Home लेखसूची लोककथांचीच कहाणी! (Story of Folktells)

लोककथांचीच कहाणी! (Story of Folktells)

लोककथा हे कोणत्याही समाजाचे धन असते. समाज जितका पुरातन तितक्या लोककथा अद्भुतरम्य. लोककथा लहान मुलांनाच नव्हे तर मोठ्या माणसांनासुद्धा आवडतात आणि ते नैसर्गिक आहे. कारण त्यांनी मनोरंजन तर होतेच व त्याबरोबर बोधही मिळतो. लोककथांचा प्रसार तीन जमातींनी इतिहास काळात केला – व्यापारीसंन्यासी आणि धाडसी प्रवासी हे ते तीन लोक होत. व्यापारी म्हटला म्हणजे बाजारपेठांशी त्याचा संबंध हा ठरलेलाच. व्यापारी त्याचा माल विकण्यासाठी निरनिराळ्या बाजारपेठा फिरतो. बाजार म्हणजे समाजाच्या सर्व थरांचे संमेलन. तेथे व्यापाऱ्यांना लोककथा ऐकण्यास मिळत. व्यापारी जितके बाजार फिरत, त्या त्या गावच्या लोककथा ते त्यांच्या मुलामाणसांना, घरी येऊन सांगत असत. संन्यासी लोक धर्मप्रचारासाठी गावोगावी फिरत असत, त्यांचा संबंध आबालवृद्ध असा सगळ्यांशी येई. त्यामुळे लोककथांचा संग्रह त्यांच्याजवळही असे. ते त्यांचा उपयोग बऱ्याच वेळा धर्मप्रचारासाठी करत व नकळत त्या लोककथांचा प्रसार होई. प्रवासी याचा अर्थच मुळी परदेशी/परप्रांती फिरणारा. धाडसी प्रवासी म्हणजे धाडसाचे प्रतीक. त्यांना कठीण आणि अचाट प्रवास करताना निरनिराळ्या जमातींत दिवस घालवावे लागत. तेथील लोककथा चार गप्पागोष्टी करताना नकळत त्यांच्या कानावर पडत. अशा कित्येक गावांच्या लोककथांचा संचय त्यांच्याकडे होई. लोककथांचा प्रसार होण्याचे दुसरे कारण झाले, ते म्हणजे राजाश्रय. राजांना पसंत पडलेल्या गोष्टी, कार्य किंवा त्यांना आवडलेल्या व्यक्ती या फार झपाट्याने प्रसृत होतात. तीच ती कथा/गोष्ट पुन:पुन्हा सांगण्यास विनंती करणारे राजे वाचकांना ठाऊक असतीलच.

लोककथांचे वाङ्मय कसे निर्माण झाले याबाबतची हकिगत म्हणजेच एक अद्भुत कथा आहे. गुणाढ्याने गोष्टींचे किंवा लोककथांचे, बृहत्कथांचे वाङ्मय निर्माण केले असे मानले जाते. गुणाढ्याचा जन्म पैठण (प्रतिष्ठान) येथे झाला. तो सातवाहन राजाचा प्रधान होता. त्याचे प्रमाण चरित्र उपलब्ध नाही. त्याच्या बाबतची चरित्रात्मक माहिती कथासरित्सागराच्या कथापीठ लंबकात आहे. त्याने पैशाची भाषेमध्ये सात लक्ष ग्रंथ शरीरातील रक्ताने लिहून काढले व ते त्याच्या दोन शिष्यांबरोबर सातवाहन राजाकडे पाठवले अशी कथा आहे. परंतु भाषा पैशाची, शाई रक्ताची व ग्रंथसंख्या सात लक्षांची म्हणून सातवाहनाने त्या ग्रंथांचा धिक्कार केला. तो अपमान सहन न होऊन गुणाढ्य त्याच्या कथेचे एकेक पान अखेरपर्यंत वाचून अग्नीमध्ये जाळू लागला. त्या सुंदर कथांचे श्रवण करण्याकरता अरण्यातील पशुपक्षी गोळा झाले. ते त्या कथा ऐकताना तहानभूक, देहभान विसरले. त्याच वेळी तिकडे सातवाहन राजाची प्रकृती बिघडू लागली. राजाला शुष्क मांस खाल्ल्यामुळे बरे वाटत नव्हते असे आढळून आले. चौकशी केली असता असे दिसून आले, की कोणी एक ब्राह्मण कथा वाचत आहे व त्या ऐकणारे पशुपक्षी काहीच खातपीत नाहीत. त्यामुळे मांस शुष्क मिळत आहे. राजा त्या स्थळी गेला तेव्हा त्याला गुणाढ्य कथा वाचत असलेला दिसला. पशुपक्ष्यांनाही उत्कृष्ट वाटणाऱ्या कथांचा त्याने धिक्कार केला, याचे त्याला वाईट वाटले. पण काय उपयोग होता? तोपर्यंत सहा लक्ष कथाश्लोक जळून खाक झाले होते!

गुणाढ्य याने बृहत्कथा पैशाची या भाषेत मूळ लिहिली होती. ती भाषा याज्ञिकांची नव्हती. बृहत्कथेत यज्ञविद्येचा उपहास होता. त्यामुळेच सातवाहन राजा व ब्राह्मण पंडित यांनी बृहत्कथेचा अनादर केला. बृहत्कथेचे महत्त्व पुढे, दहाव्या शतकाच्या आसपास सोमदेव व क्षेमेंद्र या दोन संस्कृत पंडितांनी, ती संस्कृतात आणल्यावर कळून आले.

