वंचितांचे जगणे आणि शिकणे

मी लहान असताना शाळेच्या चार भिंतींत जितके शिकलो, तितकेच महत्त्वाचे किंबहुना त्यापेक्षाही अधिक मोलाचे बाहेरच्या भवतालात, बिनभिंतींच्या शाळेत शिकलो.  खेळताना सोबत आदिवासी, भटक्या समाजातील मुले असायची. खेळण्याच्या चक्कर मध्ये तहान-भूक विसरायचो. आठवण आल्यावर ज्या मित्राचे घर जवळ असेल त्या घरी पोटपूजा व्हायची. तीन-चार लोकभाषा तेव्हाच शिकलो मित्रांकडून. त्यात शिकवणे नव्हतेच कोठे; होते ते केवळ शिकणे! मी आता शिक्षक म्हणून मुलांच्या शिकण्याच्या अंगाने विचार करतो तेव्हा लक्षात येते, की कोणत्याही मुलाला नवे काही शिकावे असे म्हटले, की भोवताली विश्वासाचे उबदार वातावरण आवश्यक असते. ते लहानपणी मला मिळाले. सोबत आणि विरोधात खेळणारे, प्रोत्साहन आणि शाबासकी देणारे, टीका करणारे, मदत करणारे, जिंकणारे आणि हरणारे असे सारे सोबती असत! प्रश्न समोर उभा राहिला की उत्तरे शोधत असू. ती उत्तरे चूक की बरोबर ते काळाच्या कसोटीवर नंतर ठरायचे. पण म्हणून आम्ही थांबत नसू. आम्हा मुलांची एकमेकांशी ‘इक्वल रिलेशनशिप’ असायची. लोकशाही तत्त्वांना अनुसरून तेथील सगळे चाले. मला गोलंदाजी यावी यासाठी माझा हुरूप आमच्या टीमने सतत वाढवला, बळ दिले. तू चांगली गोलंदाजी करू शकतोस असा विश्वास जागवला. भरपूर वेळा संधी दिली. अनेकदा समोरच्या टीमला भरपूर धावा देऊन किंमतही मोजली. तेव्हा कोठे मला गोलंदाजी जमू लागली. आता, शिक्षक म्हणून अशा प्रकारच्या अनेक संधी मी मुलांना देण्याचा सातत्याने प्रयत्न करत असतो. कारण त्याचे शिक्षणातील मोल मला समजले.

गप्पांचा फड असा काही रंगायचा, की विचारू नका. गावातली बित्तंबातमी माहिती असलेले नग असायचे. धावणे, पोहणे, पारंबी किंवा खोडाची खडबडीत साल पकडून सरसर झाडावर चढणे, भरभर डोंगर चढणे या व अशा अनेक गोष्टी, ज्या आता ‘पॅम्पलेट छाप’ शिबिरांतून शिकवल्या जातात, त्या तेव्हा आपसूक होत. मुलांच्या प्रयोगशीलतेला, कल्पकतेला अक्षरशः बहर यायचा. आम्ही मुले निसर्गाची भाषा आणि थोडीफार अरण्यलिपीही तेथे शिकलो. मुलांवर कोणीही कोणती बंधने घातलेली नसत. उनाड वाऱ्यासारखे मुक्त ‘स्वातंत्र्य’ होते.

आईवडिलांचा अजिबात वॉच नसायचा. अनवाणी पायांची गाडी कोठे पण निघायची… प्रतिकारशक्ती त्यातून वाढली असणार! ठिगळाच्या चड्ड्या घालताना लाज कधी वाटली नाही…  दोस्तांसंगे जे करण्यास मिळाले, त्यातून जे समृद्ध होता आले ते अनमोल होते. त्याची किंमतच होऊ शकत नाही हे आता, शिक्षक म्हणून जास्त चांगले उमजते.

शाळेत सतत नापास होणारा शालेय वातावरणात न्यूनगंडाने पछाडलेला, बुजून राहिलेला माझ्यासारखा विद्यार्थी शाळेत एबीसीडी, बाराखडी आणि गणितातील आकडेमोड असे काहीतरी जरूर शिकला असणार; विद्यार्थ्यांच्या शिकण्याबाबत साकल्याने विचार करू शकणारा शिक्षक बनला. ट्रेकिंगचा छंद जोपासू लागला. पर्यावरणाविषयी संवेदनशील नागरिक, वाईल्डलाईफ फोटोग्राफर बनून लिहू शकणारी व्यक्ती बनला, आत्मविश्वासाने विचार मांडू लागला… यात बराच मोठा वाटा बिनभिंतींच्या शाळेचाच आहे. मी पुढे वाचू लागल्यावर निसर्गवाद समजला. आम्ही त्या आधी तो जगलेला होता! म्हणून मला कदाचित शिकवणाऱ्या शिक्षकांपेक्षा सोबत खेळणारे मित्र आणि शाळेतल्या पेक्षा बाहेरील प्रसंग जास्त लख्ख लक्षात असल्याचे जाणवत राहते!

