तोरू दत्त – पहिली हिंदुस्थानी इंग्रजी कादंबरीकार (Toru Dutt – First Indian Novelist in English Language)

0
128

तोरू दत्त ही पहिली हिंदुस्थानी इंग्रजी कादंबरीकार. तिचे काव्यही युरोपात अठराव्या शतकात गाजले. तिने फ्रेंच भाषेतही लेखन केले. तिचे एकूण दत्त कुटुंब हेच लोकविलक्षण होते. त्यांनी विल्यम कॅरे या इंग्रजी धर्मप्रसारकास आश्रय दिला; स्वत: ख्रिश्चन धर्म स्वीकारला, इंग्लंडला स्वत:ची मातृभूमी मानले आणि प्रेम मात्र हिंदुस्थानवर केले व हिंदुस्थानी जनतेची काळजी वाहिली…

ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने जसजसा हिंदुस्तानातील विविध प्रांतांवर कब्जा मिळवण्यास एकोणिसाव्या शतकात सुरुवात केली तसतसा हिंदुस्तानातील सामाजिक जीवनाचा पोत बदलू लागला. ती प्रक्रिया 1818 नंतर अधिक वेगाने होऊ लागली. तो प्रभाव महाराष्ट्र व बंगाल प्रांतांत विशेष पडला. त्याचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे इंग्रजी भाषाशिक्षण. त्या दोन्ही प्रांतांत इंग्रजी भाषा व वाङ्मय शिकणाऱ्या वर्गात बहुधा उच्चवर्णीय असत.

अशाच पैकी बंगालमधील एक कुटुंब होते तोरू दत्त हिच्या पूर्वजांचे. तोरू दत्त हिचे पणजोबा नीलमणी हे 1757 मध्ये जन्मले. विल्यम कॅरी हे भारतातील आद्य ख्रिस्ती धर्म प्रसारक. कोलकाता येथे आले तेव्हा ते त्यांच्या पत्नीची मतिभ्रष्टता आणि मुलांचे आजारपण यांमुळे त्रस्त होते. त्यावेळी ते बेघरही होते. नीलमणी यांनी त्यांना आश्रय दिला, सर्वतोपरी मदत केली. नीलमणी यांच्याकडे सर्व धर्मांप्रती उदारता होती. तो वारसा पिढीजात तोरूकडे आला होता.

तोरूचे वडील गोविंद चंदर (नीलमणी यांचे नातू) हे ब्रिटिश सरकारात असिस्टंट कॉम्प्ट्रोलर जनरल- अकाउंट्स या हुद्यावर होते. त्यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा बढती मिळण्यात भेदभाव केला जातो या कारणास्तव दिला होता. दत्त घराण्याची सांपत्तिक स्थिती उत्तम होती– दोन घरे, एकाला मोठी बाग, घोडेगाड्या, नोकरचाकर; ददात कोणतीच नव्हती. मात्र त्यांना व तशीच त्यांच्या साऱ्या भावांनाच ख्रिस्ती धर्माविषयी ओढ लागली! त्यांचा सर्वात मोठा भाऊ मृत्युशय्येवर असताना, त्याला आंस ख्रिस्ती धर्म स्वीकारण्याची लागली होती. धर्मांतराच्या कृत्यासाठी अधिकृत प्रसारक त्या वेळी येऊ शकले नाहीत तेव्हा गोविंद चंदर यांनी भावाचा बाप्तिस्मा केला ! गोविंद चंदर यांनी स्वतः ख्रिस्ती धर्म त्या वेळी स्वीकारलेला नव्हताच; तरी त्यांनी धर्मविधी कसा केला असावा याची गंमत वाटते. पुढे, काही दिवसांनी त्यांच्या चारही भावांनी ख्रिस्त धर्म स्वीकारला. त्यावेळी तोरू फक्त सहा वर्षांची होती. तिच्या पुढील आयुष्यातील खिस्तप्रेमाचा स्रोत हा असा घराण्यातून आलेला होता.

