माझी मुंबई (My Mumbai)

0
359

मुंबई शहराच्या पोटात अनेक मुंबई आहेत. संध्याकाळच्या समुद्रावर दिव्याच्या लखलखटाने उजळलेली मुंबई, उदास काळोखात तेवणारी मुंबई आणि अंधारात बुडून गेलेली भयावह मंबई यांची प्रतिबिंबे तरंगत असतात. त्यांची आपापसात सरमिसळ होत असते. अशी ही मायारूपिणी मुंबई हेच अनेकांचे ‘गाव’ असते. त्याचा इतिहास, भूगोल आणि वर्तमान प्रत्येकाला आपापल्या नजरेतून दिसतो. अशा या ‘गावाची’ विविध रूपे एकत्र करून एक कोलाज तयार करण्याचा महत्त्वाकांक्षी मानस आहे.

गेल्या दशकात मुंबईविषयीच्या पुस्तकांची इंग्लिश आणि हिंदीमध्ये लाट आली आहे. मराठीतही तुरळक पुस्तके दिसतात. तरीही मुंबई या सर्व पुस्तकांच्यावर दशांगुळे उरते. आजचे ‘मुंबई वर्णन’ एका मध्यमवर्गीय, पांढरपेशा स्त्रीच्या नजरेतून केलेले आहे. मंबईच्या उदारमतवादी, कॉस्मोपॉलिटन स्वभावाविषयी सांगत आहेत ज्येष्ठ अनुवादक आणि लेखक सविता दामले. ‘मोगरा फुलला’ या दालनातील इतर लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

-सुनंदा भोसेकर

मुंबई माझी

‘जेरुसलेम- एक चरित्रकथा’ या पुस्तकाचा अनुवाद काही वर्षांपूर्वी केला तेव्हा कळले की त्या शहराला तीन हजार वर्षांचा इतिहास आहे. त्यानंतर काही तुर्की कादंबऱ्यांचा अनुवाद केला तेव्हा लक्षात आले की इस्तंबूल या तुर्कस्तानच्या राजधानीलाही तसाच तीन हजार वर्षांचा इतिहास आहे. ते वाचताना माझ्या मनात आले की माझा जन्म झाला ती माझी मुंबई – तिचा इतिहास किती वर्षांचा असेल? तर लक्षात आले की एक शहर म्हणून हा इतिहास जेमतेम तीनशे वर्षांचा आहे. महाराष्ट्र राज्य जन्माला आले आणि मुंबई त्याची राजधानी झाली, त्याच सुमारास माझा जन्म मुंबईत म्हणजे अगदी नेमके सांगायचे तर गिरगावातल्या मध्यमवर्गीय, पांढरपेशा, ताराबाग नामक वस्तीत झाला. त्यामुळे मुंबई हीच माझी जन्मभूमी आणि हीच माझी कर्मभूमी!

माझे वडील मुंबईपासून एकशे दहा किलोमीटर अंतरावरील नागाव येथून मुंबईला राहायला आले होते. त्या काळात गावागावांहून मुंबईला नोकरीपेशासाठी आलेल्या लोकांच्या या पहिल्याच पिढ्या होत्या. त्यामुळे गावचे बंध तुटलेले नव्हते, शिवाय तेव्हा फोनसारखे त्वरित संपर्काचे साधनही नव्हते. पत्र लिहिले तरी ते पोचायला चार पाच दिवस लागत. खूप वाईट किंवा खूप चांगली बातमी असेल तरच तार पाठवली जात असे. अशा वेळी गावापासून दुरावलेल्या या लोकांनी मुंबईतील शेजारच्या घरांना आपले मानले. ते लोक एकमेकांची सुखदुःखे वाटून घेऊ लागले. त्यातूनच मुंबईची अनोखी, अद्भुत चाळ संस्कृती जन्माला आली. मी बालपणी तो सुखाचा काळ अनुभवला आहे आणि त्याच्या रम्य आठवणी माझ्यापाशी आहेत.

