शब्दांना अर्थ असतात आणि अर्थांना विविध छटा असतात. संदर्भानुसार अर्थच्छटेत सूक्ष्म फरक होतो. व्यवहारातही एखादा शब्द वेगवेगळ्या अर्थांनी वापरला जातो. त्यामुळे शब्दांचे अर्थ बरेचदा संभ्रमितही करतात. विविध भाषांमधून एका अर्थासाठी जवळपास सारखे शब्द वापरले जातात. तर कधी कधी एका भाषेतून दुसऱ्या भाषेत जाताना, वस्त्र बदलावे तसे शब्द अर्थ बदलतात. दुसऱ्या भाषेत गेल्यावर एकातून दुसरा शब्द उमलतो आणि त्याचबरोबर अर्थही बदलतो. शब्द आणि अर्थ यांचा भाषेतला असा हा प्रवास आपल्याला कुठून कुठे घेऊन जातो. भाषेत खूप गमतीजमती असतात. भाषा, शब्द, अर्थ आणि त्यांचा विविध पातळीवरचा प्रवास याविषयी सातत्याने ‘मोगरा फुलला’ या दालनात लिहित आहेत, ज्येष्ठ लेखिका श्रीमती नंदिनी आत्मसिद्ध. अर्थवाही भाषेचे विविध कंगोरे समजून घेण्यासाठी प्रत्येक भाषाप्रेमी माणसाने वाचायलाच हवा असा हा लेख. तसेच ‘मोगरा फुलला’ या दालनातील इतर लेख सोबतच्या लिंकवरून वाचता येतील.
– राणी दुर्वे
———————————————————————————————
ओझे, शब्द आणि अर्थ यांचे
शब्दांचे अर्थ आपल्याला बरेचदा संभ्रमित करतात. बुचकळ्यात टाकतात. व्यवहारात एखादा शब्द वेगवेगळ्या अर्थांनी वापरला जातो. संदर्भानुसार अर्थच्छटेत सूक्ष्म फरक असतात. ‘आशा’ आणि ‘अपेक्षा’ ह्या शब्दांचे असेच आहे. बरेचदा ते एकाच भावनेसाठी योजले जातात. माणसाला काही गोष्टी घडाव्यात, व्हाव्यात, मिळाव्यात असे वाटत असताना त्याच्या मनात ‘आशा’ असते. तर एखादी गोष्ट घडेल अशी शक्यता त्याला वाटते, तेव्हा त्याच्या मनात तशी अपेक्षा असते. म्हटले तर दोन्ही सारखेच. पण अपेक्षा असते, तेव्हा मनात शक्यतेची काहीशी खात्री असते, असे म्हणता येईल. एखादी गोष्ट घडण्याबाबतचा एक विश्वास अपेक्षा शब्दातून व्यक्त होतो. अर्थातच आशा आणि अपेक्षा ‘बाळगण्यात’ किंवा ‘करण्यात’, दोन्हींतही भविष्याचा वेध आहे, तरी पूर्ण खात्री नाही. पण दोन्ही शब्द निश्चितच मनाला दिलासा देणारे आहेत. आशा पूर्ण झाली नाही, तर निराशा वाटते आणि अपेक्षा पूर्ण झाली नाही, तर अपेक्षाभंग होतो, असे आपण म्हणतो. इथे मग निराशेपेक्षा अपेक्षाभंग हा तीव्र बनतो, कारण कुठेतरी जे होईल असे वाटते ते घडत नाही. तर अचानक घडलेली घटना आपल्याला ‘अनपेक्षित’ असते. इंग्रजीतही ‘होप’ आणि ‘एक्सपेक्टेशन’ हे याला समांतर असे दोन शब्द आहेत. तेही अशा किंचित फरकाने वापरले जातात. हिंदीत ‘आशा’ शब्द आहेच, पण उर्दूमुळे ‘उम्मीद’ हा शब्दही हिंदी भाषेत बऱ्यापैकी रुजला आहे. हा उम्मीद शब्द मराठीत उमेद बनून वावरतो. उम्मीद हा आशा आणि अपेक्षा दोन्हींसाठी वापरला जातो. उम्मीद मराठीत उमेद म्हटले जाते, तेव्हा वेगवेगळे अर्थ अभिप्रेत असतात. आशा, अपेक्षा, धीर, खात्री, उत्साह वगैरे. ‘एखादी व्यक्ती उमेदीत असताना’ असा वाक्यप्रयोग केला जातो, तेव्हा त्या व्यक्तीच्या जोमाच्या दिवसांचा, कर्तृत्वाच्या काळाचा अर्थ सूचित केलेला असतो. बरेचदा एखाद्याच्या तारुण्यकालाकडे निर्देश असतो.