नृत्य, गीत आणि कथा म्हणजे जानपद वाङ्मयाची त्रिवेणी आहे. करमणुकीमध्ये नृत्याला स्थान मोठे होते. वाल्मिकीने रामायण तरी कसे निर्माण केले? तो त्याच त्रिवेणी संगमात डुंबला, म्हणून त्याला रामायण रचता आले. वाल्मिकी खेड्यापाड्यांत फिरला. त्याला जेथे तेथे रामाच्या कथा, आख्यायिका ऐकण्यास मिळाल्या. त्या त्याने आणल्या, एकत्र केल्या आणि स्वत:च्या प्रतिभेने रामायण रचले!

लोककथांची वर्गवारी पुढीलप्रमाणे सहा भागांत करता येईल. 1. सासु-सुनांच्या कथा, 2. आवडीनावडींच्या कथा, 3. राजपुत्रांच्या कथा, 4. बलिदानाच्या कथा, 5. जातींवरील कथा, 6. वृद्ध स्त्रियांच्या कथा.

सासु-सुनांच्या कथांत सुना सन्मार्गापासून जरासुद्धा ढळत नाहीत आणि सासवा त्यांचा छळ करत असतात. त्या कथांतून काही वाक्प्रचार आणि म्हणी निर्माण झाल्या उदाहरणार्थ, चार दिवस सासूचे चार दिवस सुनेचे. आवडती व नावडती कथा प्रकारात राजाच्या दोन राण्या असायच्या. त्यांपैकी हटकून नावडतीला पुत्रप्राप्ती व्हायची आणि मग तोच राजपुत्र धाडसी निपजायचा. अशा कित्येक कथा प्रचलीत आहेत. बलिदानाच्या गोष्टींत हुतात्म्यांच्या कथा असतात. लोक जोडप्यांचे बळी दैवी शक्तीवर विश्वास म्हणून देवतांना प्रसन्न व शांत करण्यासाठी देत असत.

प्रत्येक जातीचे असे स्वतंत्र स्वभावविशेष असतात. दक्षिण भारतातील कोमटी (विणणारे) लोक व जाट (यांना हिंदीत मुंफटे म्हणतात) यांच्या जिभेला हाडच नसते. ती जात एकदम हमरीतुमरीवर येणारी आहे. म्हातारीच्या कथाही अत्यंत मनोरंजक आहेत. त्यात म्हाताऱ्या माणसांची थोरवी दिसून येते. म्हातारीची बुद्धिमत्ता आणि थोरपणा दाखवणारी एक कथा प्रसिद्ध आहे. ती अशी

एकदा राजा विक्रम व कवी माघ फिरण्यास गेले होते. फिरता फिरता, ते वाट चुकले आणि एका झोपडीजवळ आले. तेथून फुटलेल्या एका रस्त्याकडे बोट दाखवून त्यांनी तेथील एका म्हातारीला विचारले, बाई, हा रस्ता उज्जैनीला जातो का?” त्यावर म्हातारी म्हणाली, बाबा रे, रस्ता कोठेच जात नाही, कित्येक वर्षे तो येथेच आहे.तेव्हा राजा विक्रम म्हणाला, बाई, आम्ही प्रवासी आहोत.त्यावर म्हातारी म्हणाली, या पृथ्वीवर चंद्र आणि सूर्य हे दोघेच प्रवासी आहेत.विक्रम म्हणाला, आम्ही पाहुणे आहोत. म्हातारी म्हणाली, धन आणि तारुण्य या दोनच गोष्टी या जगात पाहुणे म्हणवून घेण्यास योग्य आहेत.

राजा विक्रम आणि कवी माघ या दोघांना म्हातारीच्या बुद्धिमत्तेची कल्पना आली व ते म्हणाले, आम्ही क्षमाशील आहोत.नकारार्थी मान हलवून म्हातारी म्हणाली, नाही! नाही! पृथ्वी आणि स्त्री, ही दोनच या जगात क्षमाशील आहेत.पुढील संभाषणाला पूर्णविराम द्यावा म्हणून विक्रम म्हणाला, आम्ही परदेशी आहोत!” म्हातारीने तिची बुद्धी लढवलीच व म्हणाली, या मृत्युलोकात जीव आणि झाडाचे पान या दोनच गोष्टींना परदेशी म्हणता येईल.

आता मात्र विक्रम आणि माघ कवी यांना पेच पडला. अखेर, विक्रम पडेल चेहऱ्याने म्हणाला, आम्ही हरलो!” त्यावर हसून म्हातारी म्हणाली, जगात फक्त ऋणको आणि मुलीचा बाप हेच हरतात,मग मात्र म्हातारीने त्यांना उज्जैनीची वाट दाखवली. अशी आहे ही लोककथांची कहाणी.

 

नारायण किल्लेकर 9632796221

नारायण रामचंद्र किल्लेकर यांची कारकीर्द मुख्यतः शिक्षणात गेली. ते चौदा वर्षे शिक्षणाधिकारी आणि सत्तावीस वर्षे संस्थापक-प्राचार्य होते. त्यांना लेखनाची हौस होती म्हणून त्यांनी आस्थेने लेखन केले. त्यांची शैक्षणिक, प्रवास वर्णन, बालकथा, आठवणी या विषयांवर तेरा पुस्तके प्रसिद्ध आहेत. तसेच, त्यांना तेरा पुरस्कारही प्राप्त झाले आहेत. ते बेळगाव येथे वास्तव्यास असतात.

——————————————————————————————–

About Post Author

1 COMMENT

  1. सरजी,सादर प्रणाम !आपण लिहिलेल्या लेखातून गुणाढ्याच्या कथालेखनाचे महाभयंकर दु:ख समजले.तसेच विक्रम आणि माघ यांच्या प्रश्नाला म्हातारीने दिलेले उत्तर भल्याभल्यांना अचंबित करणारे आहे.सुंदर !© प्रा.पुरुषोत्तम पटेल 9421530412

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version