दापोलीचा प्रभुआळी उत्सव – परंपरेची मांदियाळी

1
157

प्रभुआळी हे दापोली शहराचे मध्यवर्ती ठिकाण. त्या आळीची ख्याती उत्सव, प्रथा-परंपरा यांचा वारसा जपणारा, गजबजलेला भाग म्हणून आहे. प्रभुआळी हे नाव पडण्याचे मुख्य कारण म्हणजे त्या ठिकाणी प्रधान व सुळे हे प्रभू म्हणजे सीकेपी ग्रामस्थ यांचे वास्तव्य होते. सध्या प्रभुआळीमध्ये कुणबी समाजाचे वास्तव्य प्रामुख्याने आहे. तरीही नाभिक, भंडारी, वाणी, तेली, ब्राह्मण, मराठा, सीकेपी, गुजर, कोष्टी, माळी अशी सर्व जातींची मंडळी एक कुटुंब म्हणून तेथे नांदत आहेत. त्याखेरीज आळीमध्ये परराज्यांतून म्हणजेच उत्तरप्रदेश, बिहार, झारखंड, राजस्थान, गुजरात, पश्चिम बंगालमधून आलेली मंडळी फार वर्षांपासून भाडे तत्त्वावर अथवा स्वतःच्या वास्तूंतही राहत आहेत. ती आळीतील सर्व उपक्रमांमध्ये हिरीरीने भाग घेत असतात. आळीत एकदोन बौद्ध परिवार व एक मुस्लिम परिवारदेखील वास्तव्यास आहे.

प्रभुआळी या नावाला तेथील ‘सीकेपी’ वास्तव्याच्या जुन्या संदर्भाखेरीज दुसरा महत्त्वाचा पदर आहे. तो म्हणजे आळीत असलेले ‘प्रभू’ श्रीरामचंद्राचे मंदिर ! साने गुरुजी यांच्या ‘श्याम’ नावाच्या पुस्तकात या राम मंदिराचा उल्लेख आहे. साने गुरुजी दापोली येथे शिक्षणासाठी साधारण 1912 च्या सुमारास होते. असा जुना संदर्भ राम मंदिराचा आहे. राम मंदिरामध्ये मूर्ती काळ्या पाषाणामधील होत्या. त्या जीर्ण झाल्यानंतर नवीन संगमरवरी मूर्तींची स्थापना करण्यात आली. मंदिरात विश्वस्त मंडळाची स्थापना 1953 ला झाली. राम मंदिर हे जुन्या गावातील सर्व उत्सव-परंपरांचे केंद्रस्थान होते.

प्रभुआळी सर्वदूर प्रसिद्ध आहे ती ऐक्यासाठी आणि खेळीमेळीच्या वातावरणासाठी. तेथील सण-उत्सवांचे महात्म्य जपले गेले आहे. गुढीपाडव्याला प्रभुआळीतील सर्व ग्रामस्थ त्यांच्या घरासमोर सजवलेली गुढी उभारून तिची पूजा करतात. घरोघरी गोडधोड नैवेद्य बनवला जातो. बहुतेक घरांमध्ये नैवेद्य हा पुरणपोळीचा असतो. गूळ व कडुनिंबाची पाने हा प्रसाद म्हणून घरातील सदस्यांना दिला जातोच. गुढी श्रीराम मंदिराबाहेरदेखील उभारली जाते. आळीमध्ये उंचच उंच गुढ्यांचे एकत्रित विहंगम दृश्य पाहण्यास मिळते. प्रभुआळीतील ग्रामस्थांच्या गुढीच्या काठ्या एकत्र करून श्रीरामनवमीच्या उत्सवाच्या सजावटीसाठी वापरल्या जात असत. पण मंदिर सजावटीचे प्रमाण गेल्या काही काळात एवढे वाढले, की काठ्या पुरेनाशा झाल्या. उत्सवाच्या सजावटीसाठी संपूर्ण प्रभुआळीमध्ये मंडप घातला जातो. गुढीपाडव्यापासून ते रामनवमीपर्यंत रोज विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. त्यामध्ये पूजा, कीर्तन, वारकरी कीर्तन, भजन, प्रवचन, हरिपाठ, भक्तिगीते, होम-हवन अशा कार्यक्रमांचा समावेश आहे.

