आईनस्टाईन यांनी लिहिलेले एक सुपरिचित वाक्य आहे ‘जर तुमची मुले बुद्धिमान व्हावीत, असे तुम्हाला वाटत असेल तर त्यांना परीकथा वाचायला द्या… जर तुम्हाला ती आणखी बुद्धिमान व्हावीत असे वाटत असेल, तर त्यांना आणखी परीकथा वाचायला द्या’. त्यामुळे छोट्या मुलांचे अवकाश वाढीला लागते, कल्पनाशक्ती विकसित होते, अनुभव घेण्याची उर्मी वाढते. संगीता बर्वे यांनी लिहिलेल्या ‘पियूच्या वही’ने छोट्यांच्या विश्वात असाच अवचित प्रवेश केला आहे. त्यातल्या छोट्या पियूने जे जे केले ते ते करायला उत्सुक असणारी मुले. गोष्टी छोट्या पण आशयघन बदल घडवू शकणारे छोट्यांचे सगळे अनुभव. त्यातून त्यांच्या स्वतंत्र वह्या निर्माण झाल्या. असे सकस वाचन वाऱ्याच्या वेगाने फैलावले तर मोबाईल आणि इंटरनेटमध्ये अडकून कोसळणारे लहानांचे बाल्य सावरायला नक्की मदत होईल. हे अनुभव संगीता बर्वे यांना लिहायला कोणी आणि कसे प्रवृत्त केले हे वाचणेदेखील सुंदर आहे.
– अपर्णा महाजन
पियूची वही : गोष्टीमागची गोष्ट…
माझ्या बाबांना बारामतीच्या एम. इ. एस. शाळेमध्ये चित्रकला शिक्षकाची नोकरी लागली आणि ते बारामतीला वाडकर वाड्यात राहण्यास आले. आईला म्हणाले, मी संगीताला तालुक्याच्या गावी शिक्षणासाठी घेऊन जातो. माझ्याकडे बारामतीला नेतो. तिचे शिक्षण चांगले होईल आणि तुलाही येथे सीमाला (माझी धाकटी बहीण) सांभाळून नोकरी करता येईल. त्यामुळे मोठी मुलगी वडिलांकडे आणि धाकटी मुलगी आईकडे अशी आमची वाटणी झाली.
मी बाबांकडे म्हणजे बारामतीला एम. इ. एस. ला शिकण्यास आले. मी येण्याआधी बाबांनी त्यांची दहा बाय दहाची खोली संपूर्ण स्वतः रंगवून काढली. भिंतींवर मोठ्या मोठ्या निळ्या लाटा आणि त्यात पोहणारे मासे रंगवले. आम्ही सामान घेऊन आलो तेव्हा ती छोटीशी रंगीत खोली बघून मी अगदी खुश झाले. बाबा म्हणाले, बघ, समुद्रात राहणार आहेस तू. अवतीभवती मासे, पाणी, लाटा आहेत. इतकी छोटीशी खोली, पण मला त्याचे काही वाटले नाही. त्यापूर्वी आम्ही अशा छोट्या छोट्या जागांमध्ये राहत आलो होतो.
मला आठवते, मी चौथी-पाचवीला असेन तेव्हा बाबांची नोकरी गेली होती आणि आता काय करायचे असा प्रश्न आई आणि बाबा या दोघांच्याही समोर उभा असावा. आई एकटी शिक्षिका म्हणून शाळेमध्ये जात होती. बाबांनी हाती येईल ते काम करण्यास सुरुवात केली होती. आम्ही गणपती तयार करायचो. बाबा बोर्ड रंगवायचे. शिवाजी महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई, लोकमान्य टिळक, गांधीजी… अशी चित्रे बोर्डावर काढायचे. एकदा त्यांना देऊळ रंगवायचे काम आले. आम्ही म्हटले, बाप रे ! बाबा, एवढे मोठे देऊळ तुम्ही कसे रंगवणार? तर ते म्हणाले, कोठल्याही कामाला नाही म्हणायचे नाही. काम करत राहायचे. जे हातात येईल ते काम घ्यायचे. म्हणाले, चल, तू पण माझ्याबरोबर आणि ते मला नगरला घेऊन गेले. आम्ही नगरला वेगवेगळ्या दुकानांमधून अनेक रंग, ऑइलपेंट, प्राईमर, ब्रश अशी खरेदी केली. त्यांनी छोट्या छोट्या ऑइलपेंटच्या काही बाटल्या, छोटे ब्रशसुद्धा घेतले.
आम्ही बेलापूरला केशव गोविंदाच्या घाटाच्या पायऱ्या उतरून नदीतून चांदेगावला रोज जाऊ लागलो. आईने दिलेला डबा चिंचेच्या झाडाखाली बसून खायचा आणि मग मंदिर रंगवायला सुरुवात करायची. बाबा म्हणाले, हे मोठे देऊळ मी रंगवतो. समोरचे जे छोटे देऊळ आहे, ते तू रंगव. त्यांनी माझ्या हातात त्या छोट्या छोट्या डब्या, छोटे ब्रश दिले. मग बाबा जसे करतील तसे मी ते छोटे मंदिर रंगवू लागले.
