वऱ्हाडातील वास्तूंची बुरूजसाद

वऱ्हाड प्रांतातील पुरातत्त्वीय स्थानांचा परिचय विवेक चांदूरकर या युवा संशोधकाने ‘उद्ध्वस्त वास्तू – समृद्ध इतिहास’ या पुस्तकात करून दिला आहे. या पुस्तकातील प्रत्येक नोंद ही ऐतिहासिक दस्तावेज ठरावा इतके मूल्य असलेली आहे. विदर्भाच्या सर्व जिल्ह्यांना ऐतिहासिक वास्तूंचा वारसा लाभला आहे. अशा ऐतिहासिक वास्तूंची शब्दांपलीकडील भाषा अनुभवण्याची असेल आणि पावलांना भटकंतीची चाळ असेल तर, जुन्या वास्तूंचा देदिप्यमान इतिहास तुमच्याशी भरभरून संवाद साधत असतो याचा प्रत्यय चांदुरकर यांच्या पुस्तकात येतो. त्यांचे ‘उद्ध्वस्त वास्तू – समृद्ध इतिहास’ हे अभ्यासपूर्ण पुस्तक म्हणजे तशा देदिप्यमान इतिहासाशी साधलेला संवादच असल्याचे वाचकाला जाणवेल. वऱ्हाड म्हणजे अमरावती, अकोला, वाशीम, बुलडाणा आणि यवतमाळ या पाच जिल्ह्यांचा भूप्रदेश. तो अव्वल इंग्रजी आमदानीत हैदराबादच्या निजामाच्या ताब्यात होता, नंतर तो इंग्रजांच्या ताब्यात आल्यानंतर मध्य प्रदेशाशी जोडण्यात आला होता. ‘मध्यप्रांत व वऱ्हाड’ असे ते राज्य झाले. त्यामुळे हिंदी भाषेचा त्या प्रदेशातील प्रभाव वाढला. नाग-विदर्भ आणि वऱ्हाड अशा विदर्भाच्या दोन विभागांपैकी वर उल्लेख केलेले पाच जिल्हे म्हणजे वऱ्हाड प्रांत.

पुस्तकातील नोंदींची नुसती यादी पाहवी – अमरावती जिल्ह्यातील कौंडण्यपूर, आदिमानवांची जीवनकथा ‘रॉक पेंटिंग्ज’, ऐतिहासिक अचलपूर नगरी, रिद्धपूर, गाविलगड, झिल्पी आमनेर, लासूर येथील आनंदेश्वर मंदिर, तीन हजार वर्षांपूर्वी उद्ध्वस्त झालेले पांढरी; अकोला जिल्ह्यातील नरनाळा किल्ला, मोगल साम्राज्याचा रखवालदार बाळापूरचा किल्ला, ऐतिहासिक वारसा असदगड, नामशेष होण्याच्या मार्गावर असलेला भैरवगड, पातूरच्या ऐतिहासिक लेण्या, टंकावती नगरी, बार्शीटाकळी, यादवकालीन मंदिरे, प्राचीन मूर्ती, तृतीयपंथीयांचे मंदिर; वाशीम जिल्ह्याचा पौराणिक इतिहास, ऐतिहासिक व्यापारी नगरी- कारंजा, शिवाजी महाराजांची स्वारी, शिरपूर जैन, प्राचीन मूर्ती, गाढवदेवाला शतकोत्तर पूजेची परंपरा; बुलडाणा जिल्ह्यातील स्फूर्तिस्थान सिंदखेडराजा, शिवाजी महाराजांची सासुरवाडी करवंड, गोंधनापूरचा किल्ला, मैलगड, नैसर्गिक चमत्कार लोणार, मेघंकर राजाची मेहकर नगरी, कंचनीचा महाल, पाणी लावल्यावर आयात दिसणारी मशीद; तसेच, यवतमाळ जिल्ह्यातील यादवकालीन शिवालय मनदेव, तपोनेश्वर मंदिर, महेश्वर मंदिर, पिंप्री कलगा.

विवेक चांदूरकर यांनी लालखेडचे दक्षेश्वर मंदिर, अंजी येथील नृसिंह मंदिर आणि नामशेष होत असलेला कळंबचा दुर्ग या स्थळांचा लेखक सचित्र संशोधनात्मक आढावा घेतला आहे. चांदूरकर यांनी या स्थळांना भेटी दिल्यानंतर त्या त्या स्थळांची अतिप्राचीन ऐतिहासिक पृष्ठभूमी अभ्यासपूर्णतेने उलगडली आहे. लेखकाने मौर्य काळापासून ते मध्ययुगीन काळापर्यंतच्या वऱ्हाडच्या इतिहासाची घेतलेली नोंद वाचकांची पावले त्या स्थळांच्या दिशेने ओढल्याशिवाय राहत नाही. लेखक विवेक चांदूरकर यांनी ‘उद्ध्वस्त वास्तू – समृद्ध इतिहास’ या संशोधनात्मक पुस्तकाच्या निमित्ताने वऱ्हाडातील प्राचीन मंदिरांशी संबंधित पुराणकथा, आख्यायिका आणि दंतकथा यांचीही नोंद समर्पकतेने घेतली आहे. या नोंदी घेताना वाचकांची विज्ञानदृष्टी जागृत ठेवण्याचे भान चांदूरकर यांनी जपले आहे. त्यामुळे वाचक स्वत:ला वस्तुनिष्ठेशी बांधून ठेवतानाच या स्थळांच्या प्राचिनत्वाशी समरस होतो.

अशोक राणा यांची प्रस्तावना ‘उद्ध्वस्त वास्तू – समृद्ध इतिहास’ या पुस्तकाला लाभली आहे. राणा यांनी त्यांच्या प्रस्तावनेत, यादवकालीन मंदिरांचा उल्लेख हेमाडपंती मंदिरे म्हणून करण्याच्या भेदाकडे लक्ष वेधतानाच हेमाडपंती मंदिरे व इतिहासकारांचा सावळागोंधळ, मंदिरांच्या आतील अतिक्रमणे, काही वैशिष्ट्यपूर्ण मंदिरे, शिवरायांचे सासर वऱ्हाडात या उपशीर्षकांनी वऱ्हाडातील विविध वास्तूंच्या अस्पर्श पैलूंकडे बघण्याची मर्मदृष्टी जागवली आहे.

‘उद्ध्वस्त वास्तू-समृद्ध इतिहास’
लेखक : विवेक चांदूरकर
मुखपृष्ठ : गजानन घोंगडे, अकोला
प्रकाशन : मीडिया वॉच पब्लिकेशन, अमरावती
पृष्ठे : 166, किंमत : 150

सुरेंद्र गोंडाणे  9850017300 Surendra.Gondane@Timesgroup.com

————————————————————————————————————————————————————-

About Post Author

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here