उमेद याच शब्दावरून आलेला ‘उमेदवार’ हा शब्द निवडणुकीत उभ्या राहिलेल्या व्यक्तीसाठी योजला जातो. यासाठी की, या उमेदवाराला भविष्यात यशस्वी होण्याची आशा असते. निवडून येण्याची अपेक्षा असते, म्हणूनच ना ! मराठीतला उमेदवार, तो हिंदीत उम्मीदवार असतो. शिवाय ‘कँडिडेट’ शब्दासाठी संस्कृतमधून आलेला ‘प्रत्याशी’ शब्दही ‘शुद्ध हिंदीवाले’ वापरतात. प्रत्याशा म्हणजे पुन्हा आशा, उम्मीद, भरवसा इत्यादी अर्थच व्यक्त करणारा… अपेक्षा, पूर्वानुमान किंवा संभाव्यता याही अर्थाने प्रत्याशा वापरला जातो.
एकूणच आशा, उम्मीद यांना मानवी जीवनात महत्त्वाचे स्थान आहे. माणूस आशेवर जगतो, असे आपण म्हणतो. हिंदीतही ‘उम्मीद पर दुनिया क़ायम है’ असे म्हणतात. खरेच आहे की, माणसाजवळ आशाच नसेल, तर त्याच्यापाशी काहीच नाही. जगताना अनेक गोष्टींबाबत आशा-अपेक्षा बाळगत मनुष्य वाटचाल करत असतो. आशेमुळे माणसाला संकटात संधी दिसते. काहीतरी नवे घडेल, ही आशा त्याच्या मनात नेहमी जागी राहते. एका संस्कृत श्लोकामध्ये आशेचे वर्णन आश्चर्यकारक शृंखला किंवा पायातली बेडी, असे केले आहे. ही बेडी ज्याच्या पायात आहे, तो माणूस वेगाने धावतो आणि ती नसली, तर तो पांगळा बनून एकाच जागी जखडलेला राहतो, असे हे सुभाषित सांगते-
आशा नाम मनुष्याणां शृङ्खला काचिदद्भुता
यया बद्धाः प्रधावन्ति मुक्तास्तिष्ठन्ति पङ्गुवत्
माणसाच्या आयुष्यात नवे काही घडण्याची आशा ही त्याच्या जिवट वृत्तीचा धागा जागा ठेवते. यातूनच तर हिंदीत एखाद्या स्त्रीच्या गरोदरपणाचा उल्लेख करताना, ‘वह उम्मीद से है’ असे म्हणतात. येऊ घातलेल्या नवीन जिवासाठी त्या स्त्रीच्या मनात आशा-अपेक्षा असते. इतरांनाही या बाळाची प्रतीक्षा असते. इंग्रजीतही ‘शी इज एक्सपेक्टिंग’ असा प्रयोग केला जातो, तो याच कारणाने. ‘उसका पाँव भारी है’ असेही गरोदर स्त्रीविषयी बोलताना हिंदीत म्हणतात. गरोदर स्त्रीच्या शारीरिक अवस्थेवरून असा वाक्प्रयोग आला. गर्भ हा शब्दही केंद्रीय स्थान या अर्थाने वापरला जातो. देवळातील गर्भागार-गाभारा यातूनच तर आला.