त्या काळात फोन नसल्याने लोक प्रवास करून एकमेकांना प्रत्यक्ष भेटायला यायचे पण समजा, ज्यांना भेटायचे ते घरात नसले तर ते येईपर्यंत शेजारच्या बाईंनी पाहुण्यांचे स्वागत, चहापाणी करण्याचा तो काळ होता. कारण शेजारच्या घरांतली नातेवाईक मंडळी कोण हे सगळ्यांना माहीत होते. माणसे शेजारपाजारच्या, जवळपासच्या माणसांशी अधिक संबंध ठेवून होती. अशा संमिश्र, शंभर ठिकाणांहून आलेल्या माणसांनीच मुंबईचे हे आजचे कॉस्मोपोलिटन रूप घडवले आहे.

माझ्या लहानपणी गुन्हेही कमी असावेत. तो काळ कार्यक्षमतेत मुंबईच्या पोलिसांचा स्कॉटलंड यार्डनंतर दुसरा क्रमांक असण्याचा होता. मला आठवते, मी चार पाच वर्षांची होते. मी एकदा आई आणि तिच्या मैत्रिणींसोबत गिरगावातच कोठेतरी गेले असताना आईचा हात सुटला आणि हरवले. मी रडत रडत फुटपाथच्या कडेकडेने अंग घासत चालले होते तर एका बस स्टॉपशी एक माणूस भेटला. त्याने मला विचारले, “बेबी, का रडतेस?’’ मी त्याला सांगितले, “माझी आई हरवली आहे ना, ती सापडत नाही म्हणून रडतेय.’’ त्याने मला पत्ता विचारला. सुदैवाने मला डी/16, ताराबाग, गिरगाव, मुंबई चार असा पूर्ण पत्ता पाठ होता. मग त्याने मला उचलले आणि जवळच्या पोलीस ठाण्यात नेले. तेथे मी पुन्हा माझा पत्ता धिटाईने सांगितला तर एका पोलिसकाकांच्या कडेवर बसून माझी रवानगी घरी करण्यात आली. त्यांनी वाटेत मला भूक लागली का? असे विचारल्यावर मी जोरात ‘हो ‘म्हटले. केळे खात खात पोलिसकाकांच्या कडेवरून घरी येत असताना वाटेतच शेजारचा रघुदादा भेटला तेव्हा मी लगेच उडी मारून त्याच्याकडे गेले. मग आमची ही वरात ताराबागेत आली तर घरात भरपूर माणसे जमलेली होती आणि त्या घोळक्यात बसून माझी आई रडत होती. ‘आता कुठे कुठे शोधायचे हिला,’ असा विचार ते लोक करत असतानाच मी घरी पोचले होते. आता हा प्रसंग आठवला की बसस्टॉपवर तो अज्ञात सज्जन माणूस भेटला नसता तर काय झाले असते या विचाराने मनाचा थरकाप होतो.

आजची मुंबई खूप पसरलेली आहे. एवढी वर्षे येथे काढूनही येथील बऱ्याच भागांत मी एकदाही पाय ठेवला नसेल. कारण या एकाच शहरात अनेक गावे वसलेली आहेत. त्यामुळे मुंबईतल्या गर्दीत माणसाची वैयक्तिक ओळख, जातपात विसरली जाते आणि काही काळापुरती का होईना पण सर्व माणसे समान पातळीवर येतात आणि चांगल्या अर्थाने बिनचेहऱ्याची बनून जातात. हा मुंबईचा गुण मला आवडतो. त्यामुळेच मुंबईबाहेरच्या प्रांतातील तरुण मुले- मुली शिक्षणासाठी आणि नोकरीसाठी मुंबईत येतात तेव्हा त्यांना हा मुंबईचा सर्वांना सामावून घेणारा आणि विनाकारण दुसर्‍यांच्या खाजगी भानगडीत नाक न खुपसणारा स्वभाव आवडतो.

