गच्चीवरील गप्पा – मी कोण आहे? वगैरे (Chat on the terrace)

1
303

मनाचे स्वास्थ्य वेगवेगळ्या वयोगटांत, वेगवेगळ्या प्रसंगांत कोणाच्या शब्दाने, वागण्याने, मनात चाललेल्या संघर्षामुळे किंवा कधी असे करायला नको होते या विचारांनी विस्कटून जाते. प्रत्येकाला ते कोणाशी न बोलल्यामुळे फक्त ‘आपले’ वाटत असते. स्वतःची खोलवर रुतलेली गुपिते म्हणून ती न दाखवण्याचा प्रयत्न केला जातो. मनात अशा अनेक विचारांनी ओझे निर्माण होते. ते जितके लपवू तितके ते अवजड होत जाते. पण जर त्या विचारांना, भावनांना तोंड फुटले तर लक्षात येते, की ‘हे फक्त आपल्या बाबतीत नाही; सगळ्यांच्याच बाबतीत असे होते.’ माणूस जितके स्वतःबद्दल बोलतो तितके ते वैश्विक असते. माणूस हे जाणतो पण तसे मोकळेपणाने बोलत नाही. ही कोंडी सोडवण्यासाठी मनीषा सबनीस यांनी पुण्यात ‘गच्चीवरील गप्पा’ असा मंच सुरु केला आहे. आरंभी तो गच्चीवर होता, आता तो ऑनलाईन असतो. गप्पांची सत्रे एका प्रश्नावरच्या अनेक बाजू, दृष्टिकोन तर दाखवतात पण सर्वात महत्त्वाचे म्हणजे मनातले ओझे दूर करण्यास मदत करतात. त्या गप्पांमधून आपलेपणा, मोकळेपणा, स्नेह निर्माण होतो आणि मनातला गुंता कमी होतो. लेख वाचावा आणि शक्य असेल तर पुढच्या ऑनलाईन गप्पांना जरूर भेटावे.

– अपर्णा महाजन

‘गजाली करणे’ म्हणजे गप्पा मारणे. तो कोकणातील शब्द आहे. गप्पा ही यच्चयावत सगळ्यांना आवडणारी गोष्ट. नाक्यावर, पारावर, कट्ट्यावर, बागेत, गच्चीत, स्वत:च्या घरच्या दारात उभे राहून समोरासमोर… अशा अनेक ठिकाणी लोक गप्पा मारत; मारतोही. हल्ली ‘सोशल मीडिया’च्या जगात आपण फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सॲप या माध्यमांतून देखील गप्पाच होत असतात (चॅटिंग). गप्पा मारताना मजा येते. गप्पा म्हणजे नक्की काय असते? माहितीची देवाणघेवाण, थोड्या चौकश्या आणि थोडे चवीपुरते विचारमंथन. अशा सगळ्या शाब्दिक चटकदार वेळेमुळे माणसाचे मन व मेंदू, दोन्ही ताजेतवाने होतात आणि पुढील रोजच्या जगण्याला उत्साह मिळतो. माणूस गप्पा मारतो, ते त्या आवडतात म्हणून. गप्पांचा क्लास किंवा शिकवणी नसते. गप्पा म्हणजे मुलाखत नाही. गप्पा म्हणजे शिकवणे नाही. गप्पांचा सर्वात महत्त्वाचा गुण म्हणजे गप्पा ‘आज’च्या असतात. त्यांचा भर ‘आज’, ‘आत्ता’ यावर असतो. त्या आज सुरू होतात आणि आजच संपतात. गेल्या सोमवारच्या गप्पा कोणी पुढील सोमवारी सुरू ठेवत नाही. पुढील सोमवारी नव्याने गप्पा सुरू होतात. वाचक या टप्प्यावर विचारतील, ‘गप्पा’ यावर किती गप्पा मारशील ! खरंय, एवढे सारे घडाभर तेल घातले, ते मी सुरू केलेल्या ‘गच्चीवरच्या गप्पा’ या उपक्रमाबद्दल तुमच्याशी गप्पा मारायला, तुम्हाला सांगायला, तुमचे ऐकायलाही. त्याचे काय झाले, सोशल मीडियामुळे ‘ओळखी’ची असणारी माणसे, थोडी थोडी दोस्त होऊ लागली. वेगवेगळ्या विषयांवर त्रोटक रूपातील लिखित गप्पा होऊ लागल्या आणि काही मनात मुरण्याच्या- झिरपण्याच्या आत संपून जाऊ लागल्या. शिवाय, त्या समोरासमोर बसून मारलेल्या नसल्यामुळे, ‘लिखित गप्पा’ असल्यामुळे ‘गप्पां’ची मूलभूत खासीयत त्यातून सुटून जात होती. मग वाटले, सरळ गप्पांचा कार्यक्रम करुया.