तोरू ज्या कारणास्तव विश्वविख्यात झाली ती तिची काव्यप्रतिभा. तिचा स्रोतदेखील वडील आणि त्यांचे कुटुंबीय यांच्यातच होता. गोविंद चंदर यांनी ‘दत्त फॅमिली अल्बम’ नावाचा एक काव्यसंग्रह प्रकाशित केला आहे. त्यात साऱ्या कविता ते आणि त्यांचे भाऊ व इतर कुटुंबीय यांच्या आहेत. अर्थात, त्यांतील जास्तीत जास्त कविता त्यांच्या स्वतःच्या होत्या.

गोविंद चंदर यांना दोन मुली व एक मुलगा. त्यांनी त्यांच्या दोन्ही मुली- अरू आणि तोरू यांना घरीच इंग्रजी शिकवले. तोरू हिचा जन्म 4 मार्च 1856 या दिवशीचा. बहीण तिच्याहून थोडी मोठी. भाऊ- अबजू हा सर्वात मोठा. मुलींनी इंग्रजी शिकत असतानाच त्या भाषेतील साहित्य वाचण्यास सुरुवात केली. त्यांच्या त्या वेळच्या वाचनात मिल्टनच्या ‘पॅराडाईज लॉस्ट’ या विख्यात काव्यग्रंथाचा समावेश होता. अबजू याला मृत्यू अकाली 1865 मध्ये आला – क्षयाने. तो त्यावेळी फक्त चौदा वर्षांचा होता. गोविंद चंदर आणि कुटुंबीय कोलकाता व रामबागान येथे 1865-69 या काळात आळीपाळीने राहत असत. त्यांनी युरोपात जाण्याचा निर्णय 1869 मध्ये घेतला. त्या दोन मुली आणि त्यांची आई या युरोपात जाणाऱ्या पहिल्या बंगाली स्त्रिया ठरल्या !

गोविंद चंदर कुटुंबासह प्रथम फ्रान्सला गेले. त्यांनी तेथे मुलींना फ्रेंच भाषेचे शिक्षण दिले. दत्त कुटुंब फ्रान्समध्ये काही महिने राहिल्यानंतर इंग्लंडला पोचले. ते वर्ष होते 1870. तोरूला फ्रेंच कवितांचा अनुवाद इंग्रजीत करण्याचा छंद तेथील वास्तव्यात लागला. तिने स्वतः स्वतंत्रपणे कविता लिहिण्यास सुरुवात केली. गोविंद चंदर तिला उत्तेजन देत असत. तिच्या काव्यानुवादांची संख्या दोनशे झाली तेव्हा त्यांनी स्वतः त्या काव्याचा संग्रह प्रकाशित केला (1880). तोरू दत्त हिच्या काव्याचे स्वागत संमिश्र झाले, पण त्यामुळे ती सर्व युरोपमध्ये माहीत झाली. त्या संग्रहाला गोविंद चंदर यांनीच प्रस्तावना लिहिली आहे. ते सांगतात, की “त्यांच्या दोन्ही मुली फ्रान्समधील वास्तव्याचा काळ सोडला तर नियमित स्वरूपाच्या शाळेत अशा कधी गेलेल्या नाहीत. दोघी केम्ब्रिजमध्ये महिलांसाठी जी व्याख्याने होत ती मनःपूर्वक ऐकत असत. दोघी पियानो वाजवण्यास तेथेच शिकल्या. तोरू हिच्या वाचनाचा वेग आणि विस्तार अफाट होता. ती शब्दकोश, ज्ञानकोश यांचा भरपूर वापर करत असे.” तोरूच्या लक्ष्मण आणि Casuarina या कविता महाराष्ट्रातही शिकवल्या गेल्या होत्या असे समजते.