माझ्या बालपणी आमचे घर भलेही लहान असेल पण तरी त्या ताराबाग नामक तीन मजली चाळीत दोन खोल्यांच्या प्रत्येक घरासमोर मोठा व्हरांडा होता, आम्ही मुले त्या व्हरांड्यात पकडापकडी, धावाधावी, भातुकली, काचापाणी काय काय खेळ खेळलो आहोत. शिवाय प्रत्येक मजल्यावर चौक होता आणि दोन इमारतींच्यामध्ये खाली मोठा चौक होता, तिथेही भरपूर खेळता येत होते. आज विचार केला तरी गंमत वाटते पण त्या बालवयात त्या चौकाच्या एका बाजूला बसून दूरच्या दुसऱ्या बाजूकडे बघितले की जग हे त्या टोकाशी संपले आहे असे वाटायचे. एका मजल्यावर या बाजूला अठरा बिर्‍हाडे आणि दुसऱ्या बाजूला तशीच अठरा बिऱ्हाडे असे एकुण तळमजला धरून चार मजले आणि प्रत्येक बिऱ्हाडात त्या काळच्या प्रथेनुसार तीन ते चार मुले, त्यामुळे मला खेळायला मैत्रिणींची कधीच कमतरता भासली नाही. जवळच जपानी गार्डन, जवाहर बालभवन, चौपाटी अशी ठिकाणे हुंदडायला होती, त्यामुळे शाळेत जाण्याचा काळ सोडला तर आम्ही सगळा वेळ खेळतच असू. थोडे लांब जायचे तर मलबार हिलवरचे हँगिंग गार्डन, कमला नेहरू पार्क अशीही ठिकाणे होती. तिथला म्हातारीचा बूट तर आमचा फारच आवडता होता. कधीतरी जवळच्याच घारापुरी उर्फ एलिफंटाला गेलो होतो आणि तिथली सुंदर लेणी आणि मूर्ती पाहून मन भरले होते.

माझ्या वडिलांना समाजसेवेची आवड होती. ते मॅट्रिकला अलिबाग जिल्ह्यात पहिले आले होते. मुंबईला आल्यावर पुढे ते संस्कृत घेऊन एम ए झाले. त्यांना रूईया कॉलेजची फेलोशीपही मिळाली होती. नंतर ते स्टँप ऑफिसात नोकरीला लागले. ते रोज संध्याकाळी ऑफिस सुटल्यावर रात्रशाळेतल्या मुलांना शिकवायला जायचे. मुंबईतल्या कित्येकांची घरे लहान असली तरी मने मोठी होती त्यामुळे गावाहून भाचे, पुतणे शिकण्यासाठी घरी ठेवून घेणे हे तर सर्रास होते. वडिलांना शास्त्रीय संगीताची आवड असल्याने गिरगावातच ट्रिनिटी क्लब नावाच्या एका संगीत संस्थेचे ते बरीच वर्षे कार्यवाह होते. पंडित भास्करबुवा बखले यांनी स्थापन केलेल्या या संस्थेत कितीतरी दिग्गज कलाकार गायला यायचे. त्या सर्वांशी माझ्या वडिलांचा चांगला परिचय होता. गिरगावातल्या ब्राह्मण सभेच्या नाट्यशाखेतर्फे संगीत शारदा, संगीत संशय कल्लोळ, संगीत सौभद्र इत्यादी नाटकं बसवली जायची. तिथे तालीम करायला सुमतीबाई आणि बाळासाहेब टिकेकर, दाजी भाटवडेकर, नलिनी फणसे आदी निपुण कलाकार यायचे. मी वडिलांच्या मागे लागायची, ‘चला ना आपण तालीम बघायला जाऊ’. त्या तालमी बघायला मला एवढ्या आवडायच्या आणि संवाद तर पाठच झाले होते. संस्कृत नाट्यशाखेच्या एका नाटकात दोन लहान मुली हव्या होत्या त्यात त्यांनी मला घेतले होते.

