स्थलांतरित मुलांचे शिक्षण – दौंडचा अनुभव (Education of Migrant Children -Daund’s Experience)

0
502

नांदूर हे गाव पुणे जिल्ह्याच्या दौंड तालुक्यातील मुळा-मुठा नदीकाठी वसलेले आहे. गावातील जमिनीचे क्षेत्र बागायती व लोक सधन आहेत. शेतकरी ऊसाचे पीक मोठ्या प्रमाणात घेत असल्यामुळे जवळ साखर कारखाने आहेतच, पण गुऱ्हाळाद्वारे गुळनिर्मितीचे प्रमाणही अधिक आहे. त्यामुळे हंगामी ऊसतोड मजूर (टोळ्या) अनेक जिल्ह्यांतून ऊसतोडणीसाठी वर्षभर सातत्याने येत असतात. काही गुऱ्हाळ मालकांनी टोळ्या कायमस्वरूपी ठेवलेल्या आहेत. त्यांना राहण्यासाठी तात्पुरती व्यवस्था स्वतःच्या शेतात करून दिलेली आहे.

शालेय मुलांचे ऑनलाईन शिक्षण लॉकडाऊनमुळे 2020 मध्ये सुरू झाले, परंतु स्थलांतरित मुलांच्या शिक्षणाची मोठी अडचण निर्माण झाली. तशा मुलांच्या अनेक झोपड्या नांदूर गावात कोरोनाच्या सर्वेक्षणाच्या निमित्ताने जुलै 2020 महिन्यात दिसून आल्या. परंतु ऊसतोडीला पालकांबरोबर दिवसभर गेलेली ती मुले संध्याकाळीच माघारी येत. त्यांचे सर्वेक्षण करणे कठीण होते. त्यावर एक मार्ग सापडला. झोपड्यांच्या जवळ राहणारे माजी विद्यार्थी, पालक यांच्यामार्फत सर्व्हे केला. त्यांनी मला मुलांची व्हॉट्स ॲप माहिती आणि फोटो पाठवले. नाशिकच्या इगतपुरी व औरंगाबादच्या कन्नड भागांतून टोळ्या त्या ठिकाणी आलेल्या होत्या. दोन्ही टोळ्यांत मिळून सात मुले होती, तर दोन मुले पालघरवरून आलेली होती. सर्वात प्रथम त्यांच्या इयत्ता जाणून घेतल्या, त्यानुसार जुनी पुस्तके आमच्या शाळेच्या विद्यार्थ्यांकडून जमा केली. गावातील तरुण कार्यकर्ता विलास याच्यामार्फत गावातच लेखन साहित्य व उजळणीची पुस्तके खरेदी केली. ऊसतोडवाल्यांच्या त्या मुलांना लेखन साहित्य व पुस्तके यांचे वाटप विलासमार्फत केले.

साहित्य तर उपलब्ध करून दिले, परंतु शिक्षणाचे काय? त्या मुलांच्या मूळ शाळांचे संपर्क क्रमांक शोधून फोन केले, पण उपयोग काहीच झाला नाही. कोणीही त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली नाही. शेवटी, मी त्यांचा अभ्यास ऑनलाईन आठवड्यातून दोन वेळा घेऊ लागले, तर काही मुलांसाठी तेथेच टोळीतील शिकलेल्या व्यक्तींवर जबाबदारी सोपवली. तशा प्रकारे, काही ना काही मार्गाने शिक्षण चालू ठेवण्याचा प्रयत्न केला.

