कवितेचा जागल्या ! (A Tribute to Dr. M. S. Patil)

1
209

डॉ. म.सु. पाटील हे 1980 नंतरच्या मराठी समीक्षकांमधले अग्रगण्य नाव. ते समीक्षक असण्याबरोबरच विद्यार्थी प्रिय प्राध्यापक होते. ते मनमाड महाविद्यालयाचे वीस वर्षे प्राचार्य होते. त्यांनी त्या काळात अनेक विद्यार्थी घडवले. ते महाविद्यालय नावारूपाला आणले. त्यांनी मराठी साहित्याच्या नकाशावर अस्तित्वात नसलेल्या मनमाड या गावाला साहित्यिक चळवळीचे केंद्र बनवले. त्यांच्या तिथल्या वास्तव्यात विविध चर्चासत्रे, व्याख्याने, ‘अनुष्टुभ’ सारख्या दर्जेदार मासिकाची चळवळ असे मनमाडचे साहित्यजीवन विविध अंगांनी बहरले. अनेक नामवंत साहित्यिकांचा राबता वाढला. 

हे सर्व करत असताना, त्यांचे स्वत:चे वाचन, चिंतन-मनन आणि संशोधनात्मक लेखन चालू होते. त्यांनी त्यांचे समीक्षा लेखन अत्यंत चिकाटीने आणि परिश्रमाने सिद्ध केले. त्यांचे समीक्षाग्रंथ हे अभ्यासकांच्या कुतूहलाचा विषय आहेत. त्यांना त्यांच्या ‘सर्जनप्रेरणा आणि कवित्वशोध’ या पुस्तकासाठी साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला आहे. त्यांच्या नावावर 2005 चा महाराष्ट्र फौंडेशनच्या पुरस्कारासह इतर अनेक पुरस्कार आहेत. त्यांनी स्वत: त्यांचे आयुष्य अतिशय कठीण परिस्थितीत घडवले होते. त्यांच्या ‘लांबा उगवे आगरी’ या नितळ आत्मचरित्रात त्याचे दर्शन घडते.

त्यांचे निधन 31 मे 2019 रोजी झाले. त्यांच्या निधनानंतर त्यांची कन्या, ज्येष्ठ कवयित्री, कथाकार, कादंबरीकार नीरजा यांनी त्यांच्याविषयी ‘लोकसत्ता’मध्ये लिहिलेल्या लेखाचा संपादित अंश प्रकाशित करत आहोत. 

‘मोगरा फुलला’ या सदरातील इतर लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

-सुनंदा भोसेकर

कवितेचा जागल्या !

ही इज सिंकिंग…’ आयसीयूमधला डॉक्टर मख्ख चेहऱ्याने सांगत होता. समोरच्या मॉनिटरवरचे आकडे खाली खाली येत होते. पन्नास-चाळीस-वीस-पंधरा-चौदा-सात-पाच-दोन-एक… थरथरणारी प्रकाशाची रेष काळोखी होत गेली. लिहिलेले शब्द पाटीवरून पुसून टाकावेत तसा मॉनिटर कोरा झाला. कायमचा. समोर बाबा शांत पहुडलेले. तासाभरापूर्वी, ते व्यवस्थित जेवलेले. त्यांना जेवण भरवून झाल्यावर उद्या सकाळी घरी घेऊन जाणार म्हणून प्रॉमिस करून निघालो, आम्ही मुली. तेव्हा तेही म्हणाले होते, घरी यायचंय म्हणून. घरी गेलो तर अर्ध्या तासात फोन आला मेव्हण्यांचा. त्यांना श्वास लागल्याचं त्यांनी सांगितलं, तशा आम्ही पुन्हा हॉस्पिटलात पोचलो. तर मॉनिटरवर सरकत्या आकड्यांचा खेळ सुरू झालेला होता.