श्रीरामनवमी हा प्रभुआळीवासीयांचा सर्वात मोठा उत्साहाचा सण आहे. त्याची तयारी दोन महिने अगोदर सुरू होते. आळीतील प्रत्येकजण स्वत:चा खारीचा वाटा त्या कार्यात उचलत असतो. तरुण मंडळी उत्सवाच्या सजावटीसाठी नक्षत्रमाळा, पताका, कमानी असे साहित्य रात्र-रात्र जागून तयार करतात. रामनवमीच्या उत्सवाच्या दिवशी दुपारी बारा वाजून एकोणचाळीस मिनिटे, या श्रीरामाच्या जन्मवेळेनंतर प्रभुआळीतील महिला मंडळाच्या सदस्य पाळणा म्हणतात.

त्यानंतर रामाची चांदीची मूर्ती पालखीमध्ये विराजमान होऊन भक्तांच्या भेटीला मार्गस्थ होते. मंदिरातून पालखी बाहेर पडताना त्यावर पुष्पवृष्टी केली जाते. भजन, पारंपरिक दिंडी, खालुबाजा, ढोल-ताशांचा गजर अशी वाद्यपथके मिरवणुकीतील पालखीसमोर शिस्तबद्ध रचनेत पुढे जात असतात. खालुबाजा हे कोकणचे वैशिष्ट्य. तो ‘बँड’ सण-समारंभामध्ये वाजवला जातो. त्यात टिमकी, सनई याचा वापर होतो !

पालखी प्रथम शहरातील पंचमुखी हनुमानाच्या भेटीला जाते. कोणीही भाविक रामाची व हनुमानाची भेट झाल्याशिवाय पालखीतील राममूर्तीची आरती करत नाही. ती पालखी पुढे ‘पूर्वजांनी दिलेल्या मार्गा’वर संपूर्ण शहरामध्ये दर्शनासाठी फिरवून रात्री एकच्या सुमारास पुन्हा श्रीराम मंदिराकडे वाजतगाजत आणली जाते. ग्रामस्थ पालखीसोबत अनवाणी चालत असतात. पालखीचे आळीमध्ये आगमन प्रथेप्रमाणे पायघड्या घालून केले जाते. त्या पायघड्या पालखी मंदिरात जाईपर्यंत अंथरल्या जात असतात. प्रभुआळीकर पालखी त्यांच्या घरासमोर आल्यावर सहकुटुंब रामाची आरती करतात. भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन जन्मोत्सवानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी लळिताचे कीर्तन पार पडल्यावर केले जाते. त्या उत्सवाकरता महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविक उपस्थित असतात. त्यामध्ये चाकरमान्यांचा समावेश असतो.

हरिनाम सप्ताहाची परंपरा शे-दोनशे वर्षांपासून सुरू आहे. ती श्रावण महिन्याच्या प्रतिपदेपासून सप्तमीपर्यंत सुरू असते. हरिनामाचे स्मरण सप्ताहभर अहोरात्र वीणा घेऊन केले जाते. रात्री भजन आणि वारकरी नृत्य करून जागवल्या जातात. आळीमधीलच भजनीबुवांचे सुश्राव्य भजन होते. प्रत्येक दिवसाची सांगता रात्री अल्पोपहाराने होते.