पहिल्या गप्पा जाहीर केल्या, तेव्हा जुन्या ओळखीच्यांपेक्षा नवीन ओळखीच्या व्यक्ती जास्त आल्या. त्यामुळे गप्पांना ताजेपणा आला, मात्र त्याबरोबर त्यात अडखळलेपणही होते. ओळखीच्या व्यक्ती आणि अनोळखी व्यक्ती असा मिश्र गट होता. त्यामुळे कशावर काय बोलावे याची स्पष्टता नव्हती. बरे, नाव -गाव-शिक्षण-कुटुंब अशी पारंपरिक ओळख करून घेणेही गरजेचे नव्हते. व्यक्ती म्हणून स्वतःला आणि इतरांना ओळखण्याचे ठरले आणि पहिल्या गप्पांचा विषय ठरला ‘स्व-ओळख’. म्हटले तर सोपा, विचार केला तर तितकाही सोपा नाही असा विषय. त्यातून फक्त ‘मी’वर बोलायचे याची सवयही नाही. आम्ही सगळ्यांनी मी बरोबर किंवा मी म्हणजे माझी नाती, माझ्या अर्थार्जनाचे जग, माझा भवताल हे सगळे, किंबहुना यापेक्षा अधिक काय काय येते; यातून ‘मी’ वेचून काढण्यास सुरुवात केली. बऱ्याचदा असे होते, की ‘मी म्हणजे कोण’ हे बऱ्याच वेळा स्वत: ऐवजी इतरच जास्त ठरवतात. जात, धर्म, नाव, जगण्याचे नियम हे घटक तर जन्मापूर्वीच निश्चित झालेले असतात. नंतरही ते सारे आई-वडील, नातेवाईक, शाळा कॉलेजातील शिक्षक, समाज कळत-नकळत सांगत राहतो. वयाच्या वीस-एकवीस वर्षांपर्यंत मला ‘मी’ कोण आहे असे जे वाटते, ते म्हणजे या सगळ्यांनी मी कोण असावे हे ठरवलेले असणारी मी असते/असतो. मी शहाणी मुलगी, बायको, सून, आई आहे किंवा मी हुशार, खूप कमावणारा, जबाबदार, कष्टाळू मुलगा आहे असे मला वाटते. ते खोटे नसते. पण त्या पलीकडेही मी असते/असतो. ही ‘मी कोण आहे?’ ते शोधण्याचा प्रयत्न आम्ही त्या गप्पांत केला. मला बँकेत नोकरी करायची नव्हती तर वकील किंवा मास्तर व्हायचे होते. दुसरीला लग्न करायचे नव्हते, पण तिचे लग्न विशेष लवकर करून देण्यात आले. तिसरीच्या आयुष्यात आलेल्या पुरुषांनी तिला चांगल्या अर्थाने संपन्न केले, पण समाजाने टोचून रक्तबंबाळ केले. एकाला अभिनयात कारकीर्द घडवायची होती, तशा संधीही होत्या, पण वडिलोपार्जित डॉक्टरी सांभाळण्यासाठी त्याला पैसे भरून डॉक्टर करण्यात आले… अशा आणखीही काही कथा. थोडक्यात मला जे माझे वाटते, जेथे माझे गुण दाखवून, कष्ट करून काही करावेसे वाटते, जी ‘मला’ निजखूण वाटते, ते करून बघण्याची पुरेशी संधी ‘मला’ न मिळाल्यामुळे ‘मी’ हळूहळू गाडली गेले आणि नंतर नंतर दिसणारी मी मलासुद्धा ‘खरी मी’ वाटू लागले. गच्चीवरील गप्पांमधील ‘मी कोण?’च्या निमित्ताने धूळ जरा झटकली गेली. पुढे, या ‘मी’चे काय करता येईल? एकमेकांच्या मदतीने काही करता येईल का? यावर थोडे बोलले गेले आणि त्या दिवशीच्या गच्चीवरील गप्पा संपल्या.

