स्थित्यंतर अचलपूर : गतवैभवाची फक्त साक्ष !

1
248

‘अचलपूरचा इतिहास म्हणजेच वऱ्हाडचा इतिहास’! या वचनात गावाचा शहराबद्दलचा अभिमान आहे. मात्र ते अचलपूर (आणि परतवाडा) हे शहर पार बदलून गेले आहे. संपन्नतेची साक्ष पटवणाऱ्या खुणा फक्त शिल्लक आहेत ! शहराच्या गतकाळातील वैभवाची साक्ष ऐतिहासिक वास्तूंमुळे पटते हे मात्र खरे ! हे नगर जैन धर्मातील इल नावाच्या राजाने वसवले. तो पौराणिक काळ झाला. म्हणून त्याला ‘एलिचपूर’ असे नाव पडले. एलिचपूर ते अचलपूर या प्रवासात अनेक घटना घडल्या. या शहराने मुस्लिम राजवटीत नबाबांचा थाट पाहिला. इंग्रजांनी मराठ्यांच्या विरूद्ध सैनिकी व्यूहरचना याच शहराबाहेरून आखली. कापड आणि रेशीम या उद्योगांचा सुवर्णकाळ या शहराने पाहिला, नंतर त्या व्यवसायाला अवकळा आली. शहर सुंदर बागांनी नटलेले होते. ते बगिचे नाहीसे झाले. अमरावती जिल्ह्यातील सर्वात मोठे तालुक्याचे शहर अशी या शहराची ओळख. त्यामुळे अचलपूर हे जिल्ह्याचे मुख्यालय बनावे अशी मागणी जुनी आहे.

अचलपूरच्या सभोवताली परकोट आहे. शहराला चार भव्य दरवाजे आहेत- दुल्हा दरवाजा, तोंडगाव दरवाजा, बुंदेलपुरा दरवाजा आणि हिरापुरा दरवाजा अशी त्यांची नावे. एलिचपूर ही विदर्भाची राजधानी होती. त्या काळी चाळीस हजार घरे शहरात होती. मुस्लिम राजवटीत अचलपूर शहरात चोपन्न वस्त्या होत्या. त्या प्रत्येक वस्तीला पुरा म्हणत. शहरात पस्तीसच्या वर ‘पुरे’ अस्तित्वात आहेत. या पुऱ्यांची नावे मुस्लिम नबाबांच्या नावावर आहेत. समरसखानने (1724) वसवला तो समरसपुरा, सुलतानखानने (1727) वसवला तो सुलतानपुरा, सलाबतखान याची पत्नी अन्वर खातून हिच्या नावावरून अन्वरपुरा, नामदार गंज, नसीबपुरा, अब्बासपुरा… वगैरे वगैरे.

देवगिरीच्या यादवांचा कालखंड संपला व बहामनी सत्तेचा उदय 1347 मध्ये झाला. वऱ्हाड प्रांत तोपर्यंत नरनाळा आणि गाविलगड या किल्ल्यांसह दिल्लीचा बादशहा मुहम्मद तुघलक याच्या अधिपत्याखाली होता. बादशहाचा जावई इमाद उल मुलूक हा वऱ्हाड आणि खानदेश या भागांचा सुभेदार होता. तो कारभार एलिचपूरहून पाहत असे, पण या नगरीचा इतिहास त्यापेक्षाही जुना आहे. बहामनी सत्ताकाळात आठवा सुलतान फिरोजशहा बहामनी याला एका मोहिमेसाठी अचलपूरला 1399 मध्ये यावे लागले होते. खेडल्याचा राजा नरसिंगराय आणि फिरोजशहा यांच्यातील युद्धानंतर नरसिंगराय शरण आला, तेव्हा तो सुलतानाच्या भेटीसाठी अचलपूरच्या छावणीतच थांबला होता, अचलपूर हे मुस्लिम सत्तेतील महत्त्वाचे ठिकाण 1425 पर्यंत होते. त्यानंतर वऱ्हाडातील स्वतंत्र इमादशाहीचा कारभार (1490 ते 1574) गाविलगड, नरनाळा या किल्ल्यांमधून सांभाळला गेला.