तोरू दत्त हिचे ‘लाईफ अँड लेटर्स ऑफ तोरू दत्त’ या शीर्षकाचे एक चरित्र उपलब्ध आहे. त्यात तिची पत्रे आहेत – सारी एकाच मैत्रिणीला लिहिलेली. ती पत्रे दोन वर्षांचा एक कालखंड असे दोन-तीन विभाग करून छापलेली आहेत. काही मैत्रिणींनी तिला लिहिलेली पत्रेही त्यात आहेत. ती फ्रेंचमध्ये आहेत. तोरुने लिहिलेल्या पत्रातून तोरुचे व्यक्तिमत्व समजण्यास मदत होते. तोरू हिने तिच्या केम्ब्रिजमधील मैत्रिणीला जी पत्रे लिहिली आहेत त्यात तिच्या वाचनवेडाचे उल्लेख अनेक येतात – इंग्लंडमधून कोणती पुस्तके मागवली, कधी येतील, कोणती वाचली आणि कशी वाटली वगैरे. तसेच, उल्लेख तिच्या पत्रांमध्ये पियानोवादनाचे येतात – वडिलांनी एक जुना पियानो आणला आहे, मोठा पियानो घरात मावत नाही वगैरे वगैरे. त्या बरोबर, काय वाजवले किंवा वाजवण्याचा प्रयत्न केला हेही तिने त्या पत्रांमधून नमूद केले आहे.

तोरू हिचे जीवन बहिणीच्या मृत्यूनंतर अधिक व्याकूळ, अधिक जपणुकीचे झाले. पहिली गोष्ट जाणवते, ती म्हणजे तोरू ही तिच्या बहिणीच्या मृत्यूनंतर खूप एकाकी झाली, ती तिघा भावंडांपैकी एकटी उरली होती. ती पत्रांतून रोजच्या गोष्टींबद्दल लिहिते, आईवडील आणि ती स्वतः यांना अनेक वेळा आलेले आजारपण; बागेची वर्णने, पाळीव प्राणी- त्यांची वाढ, पिल्ले- त्यांचे मृत्यू, तिने केलेले फ्रेंच कवितांचे इंग्रजी अनुवाद… किती गोष्टी सांगाव्यात !

इंग्लंडला ती स्वतःची मातृभूमी मानत होती; तसे उल्लेख वारंवार येतात- मला केम्ब्रिजच्या आठवणी किती येतात ! संस्कारक्षम वयात इंग्लंडला राहिल्यामुळे असेल किंवा वडिलांच्या अनुकरणाने असेल, ती ब्रिटिश राजघराण्याला अतोनात मान देत होती. ती एका पत्रात लिहिते, “प्रिन्स ऑफ वेल्स हिंदुस्थानला भेट देऊन आम्हाला सन्मानित करणार आहेत असे ऐकते.” पुढे म्हणते, “काही वृत्तपत्रांना स्वर्ग ठेंगणा झाला आहे, तर काही वृत्तपत्रे नाराज आहेत. त्यांना वाटते, की कर वाढवण्याचा हा एक मौका आहे.” ती स्वतःचे मत काय ते स्पष्ट करत नाही. ती एका पत्रात लिहिते- “आय सी एस परीक्षा उत्तीर्ण झालेल्यांची यादी काल प्रसिद्ध झाली, त्यात एकाही हिंदुस्तानी माणसाचे नाव नाही हे दुर्दैवाचे होय. माझा एक नातेवाईक परीक्षेला बसला होता. तो नापास झाल्यामुळे खूप निराश आहे. इथली माणसे परीक्षेसाठी खूप कष्ट घेतात, सारे पणाला लावतात.” माझा काका इंग्लंडला जायचे आहे असे अनेक वर्षे घोकत आहे, पण तो पक्का घरकोंबडा आहे.

दत्त कुटुंबीयांना ते युरोपातून भारतात परत आल्यापासून विविध व्याधींनी ग्रासले होते.

तोरू संस्कृतही शिकली होती. तिने सारे ग्रंथ वाचले- रामायण, पुराणे, बरेच काही. ब्रिटिश संस्कृती ही ती स्वतःची मानत होती असे म्हणायचे तर तिने लिहिलेल्या ‘Ancient Ballads and Legends of Hindustan’ या कवितांच्या पुस्तकाची प्रेरणा कोणती ते सहज उमजत नाही. त्या संग्रहात नऊ दीर्घ कविता आहेत. त्यांचे विषय सावित्री, लक्ष्मण, प्रल्हाद, सिंधू, सीता, एकलव्य, ध्रुव, जोगधाया उमा (दीर्घ कवितेचे शीर्षक) अशांसारखे आहेत. अन्य काही कविताही आहेत. एकलव्याची कथा सांगणाऱ्या कवितेत एकलव्याचे नाव बुट्टू असे केले आहे. ती कविता तब्बल दोनशेबहात्तर ओळींची आहे. ती बंगालमधील शाळांच्या पाठ्यपुस्तकात समाविष्ट झाली होती.