आम्ही त्या ठिकाणी दोनअडीच महिने जात होतो. मी घाटाच्या पायऱ्या उतरून नदीतून जाताना माझ्या जवळची पिशवी डोक्यावर घेत असे. कारण मी नदीत जवळजवळ कंबरेपर्यंत बुडत असे. बाबांचे देऊळ रंगवून झाले; तसे, माझे छोटेसे देऊळसुद्धा मी पूर्ण रंगवले. ही एक आठवण मनामध्ये रुजली असावी. कारण मी जेव्हा लग्न झाल्यानंतर दवाखाना सुरू केला तेव्हा तो तिथल्याच एका माणसाला रंगवायला दिला. दोन दिवसांनी मी दवाखान्यात गेले. मला वाटले, त्या माणसाने रंग दिला असेल, तर तो दारू पिऊन तेथेच खाली पडला होता. मी त्याला उठवले व बाहेर नेऊन बसवले आणि मी एकटीने तो संपूर्ण दवाखाना म्हणजे ती छोटीशी खोली, पण छपरापासून खालचा सगळा भाग रंगवून काढला. ही एक आठवण.
त्यानंतर मोठी मुलगी पाचवीत असताना मे महिन्याची सुट्टी लागली. आता, सुट्टीत काय करायचे? सुट्टीत तिला काहीतरी काम पाहिजे, बिझी ठेवायला पाहिजे म्हणून मी एक आयडिया केली. आमच्या घराच्या खिडक्या सगळ्या खराब झाल्या होत्या, तर मी तिला घेऊन एका रंगांच्या दुकानात गेले आणि काही रंगीत ऑइल पेंटच्या डब्या, ब्रश असे काय काय घेऊन घरी आले आणि तिला सांगितले, की आपण या खिडक्या रंगवायच्या. मग आम्ही खिडक्या साफ केल्या. एकेका गजाला रंग द्यायला सुरुवात केली. तीही उत्साहाने माझ्या मदतीला आली. बघता बघता त्या सुट्टीमध्ये आम्ही सगळ्या खिडक्या रंगवून काढल्या. खिडकी रंगवण्याची ही सगळी प्रोसेस जवळजवळ सत्तर-ऐंशी पाने लिहून काढली आणि तशीच ठेवून दिली. नंतर विसरून गेले. ते लेखन माझ्या प्रकाशकांना 2017 मध्ये जेव्हा दाखवले, तेव्हा ते म्हणाले, याच्यावर आणखी काम करा. आपण हे पुस्तक करुया आणि तयार झाली पियूची वही !
‘पियूची वही’ मुलांना खूप आवडली. त्यावर ‘महाराष्ट्र कल्चरल सेंटर’ने मुलांसाठी नाटक बसवले. त्याचेही उत्तम प्रयोग झाले. मुले वही वाचू लागली. नुसतीच वाचू लागली नव्हे, तर स्वतः दैनंदिनी लिहू लागली. मुलांच्या आया, मुले पियूची वही वाचतानाचे व्हिडिओ पाठवू लागले, पत्रे पाठवू लागले. पियूची वहीला 2022 सालचा साहित्य अकादमीचा बालसाहित्य पुरस्कार मिळाला आणि ती वही जास्तीत जास्त मुलांपर्यंत पोचू लागली. सिल्वर क्रेस्ट शाळेच्या मुलांनी त्या वहीवर मोठा प्रोजेक्ट केला. डेमोन्स्ट्रेशन दिले. त्यांनी पियूच्या वहीमधली सगळी पात्रे तयार केली. त्यामध्ये हिरू कुत्रा, सुरवंट- सुरवंटाचे झालेले फुलपाखरू, खिडकीवर वाढलेला मनी प्लांट, रंगवलेली खिडकी- खिडकीचे गज, शंखशिंपल्यांचे प्राणी, पक्षी असे काय काय मुलांनी तयार केले. विशेष म्हणजे मुले चित्रेही काढू लागली. पियूने तिच्या सुट्टीमध्ये जे जे केले ते सगळे मुले करू लागली. दैनंदिनी लिहू लागली आणि गंमत म्हणजे जशी पियूची वही तशी प्रत्येकाची स्वतःची वही तयार झाली. मग त्यात पृथ्वीची वही, अनघाची वही, श्रद्धाची वही, प्रणवची वही अशा अनेकानेक वह्या तयार झाल्या. मुलांनी मला असंख्य पत्रे पाठवली. लातूरच्या श्रीकिशन सोमाणी शाळेच्या जवळजवळ शंभरएक मुलांनी पत्रे लिहिली. एवढेच नव्हे तर लग्नामध्ये ‘रिटर्न गिफ्ट’ म्हणून मुलांना ‘पियूची वही’ दिली गेली. त्याचबरोबर अक्षय तृतीयेचे वाण म्हणून सुद्धा अनेक स्त्रियांनी ‘पियूची वही’ हळदीकुंकू समारंभात वाटली. ‘पियूची वही’च्या पंधरा हजारांपेक्षा जास्त प्रती मुलांपर्यंत पोचल्या आहेत याचा आनंद आहे. ‘पियूची वही’चा भाग दोन हा 2024 मध्ये प्रकाशित झाला. याही पुस्तकाला मुलांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. यातून एक गोष्ट माझ्या लक्षात आली, की मुलांना काही आवडले तर ते अतिशय उत्तम प्रकारे प्रतिसाद देतात. मुलांचे पालकही मुलांना आवडलेली पुस्तके स्वतःहून आणून देतात. आपण फक्त आपले काम मनापासून करत राहायचे, एवढेच काय ते…
– डॉ. संगीता बर्वे 9545995693 dr.sangeeta.barve@gmail.com
खूप छान. मुलांना लिहितं करणारा उपक्रम