संगीत श्रीराम मेळा हे गोपाळकाल्याचे प्रमुख आकर्षण. त्या मेळ्यात आळीतील बालगोपाळांच्या कलागुणांना वाव देणारा नृत्याविष्कारांचा अनोखा कार्यक्रम सादर केला जातो. मेळ्याची तयारी पंधरा दिवस आधी सुरू होते. त्या दरम्यान पूर्ण आळी जणू गोकुळ होते ! प्रत्येक घरातून येणारे गाण्याचे आवाज, बालगोपाळांची दंगामस्ती, नोकरी-धंद्यावरून परतल्यावर घरातील कामे बाजूला ठेवून आधी नृत्य बसवण्यास धावणारी मंडळी… संगीत साथ करणारी मंडळी आणि दिवसरात्र गाण्याच्या आवाजाचा त्रास होऊनदेखील समंजसपणे सहकार्य करून मुलांचा जोश वाढवणारे असे उत्साही वातावरण आळीत असते. मेळ्यात पूर्वी प्रामुख्याने नमन, टिपरी नृत्य, गोफनृत्य, दीपनृत्य, कोळीनृत्य या नृत्यप्रकारांचा समावेश असे. पारंपरिक नृत्यांचा गाभा जपून कालानुरूप नवनवीन प्रकारच्या नृत्याविष्कारांचा त्यात समावेश केला जातो. त्या कार्यक्रमाची उत्सुकता एवढी असते, की परिसरातील आबालवृद्धदेखील कोणत्याही निमंत्रणाशिवाय त्यास आवर्जून उपस्थित राहतात.

श्रीकृष्ण जन्मोत्सवाचा कार्यक्रम रात्री ठीक बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी मंदिरात पार पडतो. आबालवृद्ध तो जन्मोत्सव खालुबाजाच्या गजरात फळी धरून नाचत साजरा करतात. दहीकाला उत्सवास प्रारंभ दुसऱ्या दिवशी मंदिराच्या आवारात होतो. आळीमधील सर्व हंड्या फोडल्यानंतर बालगोपाळ फळी धरून नाचत-गात, श्रीकृष्णाचा जयघोष करत शहरातील नेमून दिलेल्या मार्गावरील हंड्या फोडण्याकरता रवाना होतात. बनाटे, मुदगल जोडी असे प्रकार होतात. बनाटे/बाणा हा लाठीकाठीचा एक साहसी क्रीडाप्रकार आहे. त्यामध्ये मुख्यत्वे लवचीक बांबूच्या काठीचा (चार ते सहा फूट) वापर करतात. काठीच्या दोन्ही बाजूंस दोन लाकडी गोळे बसवलेले असतात. समोरून होणारे आक्रमण रोखण्यासाठी संरक्षणाच्या हेतूने त्याचा वापर होतो. मुदगल हे लाकडी गदेसारखे व्यायामाचे साहित्य आहे. त्यामध्ये शरीराच्या कमरेपासून वरील सर्व भागांचा व्यायाम होतो. काही वेळेला एक तर कधी दोन (जोडी) मुदगल डोक्याच्या वरून विविध प्रकारामध्ये एकदा घड्याळाच्या काट्यांच्या दिशेने व नंतर विरुद्ध दिशेने फिरवले जाते. हे मुदगल विशिष्ट वजनाचे बनवलेले असतात. जुन्या काळच्या मुदगलांमध्ये मध्यभागी तळाकडून छिद्र पाडून आतमध्ये शिसे भरले जाई. शरीराचा व मनाचा कस लावणारा हा कौशल्यपूर्ण व्यायाम प्रकार आहे. दांडपट्टा, मानवी मनोरे अशा चित्तथरारक कसरती आळीतील अबालवृद्ध सादर करतात.