‘प्रत्येक माणूस मर्त्य असतो. मरण ही टाळता येण्यासारखी गोष्ट नसते..’ असं मनावर कोरलेलं होतंच, समज आल्यापासून. बाबाही म्हणायचे, ‘हे बोनस आयुष्य आहे माझ्यासाठी.’ पण तरीही बाबा आमच्या आयुष्यातून वजा होतील असं कधीच वाटलं नव्हतं. मी तर बाबांशिवाय माझं आयुष्य असू शकतं, ही कल्पनाच करू शकत नव्हते. लिहिती झाले त्या दिवसापासून माझ्या प्रत्येक शब्दावरून हात फिरला आहे त्यांचा. 23 मे च्या ‘चतुरंग’ पुरवणीतल्या लेखापर्यंतचा प्रत्येक लेख, माझी प्रत्येक कथा, कविता त्यांनी प्रथम वाचली होती. सूचना केल्या होत्या. बदललेले ड्राफ्ट वाचले होते. पण त्यांची सोडियम लेव्हल कमी होऊ लागली आणि शब्द सापडेनासे झाले त्यांना. माझे शब्दही पोचेनासे झाले त्यांच्यापर्यंत. त्या दिवशी हॉस्पिटलमध्ये दाखल केलं तेव्हा ते डॉक्टरांना म्हणाले होते, ‘मला व्यक्त व्हायला शब्द सापडत नाहीत, डॉक्टर.’

एक-एक वाक्य फार मुश्किलीनं बोलायचे. जवळ बोलावून काही सांगू पाहायचे. पण गळ्यातून उमटायचंच नाही काही.. एखाद् दुसऱ्या शब्दाशिवाय. मग हताश व्हायचे. सारं आयुष्य शब्दांशी खेळणाऱ्या माणसाला शेवटच्या दिवसांत शब्द सापडू नयेत, या जाणिवेनं आमचे डोळे भरून यायचे.

शब्दांवर कसं काय प्रेम बसलं असेल या माणसाचं- त्या पेण-अलिबागच्या खाऱ्या, कोरड्या जमिनीत वाढताना- कळत नाही. लहानपणी शाळेत जायला कंटाळणाऱ्या या लहानग्या मुलाला एक दिवस आजोबांनी मारत मारत शाळेत पोचवलं आणि तो मुलगा कायमचा पुस्तकांचा झाला! व्हर्नाक्युलर फायनल, मॅट्रिकपासून एम ए पर्यंतच्या प्रत्येक महत्त्वाच्या परीक्षेत तो मुलगा पहिला आला. स्वतःच्या बुद्धिमत्तेवर पुढे गेला. प्राध्यापक झाला. पुढे मनमाड महाविद्यालयाचा प्राचार्य झाला. कवितेवर विलक्षण प्रेम करणाऱ्या या माणसाने कवितेतली सौंदर्यस्थळे शोधण्याचा प्रयत्न केला. पीएच डी साठी ज्ञानेश्वर-तुकारामांच्या सर्जनशील मनाचा, प्रेरणांचा ठाव घेण्याचा प्रयत्न केला. खारेपाटातील एका दरिद्री कुटुंबात जन्मलेल्या या मुलाचा साहित्य अकादमीपर्यंत पोचण्याचा प्रवास म्हणजे कवी अशोक नायगावकरांच्या भाषेत सांगायचं तर- दारिद्य्राचं सोनं करणारा प्रवास होता. हा सारा प्रवास त्यांनी त्यांच्या ‘लांबा उगवे आगरी’ या आत्मचरित्रात रेखाटला आहेच. पण आमचे वडील म्हणून, एक समीक्षक म्हणून, एक माणूस म्हणून नेमके कसे पाहत होतो आम्ही त्यांच्याकडे?

मला आठवतात ते कायम पुस्तकांत रमलेले माझे बाबा. त्यांच्या सहवासात मोठे होताना किती वेगवेगळे पदर उलगडत गेले त्यांच्या स्वभावाचे. एक जाणकार समीक्षक, कवितेवर शेवटच्या घटकेपर्यंत प्रेम करणारा काव्यरसिक, विद्यार्थ्यांना भरभरून देणारा बुद्धिनिष्ठ प्राध्यापक आणि स्वातंत्र्याचा अर्थ शिकवतानाच जबाबदारीची जाणीव करून देणारा बाप, नव्या जगातले ताणेबाणे समजून घेत नातवंडांच्या सोबत राहणारा, त्यांना आधार देणारा आजोबा, बाहेरच्या झगमगीत जगात बुजणारा, पण सामान्यजनांत सहज मिसळून त्यांच्यासोबत आनंदाचे क्षण वाटून घेणारा सुहृद आणि अलीकडे, त्यांच्या आजारपणात त्यांच्यातून नव्यानं उमलून आलेलं निरागस, लहानगं मूल.. किती वेगवेगळी रूपं पाहायला मिळाली आम्हाला या म.सु. पाटील नावाच्या बहुजन समाजात जन्माला आलेल्या, पण जन्मानं मिळालेली जातव्यवस्था नाकारणाऱ्या आणि माणसातील माणूसपण शोधू पाहणाऱ्या माणसाची!

