तपस : आई-बाबांचे दुसरे घर (Tapas : My Parents’ Second Home)

8
1034

आई-वडील वृद्ध झाले आणि ती दोघेच राहत असतील तर त्यांच्या काळजीने मुलींचा जीव व्याकूळ होणारच ! पण त्यांना त्यांचा संसार असतो, संसारातील चढउतार पार करताना, आई-बाबांकडे जसे लक्ष देण्यास हवे तसे लक्ष मुलगा-मुलगी देऊ शकत नसल्याने त्यांच्याही मनाची उलघाल होत असते. त्यांना घर सोडून दुसरीकडे ठेवावे का? या अनुच्चारित प्रश्नामुळेदेखील मन अपराधाने खात राहते. अशा प्रसंगी निर्णय काय घ्यावा? कसा घ्यावा?

मी अशा मनस्थितीतून गेलेल्या ममता महाजन हिला म्हणाले, की ‘ही फक्त तुझी एकटीची मनोवस्था नाही. आपल्याला जितके वैयक्तिक वाटते, तितके ते सगळ्यांचे असते हे तत्त्व तुला माहीत आहे. तू तुझ्या परिस्थितीबद्दल लिही.’ यावर, ती घेत आहे तो निर्णय योग्य घेत आहे ना? याची तिला खात्री वाटत नव्हती. त्यात समाज, नातेवाईक अशा सगळ्यांना काय वाटेल अशा अपराध भावनेची भीती तिच्या मनास भेडसावत होती. तिने खूप विचारांती निर्णय घेतला आणि ममता व तिची बहीण यांच्या आयुष्यात आनंदाचे दिवस आले; अपराधाची भावना कोठल्या कोठे निघून गेली ! ममता महाजन यांनी लिहिलेला त्यांचा हा अनुभव अशा द्विधा मनस्थितीत असलेल्या अनेकांना विचार करण्यास मदत करेल. ‘सद्भावनेचे व्यासपीठ’ या सदरातील लेख वाचण्यासाठी सोबतच्या लिंकवर क्लिक करावे.

– अपर्णा महाजन

—————————————————————————————————————-

तपस : आई-बाबांचे दुसरे घर

माझ्या घरातील वातावरण अभ्यासू आणि वैचारिक होते. बाबा प्राध्यापक, तर आई गृहिणी- गरजू मुलांना शिकवणारी. आम्हा दोघी बहिणींना कोठलाही निर्णय घेताना तो विचारचर्चा करून घेण्याची सवय अंगवळणी पडली होती. त्यामुळे मानसिक क्लेश न होता; तसेच, योग्य निर्णय घेतला जातो आणि उपायांचा पाया मात्र भक्कम असतो.

कोरोनाच्या पहिल्या लाटेत माझ्या आईचा स्मृतिभ्रंश खूप वाढला, तिच्यावर उपचार करणारे डॉक्टर आखेगावकर म्हणाले, की “तिला आता औषधांपेक्षा वातावरणबदलाची गरज जास्त आहे. एरवी, घरी तिच्या मदतीला येणाऱ्या सर्व जणी आणि फिजिओथेरपिस्ट सर्वजण लॉकडाऊनमुळे येऊ शकत नव्हत्या. आईला पार्किन्सनचे निदान 2018 मध्ये झाले. तेव्हापासून त्या सगळ्यांनी तिला खूप आधार दिला होता. ते तिचे कुटुंबच झाले होते ! परंतु कोरोनामुळे ते एकदम विस्कळीत झाले. तिच्यासाठी मदतनीस बाई ठेवणे शक्य नव्हते. तिला डॉक्टरकडे नेता येत नव्हते आणि तेही तिला तपासण्यास घरी येऊ शकत नव्हते. डॉक्टर तशा स्थितीत फोनवरून उपचार सुचवत होते. आम्ही आईची काळजी घेत होतो, पण तिची तब्येत रोज बिघडत होती. ती आम्हाला ओळखेनाशी झाली. तिची स्मृती तिच्या आयुष्याच्या कोठल्या तरी काळात अडकली होती. त्यामुळे ती तेथेच रमत असे.

मी आणि माझी अमेरिकेतील धाकटी बहीण समता, आम्ही त्या परिस्थितीसाठी उपाय शोधू लागलो. आई-बाबांना ठाण्याच्या माझ्या घरी नेणे कोरोनामुळे शक्य नव्हते. वास्तविक, आईसारख्या रुग्णांकरता कोरोनामध्ये अशी कोठलीच जागा सुरक्षित वाटत नव्हती आणि आम्हाला आगीतून फुफाट्यात पडायचे नव्हते. पण, समस्या जन्माला येण्याआधी त्यावरील उपाय जन्माला आलेला असतो असे म्हणतात. ‘तसे देवदूत’ संकटग्रस्त माणसाच्या मदतीसाठी तयार असतात ! खरे तर, ही जाणीव हा लेख लिहित असताना झाली.

