लिंगा गाव यवतमाळ जिल्ह्याच्या नेर तालुक्यात आहे. लिंगा-बोरगाव हे जोडगाव आहे, दोन्ही गावांची ग्रामपंचायत एक आहे – बोरगावचे सहा आणि लिंगाचे चार सभासद निवडले जातात. अधिकतर बोरगावचा सरपंच असतो. परंतु ती पोटगावे एकमेकांपासून स्वतंत्र आहेत. लिंगा वेगळे आणि बोरगाव वेगळे. लिंगाची लोकवस्ती साडेतीनशे. बोरगावची लोकवस्ती बाराशेच्या आसपास आहे.
लिंगा गाव हे कामटवाड्यापासून तीन किलोमीटर अंतरावर येते. गावात बौद्ध समाजाची तीस-पस्तीस घरे, तर कुणबी समाजाची पंचवीस-तीस घरे, आदिवासी समाजाची एक-दोन घरे व अवधुतपंथीय समाजाची काही घरे आहेत. पूर्वी घरे कुडामातीची कौलारू होती. त्या ठिकाणी पक्की घरे झाली आहेत. सरकार घर बांधण्यासाठी प्रत्येकी दीड लाख रुपये खात्यात जमा करते. त्यासाठी बरेच प्रयत्न करावे लागतात. खटपट-लटपट असते. सरकारी अधिकाऱ्यांना आधी थोडे बांधकाम करून दाखवावे लागते. नंतर पैसे हप्त्या हप्त्याने खात्यात जमा होतात. गावात शेती घराला लागूनच आहे. शेतीमध्ये कापूस, ज्वारी, गहू, हरभरा, सोयाबीन, तूर अशी पिके घेतली जातात. तेथील लोकांचा मुख्य व्यवसाय म्हणजे शेती आहे. स्त्री व पुरुष, दोघेही शेतात कामे करतात. घरातील ज्येष्ठ मंडळी छोट्या मुलांना सांभाळतात.
लिंगा गावात पहिली ते चौथीपर्यंत शाळा आहे. लिंगा येथील जुनी शाळा मोडकळीस आली आहे. नवीन शाळा तेथेच शेजारी बांधली आहे. उत्तमराव रंगारी हे निवृत्त शिक्षक म्हणाले, की पण शाळेत विद्यार्थी फार नसतात. याचे कारण इंग्रजी माध्यमात शिक्षण घेण्याकडे कल फारच गेल्या दहा वर्षांत वाढला आहे. तशा खासगी शाळा बोरी अरब येथे झाल्या आहेत. गावातल्या मुलांना तेथे पोचण्यास बसने तासभर लागतो. प्राथमिकच्या पुढील शिक्षण मिळण्याचीही सोय तेथे होते. लिंगा व बोरगाव येथील मुलांना पुढील शिक्षण घेणे झाल्यास कामटवाडा, बोरी अरब किंवा यवतमाळ येथे जावे लागते.
लिंगा येथील सर्व लोक गुण्यागोविंदाने राहतात. त्यांच्या त्यांच्या धर्माचे पालन करतात. सणउत्सव थाटात साजरे करतात. गावकऱ्यांना बाजारहाट करण्यासाठी कामटवाड्याला जावे लागते. पूर्वी लिंगा येथून रेल्वे जात होती. तेथे थांबतही होती. रेल्वेच्या शिट्टीचा स्पष्ट आवाज गावात ऐकू येत होता. मात्र ती रेल्वे बंद झाली आहे. ती नॅरोगेज रेल्वे यवतमाळ – मूर्तिजापूर अशी शटल स्वरूपाची होती. कापसाची वाहतूक हे तिचे मुख्य काम. ती प्रवाशांनाही घेऊन जात असे. पूर्ण प्रवासास अर्धा तास लागे. तिचे नाव ‘शकुंतला’. आर्वी, एलिचपूर अशा ठिकाणी याच कामासाठी रेल्वे ट्रॅक टाकले होते. विदर्भाचा कापूस इंग्लंडमधील गिरण्यांना एवढा प्रिय होता !