गणेशोत्सवात बाप्पाचे आगमन झालेल्या घरी भजने केली जातात. तसेच, जाखडी नृत्य, गौरी नृत्य करून रात्री जागवल्या जातात. जाखडी नृत्य हे कोकणातील पारंपरिक समूह नृत्य असून त्यामध्ये एक- दोन गायक-वादक आणि कोरस देणारे हे गोलाच्या मध्ये बसतात. त्यांच्या एका पायात घुंगरू (चाळ) बांधलेले असतात. एका पायावर जोर देऊन हे नृत्य केले जाते. गायक गुंफलेल्या गाण्याच्या वेगवेगळ्या चाली सादर करतात. त्यामध्ये विशेषकरून कृष्णावर तसेच चालू घडामोडींवर भाष्य करणारी गाणी सादर केली जातात. गणपती या सणामध्ये गौरीचे आगमन झाल्यावर गावातील महिला एकत्र येऊन गौरी-गणपतीची गाणी म्हणत फुगड्या, जाखडी व इतर पारंपरिक सामूहिक नृत्ये करून रात्रभर जागरण करतात. गणपती सणाची विसर्जन मिरवणूक ही प्रभुआळीवासीयांची खासीयत आहे. आळीतील सर्व व्यक्ती उत्साहाने त्यात सहभागी होऊन टाळ-मृदंग-भजनाच्या तालावर, बाप्पाचा जयघोष करत बाप्पाला निरोप देतात. विशेष म्हणजे कर्णकर्कश्श ध्वनिक्षेपक, गुलाल अशा गोष्टींचा अतिरेकी वापर टाळल्यामुळे, त्यात आळीसोबत इतर भागातील पुरुष व महिला उत्स्फूर्तपणे सहभागी होतात.

प्रभुआळीच्या गणपती मंदिरातील श्री जोगेश्वरी मातेचा उत्सव नवरात्रात साजरा केला जातो. आरती, पूजा, भजन, रास दांडिया, गरबा यांसोबतच महिला, पुरुष, बालगोपाळ यांच्यासाठी विविध कला-क्रीडा अशा मनोरंजनात्मक स्पर्धा; तसेच, सामाजिक उपक्रम वेळोवेळी राबवण्यात येतात. त्यांमध्ये रक्तदान शिबीर, आरोग्य शिबीर, श्रमदान (वनराई बंधारे, स्वच्छता मोहीम), वृक्षारोपण, ज्येष्ठांचा सत्कार, विद्यार्थी गुण गौरव समारंभ, गरजू विद्यार्थ्यांसाठी आणि इस्पितळ रुग्णांसाठी वस्तू व निधी संकलन, बचाव कार्य करणाऱ्या गिर्यारोहकांना वस्तुरूप मदत, नाम फाउंडेशनला आर्थिक मदत अशा विविध सामाजिक उपक्रमांचा समावेश असतो. फुलांचा भोंडला नऊ दिवस प्रत्येकाच्या घरासमोर काढला जातो. भोंडला स्पर्धेचे आयोजन गणपती मंदिरामध्येदेखील केले जाते. आपट्याची पाने, म्हणजेच सोने लुटण्याची परंपरा विजयादशमीच्या दिवशी संध्याकाळी श्रीराम मंदिरात सुरू आहे. श्रीराम चरणी सोने अर्पण करून, एकमेकांस सोने देऊन शुभाशीर्वाद घेतले जातात. श्री गणपतीच्या मुख्य मंदिरामध्ये जोगेश्वरी मातेची मूर्ती छोट्याशा देवडीमध्ये स्थापित केलेली आहे. तिची नवरात्र उत्सवातील नऊ दिवस पंचोपचार पूजा केली जाते; तसेच, गाभाऱ्यामध्ये रोव व कलशपूजन केले जाते. देवीची आरती नवरात्र उत्सवातील नऊ रात्री केली जाते.

श्रीरामाची काकड आरती दसऱ्यानंतर कोजागिरी पौर्णिमा ते त्रिपुरारी पौर्णिमा या कालावधीत पहाटे म्हटली जाते. साने गुरुजी यांच्या ‘श्याम’ या पुस्तकात राम मंदिरातील काकड आरतीचा उल्लेख आढळतो. आळीतील काही मंडळी पूर्वी पहाटे तीन ते चार या ब्राह्ममुहूर्तावर मंदिरामध्ये येऊन घंटानाद करत असत. त्यामुळे प्रभुआळीतील ग्रामस्थ स्नान आटोपून मंदिरात वेळेत आरतीला उपस्थित राहू लागले. दिवाळीच्या पहाटे दापोली शहरातील अनेक भाविक काकड आरतीसाठी प्रभुआळीतील मंदिरात उपस्थित राहतात. दिवाळीपासून त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत मंदिर परिसर आकाश कंदील, पणत्या; तसेच, आकर्षक विद्युत रोषणाईने उजळून निघतो.

