जंगलचा कायदा ! अर्थात ‘जंगल का कानून’ (Laws of Jungle)

7
865

भाषा, संस्कृती, जात, धर्म, सरकार यांच्या बंधनाशिवाय, स्वातंत्र्याची खरी संकल्पना पाहण्यास मिळते ती फक्त जंगलामध्ये. जो दुर्बल आहे, जगण्यास योग्य नाही त्याला संघर्षात मरावे लागते. जो सबळ आहे, जगण्याला पात्र आहे त्याची भरभराट होते. या दोन महत्त्वाच्या निकषांवर चालणारे झाडा-झुडुपांचे, श्वापदांचे आणि इतर प्राण्यांचे राज्य – जंगलराज ! दुर्बल प्राणी दिसला की मोठे श्वापद त्याला मारून टाकते, हा चुकीचा भ्रम आहे. प्राणी भूक लागली असेल तरच शिकार करतात. त्यात हिंस्रता नाही हे समजून घ्यायला हवे. अशा शिकारीच्या वेळी इतर प्राणीमित्र श्वापदांच्या तावडीत सापडू नयेत, म्हणून विशिष्ट आवाज काढून धोक्याची सूचना देणारे प्राणी, झाडावर उंच जाऊन सकाळच्या वेळी झाडपाला तोडून हरणांची भूक भागवणारी माकडांची पलटण पाहताना, त्यांच्यातील एकोपा बघून विलक्षण चकित व्हायला होते. प्राणी, पक्षी, वृक्ष, कीटक एकत्र वाढताना, एकमेकांची काळजी घेताना, मदत करताना दिसतात. ते तिरस्कार म्हणून एकमेकांची शिकार करत नाहीत. स्वत:च्या स्वार्थासाठी निसर्गाच्या नियमांत बदल न करता एकत्र राहणाऱ्या या सोयरे सहचरांकडून माणसाला खूप काही शिकण्यासारखे आहे.

अपर्णा महाजन

———————————————————————————————————–

जंगलचा कायदा ! अर्थात जंगल का कानून (Laws of Jungle)

‘यहा जंगल का कानून नही चलेगा’, ‘जंगलराज’ किंवा कसला ‘जंगली’ माणूस आहे अशा संबोधनांनी जंगलांना आणि जंगलातील एकूणच व्यवस्थांना कोणी हिणवते, तेव्हा त्या माणसाच्या अज्ञानाची कीव करावीशी वाटते. खरे तर, जंगलांइतकी कायदा आणि सुव्यवस्था माणसांच्या दुनियेत क्वचितच पाहण्यास मिळते. मुख्य म्हणजे, जंगलातील हे कायदे-कानून गेली लाखो वर्षं अव्याहतपणे पाळले जातात. तेसुद्धा कोठलीही न्यायव्यवस्था, पोलिसदल किंवा राज्यकर्ते यांच्याशिवाय !

जंगलात माझ्याबरोबर पहिल्यांदाच येणाऱ्या बऱ्याच लोकांचा मला प्रश्न असतो, की तेथे आपण सुरक्षित आहोत ना? कोठल्या हिंस्र श्वापदाने आपल्यावर हल्ला केला तर? अशा वेळेस त्यांच्यासाठी माझे उत्तर ठरलेले आहे – ‘भारतातील कोठल्याही शहरातील रस्त्यांपेक्षा जंगलातील कोठलाही रस्ता अधिक सुरक्षित असतो’… आणि हे मी माझ्या गेल्या पन्नास वर्षांच्या जंगलभ्रमंतीनंतर सांगतो. खरे म्हणजे, ‘हिंस्र श्वापदे’ या शब्दप्रयोगालाच माझा विरोध आहे. हिंसा म्हणजे Violence. परंतु, जंगलातील कोठलाच प्राणी दुसऱ्या कोठल्याही  प्राण्याला सबळ कारणाशिवाय मारत नाही. म्हणजे, ते त्याचे भक्ष्य असते, त्याच्यापासून जिवाला धोका असतो किंवा त्याच्यापासून स्पर्धा असते. मात्र, केवळ एक खेळ म्हणून वाघाला मारणे किंवा फक्त मजा म्हणून उडणारे पक्षी बंदुकीने टिपणे, ही खरी हिंसा.

वस्तुतः, ‘बळी तो कान पिळी’ हा नियम माणसांच्या राज्यात असतो. प्राणी कितीही शक्तिशाली असेल, तरी तो गंमत म्हणून इतर प्राण्यांना कधीच मारत नाही. कारण तसे असते, तर हत्तीला जाता जाता किती तरी प्राण्यांना चिरडता आले असते किंवा मजा म्हणून वाघाला त्याच्या एका पंज्यात कित्येकांना लोळवता आले असते.