माझे सर्वेक्षण बालरक्षक म्हणून वर्षभर चालूच असते. डिसेंबर महिन्यात (2020) सर्वेक्षण चालू असताना, नगर जिल्ह्यातील शुभम साळवे या विद्यार्थ्याच्या वडिलांनी शुभमसाठी काही करता येईल का? याबाबत विचारणा केली. त्याचे दहावीचे शिक्षण ऊसतोडीच्या कामामुळे अर्धवट राहिले होते. त्याचा फॉर्म भरणे आवश्यक होते. त्याची चौकशी शाळा, शिक्षक यांची माहिती घेऊन केली. नगरला त्याला त्याच्या शाळेत फॉर्म भरण्यासाठी सर्व प्रकारची मदत केली. शिवाय, त्याला पाठ्यपुस्तके, गाईड्स आणि लेखनसाहित्य देण्यात आले. त्याच वेळी नंदिनी राठोड या, रस्त्याचे काम करणाऱ्या मुलीची आठवण झाली. ती आमच्या गावात रस्त्याच्या कामानिमित्त सप्टेंबर महिन्यात आली होती. तिची भेट सर्व्हेमध्ये झाली, तेव्हा तिनेही पुढे शिकण्याची इच्छा व्यक्त केली होती. तिचे शिक्षण नववीतून वडिलांच्या निधनामुळे सुटले होते. ती अक्कलकोटला राहत होती. आम्ही तिचे माध्यमिक शिक्षक कलशेट्टीसर यांच्या मदतीने अक्कलकोटला 17 नंबर फॉर्म भरण्यात यशस्वी झालो. पंढरपूर येथील दुकानदाराने तिला पाठ्यपुस्तके, गाईड्स आणि लेखनसाहित्य मोफत दिले. मी बालरक्षक म्हणून सहा ते चौदा या वयोगटासाठी काम केले होते. आता दहावीच्या त्या दोन विद्यार्थ्यांना शिक्षणप्रवाहात आणल्यानंतर आनंद झाला, नवा आत्मविश्वास निर्माण झाला.

शाळाबाह्य मुलांच्या सर्वेक्षणाचे आदेश शासनाच्या वतीने पुणे जिल्ह्यात जानेवारी महिन्यात (2021) देण्यात आले. ती मुले त्यांच्या निवासस्थानी दिवसा नसतात. म्हणून ज्या भागात ऊसतोड चालू आहे तेथे प्रत्यक्ष जाऊन सर्वेक्षण केले. मग भले शेजारच्या गावात जावे लागले तरी ! काही ठिकाणी तर गाडीसुद्धा नेणे शक्य नव्हते. तशा वेळी, मी माझ्या वर्गातील ऊसतोडीवाले मुले आकाश आणि राम यांना घेऊन जात असे. सर्व टोळ्यांचे अपडेट्स त्यांच्याकडून मिळत. वीस स्थलांतरित मुले त्या सर्वेक्षणात आढळून आली. ती धुळे, जळगाव आणि औरंगाबाद येथील होती. ती मुले शिक्षण हमीकार्डावर शाळेत दाखल करून घेतली. विशेष म्हणजे, ती मुले केदारी माळावर एकाच ठिकाणी राहत असल्याचे कळले.

मुलांना शिक्षण हमीकार्डावर शाळेमध्ये दाखल तर केले, परंतु त्या मुलांच्या शिक्षणाचे काय? हा प्रश्न भेडसावत होता. अनेक जण प्रयत्न पर्याया पर्यायाने करत होते. ऊसतोड असेल तेथे आठवड्यातून दोन वेळा जाऊन शिकवायचे, का स्वयंसेविका नेमून फिरती शाळा चालवायची? इकडे शाळेतील शिक्षकांना मुलांपर्यंत ऑनलाईन शिक्षण नियमित पोचवणे अवघड जात होते. त्यात आणखी ती मुले जोडून देणे मला योग्य वाटत नव्हते. त्यातूनही त्या मुलांच्या इयत्ता कोणत्याही असल्या तरी त्यांचा शिक्षणाचा पायाच पक्का नव्हता. तरीही शाळेच्या वतीने आम्ही स्वयंसेविका आणि जागा शोधत होतो. नांदूर गावच्या पोलीस पाटील नेहा बोराटे आणि प्रवीण बोराटे या दाम्पत्याने त्या कामी मोठी मदत केली. त्यांनी स्वयंसेविका आणि जागा शोधून दिली. माया गिरमे या स्वयंसेविका म्हणून काम करण्यास तयार झाल्या. त्या केदारीमाळ येथे मुलांच्या कोप्या होत्या, तेथेच शेजारी राहतात. त्यांच्या बंगल्याच्या आवारात रात्रशाळा घेण्याचे निश्चित केले. ग्रामपंचायतीने मास्क आणि सॅनिटायजर कोरोनाबाबत खबरदारी म्हणून दिले. मी वैयक्तिक रीत्या स्वयंसेविकेच्या मानधनाची जबाबदारी घेतली. मुलांच्या पालकांना रात्रशाळेसंबंधी कल्पना देण्यासाठी ज्या ठिकाणी ऊसतोड चालू आहे तेथे फडात माया यांना घेऊन गेले. मुलांशी ओळख करून दिली, पालकांच्या भेटी घेतल्या. रात्रशाळेविषयी माहिती दिली. त्यांना त्यांच्या पाल्याच्या शिक्षणाची चिंता सतावत होतीच. त्यामुळे सर्व पालक त्यांच्या पाल्याला पाठवण्यास तयार झाले. तेथे आम्ही मुलांना माया यांच्या हस्ते खाऊवाटप केले.

