विसापूर – दापोलीच्या छायेत

0
631

माझे विसापूर म्हणजे गुणवत्तेची खाण ! निसर्ग आणि मनुष्यसंपत्ती- दोन्हींची श्रीमंती. गाव दापोली तालुक्याहून मंडणगडकडे जाताना लागते. एकीकडे दापोली व दुसरीकडे खेड, हे दोन्ही तालुके प्रत्येकी बावीस किलोमीटरवर येतात. मंडणगड तालुका अठरा किलोमीटरवर तर महाड तालुका बत्तीस किलोमीटरवर आहे. म्हणून माझे गाव मध्यवर्ती ठिकाण.

गावाची रचना म्हणजे मध्यवर्ती विसापूर व सभोवताली नऊ वाड्या. नऊ वाड्यांची नावे अशी- पाथरीकोंड, खातलोली मोरेवाडी, खातलोली बौद्धवाडी, विश्रांतीनगर, समशेरअल्ली नगर, बौद्धवाडी, बेंद्रेवाडी व रोहिदासवाडी. ग्रामपंचायत विसापूर येथेच आहे. विसापुरात दोनतीनशे घरे असावीत. सध्या नऊ वाड्या मिळून एक हजार पाचशे एक्याण्णव एवढी लोकसंख्या आहे. विसापूर गावामध्ये सर्व धर्मीय लोक आनंदाने एकत्र राहतात. गाव महामार्गापासून सुमारे तीनशे मीटर अंतरावर वसले आहे. गावाभोवती चहुबाजूंनी हिरवेगच्च डोंगर आहेत, गावातून कालवा काढलेला असावा अशी नदी वाहते. सह्याद्रीच्या कुशीत, निसर्गाने मुक्तहस्त उधळण असे जे वर्णन दापोली तालुक्याचे केले जाते त्याचा प्रत्यय या परिसरात येतो.

विसापूर गावामध्ये सुधारणासुद्धा चांगल्या झालेल्या दिसून येतात. विसापूरच्या एसटी स्टँडपासून प्रत्येक वाडीत जाण्यासाठी सुसज्ज रस्ते आहेत. एसटी स्टँडपासून सर्व वाड्या दोन ते तीन किलोमीटर अंतरावर आहेत. मात्र एसटी सेवा नाही. पण प्रवासी रिक्षा असतात. वेळोवेळी आलेल्या सर्व सरकारी योजना गावाच्या विकासासाठी राबवल्या जातात. त्यामुळे घरोघरी नळांना पाणी आले, गावागावात रस्ते आले, पायवाटा तयार झाल्या. गावात सुख जाणवू लागले. बायका रहाटगाडग्यातून सुटल्या.

विसापुरात शेती- भातशेती हे उपजीविकेचे मुख्य साधन आहे. आधुनिकतेमुळे भातशेतीवर अनिष्ट परिणाम होत आहे. शेतकरी वर्ग नाचणी, वरी, भाजीपाला, पालेभाजी, फळे अशी छोटीमोठी पिके घेतात. स्थानिक हवामान त्यास पोषक असेच आहे. भातशेती प्रामुख्याने पावसाळ्यात होते. बहुतांश वाड्यांमध्ये किराणा मालाची घाऊक व किरकोळ दुकाने आहेत. विसापूर गावामध्ये आईस्क्रीम फॅक्टरी, सौंदर्यप्रसाधने बनवणारी कंपनी, खडी क्रशर व कात व्यवसाय असे उद्योगधंदे आढळून येतात. त्यानंतर किराणा मालाची दुकाने व हॉटेल्स, मच्छी व्यवसाय व कुक्कुटपालन व्यवसाय, सुतारकाम, वेल्डिंग व्यवसाय, केशकर्तनालये, पिठाची गिरण, मसाला गिरण, रेशन दुकान व अवैध धंदा दारूभट्टी असे विविध उद्योगधंदे दिसून येतात. तसेच दवाखाना, आरोग्य केंद्रे, पशु-वैद्यकीय दवाखाना या सोयी उपलब्ध आहेतच. त्यातूनच गाव उद्योगनगरी म्हणून उदयास येत आहे.