खरे तर ‘जंगलचा राजा’ असे पद अस्तित्वातच नसते. जंगलात वाघाला किंवा सिंहाला  कोठला वेगळा दर्जा नसतो. जंगलात उंदराला अन्न मिळवण्यास जेवढे कष्ट घ्यावे लागतात तेवढे, किंबहुना त्याहीपेक्षा जास्त कष्ट एखाद्या वाघाला किंवा सिंहाला घ्यावे लागतात. तो ‘राजा’ आहे म्हणून कोणी त्याला भक्ष्य मारून खायला आयते आणून देत नाही. आतापर्यंतच्या निरीक्षणांनुसार, वाघ भक्ष्याच्या शिकारीचा प्रयत्न करतो, तेव्हा तो साधारणपणे दहापैकी एकदाच यशस्वी होतो. म्हणजे, नऊ वेळा त्याचे श्रम वाया जातात. काही तज्ज्ञांच्या मते,  हे प्रमाण 20:1 इतके आहे.

वास्तविक, ‘स्पर्धा’ हा कोठल्याही नैसर्गिक परिसंस्थेचा अविभाज्य घटक आहे. जंगल परिसंस्थेत तर हे प्रकर्षाने जाणवते. मग ती स्पर्धा अन्नासाठी असेल, जागेसाठी असेल, पुनरुत्पादनासाठीच्या जोडीदारासाठी असेल किंवा वनस्पतींमध्ये पाणी आणि सूर्यप्रकाश यांसाठी असेल. किंबहुना, या स्पर्धेमुळेच जंगलातील प्रत्येक सजीवाला कायम सशक्त आणि सक्षम राहवे लागते. या स्पर्धेत टिकू न शकणारे मात्र नामशेष होतात. त्यांना कोठलीही सवलत किंवा मदत आयती मिळत नाही. त्यामुळे जंगलातील सर्व जीव नेहमी शारीरिक आणि मानसिक दृष्टींनी तंदुरुस्त दिसतात. पोट सुटलेले हरीण किंवा एका झाडावरून दुसऱ्या झाडावर उडी मारण्यास घाबरणारे माकड तुम्ही कधी तरी पाहिले का? दोन नरांमधील मादीसाठीची स्पर्धा तर इतकी तीव्र असू शकते, की कधी कधी ती एकासाठी अक्षरशः जीवघेणी ठरते. परंतु, त्या लढाईत जिंकलेल्या नरालाच मादी निवडते, कारण ज्याच्यापासून पुढील पिढी निर्माण होणार आहे, तो शारीरिक आणि मानसिक दृष्टींनी तंदुरुस्त असण्यास हवा ! खरे तर, भारतात पूर्वीच्या ‘स्वयंवर’ पद्धतीमागील हेतू हाच होता.

त्याचप्रमाणे, प्राण्यांइतकीच तीव्र स्पर्धा वनस्पतींमध्येसुद्धा दिसून येते. ती मुख्यतः जागा, पाणी, जमिनीतील क्षार आणि सूर्यप्रकाश यांसाठी असते. एखाद्या सदाहरित जंगलात जास्तीत जास्त सूर्यप्रकाश मिळवण्यासाठी प्रत्येक वृक्ष जास्तीत जास्त उंच वाढण्याचा प्रयत्न करतो. तर, काही वनस्पती वेगळ्या क्लृप्त्याही लढवतात. ‘स्ट्रँगलर फीग’ प्रकारचे वड-उंबरवर्गीय वृक्ष हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. त्या वृक्षांची फळे पक्ष्यांच्या विष्ठेतून एखाद्या उंच वृक्षाच्या फांदीवर पडतात. त्यांच्या चिकट आवरणामुळे ती तेथेच चिकटून राहतात आणि कालांतराने रुजतात.

असे एखादे रुजलेले रोप तेथेच वाढू लागते. त्याची मुळे जमिनीच्या दिशेने वाढतात आणि पर्णसंभार मूळ झाडाच्याही वर वाढू लागतो. साहजिकच, त्याला तेथे जास्त सूर्यप्रकाश तर मिळतोच, शिवाय जमिनीवरील पर्णभक्षक प्राण्यांपासून संरक्षणही मिळते. ह्या उपऱ्या झाडाची मुळे इतकी वाढतात, की ती मूळ झाडाच्या खोडाला अक्षरशः आवळून टाकतात. त्याच्या पर्णपसाऱ्यामुळे मूळ झाडाचा सूर्यप्रकाशही बंद होऊन कालांतराने ते झाड मरते. अर्थात, तेथे स्पर्धा तीव्र असली, तरी हाव मात्र निश्चितच नाही. ते झाड सूर्यप्रकाश अजून मिळावा म्हणून त्याच्या फांद्या आसपासच्या आणखी चार झाडांवर सोडत नाही.