वऱ्हाड प्रांत हा निजामाकडे 1574 मध्ये आला. वऱ्हाड प्रांत सुमारे सव्वीस वर्षे निजामशाहीत राहिला. वऱ्हाड मोगल साम्राज्यात अकबराच्या स्वारीनंतर 1598 मध्ये समाविष्ट झाले. अबूल फजल हा वऱ्हाडचा सुभेदार होता. मोगलांची सत्ता पूर्ण शतकभर होती. एलिचपूर हे नोंदींनुसार (2 एप्रिल 1694) सरकारी खजिना ठेवण्याचे ठिकाण होते. एका महत्त्वाच्या घटनेचा उल्लेख 11 मे 1703 रोजीच्या बातमीपत्रात आहे. त्यात मराठ्यांचे सैन्य वऱ्हाडची राजधानी असलेल्या एलिचपूरवर चाल करून आले व त्यांनी मोगलांचा नायब सरअंदाज खान याच्याकडे चौथाईची मागणी केली. त्यावेळी सुभेदार उमाद तुल्मुक्तखान फिरोजजंग हा होता. मराठ्यांनी वऱ्हाड जिंकण्यासाठी अनेक स्वाऱ्या मोगल काळातच केल्या. छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज राजाराम यांनी वऱ्हाड प्रांत 1698 मध्ये जिंकला. नंतर शाहू महाराजांनी परसोजी भोसले अमरावतीकर यांना वऱ्हाड प्रांताची जहागिरी दिली. हा भाग निजामांच्या ताब्यात 1744 ते 1750 पर्यंत गेला, पण नागपूरचे रघुजी राजे भोसले यांनी त्यांचे पुत्र मुधोजी यांना पाठवले होते. एलिचपूर हे मुधोजींच्या ताब्यात काही काळ होते.

नागपूरकर भोसले आणि इंग्रज यांच्यामध्ये युद्ध 1803 मध्ये झाले. त्या युद्धानंतर वऱ्हाड इंग्रजांच्या ताब्यात गेले. मुहम्मद तुघलक याचा पुतण्या सुलतान इमाद-उल-मुलूक याने इदगाह 1347 मध्ये उभारली. या इमारतीच्या पायऱ्यांवरून त्या वेळी गाविलगडचा किल्ला दिसत असे. जुम्मा मशीद (एकशेआठ खांब आणि पंधरा मीटर उंच) ही पारंपरिक पद्धतीने बांधण्यात आली, ती भव्य मशीद उभारण्याचे श्रेय औरंगजेबाच्या काळातील नवाब अली वर्दीखान याच्याकडे जाते. शहराच्या बाहेरील परकोट हा सुलतान खानचा मुलगा नवाब इस्माईलखान याने बांधला. नबाबाचा महाल आणि देवडी ही बहिलोलखान व सलाबतखान यांनी बांधली.

नागपूरचे मुधोजी भोसले यांनी बालाजी; तसेच, श्रीरामाचे देऊळ आणि शहा इस्माईलखाँ या फकिराचे थडगे बांधले. अचलपूरपासून तीन किलोमीटर अंतरावरील हौज कटोरा ही वैशिष्ट्यपूर्ण षट्कोणी इमारत अहमद शहावली बहामनी याने बांधली. सुमारे शंभर मीटर व्यासाच्या तलावात एक्याऐंशी फूट उंचीची तीन मजली इमारत उभारण्यात आली. ती इमारत पाच मजली होती. त्यांतील तिसरा व चौथा हे मजले पाडून त्यांच्या दगडांपासून नबाबाने त्याचा राजवाडा बांधला. ही आगळीवेगळी, जीर्ण अवस्थेतील वास्तू पर्यटकांचे आकर्षण आहे. गुलाम हुसैन खान याने इमामवाडा बांधला. त्याच्याच काळात बेबहा बाग बांधण्यात आली. इस्माईलखान याचे थडगे त्या ठिकाणी आहे. अनेक छोटीमोठी थडगी त्या परिसरात आहेत. या संपूर्ण परिसराचे सौंदर्य वेगळेच आहे. काही वास्तू जाळीदार खिडक्या, नक्षीकाम केलेले दरवाजे यांमुळे प्रेक्षणीय बनतात. पण संपूर्ण परिसर सध्या मात्र भकास आहे. त्या बागेत केवळ झुडपे, काही इमारतींचे भग्नावशेष आहेत. ती वास्तू खाजगी मालमत्ता असल्याचा फलक दरवाज्यावर आहे.

