गाव असे आणि कसे?

0
48
-heading-gaav

गावाला पूर्वी शीव असायची. गावातून बाहेर पडायला दरजा (दरवाजा) असायचा. गावाच्या आजूबाजूला कोट म्हणजे भिंत असायची. अथवा गावातील घरांची रचना अशी असायची, की घराच्या पुढील दारातून गावात प्रवेश व्हायचा तर मागील दारातून गावाबाहेर मळ्यात-खळ्यात वा प्रातर्विधीसाठी जाता येत असे. त्या व्यतिरिक्तह गावात कोठे कोठे‍ खिंडी असत. त्या खिंडींमधून पांदीने शेतात बैलगाडीतून जाता येत असे. गावात येणार्याा व्यक्ती ला गावात प्रवेश करण्यासाठी आणि गावाबाहेर जाण्यासाठी  गावाच्या मुख्य दरवाज्याचाच उपयोग करावा लागे.

 गावाची शीव वेगळी आणि दरजा वेगळा. गावाची शीव गावातून बाहेर पडूनही काही अंतरावर संपते. दरजा मात्र गावाला लागून-खेटून असे. गावाचा दरजा रात्री बंद करून दुसर्या  दिवशी सकाळी उघडला जायचा. गावाच्या बाहेर असे म्हणायचे झाले तर लोक ‘दरजाबाहेर’ असे म्हणायचे. उदाहरणार्थ, ‘दरजाबाहेर गारूडीना खेळ इयेल शे’ असा उल्लेख होई. गावाच्या त्या दरवाजाला ‘देवडी’ असेही म्हटले जायचे. 

प्रत्येक गावाला ‘पांढरी’ आणि ‘काळी’ नावाची जमीन असायची. गाव वसलेल्या आणि आजूबाजूच्या जमिनीला ‘पांढरी’ असे म्हणायचे, तर गावातील लोकांच्या मालकीच्या गावाच्या चहू बाजूंला असलेल्या शेतीला ‘काळी’ म्हटले जायचे. गावाच्या चौथ्या बाजूला शक्यतो नदी वाहायची आणि नदी हीच गावाची त्या बाजूची वेस ठरायची. गावाची काळी म्हणजे शेतजमिनीची हद्द. ती संपली, की शेजारच्या दुसर्याय गावाची वेस सुरू व्हायची.

आता, ग्रामीण भागात काही गावांमध्ये दरजाचे भग्न अवशेष दिसून येतात. अनेक गावे मूळ मुख्य गाव सोडून आडवी-उभी गावाबाहेर वाढली आहेत. अनेक गावांतील घरांसह रस्त्यांचेही काँक्रिटीकरण सर्वदूर झालेले दिसते. शेतीची काळी जमीनही नव्या इमारतींखाली दाबली जात आहे.

आख्खे गाव गावाला वळसा घातलेल्या कोट भिंतीच्या आत गुण्यागोविंदाने नांदायचे. गावांतर्गत अनेक गल्ल्या, वाडे असायचे. कुणबी गल्ली, माळी गल्ली, तेली गल्ली, वाणी गल्ली, धनगर गल्ली, तांबट गल्ली, सोनार गल्ली, पेठ गल्ली, तांबोळी आळी, मधली होळी, भोपळा चौक, चावडी, सुतार वाडा, कुंभार वाडा, लोहार वाडा, खालची आळी, वरची आळी, भिलाटी अशी अनेक नावे राजरोस उच्चारली जात; पोस्टकार्डावर पत्ता म्हणून लिहिली जात. त्या गल्ल्या-वाड्यांची नावे जातीयवादी दिसत असली तरी तशी ती जातीयवादी नव्हती; ती सामान्य नावे झाली होती. गावात जाती होत्या पण जातीयता नव्हती. गावातील गल्ल्या आणि वाडे एकमेकांना जोडण्यासाठी बोळ असत. बोळीने या गल्लीतून त्या गल्लीत जाता येत असे. पारंपरिक चुकीच्या समजुतीमुळे काही लोकांना कमी दर्ज्याचे समजले जाई. ते योग्य नव्हते. ती दरी काळानुरूप बुजली गेली. तेली तेलाची घाणी चालवायचा. कुंभार वाड्यात फिरत्या चाकावर मडके बनवली जाताना दिसत. सुतार चौकात करवत- हातोडी तर लोहार चौकात धामण- घणांचे आवाज ऐकू येत. शिंप्याच्या दारासमोरून जाताना शिवण्याच्या मशिनचा आवाज ऐकू यायचा. सोनाराची‍ पिटी पिटी सुरू असायची. अशा तऱ्हतऱ्हेच्या आवाजांमुळे गाव जिवंत वाटायचे.