साहित्य संघ मंदिर तर अगदीच जवळ. माझ्या लहानपणच्या काळात तिथं ‘चिनी बदाम’, ‘हं हं आणि हं हं हं’, ‘इंद्राचं आसन-नारदाची शेंडी’, ‘धडपडे बडबडे मारकुटे आणि मंडळी’ अशी किती तरी बालनाट्ये लागायची. त्या नाटकांना मला अगदी एकटीलासुद्धा आईने पाठवले होते. शिवाय सेंट्रल, मॅजेस्टिक, रॉक्सी, ऑपेरा हाऊस एवढी सिनेमा घरेही जवळच होती. आईवडील मराठी सिनेमे आणि नाटके आवर्जून बघत असल्याने लहानपणीच मला या सिनेमा, नाटकांचा आस्वाद घेता आला. आज मागे वळून बघताना वाटते की आई वडील दोघेही नोकरी करत असल्याने हा पैसा ते खर्च करू शकत होते. त्यामुळेच हे सगळे सुंदर अनुभव मी त्या लहान वयात घेऊ शकले.

गिरगावातील जवाहर बाल भवनात अनेक उपक्रम चालायचे. वयाच्या चौदाव्या वर्षापर्यंत त्यात भाग घेता येत असे. तिथे मी चित्रे काढायला शिकले, नाच करायला शिकले. ‘दुर्गा झाली गौरी’ हे गाजलेले नाटक बसवणारे रमेश पुरव हे मोठे डान्स गुरू तिथे आम्हाला शिकवायला यायचे. त्यांनी आमचा भांगडा बसवला होता. आम्ही तो भांगडा बालभवनच्या कार्यक्रमात केला होता आणि प्रमुख पाहुणा म्हणून राजेश खन्ना आला होता. शिवाय, तिथे ते लहान मुलांची एक दिवसीय शिबिरे घेत. त्यात आम्हाला उत्तम बालचित्रपट दाखवत, बाकीही लहान मुलांचे बरेच उपक्रम घेत. मी हा सगळा आनंद लहानपणीच्या मुंबईत अनुभवला.

मी पुढे मोठेपणी अंधेरी पूर्व या मुंबईच्या उपनगरात राहायला आले आणि ‘सार्वजनिक भूमी’ मोठ्या प्रमाणावर आक्रसल्याचे, तिच्यावर अतिक्रमण झाल्याचे जाणवू लागले. मला आठवते, आम्ही 1974 की 75 साली अंधेरीतील महाकाली गुंफा बघायला गेलो होतो तेव्हा जंगलात गेल्याचाच भास झाला होता. त्यानंतर पंधरा-वीस वर्षांनी गेले तर तिथे सिमेंट काँक्रिटचे जंगल उभे राहिले होते. या सगळ्या अधिकृत इमारती आणि अनधिकृत वस्त्यांमुळे माणसांची सोय होत असली तरी त्यामुळे मैदाने, बागबगीचे, फुटपाथ यांच्यासाठी जागाच शिल्लक राहात नाही, मग बकालपणा येतो. मुंबईचा बकालपणा वाढत चालला असला तरी तिथे माझी पाळेमुळे तिथे रुजलेली आहेत त्यामुळे मुंबई मला प्रिय आहे. बाहेरगावचे लोक मुंबईला नावे ठेवतात, त्यांना येथली गर्दी सहन होत नाही, बावरल्यासारखे होते पण ते साहजिकच आहे. आम्हा मुंबईकरांनाही बाहेरगावच्या संथ जीवनाचा काही काळाने कंटाळा येतो, तसेच आहे हे.

खास मुंबईवर लिहिलेली हिंदी चित्रपटातली गाणी बरीच आहेत, त्यातले ‘ऐ दिल है मुश्किल है जिना यहा, जरा हटके जरा बचके ये है बाँबे मेरी जाँ.’ हे गाणे मला फार आवडते. त्याशिवाय जुन्या काळ्या-पांढऱ्या चित्रपटातले जुन्या मुंबईचे दर्शन आजही लोभसवाणे वाटते. मोकळे रस्ते, रस्त्यावरील गाड्यांची कमी संख्या आणि गंमत म्हणजे खास मुंबईच्या अशा घोडागाड्या. त्यांना व्हिक्टोरिया असं शानदार नाव होते. रेसकोर्समधून निवृत्त झालेले रूबाबदार घोडे या गाड्या ओढत असत. त्यांच्या गळ्यात घातलेल्या घुंगरांच्या खुळखुळत्या तालावर गाडीवानाच्या बाजूला उंचावर बसून मुंबई बघितली आहे मी. पण मग मुंबईत माणसांची आणि मोटारींची संख्या वाढली तशा घोडागाड्या गायबच झाल्या.