दुर्दैवाने, तोरू आणि आजारपण या युद्धात आजार जिंकले. तोरु दत्त हिचे निधन 30 ऑगस्ट 1877 रोजी झाले. तिने लिहिलेल्या कादंबऱ्यांची हस्तलिखिते वडिलांना तिच्या मृत्युपश्चात मिळाली. तिची तीन पुस्तके त्यानंतर प्रकाशित झाली –

A sheaf Gleaned in French Fields (नवी आवृत्ती;)

Bianca- or the Spanish maiden (स्वतंत्र इंग्रजी कादंबरी)

Le Journal de Mademoiselle d’ Avers (फ्रेंच भाषेतील कादंबरी). फ्रेंचमध्ये लिहिणारी ती पहिली हिंदुस्थानी महिला होय. तिच्या मूळ फ्रेंच कादंबरीचा इंग्रजी भाषेतील अनुवाद 2005 मध्ये प्रकाशित झाला आहे. फ्रेंच कादंबरीचे शीर्षक – The Diary of Mademoiselle D’Arvers.

बियांका ही तोरूची कादंबरी अपुरी आहे असे म्हटले जाते. तिची उपलब्ध छापील प्रत फक्त पन्नास पृष्ठांची आहे. तिचे महत्त्व अशासाठी की तोरू हिने तिच्या वयाची एकवीस वर्षे पुरी होण्याच्या आसपास ती लिहिली आणि इंग्रजीत हिंदुस्तानी महिलेने लिहिलेली ती पहिली कादंबरी होय. तिला कादंबरी तांत्रिक दृष्ट्या म्हणता येणार नाही, कारण तिचा शेवट असा केलेला नाही.

कादंबरीची नायिका बियांका ही स्पॅनिश कुटुंबातील मुलगी आहे. कादंबरीला प्रारंभ होतो तो नायिकेच्या मोठ्या बहिणीच्या पार्थिवाचे दफन होत आहे या प्रसंगाने. बहिणीचे लग्न ठरले होते, परंतु ते होण्यापूर्वी तिचा मृत्यू झाला. काही दिवसांनी, बहिणीचा नियोजित पती नायिकेला लग्नाचा प्रस्ताव देतो, पण नायिका तो नाकारते. नंतर नायिकेच्या एका मैत्रिणीचा भाऊ नायिकेच्या प्रेमात पडतो. तो नायिकेलाही आवडतो. मात्र दोघांच्या आर्थिक परिस्थितीत आणि सामाजिक दर्ज्यात खूप फरक असतो. नायिका आणि नायिकेचे वडील यांची आर्थिक परिस्थिती अगदी हातावर पोट म्हणावे अशी. वडील वाङ्मयावर काहीबाही लिहून मासिकांना पाठवत असतात. त्याउलट, मैत्रिणीचा भाऊ जमीनदार असतो- लॉर्ड असतो. शिवाय, नायिका इंग्लंडमध्ये स्थलांतरित असते. नायिका वडिलांना झाला प्रकार सांगते; त्यांना दुःख होते. मुलगी लग्न करून गेली तर आपले कसे होणार? एकाकीपणाचे ते संभाव्य दुःख प्रदर्शित करतात. नायिका वडिलांची चिंता बघून लग्न न करण्याचा निश्चय करते आणि त्याच दुःखाने आजारी पडते, मरण्यास टेकते. नायिकेवर एक महिनाभर उपचार होतात, नायिका सर्वसाधारण प्रकृतीची होते. मैत्रिणीच्या आईचा विरोध लग्नाला असतो, पण लॉर्ड ठाम असतो. त्याने नायिकेच्या शुश्रूषेत जीव ओतलेला होता. अखेर, वडील लग्नाला होकार देतात. मात्र अचानक इंग्लंडचे युद्ध सुरू होते- क्रिमियन वॉर. लॉर्डला सैन्यात भरती व्हावे लागते. तो जाताना नायिकेच्या बोटात अंगठी सरकावून जातो.

