भाषेतील भर आणि प्रदूषण

0
329

शब्दांची व्युत्पत्ती, शब्दाचा काळाच्या ओघातील अर्थबदल अभ्यासणे हे मोठे मनोरंजक असते. त्यातून भाषेची जाण येते…

उपासाच्या दुसऱ्या दिवसाला ‘पारणे’ असे म्हणतात. तो शब्द कसा रूढ झाला? ‘धनको’ आणि ‘ऋणको’ म्हणजे ‘कर्ज देणारा’ आणि ‘कर्ज घेणारा’ हे समाजाचे घटक आहेत. ‘धनको’ मंडळींना ‘ऋणको’ लोकांकडून कर्जवसुलीसाठी प्रयासही करावे लागत असत. त्या संदर्भात अठराव्या शतकात एक प्रथा निर्माण झाली होती. घेणेकऱ्याने देणेदाराच्या दाराशी उपाशी बसायचे आणि त्यालाही उपाशी ठेवायचे ! पैशांची तोड निघाली की दोघांनी मिळून जेवायचे, म्हणजेच पारणे करायचे ! गावात धरणीपारणी चालली आहेत, असे म्हटले जात असेच. पारणे हा शब्द समस्येतून पार होणे या अर्थी रूढ झाला असू शकेल. त्या प्रथेत एक प्रबोधनही आहे. समस्येतून पार झाले की एकमेकांविषयी मनात कटुता ठेवणे नाही- पुढील व्यवहाराला गोडीने-सुखासमाधानाने सुरुवात करणे.

पुढे, पारणे या शब्दाचा अर्थ विस्तारित होऊन ‘डोळ्यांचे पारणे फिटणे’ हा वाक्प्रचार रूढ झाला असावा. तो वाक्प्रचार एखादे दृश्य पाहून आत्यंतिक समाधान वाटले, की वापरला जातो. मूळ भावना रूढीतील समाधानाचीच आहे; पण गंमत अशी, की ती डोळ्यांपुरती मर्यादित राहिली. कानाचे किंवा नाकाचे पारणे फिटत नाही. असे का होते? कारण भाषेच्या प्रवाहाची वळणे गणितासारखी विकसित होत नाहीत. ती माणसाच्या मनातून, भावनांतून निर्माण होत जातात.

‘असामी’ हा शब्द ‘बडे प्रस्थ’ या अर्थी वापरतात. ‘असामी’ या शब्दाचा उपयोग अठराव्या शतकात नेमून दिलेले वार्षिक वेतन आणि भरपूर वार्षिक वेतन घेणारी व्यक्ती, या दोन्ही अर्थांनी केला जात असे. म्हणजेच असामी हे एक पद ‘पालखी- पदस्थ’ या प्रमाणेच होते. काळाच्या ओघात ‘पद’ हा अर्थ लोप पावला. मोठेपण हा अर्थ उरला. तोरा दाखवणारे मोठेपण असा काहीसा अर्थ त्या शब्दात अभिप्रेत आहे.

‘गोसावी’ या शब्दाचा मूळ अर्थ ‘गोस्वामी’ असा आहे. त्यावरून रूढ झालेले गोसावी हे पद. ते सन्मानदर्शक राव आणि पंत यांपेक्षा वरचे अठराव्या शतकात समजले जात असे. त्याचा अर्थ पुढे मात्र ‘संन्यस्त जीवन’ असा झालेला आहे. नारायणराव पेशवे यांची हत्या गारद्यांनी केली, गारदी वाड्यात घुसले असे वाचण्यास मिळते. तेव्हा हे गारदी कोण, असा प्रश्‍न पडतो. तो शब्द इतरत्र कोठे आढळत नाही. ‘गार्ड’ या इंग्रजी शब्दाचा ‘गाडदी’ हा मराठी अपभ्रंश आहे, असा उल्लेख ऐतिहासिक कोशात मिळतो.

मराठीची अशी रंजक माहिती कृ.पां. कुलकर्णी यांच्या व्युत्पत्तिकोशात मिळते. ‘सकाळ’ हा शब्द ‘उष:काल’ आणि ‘सत्काल’ या दोन शब्दांवरून मराठीत आला. ‘विहीर’ हा शब्द संस्कृतमधील ‘विवर’ (जमिनीतील भोक) या शब्दातून मराठीत आला. मराठीत ‘दांडगा’ असा शब्द दण्ड-दाण्ड… असा प्रवास करून रूढ झाला. संस्कृत ‘लघु’वरून प्राकृत लहू, त्याचे मराठीत पुढे ‘लहान’ हे रूप झाले. सिंदुरमवरून ‘शेंदूर’, श्मश्रूवरून ‘मिशा’, श्वापदवरून ‘सावज’ हे शब्द मराठीत आले. फारसी, अरबी शब्दांची सरमिसळ मराठीत कशी झाली आहे, तेही कोशात कळते. अशी सरमिसळ कोणत्याही भाषेत अपरिहार्य असते.

भाषा ही नदीसारखी असते. नदी उगमापासून तुटत नसते. पण तिला ओढे, छोट्या नद्या येऊन मिळत राहतात आणि ती पुढे वाहत राहते. पण नदी प्रदूषित होऊ नये म्हणून जागरूक राहणेही आवश्यक असते. नाहीतर काय होते, ते नुकसान आधुनिक मराठी भाषा अनुभवत आहे. भाषा ही प्रदूषित होऊ नये म्हणून जागरूक असले पाहिजे. ती प्रदूषित झाली की सामाजिक विचारांतही प्रदूषण होऊ शकते.

विनया खडपेकर 7028257366 vinayakhadpekar@gmail.com

(‘राजहंस ग्रंथवेध’वरून उद्धृत)

——————————————————————————————————–

About Post Author

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here