आजच्या घडीला मुंबईची लोकसंख्या या शहराच्या क्षमतेहून जास्त झाल्याने नागरी सोयी सुविधांवर ताण पडतो. तरी पूर्वी सगळ्या कंपन्या दक्षिण मुंबईत एकवटल्या होत्या त्या आता हळूहळू बी.के.सी., अंधेरी इत्यादी भागात सरकल्या असल्याने एकाच दिशेने येणारी गर्दी थोडी कमी झाली आहे. तरी नवनवीन माणसे पोट भरण्यासाठी मुंबईत येत असल्याने सार्वजनिक सेवांवरील ताण फारसा कमी झाल्याचे जाणवत नाही.

मुंबईची जीवनरेषा म्हणजे मुंबईची लोकल. या लोकलबाई असल्यानेच पार वसई, विरारपासून कर्जत, शहापूरचे लोक येथे कामासाठी रोजच्या रोज ये-जा करू शकतात. मुंबईतील बससेवाही उत्कृष्ट आहे. तर्‍हे तर्‍हेच्या ठिकाणांहून मुंबईची बस आणि लोकल अत्यंत परवडू शकेल अशा खर्चात लोकांना प्रवास करायला साहाय्यभूत ठरतात.  म्हणूनच तर त्यांना मुंबईच्या जीवनदायिनी म्हटले आहे. सध्या छोट्या छोट्या वातानुकुलित बसेसही कमीतकमी अंतर सहा रूपयांत लोकांना फिरवत असतात.

अद्यापही येथे बाहेर फिरताना स्त्रियांना जसे सुरक्षित वाटते तसे देशात अन्यत्र वाटत असेल की नाही शंकाच आहे. मुंबईतल्या स्त्रिया ही एक वेगळीच चीज आहे. रोज सकाळी घरचे, मुलांचे सगळे आटपून त्या बाहेर कामाला जातात. कोठल्याही वर्गातल्या असल्या तरी; येथील स्त्रिया एकूण भारताच्या मानाने पुढारलेल्या, सुशिक्षित आहेत, स्वतःच्या पायावर उभ्या आहेत आणि त्यामुळे येणाऱ्या आत्मविश्वासाने जगात वावरत आहेत. मला आठवते, बँकेत नोकरी करत असताना मी एकदा गोव्याला ट्रेनिंगसाठी गेले होते. तिथे उत्तर भारतातल्या शाखांमधून काही लोक ट्रेनिंगला आले होते. ते आम्हाला म्हणाले की ‘आमच्या येथील शाखांत खूपच कमी स्त्रिया नोकरी करतात आणि ज्या करतात त्या ट्रेनिंगला वगैरे अशा बाहेरच्या ठिकाणी जातच नाहीत. त्या मानाने आम्हाला येथे मुंबईतल्या स्त्रिया खूपच मोकळ्या आणि उत्साही, चौकस वाटल्या’. ते ऐकून तेव्हा माझ्या मनात आले होते की, खरोखरच, एक स्त्री म्हणून आपल्या व्यक्तिमत्वाच्या जडणघडणीत मुंबईचे मोठे योगदान आहे.

मुंबईत नोकरी करणाऱ्या स्त्रीपुरुषांना मदतीचे हात देण्यासाठी कित्येक हात तत्पर असतात. पाळणाघर ही त्यातली तशीच आवश्यक मदत. त्याशिवाय, दूधवाले, इस्त्रीवाले, भाजीवाले, डबेवाले, मुलांना शाळेत नेणारे आणणारे रिक्षावाले, घरी काम करणाऱ्या मदतनीस, दुकानातून सामान घरपोच करणारा वाणी अशा कितीतरी लोकांच्या मदतीवर मुंबईतले चाकरमान्यांचे संसार चालले आणि त्यांच्याकडे काम करणाऱ्या लोकांचेही चालले. आता तर घरपोच सेवा देणारे स्विगी, झोमॅटो, ऍमेझॉन असे नानाविध ऍप सुरू झाले आहेत.