मी या समस्येबाबत माझे मार्गदर्शक ठाण्याचे डॉ. आनंद नाडकर्णी आणि डॉ. शुभा थत्ते यांच्याशी बोलले. त्या दोघांनीही मला ‘तपस’च्या प्राजक्ता वढावकर यांचे नाव सुचवले. प्राजक्ता वढावकर यांनी पुण्यात जेष्ठ नागरिकांसाठी ‘तपस’ संस्था 2016 साली सुरू केली. निवासी सेवा घर असे त्या संस्थेचे स्वरूप आहे. तेथे शंभराहून अधिक ज्येष्ठ नागरिक राहत आहेत. ज्येष्ठ नागरिकांची शारीरिक, मानसिक आणि भावनिक काळजी घेणे हे तत्त्व ‘तपस’मध्ये जपले जाते. वृद्धांना अल्झायमरसारखे मानसिक आजार असतात. तशा व्यक्तींची सर्वतोपरी काळजी घेणे हे ‘तपस’चे वैशिष्ट्य आहे. वानप्रस्थ, Active Ageing Center मध्ये मनोरंजन, शिक्षण, सामाजिक आदानप्रदान आणि औषधोपचार ह्यांवर लक्ष दिले जाते. तेथे अनेक डॉक्टर्स, सामाजिक कार्यकर्ते आणि मदतनीस अशी टीम असते. ती सगळ्यांची काळजी घेते. ‘तपस’च्या बालेवाडी आणि औंध अशा दोन शाखा आहेत.

हे समजल्यावर मी ‘तपस’ला भेट दिली. प्राजक्ता यांनी आमच्या मनातील सर्व शंकांचे निरसन केले. डॉक्टर आखेगावकर यांनी बाबांबद्दल वैद्यकीय दृष्ट्या सगळी माहिती सांगितली. सुरुवातीला, ते बाबांच्या वयाचा विचार करून त्यांना तेथे ठेवण्यास तयार नव्हते. अचानक घर सोडून, कधी न पाहिलेल्या जागी राहण्यास जाणे हे त्यांच्यासाठी अवघड असले, तरी त्यांनी हट्ट न करता तो पर्याय स्वीकारला. आम्ही घरी सांभाळण्याचे आणि ‘तपस’मध्ये ठेवण्याचे फायदे-तोटे यांचा एक तक्ता बनवला. आमची पूर्ण खात्री झाल्यावर आठ दिवसांत आम्ही आईबाबांना ‘तपस’मध्ये राहण्यासाठी दाखल केले.

आम्ही असा सगळा विचार केलेला असला तरी मनामध्ये अपराधी वाटत होतेच. हा निर्णय कितपत यशस्वी होईल याची भीती मनात होती. पण मनोमन खात्री वाटत होती, की हा निर्णय विशेषत: आईच्या स्वास्थ्यासाठी योग्य आहे. आम्ही तिला चार महिने घरी सांभाळूनही काहीच साधले नव्हते. तिचा आजार आटोक्यात येणे तर महत्त्वाचे होते. तसेच, तिला कोरोना होऊ नये याची खबरदारी घेणेही आवश्यक होते. कारण ती कॅन्सर-रुग्णदेखील होती. हा सगळा विचार केला, की मन स्थिर होई.

आई-बाबांना ‘तपस’मध्ये सोडल्यावर, त्यांना तेथे पूर्ण विश्वासाने ठेवले आहे, हा विचार मनात पक्का केला. तेथे त्यांची देखभाल करण्यास डॅाक्टर्स, नर्सेस, तरुण प्रशिक्षित वर्ग अशी मोठी फळी होती. आम्हाला कोरोनामुळे त्यांना भेटण्याची परवानगी नव्हती. तेथील सगळे आजी-आजोबा कोरोना असूनही ‘मास्क’शिवाय होते, ही बाब सुखावह होती. तेथे ज्येष्ठ मंडळींची देखभाल कुशलतेने केली जात होती.