खरे तर, ‘पोट भरलेला सिंह शांत झोपला आहे आणि त्याच्या शेजारून हरणे संथपणे चालत जात आहेत’ हे आम्ही जंगलात कितीदातरी पाहिले आहे. जवळ आलीच आहेत, तर अजून एक-दोन हरणे मारू या, असे सिंह कधी करत नाही.

दोन जीवांमध्ये दरवेळी अशीच स्पर्धा दिसते असे नाही. बऱ्याच वेळा दोन भिन्न जातींच्या प्राण्यांमध्ये किंवा वनस्पतींमध्ये ‘परस्परा साहाय्य करू’ हे तत्त्वही पाळले जाते. गायीच्या पाठीवर बसून तिच्या त्वचेमधील किडे खाणारे गायबगळे हे त्याचे उत्तम उदाहरण ! ह्यात दोघांचाही फायदा होतो. आपण मसाल्यात जे दगडफूल वापरतो, त्यात अशा प्रकारे बुरशी आणि शैवाल यांचे परस्परपूरक सहजीवन दिसते. बुरशी ही पाणी, क्षार आणि संरक्षण देते, तर शैवाल हरित द्रव्याच्या सहाय्याने अन्न तयार करून बुरशीला पुरवतात.

वन्य प्राण्यांमध्ये बालसंगोपनाचे आणि पिल्लांच्या प्राथमिक शिक्षणाचे नियम ठरलेले असून त्याच्या पद्धतीही ठरलेल्या आहेत. बऱ्याच सस्तन प्राण्यांमध्ये ती जबाबदारी मादीची असते, तर बऱ्याच पक्ष्यांमध्ये ते काम नर आणि मादी या दोघांचे असते. पिल्लांची योग्य ती काळजी घेतली जाते, पण त्यांचे फाजील लाड होत नाहीत. त्यांच्या बछड्यांना कोणापासून धोका आहे असे वाटल्यास वाघीण अतिशय आक्रमक बनते आणि पिल्लांच्या शत्रूशी, मग तो एखादा बलाढ्य वाघ असला तरीही; प्राणपणाने लढते. पण तीच वाघीण तिची पिल्ले साधारण अडीच वर्षांची झाली, की तिच्यापासून दूर करते आणि त्यांना पूर्णपणे स्वतःच्या जोरावर जगण्यास भाग पाडते. अर्थात, तोपर्यंत ती पिल्लांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठीचे सर्व शिक्षण देते. पण एखादे पिल्लू काही कारणांनी दुबळे असेल, तर त्याचे संगोपन ती चालूच ठेवत नाही. त्यामुळे या वयानंतर स्पर्धेत टिकू शकत नाहीत, ती टिकत नाहीत.

जंगलांमध्ये कचऱ्याची समस्या नसते, कारण तेथे अविघटनशील कचरा निर्माणच होत नाही. तयार होणाऱ्या विघटनशील कचऱ्याची विल्हेवाट लावणारी यंत्रणा अतिशय पद्धतशीरपणे काम करत असते. बिबट्या हरीण मारतो आणि त्यातील बराचसा भाग खाऊन टाकतो. उरलेली हाडे, त्वचा, केस, आतडी हे भाग खाण्यास आधी तरस  येतात. त्यांच्याकडून उरलेले भाग खाण्यास गिधाडे येतात. तरीही काही अगदी बारीक कण उरतात. त्यांचे विघटन जमिनीवरील बुरशी करते आणि शेवटी मातीतील जिवाणू करतात. अशा रीतीने तो परिसर स्वच्छ होतोच; पण मृत शरीरातील आवश्यक मूलद्रव्येही मातीत मिसळली जातात. जेणेकरून, वनस्पती आणि प्राणी यांना ती पुन्हा उपलब्ध होतात.

वास्तविक, अतिशय तीव्र, पण सशक्त स्पर्धा आहे, बालसंगोपनाचे आदर्श आहेत, कोठेही उच्च-नीच भाव नाहीत, प्रदूषण आणि कचरा समस्या नाही, खऱ्या अर्थाने ‘हिंसा’ म्हणता येईल अशी हिंसा नाही, हाव नाही की विनाकारण सवलती नाहीत, कायद्यांचे काटेकोर पालन आणि कडक शिस्त आहे, आनंदाने बागडणारी, दंगा-मस्ती करणारी पिल्ले आहेत आणि त्यांचे समर्थपणे संरक्षण करणारे पालक आहेत, अशा जंगलांकडे एक ‘आदर्श परिसंस्था’ ह्या दृष्टीनेच पाहण्यास हवे.