प्रत्येक वाडीमध्ये अंगणवाडी व चार वाड्यांमध्ये इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंत शाळा आहे. पुढील शिक्षणासाठी पालगड, दहागाव किंवा आमगे येथे दहावीपर्यंत शिक्षणवर्ग चालू असतात. विसापूर गावामध्ये दहावीपर्यंत शिक्षण असलेले उमे खतिजा इंग्लिश मीडियम स्कूल आहे. त्या ठिकाणी मुस्लिम मुले/मुली शिक्षण घेतात. त्यानंतर तालुक्याच्या ठिकाणी महाविद्यालये आहेत. विद्यार्थ्यांना प्रवासासाठी एसटी सेवा उपलब्ध आहे. तालुक्याच्या ठिकाणी इतरही निरनिराळे अभ्यासक्रम असतातच.

विसापूर विश्रांतीनगर येथे भैरीदेवाचे स्थान आहे. दरवर्षी शिमग्याच्या दरम्यान मोठा उत्सव जामगे गावामध्ये खेळीमेळीच्या वातावरणात होतो. त्या ठिकाणी पाच पालख्या व सहा काठ्या वाजतगाजत भक्तांच्या उपस्थितीत येतात. खातलोली मोरेवाडी येथेसुद्धा कालकाईदेवीचे स्थान आहे. तीही पालखी जामगे गावामध्ये शिमगा महोत्सवासाठी उपस्थित असते. पाथरीकोंड येथे पाथराजाईचे स्थान आहे. मोरेवाडी, विश्रांतीनगर व पाथरीकोंड या ठिकाणी हनुमानाची मंदिरे आहेत. जयंतीच्या वेळी उत्सव साजरा होतो. रोहिदासवाडी येथे साईबाबांचे मंदिर आहे. मे मध्ये त्या ठिकाणी उत्सव साजरा होतो. बौद्ध विहार दोन वाड्यांमध्ये आहेत. त्या ठिकाणी बुद्ध व आंबेडकर जयंती साजरी होते. समशेर अल्ली नगरमध्ये मुस्लिम धर्माची मशीद आहे. त्या ठिकाणी ईद, ऊरूस असे सण साजरे होतात. प्रत्येक वाडीवर त्या त्या ठिकाणच्या देवाचे उत्सव पारंपरिक पद्धतीने आनंदाच्या वातावरणात साजरे होतात. कीर्तने, नाचाचे सामने, भजन, लहान मुलांचे कार्यक्रम व भाविकांना प्रसादाचा कार्यक्रम हा क्रम प्रत्येक वाडीने ठरवल्याप्रमाणे साजरा होतो. शिमगोत्सवाची धमाल आहे खूप न्यारी देवाची पालखी येते घरोघरी – असाच भाव ग्रामस्थांच्या मनामध्ये असतो !

प्रत्येक वाडीत गणपती उत्सव पारंपरिक पद्धतीने साजरा होतो. घरोघरी गणपती व गौरीचे पूजन केले जाते. विसर्जनावेळी ढोल-ताश्यांच्या गजरात वाजत-गाजत बाप्पाची व गौराईची मिरवणूक काढली जाते. जे कोणी गावकरी कामानिमित्त बाहेरगावी असतात ते सर्वजण गणपती, शिमगा या सणांला उपस्थित असतात. नवरात्रीमध्ये नऊ दिवस देवीचा जागर केला जातो. तेव्हा असंख्य भाविक दर्शनासाठी येतात. गावामध्ये प्रत्येकाचे पोशाख हे प्रत्येक वाडीमध्ये होणाऱ्या कार्यक्रमावर ठरलेले असतात. साधा शर्ट-पँट किंवा झब्बा-कुर्ता आणि महिलांसाठी साडी. साधी राहणी व उच्च विचारसरणी ! वरिष्ठ मंडळी सांगतील त्या पद्धतीने सर्व कार्यक्रमांचे नियोजन होते. तरुण वर्गासाठी भात कापणीनंतर प्रत्येक वाडीमध्ये क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले जाते. त्यात तरुण वर्ग व गावातील मंडळी सहभागी होऊन स्पर्धा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडतात.