‘तपस’मधील संबंधित डॉक्टर पाटील यांच्याशी आठवड्याभराने बोलणे झाले, तेव्हा आईची औषधे अर्धी कमी झाल्याचे त्यांनी सांगितले. ती खूप समाधान देणारी गोष्ट होती. तेथील व्यवस्थापक विजय व प्राजक्ता यांच्याशी नियमित बोलणे होई. तेथील कार्यक्रमांचे फोटो नियमित आमच्याकडे येत. ते बघून आमचा निर्णय चुकला नाही हा आमचाच विश्वास बळावत होता. आम्ही लॉकडाऊन उघडल्यावर आईबांबाना जेव्हा भेटलो, तेव्हा आईने आम्हाला ओळखले ! वातावरणबदलाचा परिणाम झाला होता. घरापासून दूर असे हे घर. पण तेथे फक्त वैद्यकीय देखभाल होत नाही; तर मनेही जपली जात. ‘तपस’ टीम आजी-आजोबांबरोबर त्यांच्या नातेवाइकांचीही मने उत्तम सांभाळते.

जगण्यातील रस निघून गेलेल्यांमध्ये चैतन्य आणण्यासाठी तेथे सर्व सण, वाढदिवस, खेळ, उपक्रम उत्साहात साजरे करतात. हरतालिकेला आज्यांच्या नखांना नेलपेंट लावतात, मेहंदी काढतात. संक्रांतीला आजोबा पतंग उडवतात. त्यांचे वाढदिवस साजरे करतात. तेथे उपक्रमांचे वेळापत्रक असते. त्यांना जेवढे शक्य आहे तेवढे अनुभव दिले जातात. त्यात ख्रिसमसला केक-सजावट, दिवाळीला लाडू वळणे-आकाशकंदील तयार करणे, होळीला रंगांचे पंजे भिंतीवर उमटवणे, कोजागिरीला चुलीवर दूध आटवणे, सणांची व विशेष दिवसांची माहिती सांगणे, मोठ्या पडद्यावर चित्रपट बघणे अशा उपक्रमांचा त्यात समावेश असतो. दिवाळीत बाबांनी फुलबाज्या पेटवल्या, उन्हाळ्यात बर्फाचा गोळा तयार करून खाल्ला. त्यांनी यापूर्वी हे सर्व कधी केलेले त्यांना आठवत नव्हते. किंबहुना पुन्हा करण्यास मिळेल असेही वाटले नव्हते.

आईला ‘तपस’मुळे अकरा महिने आयुष्य मिळाले. तिचे तेथेच निधन झाले. बाबा आजुबाजूला समवयस्क रहिवासी, डॉक्टर्स आणि काउन्सेलर त्यांच्यासोबत असल्यामुळे आईच्या निधनानंतर लवकर सावरले. आपले माणूस गेले, की आपले दुःख मोठे वाटते. पण त्यांच्याबरोबर चोवीस तास ‘तपस’चे ताई-दादा असतात. जेव्हा ‘तपस’मधील एखादे आजी-आजोबा पुढच्या प्रवासाला लागतात, तेव्हा प्राजक्ता शोकसभा घेतात.

आम्हाला ‘तपस’च्या भेटी कधीच भकास वाटल्या नाहीत. आजूबाजूला भरपूर झाडी, आजी-आजोबांनी केलेली सजावट, सणांसाठी केलेली तयारी, रंगीबेरंगी स्वागतकक्ष, सर्व रहिवाशांना जेवणाच्या वेळी जेवणाचाही आग्रह होतो. चार वाजता चहा-फराळ नक्की देतात. ताई-दादा सगळ्या आजी-आजोबांचे जेवण झाल्यावर स्वत: जेवण करतात. माझ्या बाबांना कमी ऐकू येते. आमचा फोन गेला, की त्यांना मदतनीस हेडफोन्स लावून देत. घरी मोबाईल न वापरणाऱ्या बाबांना ‘तपस’मधील ताई-दादांनी मोबाईल वापरण्यास शिकवले.

लक्षात राहिलेला एक प्रसंग नमूद करावासा वाटतो. एकदा बाबांचे पोट बिघडले, त्यामुळे अशक्तपणा आला होता. आम्ही चौकशी केल्यावर त्यांच्या तब्येतीबद्दल कळले आणि काळजी वाटली, की ‘आता ते काय जेवतील?’ तोच मॅडम म्हणाल्या, “त्यांना आम्ही मऊ खिचडी किंवा मेतकूट-भात देऊ- त्यांना जे आवडेल ते. आम्ही नंतर ते बरे झाल्यावर अशक्तपणा जाण्याकरता शिरा देतो.