दुसऱ्या गप्पांचा विषय होता, ‘मी पुढे गप्पा सुरू ठेवणार आहे का?’ आणि असल्यास का? मी सांगितले, की उपक्रम तूर्त सुरू केला आहे तो नव्या-वेगळ्या लोकांची गप्पांची देवाणघेवाण करण्यासाठी. तुमच्याबरोबर माझेही स्वतःला नवीन काही सापडते आहे का, ते बघण्यासाठी. सध्याच्या ‘सोशल मीडिया’च्या जगात डोळे-कान-मेंदूवर सतत काही ना काही आदळत असते. त्यात आणखी OTT! या सगळ्यात वाचलेल्या-ऐकलेल्या गोष्टींवर विचार करून काही कृतीत आणण्यास अवसरच मिळत नाही. अगदी प्लेटो, सॉक्रेटिस नाही, तरी ओळखीच्यांशी विचारांचे आदानप्रदान करून, त्यातून येणारी स्पष्टता, होऊ शकणारा बदल, आनंद-सार्थकता हे सगळे हळूहळू गायब होऊ लागल्याची भावना बलवान होत आहे. त्यातूनच ‘गच्चीवरच्या गप्पां’ची कल्पना जन्माला आली. हे वर्ष-सहा महिने सुरू ठेवण्याचा प्रयत्न आहे. इतरांनी त्यांना त्यात सहभागी व्हावेसे का वाटले, तेही सांगितले. एकतर त्यांना ‘गच्चीवरच्या गप्पा’ हे शीर्षक आवडले. मोजक्या लोकांशी छोट्या गटात, फक्त गप्पा मारायच्या, तेही फक्त शंभर रुपयांत. वैयक्तिक काही सांगणे जे सगळ्यांसमोर सांगण्यास नको वाटेल, ते सांगणेही गरजेचे नाही; पण किमान प्रतिसाद, प्रतिक्रिया अपेक्षित आहे. हे सगळे कळल्यावर, काहीजण ‘एकदा जाऊन तर बघू, पुढचे पुढे ठरवू…’ येथपर्यंत आले आणि ते गप्पांना हजर झाले. रविवारी संध्याकाळी एक तास नुसत्या गप्पांसाठी देण्याची चैन, तेही अनोळखी लोकांबरोबरच्या गप्पा ! ती चैन कमीच लोकांना परवडणारी आहे, शिवाय, कल्पनाही तशी नवीन. तरी म्हटले, बघुया तरी राबवून ! पण खरंच, खूप छान प्रतिसाद मिळाला.

दुसऱ्या वेळच्या गप्पांमध्ये काही सभासद नव्याने आले. पहिल्या वेळेच्या गप्पांना आलेल्यापैकी काहींना येण्यास जमले नाही, कारण तुफान पाऊस पडत होता त्या दिवशी. त्यावेळी असे ठरवले, की गप्पा पुढील वेळेपासून ऑनलाईन घेऊ या. दुसऱ्या वेळेच्या गप्पांमध्ये ‘यात तुम्ही का सहभागी होताय? तुम्हाला का यावेसे वाटले, परत? आणि काहींना नव्यानेही असा शोध घेतला.’ तेव्हा लक्षात असे आले, की वेगळ्या माणसांशी ओळखी होतील, वेगळे काही ऐकण्यास मिळेल या अपेक्षा होत्या येणाऱ्यांच्या. मात्र एक नवाच अनुभव पदरी पडला. नव्याने आलेले एक जण म्हणाले, ‘मला यावेसे वाटले, कारण मी येथे काहीतरी देण्यास आलेलो आहे. मी नेहमी जेथे जातो, तेथे काहीतरी देतो. मला येथे काही आनंद वाटायचा आहे. मी गप्पांमध्ये सहभागी होणार नाही; फक्त बघणार, ऐकणार आणि आनंद देणार.’ त्यांची ही भूमिका माझ्यासह इतरांनाही फारशी स्पष्ट झाली नाही. त्यांच्या गुरूंच्या आशीर्वादाने, त्यांच्या नुसत्या उपस्थितीने इतरांना आनंद होण्याची शक्यता खात्रीशीर नसल्यामुळे त्याबद्दल चर्चा झाली; पण फार काही निष्पन्न होऊ शकले नाही. या चर्चांमधून विचार करण्यास मिळते त्याची मजा येते. इतरांचे विचार ऐकताना असे वाटते, की ‘अरे, असे पण असते? कमालच आहे !’ या सगळ्यासाठीही यावसे वाटते; पण रहदारी आणि येण्याचे अंतर बघून कंटाळा येतो. या सगळ्यामुळे पुढील वेळेपासून ऑनलाईन गच्चीवरच्या गप्पा घेण्याचे ठरवून टाकले. त्यासाठी थोडी तांत्रिक तयारी करावी लागली. पण अगदी प्राथमिक का होईना, ती केली आणि पुढील गप्पा ऑनलाईन घेतल्या.