रात्रशाळा ही आमच्यासाठी पूर्णपणे नवी संकल्पना होती. सतत भटकंतीमुळे त्या स्थलांतरित मुलांना शिक्षणाची गोडी नसते. शिवाय अस्वच्छ राहणीमान, पालकांचे दुर्लक्ष यांमुळे शाळेत अध्यापनाबरोबर संस्कार, मनोरंजन होणे आवश्यक होते. माया यांना सर्व बाबी समजावून दिल्या. माया यांचे शिक्षण एम कॉम, परंतु त्यांना अध्यापनाचा अनुभव नव्हता. म्हणून खाजगी प्रकाशनाच्या भाषा व गणित या विषयांच्या स्वयंअध्ययन पुस्तिका संदर्भासाठी वापरण्याचे ठरले. त्यासाठी निधीची आवश्यकता होती. शेजारीच असलेल्या आर्टिक फूड कंपनीने त्यासाठी दोन हजार रुपयांची आर्थिक मदत केली. त्यामधून वीस मुलांना पुस्तिका पुरवल्या.

आमची रात्रशाळा फेब्रुवारी महिन्यात सुरू झाली. मुले फडातून उशिरा येत. त्यामुळे शाळा रात्री सात ते साडेआठ दरम्यान भरू लागली. मुले कितीही उशीर झाला तरी आवरून हजर राहत असत. माया यांनी मुलांना स्वच्छतेच्या सवयी लावल्या. वर्गाची सुरुवात प्रार्थना, ‘शुभं करोती’… श्लोक म्हणून होत असे. त्यानंतर अभ्यासाला सुरुवात होई. ती शाळा दोन महिने चालली. मी, वेल्हाळमॅडम आणि माया यांनी त्या मुलांच्या कपड्यांची व्यवस्था केली. मुले फडातून आल्यावर शाळेची वाटच बघत बसत. मुली तर मेकअप करून येत. ज्यांनी कधी शाळेचे तोंडच पाहिले नाही अशी मुले जरा कंटाळा करत, पण माया त्यांच्याकडून खडे, गोट्या आदी साहित्य वापरून कृती घेत असत. वाढदिवसानिमित्त शिक्षकबंधूनी खास मुलांच्या खाऊसाठी पैसे पाठवले होते. तेव्हा आम्ही मुलांसाठी जेवणाचे नियोजन केले. माया यांच्या कुटुंबाने स्वतः स्वयंपाक करून मुलांना गोडाधोडाचे जेवण दिले. आमची रात्रशाळा अशा प्रकारे आनंददायी वातावरणात चालू होती.

शाळेतील मुले वाचन-लेखन दोन महिन्यांत करू लागली होती. परंतु शाळा बंद, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे करावी लागली. मुले तर खूप नाराज झाली; पुन्हा शाळा कधी सुरू होणार असे माया यांना सतत विचारत आणि खरोखरच, एक मार्ग बंद झाला तरी पर्यायी मार्ग निघतो. आमच्या त्या ऊसतोडीवाले मुलांसाठी पुण्यातील ‘डोअर स्टेप स्कूल संस्था’ ऑनलाइन तास घेऊ लागली. मोबाईलची अडचण सुरुवातीला जाणवली. माझ्या सहकारी वेल्हाळमॅडम यांनी तात्पुरता एका पालकांचा मोबाईल उपलब्ध करून दिला. त्यामुळे अनेक अडचणींचा सामना करत तास चालू राहिले. आम्ही ‘अक्षर मानव संस्थे’मार्फत सोशल मीडियावर जुन्या किंवा नव्या मोबाईलसाठी आवाहन केले. आमच्या त्या आवाहनाला प्रतिसाद देत कोथरुडमधील अर्चना जोशी आणि त्यांच्या सोसायटीच्या रहिवाशांनी आम्हाला पाच नवे मोबाईल उपलब्ध करून दिले ! नांदूर गावचे ग्रामस्थ मकरंद केदारी यांनी जागा उपलब्ध करून दिली. कारण बऱ्याच वेळा पावसामुळे तास रद्द करावा लागत असे. परंतु आता शेड मिळाल्यामुळे दुपारच्या वेळी तास घेणे शक्य होत आहे. ऊसतोड कामगार त्यांच्या मुलांना शक्यतो सोबत घेऊन जातात. काही पालक शैक्षणिक तासासाठी मुलांना घरी ठेवत आहेत. मी व डोअर स्टेप संस्थेचे शिक्षक त्या मुलांचे तास दुपारी घेत आहोत. मुलांचे अभ्यासाबरोबरच मनोरंजन व्हावे म्हणून अभ्यासानंतर मुलांसाठी कार्टून, कविता, गोष्टी इत्यादी दाखवले जाते. दर शनिवार फनी वार म्हणून राबवला जातो. त्यामध्ये मुलांसाठी कला, कार्यानुभव; तसेच, बौद्धिक गेम्स इत्यादी उपक्रम घेतो. त्यामध्ये मुले छान रमतात.

