यांचे काकाही सैन्यात होते आणि मेव्हणे हवाई दलात विंगकमांडर होते. मदन मोडक यांना एनसीसी कॅडेटच्या रूपात खाकी वर्दीची महती कळली आहे. त्यामुळे त्यांचा राष्ट्राभिमान जाज्वल्य आहे व तो तसाच प्रकटत असतो. त्यातूनच कोकणात लष्करानुकूल वातावरण तयार व्हावे ह्यासाठी शहीद स्मारकाची संकल्पना जन्माला आली. स्मारक निवृत्त लेफ्टनंट जनरल दत्तात्रय शेकटकर यांच्या मार्गदर्शनाखाली उभे राहिले आहे.

त्या बरोबर वामनराव मोडक अकादमीची स्थापना करण्यात आली आहे. त्या माध्यमातून सैन्य भरतीसाठी युवक तयार व्हावेत, त्यांना प्रेरणा मिळावी हा उद्देश आहे. त्याकरता स्मारक आणि दालन यांची कल्पना पुढे आली. प्रकल्प आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयाच्या प्रवेशद्वाराशी उभा करण्यात आला आहे.

प्रकल्पाच्या प्रारंभीच दिसतो तो चौथर्‍यावर विराजमान करण्यात आलेला बजरंग रणगाडा. तो 1962 च्या चीन युद्धात वापरण्यात आला होता. तो मिळावा म्हणून संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे व नितिन गडकरी यांनी विशेष प्रयत्न केले. खडकी येथील आर्टिलरी सेंटरमध्ये त्या युद्धात वापरलेले काही जुने रणगाडे पडून होते. तेथे मोडक यांनी भेट दिली. रणगाडे गंजलेल्या, दुरवस्था झालेल्या अवस्थेत होते. पण ब्रिगेडियर नागपाल यांनी त्यांतील एक निवडून त्याची आवश्यक ती डागडुजी केली, रंग दिला. तो मोडक यांच्या हवाली केला. तो रणगाडा अडतीस टन वजनाचा आणि तीस फूट लांबीचा आहे.

बजरंग रणगाड्याच्या समोर आहे ती RCL गन. ती गन जबलपूरच्या आर्मी सेंटरमधून मिळवली आहे. ती बसवण्यासाठी जीपची आवश्यकता होती. ती जीप महिंद्रा कंपनीने दिली आहे. त्या ठिकाणी आणखी एक प्रतिकृती पाहण्यास मिळते ती ‘INS दिल्ली’ ह्या युद्धनौकेची. ती प्रतिकृती रत्नागिरी येथील गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या NCC च्या नेव्ही विंगच्या कॅडेट्सनी तयार केली आहे. सैनिक मानवंदना उद्यान हे स्मारकाचे वेगळे आकर्षण आहे. त्या उद्यानात एक डोम तयार करण्यात आला आहे. त्याखाली दिल्लीच्या अमर जवान ज्योतीजवळ असलेली, रिकामी बॅरल असलेली रायफल आणि तिच्यावर ठेवण्यात आलेले शिरस्त्राण अशी प्रतिकृती उभारण्यात आली आहे. आठल्ये सप्रे पित्रे महाविद्यालयातील NCC युनिटच्या वतीने स्वातंत्र्य दिनाला व प्रजासत्ताक दिनाला हुतात्मा सैनिकांना मानवंदना प्रती वर्षी दिली जाते. तसेच, कारगिल विजयदिनही तेथे साजरा केला जातो.

परमवीर चक्र दालन हे अर्धगोलाकार आकारात तयार करण्यात आले आहे. एका बाजूने प्रवेश केल्यावर आतमध्ये परमवीर चक्र विजेत्या वीरांचे फोटो आणि गाथा लावण्यात आल्या आहेत. देशात एकवीस सैनिकांना परमवीर चक्र हा सर्वोच्च सैनिकी सन्मान मिळाला आहे. मेजर सोमनाथ शर्मा, नाईक जादूनाथ सिंग, सेकंड लेफ्टनंट रामा राघोबा राणे, कंपनी हवालदार मेजर पिरू सिंग, लान्स नाईक करम सिंग, कॅप्टन गुरबचन सिंग सलारिया, मेजर धनसिंग थापा, सुभेदार जोगिंदर सिंग, मेजर शैतान सिंग, कंपनी क्वार्टर मास्टर ऑफ हवालदार अब्दुल हमीद, लेफ्टनंट कर्नल थापर, लान्स नाईक आल्बर्ट एक्का, फ्लाईंग ऑफिसर निर्मलजीत सिंग, सेकंड लेफ्टनंट अरुण खेत्रपाल, मेजर होशियार सिंग दाहिया, नायब सुभेदार बाणा सिंग, मेजर परमेश्वरन, कॅप्टन मनोज कुमार पांडे, ग्रेनेडियर योगेंद्र सिंग यादव, रायफलमन संजीव कुमार आणि मेजर विक्रम बत्रा ह्या एकवीस परमवीर चक्र विजेत्यांच्या शौर्याच्या कहाण्या तेथे लावण्यात आल्या आहेत. त्याच बरोबर परमवीर चक्र पदकाची माहिती, त्याच्या रचनेचा अर्थ अशी अनुषंगिक माहितीही तेथे उपलब्ध आहे. त्याच दालनात पंतप्रधानांनी या स्मारकास दिलेला शुभेच्छा संदेशही लावण्यात आला आहे.

स्मारकाचे उदघाटन 30 मे 2018 रोजी करण्यात आले. कारगिल युद्धात परमवीर चक्र मिळवणारे ग्रेनेडियर योगेंद्र सिंग यादव त्या वेळी प्रमुख म्हणून उपस्थित होते. महाविद्यालयाच्या आवारात एका फायरिंग रेंजची निर्मिती करण्यात आली आहे. रेंज तीस मीटर लांबीची आहे. तेथे महाविद्यालयाचे NCC कॅडेट्स सराव करतात. रेंजचे उद्घाटन नेमबाज अंजली भागवत यांच्या हस्ते झाले होते.

कोकणातील युवकांमध्ये देशाच्या सैन्यदलाबाबत जागृती व्हावी, त्यांना सैन्यदलात जाण्याची प्रेरणा मिळावी ह्या उद्देशाने हे स्मारक तयार करण्यात आल्याचे मदन मोडक सांगतात. NDA परीक्षा पूर्वतयारी अकादमी स्थापन करण्याचा मानसही त्या पदाधिकार्‍यांचा आहे.

अमित पंडित 9527108522 ameet293@gmail.com

———————————————————————————————————————————————-

About Post Author

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here