अचलपूर आणि परतवाडा या जोड शहरांना पिण्याचे पाणी पुरवण्यासाठी योग्य ते नियोजन झालेले नाही. शहरभर पाणी पुरवण्याची व्यवस्था बहामनी सत्ताकाळात खापरी नळ बांधून करण्यात आली होती. बिच्छन नदीवर त्यासाठी धरणही बांधण्यात आले होते. ते नळ बंद असले तरी त्या व्यवस्थेचे अवशेष आणि टाक्या जागोजागी कायम आहेत. त्याला ‘सातभुळकी’ असे म्हणतात. चंद्रभागा धरणावरून सध्‍या या शहराला पाणी पुरवठा केला जातो.

परतवाडा शहराला विकसित होण्यास वाव अधिक मिळाला तो इंग्रज काळात. ते आधुनिक काळातील शहर बनले. इंग्रजांनी छावणी त्या ठिकाणी उभारली. इंग्रजांची पलटन त्या ठिकाणी असल्याने त्याला पलटनवाडा असे म्हणत. पलटनवाडा म्हणजेच आजचा परतवाडा. अचलपूर सिव्हिल स्टेशन असे नावही त्या भागाला होते. परतवाडा शहर हे मेळघाटातून आणले जाणारे लाकूड आणि गुरे यांच्या बाजारासाठी प्रसिद्ध होते. सागाचे वृक्ष तोडण्यावर बंधने आल्यानंतर तेथील बाजार कमी झाला. गुरांच्या बाजारावरही मर्यादा आल्या.

अचलपूर हे विणकरांचे शहर एके काळी होते. बलुतेदारी ज्या काळात अस्तित्वात होती, तेव्हा कोष्टी समुदायाने त्यांचा वाटा उचलला. अचलपूरने कापसाची बाजारपेठ म्हणूनही स्थान मिळवले. तेथे कापसावर प्रक्रिया करणारे उद्योग उभे झाले. अचलपुरात विदर्भ मिल्स (बेरार) लिमिटेड या कंपनीमार्फत कापड निर्मिती उद्योगाचा शुभारंभ 1925 मध्ये झाला. त्या वेळी दोन हजार कामगार गिरणीत कामाला होते. त्या सोबत हातमाग व्यवसायही फोफावला. विदर्भ मिल 1959 मध्ये बंद पडली. राज्य वस्त्रोद्योग महामंडळाने ती मिल 1972 मध्ये ताब्यात घेतली. नंतर ती 1974 मध्ये राष्ट्रीयीकृत झाली. मिलचे शेवटचे युनिट 2003 मध्ये बंद झाले. राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या हस्ते फिनले मिलची पायाभरणी 2008 मध्ये झाली होती. गिरणीच्या जागेवर तीनशेसव्वीस कोटी रुपयांची गुंतवणूक करून फिनले मिल उभारण्यात आली. राष्‍ट्रीय वस्‍त्रोद्योग महामंडळामार्फत ती मिल चालवली जात होती. करोना काळात ती मिल बंद पडली, तेव्‍हापासून ती बंद स्थितीतच आहे. अचलपुरात अचलपूर इंडस्ट्रियल विव्हिंग को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे एक हजार एकशेअठ्ठावीस सदस्य 1960 च्या दशकात होते. तब्बल आठशेवीस हातमाग शहरात होते. त्यांचे भांडवल सुमारे दीड लाख रुपये होते. परंतु हातमाग व्यवसायावर अवकळा आली आहे.