कुठल्याही संकटात मुंबई डगमगून जात नाही. 1992 साली बाबरी मशीद पाडली गेली तेव्हा सर्वप्रथम देशातील सौहार्दाचे वातावरण बिघडवणाऱ्या हिंसाचाराची चुणूक पाहायला मिळाली होती. तोपर्यंत आम्ही ज्या मोकळ्या वातावरणात वाढलो होतो, ‘खरा तो एकचि धर्म जगाला प्रेम अर्पावे’ असे शिकलो होतो त्या सगळ्यावर त्या एका घटनेने प्रहार केला होता. त्यानंतर 1992-93 सालचे बाँबस्फोट आणि जातीय दंगलींचे चटके, 2006 साली उपनगरी रेल्वेत झालेले बाँबस्फोट, 26 नोव्हेंबर, 2008 सालचा अतिरेकी हल्ला अशी अनेक संकटे मुंबईने सोसली तरीपण स्वतःचा मूळ स्वभाव बदलला नाही ही गोष्ट कौतुकास्पदच आहे.

मुंबईवर दर वर्षी पावसाळ्यात संकट आल्यासारखे भासते. 26 जुलै, 2005 साली पडलेला प्रचंड पाऊस तर शंभर वर्षांत त्या आधी पडलेला नव्हता. पण या सगळ्यातून मुंबईकर बाहेर पडला आणि यानंतरही पडेल कारण येथल्या माणसांकडे कॉस्मोपॉलिटन संस्कृतीचा लाघवीपणा, सोशिक आणि आशादायी वृत्ती आहे. म्हणूनच नोटबंदीच्या काळात मुंबईतील बँकर मंडळींनी माना मोडून काम करत लोकांना पैसे बदलून दिले. कुठेही गोंधळ, गडबड उडू दिली नाही हे मी प्रत्यक्ष पाहिले, अनुभवले आहे. इतक्या दाट लोकवस्तीचे शहर असूनही कोविडने घाला घातला तेव्हाही मुंबई डगमगून गेली नाही. धारावीसारख्या दाट वस्तीतही कोविड पसरला नाही यासाठी तत्कालीन महाराष्ट्र सरकार आणि मुंबई महानगरपालिका यांना दाद द्यायलाच हवी. कोविडच्या काळात बरीच कामे घरात बसून ऑनलाईन होत असली तरी बँकेतली कामे, महानगरपालिकेतली कामे, डॉक्टर, नर्सेस इत्यादींची कामे घरी बसून होणारी नव्हती. त्या काळात या सगळ्या लोकांनी जीवाची भीती असूनही काम केले आणि मुंबईत कोविडची साथ पसरू दिली नाही. यालाच मी मुंबई स्पिरिट म्हणते. उत्तर प्रदेशात जशी गंगेतून प्रेते वाहिली तशी परिस्थिती येथे आली नाही हे मुंबईसाठी आणि महाराष्ट्रासाठी गौरवास्पद आहे. या काळात येथील हातातोंडाशी गाठ असलेला मजूर वर्ग आपल्या आपल्या प्रांतात पायी चालत परत गेला तेव्हाही महाराष्ट्राच्या हद्दीत त्यांना सोयी मिळतील असे पाहिले गेले. त्यानंतर परिस्थिती सुधारल्यावर हा वर्ग परतही आला. परप्रांतातून नोकरीनिमित्त आलेले लोक पुढे शक्य झाले तर मुंबईतच राहू इच्छितात. याचे कारण पुन्हा तेच; म्हणजे मुंबईतील मोकळे वातावरण.