विसापूर गावापासून नऊ किलोमीटरवर शंकराचे स्थान- ‘देवाचा डोंगर’ आहे. ते ठिकाण उंच डोंगरावर नयनरम्य आहे. ते शासनाने पर्यटनस्थळ म्हणून घोषित केले आहे. त्या ठिकाणी रायगड व रत्नागिरी हे दोन जिल्हे आणि दापोली, मंडणगड, खेड व महाड हे चार तालुके- यांच्या सीमा एकत्र मिळतात. त्या ठिकाणी महाशिवरात्र व श्रावण महिन्यात भाविकांची गर्दी असते.

दर मंगळवारी आठवडा बाजार एसटी स्टँडजवळ भरतो. त्या ठिकाणी सुकी मच्छी, ओले मासे, भाजीपाला, कपडे, भांडी, मुलांची खेळणी व स्त्रियांच्या अलंकारिक वस्तू यांची विविध दुकाने पाहण्यास मिळतात. कोर्ट-कचेरीची कामे, सरकारी कामे, अत्यावश्यक रूग्ण ह्यांसारख्या सोयींसाठी दापोलीमध्ये जावे लागते. ग्रामपंचायतीमध्ये सोसायटी, तलाठी कार्यालय व पशुवैद्यकीय दवाखाना आहे. ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच, उपसरपंच व सदस्य असे एकूण नऊ जण कार्यरत आहेत. त्यांच्या जोडीला ग्रामसेवक व नोकरवर्गसुद्धा कामासाठी असतो. वेळोवेळी आलेल्या सर्व सरकारी योजना गावाच्या विकासासाठी राबवल्या जातात. त्यामुळे घरोघरी नळांना पाणी आले, गावागावात रस्ते आले, पायवाटा तयार झाल्या. गावात सुख जाणवू लागले. बायका रहाटगाडग्यातून सुटल्या.

काही लोक शिक्षण पूर्ण करून चांगल्या पदावर कार्यरत आहेत- डॉक्टर, इंजिनीयर, शिक्षक, पुढारी असे. पण ते बाहेरगावी देशात-विदेशात आहेत ! ते यशस्वी काम करताना दिसतात. मात्र त्यांना त्यांची जन्मभूमी असणाऱ्या विसापूरचा अभिमान वाटतो. लोक गरिबीतून वर आलेले, सुविधांची कमतरता, तुटपुंजे उत्पन्न यांसह जगणारी जनता… तिने न डगमगता आलेल्या परिस्थितीला तोंड देऊन गाव आधुनिक घडवले. माझे गाव डौलाने स्थिरावलेले दिसते. मीसुद्धा ह्याच गावामधला, माझी जन्मभूमी आणि कर्मभूमी हीच. माझा छोटासा दवाखाना विसापूर येथे बावीस वर्षे अखंडित चालू आहे. मला ज्या मातीने घडवले त्या मातीचे ऋण फेडण्याची संधी मला मिळाली आहे. ह्या मातीमधील रंग, गंध, स्पर्श; एवढेच नव्हे तर पंचभूमीचे संस्कार… यांमुळे विसापूरची ही गाथा लिहिताना माझा ऊर भरून येत आहे, आनंद होत आहे. विसापूर हे नाव माझ्या लेखी कोठेतरी अजरामर होताना दिसत आहे.

‘विसापूरची किती गाऊ मी ओवी
गाव आहे आमचं लय भारी.
इथे नांदत आहे सर्वधर्मसमभाव जरी
सुखदुःखात साथ देतात एकमेकांना प्यारी.
सण-उत्सव आनंदाने पार पाडतात बरी
अशी आहे आमच्या विसापूरची थोरवी.’

– बिपीन माधवदास शहा 9226268679

———————————————————————————————-

About Post Author

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here