मराठीत गरोदरपणा, गर्भिणी, गर्भवती असे शब्द आहेत. तर गाभण असा शब्द प्राण्यांबाबत वापरला जातो. अनेकजण गरोदरावस्थेविषयी बोलताना ‘गर्भावस्था’ असाही उल्लेख चुकीने करतात. गर्भावस्थेत स्त्रीच्या पोटातले बाळ असते, ती स्त्री नव्हे, असे मग स्पष्ट करून सांगण्याची वेळ येते. प्रसूत होणे, बाळंत होणे असे शब्द मुलाला जन्म देणाऱ्या स्त्रीसाठी वापरले जातात. तर विणे हे क्रियापद प्राण्यांसाठी. इथे कुठेतरी वाचलेला किस्सा आठवतो. इंग्रजी काळातला. मराठी भाषा शिकण्याचा चंग बांधून एका इंग्रजी अधिकाऱ्याने एका संस्थानिकाच्या पत्नीला मुलगा झाल्यावर, संस्थानिकाला पत्र लिहून अभिनंदनपर संदेश पाठवला. त्याला सतत नवनवे शब्द वापरण्याची हौस होती. त्याने शब्दकोश काढून ‘टू डिलिव्हर’ साठी मराठी शब्द शोधला. त्यात त्याला आवडला तो शब्द उचलून, व्याकरणशुद्ध रूप वापरून त्याने संदेश पाठवला- ‘महाराणीसाहेब व्याल्या आणि त्यांना पुत्ररत्न झाले, त्याबद्दल अभिनंदन!’ पूर्वी मराठीच्या एका पाठ्यपुस्तकातल्या धड्यात, घरातली सून गर्भवती आहे नि गाय गाभण. एक मैत्रीण म्हणायची, ‘हा धडा शिकवताना मला अगदी गोंधळल्यासारखं होतं. गाय गाभण आणि वहिनी गरोदर, हे अगदी मनात कोरूनच वर्गात शिकवते, नाहीतर उलट बोलेन एखादवेळी…’ इंग्रजीतलं ‘टू कन्सीव्ह’ हे क्रियापद गर्भधारणा होणे आणि नवीन कल्पना सुचणे, विशिष्ट दिशेने विचार करणे अशा अर्थी वापरतात. यावरूनही इंग्लंडच्या हाऊस ऑफ कॉमन्समध्ये एक किस्सा घडला होता. नाव आठवत नाही, पण एक लोकप्रतिनिधी त्यांच्या भाषणात तीन वेळा ‘आय कन्सीव्ह’, असे तीनदा म्हणाला. मात्र पुढे त्याला बोलता आले नाही, तेव्हा सभागृहातल्या एकाने शेरा मारला, ‘द जेंटलमन कन्सीव्हड थ्राइस बट ब्रॉट फोर्थ नथिंग’…
भाषेत अशा बऱ्याच गमतीजमती असतात. वेगवेगळ्या भाषांमधून गरोदरपणा, गर्भवती यांचा निर्देश वेगवेगळ्या प्रकारे केला जातच असेल. मराठीत आपण ‘दोन जिवांची’ असं गरोदर स्त्रीचे वर्णन करतो. तसा फ़ार्सी भाषेत गर्भवती स्त्रीला ‘बारदार’ शब्द आहे. बार म्हणजे ओझे, भार. या अवस्थेतली स्त्री पोटात वजन, ओझे बाळगत असते, म्हणून ती बारदार – भारधारक. गरोदर स्त्रीला दुसरा शब्द आहे, ‘हामिला’. इंग्रजीत ‘टू कॅरी’ आहे, त्यावरून गर्भवतीला ‘कॅरींग’ म्हणतात, त्याच धर्तीवरचा. हम्ल म्हणजे ओझे, हा मूळचा अरबी शब्द आहे. फ़ार्सीत यावरून ‘हम्ल बोर्दन’ म्हणजे ओझे वाहणे, त्यापासूनच ‘हामिला’ आला. गर्भवती स्त्री अशा अर्थाने. तर याच शब्दापासून तयार झालेला ‘हामिल-ए-ख़त’, म्हणजे पत्रवाहक. तर हम्ला/हमला म्हणजे हल्ला हा शब्दही ‘हम्ल’ पासूनच तयार झाला आहे. ओझे वाहणारा ‘हमाल’ हाही हम्ल शब्दातूनच आला. शब्द आणि अर्थ यांचा प्रवास आपल्याला कुठून कुठे घेऊन जातो. एकातून दुसरा शब्द आणि अर्थही. आशा-अपेक्षा ते हमाल. बरीच मजल गाठली. आशा चांगलीच असते, पण आपण तिचे नुसते ओझे वाहणारा हमाल नक्कीच होऊ नये.
– नंदिनी आत्मसिद्ध 9920479668 nandini.atma@gmail.com
———————————————————————————————————————
छान लेख !
खूप छान लेख.अभिनंदन.
‘मी केवळ हमाल भारवाही’ असं संत रामदास स्वामींनी म्हटलं आहेच.
भाषेगणिक येणारे शब्द आणि त्यांच्या संदर्भाप्रमाणे बदलत जाणाऱ्या अर्थछटांच्या ओझ्याखाली या हमालाला गुदमरायला झालं. भाषेचा एवढा विचार मी कधीच केला नव्हता.