-sanjvel-divabattiसंध्याकाळ झाली आणि कोणी घराचे दार लावू लागले, की लहानपणी वडीलधारी मंडळी पोरासोरांवर खेकसायची, ‘राहू देत नी रे कवाड उघडं. आता लक्षमी येवानी येळ जयी आनि तू कवाड आघे करी र्हायना. सांज जई का दार लाऊ नही भाऊ.’ सायंकाळी घरात लक्ष्मी येते हा समज. गावातील प्रत्येक घरात लक्ष्मी येते. लक्ष्मी म्हणजे धन, दौलत, बरकत वगैरे. खेडोपाडी विजेचे दिवे नव्हते. कंदील आणि चिमणी नावाचे लहान दिवे असत. त्यांच्या काचा रोज संध्याकाळी चुलीतील राखेने घासून फडक्याने स्वच्छ पुसल्या जात आणि मग चिपडे पडताच, म्हणजे दिवस जाताच घरोघरी ते दिवे लावले जात. त्या वेळेला ‘दिवाबत्तीची वेळ’ म्हणत. अशी अलिखित, पूर्वपरंपरेने चालत आलेली आचारसंहिता होती ती.

गावात आड असत. घरोघरी नसले तरी प्रत्येक पंधरा-वीस घरांमागे एक आड असायचाच. घराच्या मागच्या दारी आड खोदला जायचा. जमिनीत चाळीस-पन्नास हात खोल जाताच आडाला पाणी लागायचे. आडाची रूंदी चार बाय चार हात अथवा तीन बाय तीन हात असायची. त्या रूंदीला कडे म्हटले जायचे. आड धसू नये म्हणून बांधून घेतला जायचा. तो खालून वरपर्यंत गोल आकाराने दगड आणि चुना यात बांधावा लागायचा. लाकडी रहाट आडाच्या वर बसवले जायचे. त्यासाठी सुताराकडून आडाच्या काठावर दोन तिरपे खांब उभे केले जायचे. खांबांच्या वरच्या टोकाला छिद्रे पाडून, त्या छिद्रातून आडवा लोखंडी आस टाकत. त्या आसात रहाट ओवले जायचे. आडात एखादा प्राणी वा लहान मूल पडू नये म्हणून आडाच्या तोंडावर चौकट टाकून लावण्या- उघडण्याच्या फळ्या बसवल्या जायच्या.

हे ही लेख वाचा-
निसर्गाने वेढलेले देवरुख
राजुरी गावचे रोजचे उत्पन्न, वीस लाख !

काही आड उन्हाळ्यात आटायचे. तेव्हा आड कोरावा लागायचा. गावात एक-दोन जण आड कोरणारे, आड खोदणारे असायचेच. ते आडात उतरून आडात साचलेला गाळ काढायचे. गावात होते ते आड आता बुजले गेले. म्हणजे लोकांनी स्वत:हून त्यांचे आड मातीने बुजवून टाकले. गावागावात ‘वॉटर सप्लाय’ आले, जरी ते वेळेवर वॉटर सप्लाय करत नाही. कोठे कोठे हातपंपही पाहण्यास मिळतात. ते उपसून पाणी वर येईलच याचीही शाश्वती राहिली नाही.

गाव तेथे चावडी असायचीच. चौ – वाडी म्हणजे चारचौघेजण जमण्याचे ठिकाण ते चावडी (चव्हाटी- चावडी). चावडीवर पंचायत भरायची. पंचायत बोलावणे म्हणजे गावातील लोकांची बैठक. चावडीवर गावातील प्रश्न सोडवले जात. वार्षिक भाडे मिळवण्यासाठी सार्वजनिक मालमत्तेचे काही लिलावही चावडीवर व्हायचे. गावात दवंडी देऊन चावडीवर लोकांना बोलावले जाई. गावाच्या भल्यासाठी निर्णय घ्यायचा झाला तर गावातील चावडीवर लोक जमत.

गावगाड्याचा सर्व प्रकारचा कारभार चावडीत होत असे. चावडीवर नुसते सरकारी व सार्वजनिक व्यवहारच होत नसत. खाजगी वाद, भानगडीसुद्धा चावडीवर येत आणि ते वाद पो‍लिसपाटील सोडवत असे. जातपंचायत म्हणजे चावडी नव्हे. चावडी ही शासकीय यंत्रणेची व्यवस्था होती.