तिसऱ्या आणि चौथ्या गप्पांचे विषय होते ‘माहेर’ आणि ‘सण व सेलिब्रेशन’. ‘माहेर’च्या वेळी असे लक्षात आले, की ‘माहेर’ हा शब्द म्हणजे भावनांचा एक गुच्छ आहे. त्यात ‘आई’, ‘माझे घर’, ‘माझी खोली’, ‘माझे गाव’ असे सगळे सुटे सुटे आणि एकत्र, असे दोन्ही आहे. काहींच्या मनात आधी ‘माहेर म्हणजेच आई’ असे समीकरण अनेक वर्षे होते. ते काही अनुभवांती पारच मोडून गेले. काहींचे तर आईशी कधी पटलेच नाही; त्यामुळे नवऱ्याबरोबर राहत असलेले, स्वतः उभे केलेले घरच माहेर वाटत होते. थोडक्यात, त्या चर्चेत निष्कर्ष असा निघाला, की माहेर म्हणजे मनाप्रमाणे जगता येईल अशी जागा. न बोलता समजून घेईल असे माणूस, उठणे-बसणे-खाणे-पिणे-कपडे-बोलणे-हसणे-रडणे-तक्रारी-गॉसिप, अतिउत्साह, नव्याने काही करून बघण्यास मदत आणि प्रोत्साहन हे सगळे म्हणजे माहेर. पुरुषांसाठी माहेर म्हणजे कोणत्याही जबाबदारीतून मुक्तता, सल्ला आणि सूचनांपासूनही मुक्ती, लहानपण पुन्हा जगता येण्याची मुभा, अशीही चर्चा झाली, की कितीही म्हातारे झाले, तरी माहेराची गरज काही संपत नाही, तर आपण एकमेकांचे माहेर होऊ शकतो का? तसा प्रयत्न करून बघण्याचे ठरले.

‘सण आणि सेलिब्रेशन’ या संबंधीच्या गप्पांमध्ये सण साजरे करताना जाती-पोटजाती-धर्म यांनी घालून दिलेले नियम पाळावे लागतात, पाळले जातात. त्यात नकळत एक दडपण असते. बायकांना त्यात कष्ट पडतात आणि वेळ-श्रम-पैसा खर्चला जातो. हल्ली सदा सर्वकाळ सर्व काही उपलब्ध असल्याने, सणांचे अप्रूप कमी झाले. पावित्र्य, मन:शांती गमावली गेली आहे आणि दिखावा, गोंगाट, व्यापारीकरण, उन्माद यांचे प्रमाण लक्षणीय रीत्या वाढले. जुने सोडवत नाही, नवीन सापडत नाही; आहे ते पटत नाही असा सगळा गोंधळ झाला या सणांच्या निमित्ताने. त्या मानाने ‘सेलिब्रेशन’ची आयडिया खूपच छान आहे. माझा आनंद, माझी आवड कोणाबरोबर? कसा? कधी? कोठे? याची निवड, सगळ्याचे स्वातंत्र्य असते तेथे. आनंद झाला म्हणून मला निवांत पाय लांब करून, काही न करता तो ‘सेलिब्रेट’ करायचा आहे, हे स्वातंत्र्यही त्यात अंतर्भूत आहे.

तर, ‘गच्चीवरच्या गप्पां’च्या चार एपिसोडचा थोडक्यात सांगितलेल्या हा वृत्तांत. कशी वाटते कल्पना? काही सुचवावेसे वाटते? यावेसे वाटते? तुमचा प्रतिसाद हवा आहे. बरा-वाईट, कसाही चालेल; कारण ‘गप्पा’च तर आवडतात ना ! जमल्यास ऑनलाईन भेटू.

– मनीषा सबनीस 9881253883 manisab05@gmail.com
——————————————————————————————

About Post Author

Previous articleओझे, शब्द आणि अर्थ यांचे (Loads of content and context)
Next articleसद्भावना संमेलन
मनीषा सबनीस यांचे शिक्षण बी कॉम, एलएल बी, एम ए (इकॉनोमिक्स), एम ए (फिजियोथेरपी), एम एससी (इन फिजियोथेरपी अॅण्ड काऊन्सिलिंग) असे झाले आहे. त्यांनी work life balance of bank employees या विषयात डॉक्टरेट पूर्ण केली आहे. त्या अल्बर्ट एलिस विद्यापीठा (अमेरिका)च्या ‘सर्टिफाईड काऊन्सलर’ आहेत. त्यांनी बँकेत उपमहाव्यवस्थापक म्हणून काम केले आहे. त्यांचा कवितासंग्रह प्रसिद्ध आहे. त्यांनी सदरे, लेख असे स्फूट लेखन केले आहे. त्या ‘मानसिकतेसह लैंगिकता’ या विषयावर महाराष्ट्रभर कार्यशाळा/व्याख्याने घेत असतात. त्यांचा टीव्ही-आकाशवाणीवरील देशाचे अंदाजपत्रक, अर्थ विषयक सरकारच्या योजना चर्चासत्रात सहभाग असतो. त्यांनी र.धों. कर्वे यांच्या ‘समाजस्वास्थ्य’ या मासिकाचे पुनरुज्जीवन केले आहे.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here