बाबांचे वक्तृत्व आणि लेखन उत्कृष्ट होते. मात्र मधल्या काळात त्यांच्या अशा सगळ्या गोष्टी मागे पडल्या होत्या. वाचनही कमी झाले होते. पण ‘तपस’मध्ये त्यांच्या त्या सगळ्या छंदांना पुन्हा अंकुर फुटले. ‘तपस’मधील वाचनालयात छान पुस्तकसंग्रह आहे. तेथील कार्यक्रमांमध्ये बाबा स्वत: नोट्स काढून भाषण करू लागले.

बाबांना भेटण्यास जाताना ‘बाबा, खायला काय आणू?’ असे विचारल्यावर, ‘काही नको. येथे आम्हाला सगळं मिळतं.’ हे त्यांचे समाधानकारक उत्तर ठरलेले असे.

आमच्या या अनुभवातून मला ‘तपस’सारख्या संस्था आधुनिक वानप्रस्थाश्रम वाटतात. आयुष्य अशा टप्प्यावर जेव्हा येते, की आयुष्यमान वाढल्यामुळे शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या संसाराचे गाडे ओढणे कठीण वाटते, पिढ्यांतील अंतर वाढत असते, नातेवाइकांपेक्षा डॉक्टर आणि दवाखाना जवळचा वाटतो, झपाट्याने होणारे बदल स्वीकारणे अवघड होते, माणूस एकटा राहू शकत नाही- अशा वेळी समवयस्क, समविचारी, समदुःखी एकत्र आल्याने आणि संसाराचा कोठलाही बोजा नसल्यामुळे जगणे सुखावह होते. मोठ्या संसाराचा हा एक बोन्सायच नाही का? असे हे आई-बाबांचे घरापासून दूर असले, तरी दुसरे घरच !

तपस – प्राजक्ता वढावकर 8818896041

ममता महाजन 9769553255 mamatasmail@gmail.com

————————————————————————————————————-

About Post Author

8 COMMENTS

 1. फार छान माहिती मिळाली. तसे ऐकून होते. पण प्रत्यक्ष अनुभव घेतलेल्या व्यक्तीकडून ऐकले म्हणजे जास्त विश्वासार्हता वाटते. अपर्णा हा विषय घेऊन माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. खूपजणांना उपयोगी होईल.

 2. खरं आहे.लोक काय म्हणतील हा विचार बाजूला करून आपला निर्णय योग्य निर्णय घेतोय याची खात्री पटली की मन शांत होतं आणि आयुष्य सुखावह होतं.

 3. खूप योग्य माहिती. आजकाल च्या काळात जेव्हा बरेच लोकांची मुले परदेशात आहेत आणि वृद्ध आई बाबांची तिकडे जायची तयारी नस्ते तर हे पर्याय स्वीकारणे हा एक उत्तम मार्ग आहे.

 4. लेख छानच आहे. ‘तपस’ बाबत चांगली माहिती मिळाली. पण सगळ्याच संस्था अशा सेवाभावी असतातच असे नाही. आणि कितीही चांगल्या असतील, तरी वयोवृद्ध बऱ्याचदा त्यांच्या तत्त्वांना मानसिकरीत्या चिकटून असल्याने बदल स्वीकारण्यास तयार नसतात. ते वेगळ्या ठिकाणी रमत नाहीत. अल्झायमर ही तर आणखी वेगळी बाब आहे. शेवटी वृद्ध व्यक्ती आणि संस्थेच्या ताई-दादा हे एकमेकांना कसे समजून घेऊन राहतात, त्यावर सर्व अवलंबून आहे.

 5. लेख खूपच माहितीपूर्ण आहे. महत्वाचे म्हणजे मनातला गिल्ट दूर करण्यासाठी या लेखाचा नक्कीच उपयोग होईल.

 6. आत्ताच्या काळाची गरज. एका चांगल्या संस्थेची माहिती मिळाली.

 7. लेख अतिशय सुरेख लिहिलेला आहे. प्रत्यक्ष अनुभव घेतलेल्या व्यक्तीने लिहिलेला लेख वाचला की मनाला एक वेगळीच उभारी मिळते.
  खरंच ‘सद्भावनेचे व्यासपीठ’ या उपक्रमांतर्गत अशा पद्धतीचे लेख प्रसिद्ध झाल्यामुळे अनेक जणांच्या समस्या सहज उलगडल्या जातील असे वाटते. खूपच चांगला उपक्रम आहे हा.
  ‘तपस’ या संस्थेतील सर्व कार्यकर्त्यांना द्यावेत तितके धन्यवाद कमीच आहेत. त्यांच्या या कार्याकडे बघितलं की मानवतेचे खरे स्वरूप लक्षात येते. अशा संस्थांची माहिती जर लोकांपर्यंत पोहोचली तर अनेकांचे जीवन सुखावह होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here