होळी हा सणदेखील प्रभुआळीत जोशात साजरा होतो. नऊ दिवस-रात्री घरोघरी फिरून केळंबा म्हणजेच होळीसाठी लाकूड, गवत गोळा केले जाते. आळीतील माळावर होळी लावली जाते. काही वर्षांपासून, लाकडांचा वापर कमी करून गवत, झावळ्या, पुठ्ठे, इतर काडी-कचरा यांचा वापर होळीत जाळण्यासाठी अधिक केला जातो. ते आळीकरांचे पर्यावरण संवर्धनाचे भान ! होळीच्या दहाव्या दिवशी सुरमाडाचे झाड शीत म्हणून तोडले जाते. शीत म्हणजे होळीच्या शेवटच्या दिवशीच्या होमासाठी तोडलेले झाड. ते शीत रात्री वाजतगाजत प्रभुआळीच्या हद्दीत नाचवले जाते. आळीमध्ये सुरमाडाच्या झाडाचे दोन शीत (एक लहानाचा व एक मोठ्यांचा) खांद्यांवरून एकत्रित नाचवले जातात. त्यामध्ये कोणत्याही विशिष्ट व्यक्तीचा अथवा घराचा मान नसतो. परंतु दोन्ही शीत होळीच्या माळावर पेटवण्यासाठी उभे केल्यावर आळीतील प्रथेप्रमाणे प्रधान कुटुंबातील सदस्य त्यांची विधिवत पूजा करतात. दोन्ही शीत हे त्याच प्रधानांच्या बागेतून तोडले जातात. त्या प्रधानांना आम्ही मालक प्रधान म्हणून संबोधतो.

शिमग्यामध्ये दापोलीची ग्रामदेवता श्रीदेवी काळकाईची पालखी प्रभुआळीकर मोठ्या भक्तिभावाने वाजतगाजत आणतात. ग्रामस्थ मंदिरामध्ये देवीची खणा-नारळांनी ओटी भरतात. पालखी तिच्या मुक्कामी त्यानंतर पुन्हा ढोलताश्यांच्या गजरात पोचवली जाते. रंगपंचमीही तितक्याच जल्लोषात साजरी केली जाते. हत्तीच्या प्रतिकृतीची मिरवणूक बैलगाडीमधून वाजतगाजत प्रभुआळी हद्दीतून काढण्याची प्रथा पूर्वापार आहे. राजेमहाराज, संस्थाने यांमध्ये ज्याप्रमाणे हत्तीची मिरवणूक पूर्वापार काढली जाई, तशीच ती प्रथा चालू असावी. ते प्रतिष्ठेचे द्योतक असावे. कोकणामध्ये बहुतेक ठिकाणी, मुख्यत्वे करून रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये अशा मिरवणुका काढल्या जातात. बालगोपाळ मंडळी एकमेकांवर रंग उधळून आनंद साजरा करतात. पाण्याचे दुर्भीक्ष्य लक्षात घेऊन; तसेच, घातक रासायनिक रंगांचे दुष्परिणाम टाळण्याकरता नैसर्गिक व सुके रंग उधळण्याची पद्धत आळीने स्वतःहून स्वीकारली आहे. श्रीराम ढोल ताशा ध्वज पथकाने त्यांचा ठसा राज्यस्तरापर्यंत उमटवलेला आहे.

– अंबरीश प्रकाश सणस 9960332370 ambarish.sanas@gmail.com

———————————————————————————————————————————————-

About Post Author

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here