महानुभाव पंथीयांचे पूजनीय अचलपूर

0
189

अचलपूर तालुका हा महानुभाव पंथीयांसाठी श्रद्धास्थान आहे. त्यांच्या पवित्र जागा तालुक्यात अनेक आहेत- अष्टमहासिद्धी, वडनेर भुजंग, असदपूर, काकडा, अचलपूर शहरातील रत्नपूजा, निर्वाणेश्वर, बोरबन, पिंगळभैरव, लाखबन, देव्हार चौकी, अंबीनाथ, सोमनाथ ही ती श्रद्धास्थाने.

महानुभावांना स्थान म्हणजे परमेश्वर अवताराच्या स्पर्श सबंधाने पवित्र झालेले ठिकाण. एकूण अकरा प्रकार स्थानासबंधी आहेत. त्या प्रकारांत ज्या ठिकाणी परमेश्वर चरणावरी उभे राहिले, त्यांनी आसन केले, पूजा केली, आरोगणा (उपहार) केली, शयन केले अशा गोष्टींचा समावेश होतो.

श्री चक्रधर स्वामी तालुक्यातील ‘वडनेर भुजंग’ या स्थानी तीन दिवस वास्तव्यास होते. त्या ठिकाणी अवस्थान स्थान, जगतीच्या दारवंठ्यातील स्थान, आसन स्थान, परिश्रम स्थान, वस्ती स्थान, अनुपलब्ध स्थान अशी आठ स्थाने आहेत. स्वामींच्या मंदिराचा ढाचा मुघलकालीन आहे. चक्रधर ‘स्वामी’ असदपूरहून वडनेरला परत येत असताना दादोस यांनी स्वामींना दोन वाळुके अर्पण केली. दहीभाताची आरोगना केली. दादोस रामदेव हे वडनेर भुजंग येथील रहिवासी होते. त्यांचे वडील रामदेव हे व्यापारानिमित्त गेले असता लुटारूंनी त्यांच्या वडिलांची हत्या केली. त्यांनी दशक्रियेचा विधी म्हणून स्वामींना दोन वाळुके (काकड्या) अर्पित केली होती. त्याबरोबर दहीभाताचा उपहार केला होता. त्यांनी उत्तरेश्वराच्या देवळात भांडत असलेल्या सापांचे वैर सोडवले, म्हणून ते गाव ‘वडनेर भुजंग’ या नावाने ओळखले जाऊ लागले. त्या ठिकाणी असलेल्या आमजई येथे पहिला मराठी ग्रंथ ‘विवेकसिंधू’ लिहिला गेला. आमजाईचा उल्लेख वडनेर भुजंग या शेत शिवार परिसरातील ग्रामदेवता म्हणून होतो. त्या परिसरात श्री चक्रधर स्वामी पिंपळाच्या फांद्यांवर श्री चरणाने झुला घेत. म्हणून आमजाई परिसराला वेगळी ओळख मिळाली. त्या ठिकाणी महानुभाव भक्तांसाठी आश्रम स्थापन करण्यात आला आहे. तेथे वाचनयोग्य साहित्य व धार्मिक सुविधा उपलब्ध आहेत.

काकडा गावातील ईशान्येस शिंदी-पथ्रोट मार्गावर ‘काटेशुक्रम’ या स्थानीची लिळाही प्रसिद्ध आहे. स्वामी यांनी अचलपूरवरून आणलेल्या, राजा रामदरणाच्या आईने दिलेल्या वस्त्राचे लहान लहान तुकडे करून लहान मुलांसोबत चिंचोरे (चिंचोके) व दाधोटे (बिया) यांचा व्यापार करून खेळ मांडला अशी ती लिळा आहे. त्या ठिकाणी दोन स्थाने आहेत.

श्री चक्रधर स्वामी यांनी, ते वडनेर भुजंगवरून असदपूरला आले असता त्यांनी गावाच्या पूर्व भागास चंद्रभागा नदीच्या काठी एक रात्र मुक्काम केला आणि मुक्यास वाचा दिली ! ती त्यांची लिळा प्रसिद्ध आहे. तेथे चार स्थाने आहेत.