बियांका या कादंबरीला आत्मकथनाची किनार आहे असे मानले जाते. क्रिमियन वॉर 1853-56 या काळात झाले. तोरू हिचा जन्म 1856 मधील. तिच्या बहिणीचा मृत्यू झाला 1874 मध्ये. कादंबरीतील बियांका या नायिकेच्या आजाराची जी वर्णने आहेत ती तोरू हिच्या प्रत्यक्षातील आजाराशी मिळतीजुळती आहेत. बियांकाच्या वडिलांचा लेखन- व्यवहार आणि तोरू हिच्या वडिलांचे वाङ्मयीन व्यक्तिमत्त्व यांच्यात खूप साम्य आहे.

फ्रेंच कादंबरीचे कथानक – मुलगा जमीनदार घरातील असतो. नायिका प्रेमभावनेच्या भरात स्वतःला विसरून जाते. जमीनदार तरुणाची सांपत्तिक स्थिती भारतातील लहानशा संस्थानाच्या राजासारखी. मुलाच्या आईला नायिका आवडते, मुलगा नायिकेच्या प्रेमात असल्याचे आभासी आचरण करतो. या प्रेमकहाणीचे एक उपकथानक आहे- नायिकेच्या वडिलांच्या मित्राचा मुलगाही नायिकेच्या प्रेमात पडतो, तो नायिकेला लग्नाचे विचारतो. नायिकेच्या आईवडिलांनाही तो जावई म्हणून हवा असतो, पण नायिकेच्या मनात जमीनदार भरल्याने नायिका त्याला नकार देते. जमीनदाराची सांपत्तिक स्थिती, रूप यामुळे नायिकेचे आई-वडील तयार होतात. मात्र त्यानंतर कथानकाला एकदम कलाटणी मिळते.

कादंबरीची नायिका ज्याच्या प्रेमात पडते तो मुलगा आणि त्याचा भाऊ यांच्यात सुप्त कलह असतो आणि तो भीषण स्वरूपात प्रगट होतो. दोन्ही भावांचे प्रेम कुटुंबातील नोकराणीवर असते- तिला तेथे नोकरी मिळवून दिलेली असते ती नायिकेनेच. त्या नोकराणीवर भावाने हक्क सांगू नये म्हणून जमीनदार धाकट्या भावाची हत्या बंदुकीने करतो. एवढे होऊनही नायिकेचे त्याच्यावरील प्रेम संपत नाही. भावाची हत्या केली या आरोपावरून मोठ्या भावाला पंधरा वर्षे सक्त मजुरीची शिक्षा होते. मात्र त्याला झाल्या कृत्याचा पश्चाताप होतो, त्याचे मानसिक संतुलन बिघडते आणि तो तीन महिन्यांत आत्महत्या करतो.

हताश झालेल्या नायिकेला तिच्यावर प्रेम अजूनही करत असलेला वडिलांच्या मित्राचा मुलगा पुन्हा लग्नासाठी विचारतो. नायिका होकार देते. त्यांचे लग्न होते, अगदी अल्पावधीत नायिकेला मुलगा होतो आणि त्या प्रसूतीपश्चात आलेल्या तापात नायिका मरण पावते. त्यापूर्वी आपण मरणार आहोत अशी पूर्वसूचना देणारे भास नायिकेला होतात.

तोरूने कादंबरीतील कलाटणीचा अंदाजही येऊ नये अशा कौशल्याने जमीनदार आणि त्याचे आभासी आचरण रंगवले आहे. फ्रान्समधील निसर्ग, गावातील वातावरण, सामाजिक जीवन नायिकेच्या स्वभावातील औदार्य असे अनेक पैलू यांचे चित्रण फार सफाईने येते. एका वीस वर्षांच्या मुलीने आणि तेही तिच्या पहिल्याच प्रयत्नात फ्रेंच भाषेत ते करावे याचे कौतुक करावे तितके थोडे !

–  रामचंद्र वझे 9820946547 vazemukund@yahoo.com

——————————————————————————————————————-

About Post Author

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here