अचलपुरात तेलबियांवर प्रक्रिया करणारे कारखाने होते. त्या उद्योगाची रया गेली आहे. अचलपूर आणि परतवाडा या दोन शहरांसाठी पूर्वी दोन स्वतंत्र नगरपालिका होत्या. अचलपूर नगरपालिकेची स्थापना 1869 मध्ये आणि परतवाडा नगरपालिका 1893 मध्ये अस्तित्वात आली. आता, दोन्ही शहरांसाठी एकच नगरपालिका आहे. दोन्ही शहरांचा विस्तार शैक्षणिक दृष्ट्या झाला आहे. अचलपूर शहरात पाच प्राथमिक शाळा आणि पाच खाजगी संस्थांची माध्यमिक विद्यालये 1961 मध्ये होती. अनेक शाळा-महाविद्यालयांनी अचलपूर आणि परतवाडा या शहरांचे शैक्षणिक जीवन नंतर समृद्ध केले आहे. अचलपुरातील ग्रामीण रुग्णालयासह अनेक खाजगी रुग्णालयांनी चांगल्या वैद्यकीय सेवा उपलब्ध करून दिल्या असल्या, तरी अचलपूर-परतवाड्यात सुसज्ज मोठे हॉस्पिटल व्हावे ही अनेकांची इच्छा आहे.

अचलपूरची कृषी उत्पन्न बाजार समिती अमरावती जिल्ह्यात दुसऱ्या क्रमांकाची आहे. जिल्ह्यातील सर्वात मोठा मिरची बाजार त्याच ठिकाणी भरतो. अचलपूर नगर परिषदही धनाढ्य आहे. शहरातील काही इमारतींना चांदीचे दरवाजे होते, ते चोरीला गेले! अनेक ऐतिहासिक वास्तूंची पडझड झाली, पण जे काही सुस्थितीत आहे त्याचे संवर्धन करण्यासाठी प्रयत्न झाले नाहीत. अनेक ऐतिहासिक इमारती देखभालीअभावी शेवटच्या घटका मोजत आहेत. हा वारसा जपण्यासाठी राजकीय इच्छाशक्ती आणि जनसमूहाचा दबाव या दोन्हींची आवश्यकता आहे.

अंजनगाव सुर्जी आणि चांदूर बाजार या दोन्ही तालुक्यांच्या शहरांसाठी परतवाडा हे जवळचे आणि महत्त्वाचे केंद्र बनले आहे. चिखलदरा हे विदर्भातील एकमेव थंड हवेचे ठिकाण या शहरापासून केवळ पंचवीस किलोमीटरवर आहे. अचलपूर ते मुर्तिजापूर आणि मुर्तिजापूर ते यवतमाळ या नॅरोगेज रेल्वेचे महत्त्व इंग्रजांना कळले होते. त्याचा वापर अचलपूर-परतवाडा यांच्या विकासासाठी होऊ शकतो, पण हा रेल्‍वेमार्ग बंद आहे. रेल्वेचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतर व्हावे अशी मागणी आहे. स्थित्यंतर जे पाहण्यास मिळते ते परतवाड्यात. अचलपूर मात्र जुन्यातच रमलेले आहे. अचलपूरला सुसज्ज उपजिल्हा रुग्णालयाची इमारत झाली. अचलपूर नगरपालिकेचे तंत्रनिकेतन, नगरपालिकेनेच उभारलेले कल्याण मंडपम हे सभागृह, अचलपुरात स्थापन झालेली जिल्हा व सत्र न्यायालये, ब्रिटिशकालीन वास्तूंचे नूतनीकरण या नोंदी विकास प्रक्रियेतील महत्त्वाच्या बाबी ठरतात.

– मोहन अटाळकर 9422157478 mohan.atalkar@gmail.com

——————————————————————————————————————————-

About Post Author

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here