श्री चक्रधर स्वामी यांचा मुक्काम ‘अष्टमहासिद्धी’ येथे तीन रात्री होता. त्याचे कारण श्री गोविंदप्रभू यांनी देवतेच्या प्रतिमेशी खेळ केला, तर राजा रामदरणांसोबत शहरात प्रवेश करतेवेळी मुहूर्त निघाला नाही. अष्टमहासिद्धी येथील देवळाच्या नैऋत्य दिशेस कापूर विहीर आहे. त्या विहिरीच्या पाण्याने लहान मुलांना स्नान घातल्यास त्यांना आजार होत नाही; तेवढेच नाही तर बाळ भोपळ्यांसारखे सुदृढ राहते असा विश्वास आहे. म्हणून तेथील मंदिरावर भोपळा अर्पण करण्याची पद्धत आहे. भाविकांची गर्दी दर बुधवारी व शुक्रवारी त्या ठिकाणी होत असते. अष्टमहासिद्धी येथे दोन स्थाने आहेत.

अचलपूर शहरातील राजा रामदरणा हा दौलताबाद राजाचा मांडलिक राजा होता. तो तेथे वसुली घेऊन जात असे. एकदा, त्याने ‘खेड’ येथे मुक्काम केला. तेथे त्याची स्वामी यांच्याशी भेट झाली. ती भेट होताच वसुली माफ झाल्याचा संदेश त्यास आला ! त्या राजाने स्वामी यांना अचलपूर येथे येण्याची विनवणी केली. श्री चक्रधर स्वामी  रामदरणा राजाच्या विनंतीवरून अचलपूरला आले.

उपजिल्हा रुग्णालयाच्या दक्षिणेस जुम्मा मस्जिदीजवळ, पिरंगई दरम्यान भिंतीला लागून रामदरणा राजा यांचे ‘आवार’ होते. राजा रामदरणा यांचा राजवाडा त्या ठिकाणी होता, तेथील परिसराला आवार म्हणून ओळखले जाते. स्वामी यांनी त्या ‘देव्हार चौकी’त दहा महिने वास्तव्य केले. अचलपूर शहरातील अचलपूर उपजिल्हा रुग्णालयाच्या समोरील जुन्या लाकूडफाटा मार्केटच्या मागील बाजूस लगतच्या परिसरात हजरत पीरगैब साहेबांची तुर्बत-मजार आहे. अगदी त्याला लागून श्री चक्रधर स्वामींचे ते मूळ देव्हार चौकी स्थान आहे. – त्याचे स्वरूप एका भुयारासमान खोलगट जागेत उत्तर-दक्षिण ओट्यासारखे आहे. दर्गा हजरत पीरगैबसाहेब रहमतुल्ला अलै आणि श्री चक्रधर चरणांकित स्थान (ओटा-किसन) देव्हार चौकी या ठिकाणी एकत्र आहेत. ते स्थान महानुभाव पंथीयांना व हिंदूंना नमस्कार करण्यासाठी खुले आहे. तेथे मोठ्या संख्येने उभय पंथीय लोक जातात. श्री चक्रधर चरणांकित स्थानाचे (ओटा-किसन) दर्शन घेतात. श्री चक्रधर स्वामी यांचे स्थान (देव्हार चौकी) आणि मुस्लिम धर्माचा दर्गा त्या ठिकाणी एकाच छताखाली वर्षानुवर्षांपासून आहे. देव्हार चौकीत हिंदू-मुस्लिम एकत्र नांदतात. देव्हार चौकीचे पावित्र्य अबाधित राहवे, ते राष्ट्रीय एकात्मतेचे, हिंदू-मुस्लिम एकोप्याचे प्रतीक वादविरहित राहवे याकरता प्रशासनानेही त्या ठिकाणी दक्षता घेतली आहे. दर्ग्याच्या आतील भागाला हिरवा रंग न देता, फक्त सफेदी केली आहे !

तेथून ‘स्वामी’ गरुड घोड्यावर बसून अचलपूरच्या दक्षिणेस, बिच्छन नदीच्या पश्चिम काठी ‘मणकर्णा विहिरी’वर दररोज सकाळी स्नान करण्यास जात. बिच्छन नदी शहराच्या मधोमध खळखळ वाहते. ही नदी हे शहराचे वैभव आहे. स्वामी यांनी त्या ठिकाणी चुन्याच्या जातींचे निरूपण केले. त्या घटनेचे ‘स्नानानंतर घोड्यावर बसून, अंबिनाथाच्या लिंगावर विडा अर्पण करून श्रीकराने लिंगास स्पर्श करत’ असे वर्णन आहे. स्वामी अधूनमधून सापन नदीच्या उत्तरेकडील कप्तानसाहेबांच्या पेरूच्या बागेत विरहन (विहार) करण्यासाठी जात असत.