सध्या माणसांच्या जंगलात सुरू असलेल्या हिंसा, अराजकता, भ्रष्टाचार, इतर जीवांना ओरबाडण्याची वृत्ती, हाव, सत्तेचा माज आणि निसर्गसंहार हे सर्व बघता आपण जर ‘जंगल का कानून’ माणसांच्या राज्यात लागू केला नाही, तर आपला विनाश काही फार दूर नाही, असेच वाटते.

– डॉ. पराग महाजन 9371020638 mahajan.drparag@gmail.com

—————————————————————————————————————————

About Post Author

7 COMMENTS

 1. जिथे व्यवस्थाच नसते वा व्यवस्था असेल तर ती पाळली जात नाही तेथेच सरकार निर्मितीची आणि कायदे करण्याची गरज असते. निसर्गनिर्मित व्यवस्था जंगलात असल्यामुळे आणि व्यवस्थेचे पालन काटेकोरपणे होत असल्याने आणि व्यवस्थित पळवाटा काढण्याएवढी प्रगल्भ (भ्रष्ट)बुद्धी जंगलातील प्राण्यांमध्ये, वृक्ष वनस्पतींमध्ये अजिबात नसते. त्यामुळे कायदे विरहित काटेकोर व्यवस्था जंगलात असते.

 2. अतिशय उत्तम विवेचन केले आहे, खरंच जंगलातील पद्धती निसर्गनियमान्वये चालू असल्याने अतिशय व्यवस्थित आहे. मनुष्य निसर्गनियमांच्या विपरित चालत आहे म्हणून सगळी संकटं येत आहेत.

 3. फारच सुरेख लेख.
  जंगल..एक आदर्श परिसंस्था. अगदी खरं आहे.

 4. Live and let live हे सुखी सहजीवनाचे सहज-सोपे मर्म जंगलातील परिसंस्थेने अंगिकारतांना त्यालाच Fitest to survive या तत्त्वाची जोड देऊन ते भविष्यातील बहुविध आव्हाने पेलत शाश्वतही राहील याची काळजी घेतली. फक्त स्वतःच्या अनावश्यक फायद्यासाठी/स्वार्थ साधण्यासाठी तेथील सजीव कोणतीही कृती कटाक्षाने करीत नाहीत. या मती गुंग आणि विस्मयचकित करणाऱ्या ब्रम्हांडात मानवी अस्तित्व देण्यामागे सृष्टी कर्त्याने एक बुद्धिमान काळजीवाहू जीवाची पोकळी भरून काढली जाऊन ते परिपूर्ण होईल अशीच भूमिका नि:संशय ठेवली असणार. परंतु कालौघात मानवाने बुद्धीचा उपयोग स्वार्थ साधण्यासाठी  सुरू केला आणि सगळी गफलत सुरू झाली.
  कोणी कितीही शिकवले समजावले तरी मानव नावाचा प्राणी कधीना कधी सुधारेल आणि अलिखीत सृष्टी नियमांचे उल्लंघन करण्यापासून परावृत्त राहील ही अपेक्षा ठेवणे दिवसेंदिवस अवघड होत आहे. या पार्श्वभूमीवर डाॅ. पराग महाजनांसारख्या निसर्ग दूतांचे कार्य आणि योगदान खूपच मोलाचे आणि आश्वासक ठरते. अन्यथा Homo sapiens ही प्रजाती Endengered Species च्या वर्गवारीत जाण्याची वाट पहाणे येवढा एकच पर्याय मानवाचे अस्तित्व टिकवून धरण्यासाठी हाती शिल्लक राहणार की काय असा प्रश्न अनाठायी ठरत नाही.

  प्रमोद फाल्गुने,
  फ्लोरल सोजर्न इको टुरिझम सेंटर,
  नाशिक.

 5. पराग
  खुपच सुंदर लेख आहे. जंगल का कानून माणसांच्या राज्यात लागु करण्याची नितांत गरज आहे.

 6. आपल्या गरजे पेक्षा जास्त जमवणे हा रोग जंगलात नाही .त्या रोगाने मनुष्य जातीला पिडले आहे . हव्यास न करता जंगलाच्या कायद्याने राहणे जमले पाहिजे माणसाला , नाहीतर अवस्था बिकट होत जाईल अजूनच
  पराग , उत्तम लेख आणि फोटो नेहमीप्रमाणे !
  तुझ्या व्यासंगाला सलाम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here