आमच्या गावात चावडी नावाचे विशिष्ट स्थळ अजूनही सुरक्षित – शाबूत आहे. चावडीजवळ असणारी ग्रामपंचायत दुसरीकडे गेली आहे. पंचायतीची ती खोलीवजा वास्तू काही काळ धर्मशाळा म्हणूनही कार्यरत होती. -aad-vihirधर्मशाळा कालबाह्य झाल्या. एखादी वास्तू धर्मशाळा म्हणूनही अस्तित्वात ठेवली तरी तिचा उपयोग कोणी करणार नाही. (पूर्वी, लोक धर्मयात्रा करण्यासाठी लांबच्या प्रवासाला निघत. दरम्यान रात्री जे गाव रस्त्यात लागेल‍ तेथील धर्मशाळेत तसे प्रवासी विश्राम करत. सकाळ होताच त्यांचा पुढील प्रवास सुरू करत). धर्मशाळेत मध्यंतरी हायस्कूलचे वर्गही भरत होते. हायस्कूलची स्वतंत्र इमारत झाल्याने ती खोली भग्न अवस्थेत गेली.

चावडीवर कडुलिंबाची भलीमोठी चार झाडे अजूनही आहेत. म्हणजे गल्लीच्या एका बाजूला दोन व दुसर्या बाजूला दोन. म्हणून तेथे कडुलिंबाच्या चार झाडांचा चौरस तयार झाला. झाडांवर अधून मधून हवापालट म्हणून रानावनातून वांदरे येऊन राहायची. माकडांची गंमत पाहण्यासाठी गावातील पोरेबाळे चावडीत जमा व्हायची. कोणाच्या घराजवळ माकड आले तर घरांतून त्याला काही खायलाही दिले जाई.

झाडांखाली घनदाट सावली असायची – अजूनही असते. म्हणून किरकोळ विक्रेते त्यांची दुकाने त्या सावलीत थाटत. कल्हईवाला, बुढ्ढीचे बालवाला, चप्पल सांदणारे चर्मकार लोक तेथे येऊन बसायचे. गावाच्या वरच्या बाजूला राहणार्याढ कोकणा पाड्यातून काही बाया चावडीजवळ करवंदे, आवळा, पेरू, जांभूळ, सीताफळ, चिंचा, बोरे, टेंभरे, अंजीर विकण्यास येत असत. ती फळे अन्नधान्याच्या बदल्यात मिळायची.

 – डॉ. सुधीर रा. देवरे 9422270837
drsudhirdeore29@gmail.com

About Post Author

Previous articleव्यवसायनिष्ठ बोली – मराठीवर आघात?
Next articleसांकेतिक बोली-गूढतेची गंमत
डॉ. सुधीर राजाराम देवरे (विद्यावाचस्पति - एम. ए., पीएच. डी.) हे भाषा, कला, लोकजीवन, लोकसंस्कृती आणि लोकवाङ्मय यांचे अभ्यासक आहेत. त्‍यांची साहित्य, समीक्षण, संशोधन आणि संपादन अशा विविध क्षेत्रांत मुशाफिरी चालते. देवरे हे अहिराणी भाषेचे संशोधक असून त्‍यांनी अहिराणी लोकसंचितावर लेखन केले आहे. ते 'ढोल' या अहिराणी नियतकालिकाचे संपादक आहेत. ते 'महाराष्ट्र राज्य लोकसाहित्य समिती'सोबत सदस्‍य रुपात कार्यरत आहेत. त्‍यांचा 'डंख व्यालेलं अवकाश' हा कवितासंग्रह तर, 'आदिम तालनं संगीत' हा अहिराणी कवितासंग्रह प्रसिद्ध आहे. त्‍यासोबत त्‍यांचे 'कला आणि संस्कृती : एक समन्वय', 'पंख गळून गेले तरी!', 'अहिराणी लोकपरंपरा', 'भाषा: अहिराणीच्या निमित्ताने', 'अहिराणी लोकसंस्कृती', 'अहिराणी गोत', 'अहिराणी वट्टा' असे लेखन प्रसिद्ध आहे. देवरे यांच्‍या लेखनास महाराष्ट्र शासनाच्‍या उत्कृष्ट वाङ्मय निर्मितीच्‍या पुरस्‍कारासह इतर अनेक पुरस्‍कार मिळाले आहेत. लेखकाचा दूरध्वनी 9422270837, 02555-224357