‘ब्युटीफुल थिंग’ नावाच्या बारबालांच्या जीवनावरील एका पुस्तकाचा अनुवाद करायला मिळाला तेव्हा मुंबईचे एक वेगळेच रूप पहायला मिळाले. जे माझ्या प्रत्यक्ष अनुभवाचे नाही परंतु आपल्या जगासोबतच आणखी एक समांतर जग येथे नांदते आहे याची जाणीव मात्र नक्कीच झाली. त्याही जगात माणसेच राहातात, परिस्थितीने नाडली असली तरी त्यातही आशा आणि हिंमतीच्या जोरावर ती आपल्या जीवनाला अर्थ शोधतात हे मला त्यातून समजले.

मुंबई नगरी बडी बांका असं म्हणतात. कारण येथेच ते सुप्रसिद्ध बॉलिवूड आहे आणि बॉलिवूडचे राजे महाराजे आणि राण्या महाराण्या येथेच वस्तीला असतात. लहान गावांतल्या नाट्य-सिने कलाकारांचं मुंबईला यायचे हे स्वप्नच असते. म्हणून तर हिला स्वप्ननगरी म्हणतात. कित्येकांची स्वप्ने प्रत्यक्षात उतरतात तर कित्येकांची उतरत नाहीत. पण म्हणून तरुण तरूणी येथे यायचे सोडत नाहीत, म्हणून तर ही आशानगरीदेखील आहेच. मुंबईची अनेक रूपे होती, आहेत आणि पुढेही असतील. मुंबई अतिश्रीमंतांची आहे, श्रीमंतांची आहे, माझ्यासारख्या मध्यमवर्गीयांची आहे, गरिबांची आहे आणि अतिगरिबांचीही आहे. मी अनुभवलेली मुंबई ही अर्थातच सुरक्षित मुंबई आहे, पंखाआडची मुंबई आहे. उच्च जातीत जन्माला आल्याचे सामाजिक लाभ मिळालेल्या व्यक्तीने अनुभवलेली मुंबई आहे हे मी मान्य करते.  पण कुठल्याही वर्गातील व्यक्तीला ही मुंबई पोटाशी घेऊन आसरा देते हे नक्की. म्हणूनच माझी मुंबई मला प्रिय आहे.

(छायाचित्रे इंटरनेटवरून साभार)

-सविता दामले 9930311546 savitadamle@rediffmail.com

About Post Author

Previous article वंदे मातरम् – हैदराबाद मुक्ती संग्रामातील पहिली ठिणगी
Next article पियूची वही : गोष्टीमागची गोष्ट… (Piyu’s journal: The story behind a story !)
सविता दामले या मराठी अनुवादिका, लेखिका आणि कवयित्री असून त्यांनी पत्रकारितेची पदविका घेतली आहे. त्यांनी मराठीतील नामवंत प्रकाशकांसाठी पन्नासहून अधिक इंग्रजी पुस्तके अनुवादित केली आहेत. त्यांनी केलेल्या अनुवादांत ‘जेरुसलेम एक चरित्रकथा’, महात्मा गांधी सचित्र चरित्र दर्शन, नेहरूंची सावली, ‘गुलजार यांच्या पटकथा’, मेलिंडा गेट्स यांचे आत्मकथन, मोसाद या पुस्तकांचा समावेश आहे. त्यांनी लावणी सम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांच्या ‘माझे गाणे, माझे जगणे’ या आत्मचरित्राचे शब्दांकन केले असून रतन टाटा आणि शर्मिला इरोम यांची चरित्रे लिहिली आहेत आणि दोन कवितासंग्रह त्यांच्या नावावर आहेत. त्यांचे लेख अनेक मासिकांत आणि वृत्तपत्रांत प्रसिद्ध झाल आहेत. त्यांनी सकाळ वृत्तपत्रात ‘नोकरीचाकरी’ हे सदरलेखन केले होते. त्यांना मराठी अनुवाद क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल मुंबईच्या 'यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान'तर्फे 2020 सालचा पुरस्कार आणि महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्था यांच्याकडून 2023 सालचा पुरस्कार मिळाला आहे. त्यांनी लिहिलेली गीते वैशाली सामंत, साधना सरगम अशा गायिकांनी गायली आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here