वऱ्हाडची राजधानी अचलपूर

0
266

अचलपूर ही वऱ्हाडची जुनी राजधानी. त्या परिसराला ऐतिहासिक वारसा लाभला आहे. एलिचपूर हे त्याचे जुने नाव. त्या गावाला लष्करी डावपेचाच्या दृष्टीने इतिहासात फार महत्त्व होते. भारताच्या उत्तरेतून दक्षिण प्रदेशात प्रवेश करण्याचे प्रवेशद्वारच ते ! बराणीने अचलपूरचा भारताच्या दक्षिणेकडील एक महत्त्वाचे शहर म्हणून तेराव्या शतकात उल्लेख केलेला आहे.

वाकाटक नृपतींच्या कारकिर्दीमधील दोन ताम्रपटांचा प्रत्यक्ष संबंध एलिचपूर परिसराशी येतो. दोन्ही ताम्रपट राष्ट्रकूट नृपती नंदराज याने दिले आहेत. त्यातील एक ताम्रपट हा वाकाटक नृपती द्वितीय प्रवरसेन यांचा आहे. तो अचलपूरच्या उत्तरेस चार मैलांवर असलेल्या चमक गावी शेत नांगरताना 1868 साली सापडला होता. एलिचपूरजवळील मल्हारा गावी नवा एक ताम्रपट आढळून आला आहे. तो ताम्रपट भारद्वाज गोत्र मुंडवंशातील आदित्य राजाने अश्वमेध यज्ञ केला, त्या संबंधात आहे. त्याने तो वानखेट नगरातून आलेल्या काही ब्राह्मणांना पुण्योपर्जनार्थ काही गावांचे दान करताना दिलेला आहे. त्या ताम्रपटांच्या अनुषंगाने एलिचपूरशी आदित्यराज, वाकाटक व राष्ट्रकूट यांचा संबंध असल्याचे स्पष्ट होते. देवगिरीच्या यादवांचे साम्राज्य नष्ट झाल्यानंतर वऱ्हाड प्रांतात निरनिराळ्या मोगल, मुसलमान सरदार व नवाब यांच्या राजवटी होत्या. तो काळ गेल्या तीनचार शतकांतील असल्याने त्यांचे अवशेष बरेच आढळतात.

मुसलमान प्रथम दक्षिणेत आले. त्यापूर्वी इसवी सन 1058 मध्ये एलिचपूर येथे ईल नावाच्या जैन धर्मी राजाचे वास्तव्य होते. त्यामुळे इतिहासकारांच्या मते एलिचपूर (अचलपूर) शहर इसवी सन 1058 मध्ये वसले असावे. एलिचपूरजवळील ‘मुक्तागिरी’ हे ईल राजाच्या काळातील आहे. मुक्तागिरी हे जैन धर्मीयांचे सिद्धक्षेत्र. मुक्तागिरी म्हणजे पूर्वीचे मेंढागिरी. त्या ठिकाणी जैन धर्मीयांची पुरातन काळातील बावन्न मंदिरे आहेत. ती सर्व मंदिरे वेगवेगळ्या शतकातील आहेत. ईल राजा व दुला रहिमानशाह या दोघांमध्ये त्यावेळी अचलपूरात लढाई झाली. लढाईत दोघेही प्राणास मुकले. रामदेवराव यादव देवगिरी येथे राज्य तेराव्या शतकात करत होता. रामदेवराव दरणा (रामदरणा) नावाचा त्याचा मंडलिक एलिचपूर येथे राज्य कारभार करत असे. रामदेव दरणाचा पुत्र नरसिंहदेव राणा हा अचलपूरचा शेवटचा हिंदू राजा ठरला.

अल्लाउद्दीन खिलजीने रामदेवराव यादवाचा पराभव करून देवगिरीचे साम्राज्य 1302 मध्ये नष्ट केले. तेव्हापासून इसवी सन 1853 पर्यंत वऱ्हाडवर मुसलमानी राजसत्ता चालली. पुढे इंग्रजांची कारकीर्द 1853 पासून सुरू झाली. अचलपूरला 1853 ते 1947 पर्यंत इंग्रजांची कारकीर्द राहिली. अचलपूरला मोगल, निजाम, बहामनी यांच्या काळात राजधानीचा दर्जा होता.

वऱ्हाड 1347 ते 1484 पर्यंत बहामनी घराण्याच्या ताब्यात होते. अहमदशहा वली बहामनीने ‘हौजकटोरा’ या जल महालाची निर्मिती इसवी सन 1416 मध्ये केली. पुढे, बहामनी राज्याचे पाच तुकडे झाल्यानंतर एलिचपूर हे इमादशाहीच्या राजधानीचे ठिकाण बनले. तेव्हा एलिचपूरला स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळाला. नवाब सलाबतखान हे एलिचपूरचे पहिले नवाब. ते इस्माईल खान यांचे पुत्र. इस्माईल खानाने इसवी सन 1758 मध्ये हैदराबादच्या निजामाकडून वऱ्हाडची सुभेदारी मिळवली व एलिचपूरचा परकोट बांधण्यास सुरुवात केली.

इसवी सन 1299 पासून तर 1853 पर्यंत मुसलमानी अमलात अचलपूरला अनेक राजकीय घडामोडी घडल्या. वऱ्हाडात निजामाची कारकीर्द 1803 ते 1853 दरम्यान होती. अल्लाउद्दिन याच्या कारकीर्दीत; तसेच, इमादशाही व निजामशाही यांच्या काळात ती वऱ्हाडची भरभराटलेली अशी राजधानी होती. तेथील इदगा, हौजकटोरा, तलाव व मनोरा, मशिदी, सुलतानपुरा या वास्तू प्रेक्षणीय आहेत. तेथील लोकसंख्या 1971 सालच्या जनगणनेनुसार बेचाळीस हजार तीनशेतेहतीस होती, तर कँपात चोवीस हजार एकोणनव्वद अशी होती. अचलपूर व कँप- पूर्वीचे परतवाडा लष्करी ठाणे हे अमरावतीच्या वायव्येस अठ्ठेचाळीस किलोमीटर अंतरावर आहे. त्यांच्यासाठी दोन नगरपालिका होत्या. अचलपूर व कँप या दोन्हींचे मिळून क्षेत्रफळ 67.88 चौरस किलोमीटर भरते.

– संकलित नितेश शिंदे info@thinkmaharashtra.com

———————————————————————————————

About Post Author

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here