स्वामी भांडारेकर यांच्यासह अचलपूरच्या नैऋत्येस असलेल्या ‘पिंगळाभैरव’ या स्थानावर आले. पाचोळी राजाची राणी धनाईसा ही दररोज निर्वाणेश्वरच्या या कुलदैवतांचे पूजन करत असे. त्या ठिकाणी भांडारेकर (ब्राह्मण) यांस दान देण्याकरता घरी आणले. तेव्हा त्यांनी माझी पूजा न करता गोसावियांची (श्री चक्रधर स्वामींची) पूजा करा असे सुचवले. (भांडारेकर हे भंडाऱ्याचे गर्भश्रीमंत गृहस्थ व पुरोहित होते. ते भंडारा येथील जोशीवाड्यात राहत असत. ते श्री चक्रधर स्वामींच्या तत्त्वज्ञानाने प्रभावित होऊन स्वामींचे शिष्य म्हणून सोबत राहू लागले.)

धनाईसा यांनी त्यांच्या जवळील रत्नांनी स्वामी यांची पूजा भांडारेकर यांच्या माध्यमातून केली. बिलनपुरा येथील पांगारकर यांच्या वाड्यातील ते पूजास्थळ ‘रत्नपूजा’ म्हणून ओळखले जाते. त्याच दरम्यान, स्वामी यांनी ‘सोमनाथा’च्या मंदिरात जाऊन दोन रात्र- दोन दिवस मुक्काम केला. रामदरणा राजा सर्वज्ञांसाठी दररोज भोजनाचे ताट घेऊन जात असे. तिसऱ्या दिवशी, राजाच्या विनवणीवरून स्वामी यांनी नगरात प्रवेश केल्याची लिळा आहे.

स्वामींचे आसन विरहनासाठी ‘लाखरबन’ या स्थानावर होत असे. ते स्थान सापन नदीच्या पश्चिमेस हिरालाल धोंड यांच्या संत्रा बगिच्यामध्ये पूर्वाभिमुख देवळात आहे. सापन नदी अचलपूर शहरात आजही प्रवाहित आहे. अचलपूर येथील धनाईसा आवारातील रत्नपूजा स्वीकार, अंबानाथावरील आसन, पिंगळाभैरवावरील आसन, निर्वाळेश्वरावरील आसन अशी एकूण नऊ स्थाने अचलपूर शहरात आहेत. ‘सावळापूरची लेक’ म्हणून गोविंदप्रभू यांनी आईवडील नसलेल्या मुलीस त्यांची लेक मानले आहे. त्याचा संदर्भ ‘लिळाचरित्रा’त येतो. त्या सर्व स्थानांच्या माध्यमातून स्वामी यांनी दिलेल्या शिकवणीच्या व नीतिमूल्यांच्या आधारावर लाखो महानुभाव अनुयायी आहेत. ई.श्री. कृष्णमुनी (अचलपूरकर महंत), नाथोबाबाबा, पालीमकरबाबा व अन्य महंत यांच्या माध्यमातून धार्मिक उत्सव, पदयात्रा, पंचअवतार उपहार, धर्म जनजागरण असे अनेक पंथीय कार्यक्रम तालुक्यात दरवर्षी पार पाडले जात असतात. त्यात महावाक्य श्री चक्रधर स्वामींच्या चरित्राची पोथी, व्याख्यानमाला, पदयात्रा, मंदिरातील वार्षिक महोत्सव, नवरात्रोत्सव, भगवद्गीता पठण यांचा समावेश असतो. अचलपूर या स्थानावर अनेक आश्रम स्थापित झाले असून भक्‍तांसाठी सोयी सुविधा उपलब्ध आहेत. त्याशिवाय कांडली येथे श्रीकृष्ण मंदिर, कविठा व कोल्हा येथे श्रीप्रभू व चक्रधर स्वामी यांचे मंदिर तर सावळी येथे दत्तप्रभूचे मंदिर आहे.

– अपर्णा जितेंद्र रोडे 9422158005 jitendrarode77@gmail.com

———————————————————————————————————–

About Post Author

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here