‘डोअर स्टेप’मार्फत तीन महिने मुलांचा ऑनलाइन अभ्यास घेण्यात आला. साधारणपणे जून ते ऑगस्ट असे तीन महिने भाषा विषयाची तयारी करून घेण्यात आली. मुलांना ऑनलाइन अभ्यासाचा कंटाळा येऊ नये म्हणून कृतियुक्त गाणी, गोष्टी घेतल्या जातात. मुलांच्या क्षमतेनुसार अध्यापन केले जाते. चौथ्या महिन्यात स्वयंसेविका माया यांना प्रशिक्षित करण्यात आले. माया स्वतः वर्ग घेऊ लागल्या. त्याचा परिणामही दिसू लागला आहे. मुले चांगल्या प्रकारे वाचन करू लागली आहेत. कधीही शाळेत न गेलेला विजय बागूल हा विद्यार्थी बाराखडीयुक्त पाठ वाचू लागला आहे. ‘डोअर स्टेप’ संस्थेमार्फत मुलांची वाचन कार्यशाळा घेण्यात आली.

हंगामात ऊसतोड कामगार अनेक येत आहेत. त्यामुळे मुलांची संख्या वाढत आहे. आमचे काम ‘बालरक्षक’ म्हणून ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी माया यांच्याबरोबर चालू आहे. राज्याच्या शिक्षण उपसंचालक, समता विभागाच्या प्रमुख कमलादेवी आवटे यांनी एका परिषदेमध्ये आमचे ते काम मांडले आणि Times of India ने आमच्या कार्याची दखल घेतली. त्यापाठोपाठ महाराष्ट्र टाइम्स, दैनिक सकाळ या वर्तमानपत्रांनी; तसेच, News 18 लोकमत, लोकशाही, हिंदी news आदी चॅनेलवाल्यांनी आमचे ते काम प्रकाशझोतात आणले. त्याचा सकारात्मक परिणाम म्हणून परिसरातील फ्लिटगार्ड कंपनीच्या साहेबांनी आमच्या ‘प्रोजेक्ट’ला भेट दिली. मुलांना आर्थिक सहाय्य व बौद्धिक गेम्स गिफ्ट दिले. पुण्यातील दानशूर लोकांनी मदतीचा हात पुढे केला आहे. दौंड तालुक्यातील कुरकुंभ येथील Clean Science &Technology या कंपनीने प्रत्यक्ष बोलावून सत्कार केला. तसेच, मोठ्या प्रमाणात मदत करण्याचे आश्वासन दिले. आम्ही या सहाय्याचा उपयोग संपूर्ण दौंड तालुक्यातील स्थलांतरित मुलांसाठी करत आहोत.

कोरोनाकाळात स्थलांतरित मुलांचा शोध घेणे, त्यांना शिक्षणप्रवाहात आणणे- टिकवून ठेवणे आव्हानात्मक होते. परंतु प्रयत्नांद्वारे अतिशय कठीण गोष्टही शक्य झाली. आमच्या केंद्रप्रमुख वेताळमॅडम, मुख्याध्यापक ठोंबरेसर, नांदूर शाळेचे सहकारी शिक्षक, नांदूरची ग्रामपंचायत, पोलिस पाटील नेहा, स्वयंसेवक माया या सर्वांचे सहकार्य झाले.

–  रोहिणी लोखंडे 9890711833 rohinilokhande75@gmail.com

About Post Author