गावात मोठा बौद्ध विहार आहे. तेथे बाबासाहेब व रमाई यांचे पुतळे आहेत; तसेच, गौतम बुद्धाची सुंदर मूर्ती आहे. रोज संध्याकाळी बुद्धवंदना होते. स्थानिक लोक आंबेडकर जयंती थाटात साजरी करतात.
गावात कुणबीवाडा व बौद्धवाडा हे दोन वेगवेगळे भाग आहेत. बऱ्याच ठिकाणी विहिरी आहेत. त्यात पाणीदेखील आहे. गावात नळ आलेले आहेत, मात्र पाणी दररोज येत नाही. वापरण्यासाठी विहिरीच्याच पाण्यावर अवलंबून राहवे लागते. शेती करण्यासाठी बैलांचा व ट्रॅक्टरचा वापर होतो. प्रत्येकाच्या दारासमोर वालाच्या शेंगांचा वेल वर चढवलेला असतो.
लिंगा गावातील वेगळे वैशिष्ट्य म्हणजे तेथे अवधुत पंथाचे दोन, मोठमोठे चाळीस फूट उंचीचे स्तंभ आहेत. त्या खांबांना दरवर्षी दसऱ्याच्या दिवशी त्यावरील भगव्या रंगाचा कपडा काढून, दुसरा त्याच रंगाचा कपडा शिवून चढवला जातो. त्या दिवशी गावात मोठा उत्सव असतो. संपूर्ण गावाला जेवणाचे आमंत्रण ‘प्रसाद घेण्यासाठी या’ असे म्हणून दिले जाते. गावातील अवधुत पंथाची मंडळी हे सर्व घडवून आणतात. त्यात काही कुणबी, बौद्ध, आदिवासी या तिन्ही समाजांतील लोक सहभागी होतात. अवधुत पंथाचे मूळ ठिकाण अमरावती जिल्ह्यात पारवे येथे आहे. तेथे ही भक्तमंडळी जाऊनयेऊन असतात. उत्तम रंगारी यांचे म्हणणे असे, की अवधुत पंथ फक्त अमरावती जिल्ह्यात आहे. तो एका गुराख्याच्या देवाचे नाव घेण्याच्या ओढीतून निर्माण झाला अशी कहाणी सांगतात. गोष्ट शंभर-दीडशे वर्षांपूर्वीची आहे. त्या गुराख्याचे नाव श्रीकृष्ण कांबळे. तो लोकांची गुरे चरण्यास नेत असे. त्यावेळी देवाचे नाव भजनगाण्यांतून घेण्याची त्याची सवय होती. त्याच्या त्या नादाने लोक त्याच्या भोवती जमू लागले. कोणी तरी त्याला दत्तावतार अवधुत ठरवले आणि त्यातून खरोखरीच छोटा पंथ उभारला गेला. लिंगाचे लोक त्या पंथापर्यंत पोचले. त्यांनाही तो भक्तिभाव जडला आणि त्यातून लिंगा गावात त्या भाविकांची वस्ती झाली. त्यांनी मंदिर बांधले. ते दोन स्तंभ म्हणजे त्या पंथाचे झेंडे आहेत.
अवधुत पंथ येथे पोचण्याचे कारण त्याच धर्तीवर आणखी एक प्रकारे सांगण्यात येते, की अमरावती जिल्ह्यातील सावंगी येथील एक व्यक्ती लोकांचे भविष्य काव्याच्या रूपाने सांगत असे. ते गृहस्थ जसे बोलत ते खरे होत असे. त्यामुळे त्यांच्यावर लोकांचा विश्वास जडला. ते अडाणी होते, निरक्षर होते. मात्र भविष्य काव्याच्या स्वरूपात सांगत. त्यांचे काव्य अलिखित स्वरूपात आहे. त्याची नोंद कोठे नाही. ते लिंग्याला येऊन राहिले. तेथे त्यांचे एक मंदिर आहे. अवधुत पंथीय लोक अमावास्या-पौर्णिमेला मंदिरात नित्य भजने वगैरे करतात व जागृती ठेवतात.
– रत्नकला बनसोड 9503877175 bhimraobansod@gmail.com