मी शिक्षक म्हणून आता टेबलाच्या या बाजूला उभा आहे. मागे वळून मनात विचार येतो, की आदिवासी मुलांकडे असलेल्या विशेष कौशल्यांची, अंगभूत क्षमतांची नोंद आमच्या शिक्षणाने घेतली नाही! त्यांचे धावणे, खेळातील सफाईदार हालचाली, चपळाईने पोहणे, निर्णयक्षमता सारे काही अफलातून असे आजही हीच सल मनाला बोचते आहे.

वंचित समूहातील मुलांची आवड आणि ताकद शिक्षणव्यवस्थेला समजून घेता आलेली नाही किंवा जाणीवपूर्वक तसा प्रयत्न केला गेलेला नाही. शेती हा विषय शिक्षणात असला पाहिजे, असा आग्रह महात्मा ज्योतिराव फुले यांनी धरला होता. त्याकडे आजतागायत दुर्लक्ष होत आले आहे. तसा काही विषय शिक्षणात असला असता तर आज वंचित समूहातील मुला-मुलींच्या शिक्षणाचे चित्र वेगळे दिसले असते. आजच्या शिक्षणातून मुलांच्या ठायी स्वाभाविकपणे निर्माण होत असलेला चिकित्सक विचार दाबून-दडपून टाकण्याचा प्रयत्न खुलेआम होताना दिसत आहे.

देशातील शिक्षणाचा धोरणात्मक एकूण विचार आणि शिक्षणाचा आशय या गोष्टी अभिजनांच्या नजरेतून ठरल्या गेल्या आहेत. शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणाच्या टप्प्यावर लाखोंच्या संख्येने वंचित समाजातील मुले शाळांत दाखल झाली. पण अभ्यासक्रमात वंचित समूहांना ज्या तऱ्हेने सामावून घेतले जाण्यास हवे होते तसे झालेले दिसत नाही. वंचित यांतील मुलांचे बालपण शिक्षणात येत नाही. मुलांचे जगणे आणि शिकणे यांतील दरी रुंदावत आहे. माझ्यासारखी मुले काठावर पास होत कशीबशी पुढे गेली; काहीतरी शिकली. माझ्या सोबतची आदिवासी इतर मुले इयत्तांच्या टप्प्यावर कोठे कोठे गळाली; शिक्षणव्यवस्थेने  नापाशीचे शिक्के त्यांच्या शैक्षणिक आयुष्यावर मारले.

मुले आज वेगवेगळ्या परीक्षांच्या चक्रात अडकून पडली आहेत. त्या परीक्षा पार पडल्या की पालक, मुले निकालाची वाट पाहत असतात. निकाल ही गुणवत्ता मोजण्याची मोजपट्टी बनली आहे. त्यातून नेमके काय मोजले जाते? जीवनविषयक तत्त्वज्ञान, विकासाच्या कल्पना, निसर्ग समजून घेणे, ज्ञान आणि गुणवत्ता कशाला म्हणावे? ते कोणी ठरवलेले असते? त्याचे निकष काय असतात? गुण म्हणजे गुणवत्ता असते काय? या सगळ्याचा विचार मनात येतो. तेव्हा सगळ्यांची नव्याने मांडणी करण्याची गरज जाणवते.

मुद्दा केवळ लाखो मुलांच्या शिक्षणाचा नाही तर सबंध आयुष्याचा आहे. अजून किती दिवस वंचित समाजघटकांनी हे बदलेल, सुधारणा होतील या आशेवर असे वाट बघत बसायचे? आणि का म्हणून?

(‘अॅग्रोवन’ दैनिकातून उद्धृत, संपादित – संस्कारित)

भाऊसाहेब चासकर ,bhauchaskar@gmail.com, 9422855151

About Post Author

Previous articleकविमनाचा चित्रकार प्रभाकर बरवे
Next articleपालघरमध्ये सतत होणाऱ्या भूकंपाविषयीचा माझा अनुभव
भाऊ चासकर यांचा जन्‍म अकोले (अहमदनगर) तालुक्यातील बहिरवाडी या लहानशा खेड्यात शेतकरी कुटुंबात झाला. त्‍यांनी नोकरी करण्‍यास सुरूवात केल्‍यानंतर मराठी विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. त्‍यांना वाचन आणि लेखनाची आवड आहे. त्या ओढीनेच त्‍यांनी मास कम्युनिकेशन आणि जर्नालिझमची पदवी संपादन केली. चासकर यांनी ललित, वैचारिक स्वरूपाचे लेखन केले. त्‍यांचे शिक्षण, पर्यावरण हे विशेष आवडीचे, जिव्हाळ्याचे आणि अभ्यासाचे विषय आहेत. त्‍यांचे त्या विषयांत लिखाण सुरु असते. चासकर यांना लहानपणापासूनच निसर्गात भटकंतीची आवड आहे. त्यातून त्यांना छायाचित्रणाचा छंद जडला. भाऊ चासकर हे अकोला तालुक्‍यात बहिरवाडी या आदिवासी पाड्यावरील जिल्‍हा परिषदेच्‍या शाळेत शिक्षक म्‍हणून कार्यरत असून त्‍यांनी तेथे शिक्षणाविषयी अनेक प्रयोग राबवले आहेत. लेखकाचा दूरध्वनी 9422855151