सेवादलाचे संस्कार होते बाबांवर. साने गुरुजींचा विलक्षण प्रभाव होता त्यांच्यावर. शरद्चंद्र तर ऑल टाइम फेव्हरिट- त्यांच्या कादंबऱ्यांत वेगवेगळ्या नातेसंबंधांची ओल शोधणारे बाबा शेवटी शेवटीदेखील शरद्चंद्र चटर्जीची ‘सव्यसाची’ ही कादंबरी वाचत होते. ‘श्रीकांत’ आणि ‘चरित्रहीन’ या कादंबऱ्यांवर तासन् तास बोलायचे ते. तरुणपणी बंगाली भाषा शिकले होते. त्यामुळे अलीकडचा बराचसा वेळ जुने बंगाली चित्रपट पाहण्यात घालवायचे ते.

समीक्षक म्हणून स्वत:ला एका चौकटीत बंदिस्त करून नाही घेतलं त्यांनी. आदिबंधात्मक समीक्षा तर मराठीत रुजवलीच त्यांनी; पण निर्मितिप्रेरणेच्या संदर्भात तृष्णेचा विचारही दिला मराठी समीक्षेला. स्वत:ला अत्यंत लवचीक ठेवलं या माणसानं. ‘कोणत्याही विचारप्रणालीच्या चौकटीत आंधळेपणानं बंदिस्त होऊ नकोस. ती समजून घे,’ असं ते सांगत राहायचे. अनेकदा अनेक विचारधारा त्या- त्या काळाची अपत्यं असतात. त्या- त्या काळातील परिस्थितीतून माणसांना बाहेर काढण्यासाठी ते योग्यच असतात. पण काळ बदलल्यावर त्याचे संदर्भही बदलतात. अत्यंत टोकाच्या भूमिका घेण्यावर त्यांचा कायम आक्षेप असायचा. स्वत:ला एका विशिष्ट विचारप्रणालीत बंदिस्त न करता वेगवेगळ्या विचारप्रणालींतील माणसाच्या जगण्याचा आधार होणाऱ्या चांगल्या गोष्टी घेण्याकडे कल होता त्यांचा. ज्या विचारधारा सामाजिक न्याय, माणूसपण जपणाऱ्या असतात त्या, त्या आपल्या असातात असं म्हणायचे ते. पण माणसांना पुन्हा काही शतकं मागे घेऊन जाणाऱ्या उजव्या विचारसरणीच्या प्रतिगामी शक्तींना मात्र कायम विरोध करत राहिले ते.

बाबा स्वत: निरीश्वरवादी असले तरी त्यांनी कोणावरही त्यांचे विचार लादले नाहीत. प्रत्येकाचं स्वातंत्र्य त्यांनी जपलं. पण स्वत:च्या विचारांवर मात्र ते ठाम राहिले. मी वीस वर्षांची असताना एकदा त्यांना म्हणाले होते, ‘मी अश्रद्ध होत चाललेय असं वाटतंय मला.’ तर म्हणाले होते, ‘आपण अश्रद्ध नसतो कधीच. तुला असं वाटतंय, कारण तू श्रद्धा केवळ देवाशी जोडते आहेस. श्रद्धा ही आपल्या कामावर असते, एखाद्या विचारावर असते, एखाद्या माणसावरही असते. तू स्वत: ठरव- तू कशावर श्रद्धा ठेवायची ते.’ आणि तेव्हा मी पटकन् म्हणून गेले होते, ‘माझी श्रद्धा तुमच्यावर आहे.’ ज्यांच्यावर श्रद्धा ठेवावी, पूर्णपणे विसंबून राहावं असेच होते ते.

त्यांची श्रद्धा माणसातल्या माणूसपणावर होतीच; पण त्याहीपेक्षा जास्त शब्दांवर, शब्दांच्या ताकदीवर होती. ही ताकद त्यांना ज्ञानेश्वर-तुकारामांपासून केशवसुत, मर्ढेकर, बोरकर, इंदिरा संत, कोलटकर, पु. शि. रेगे, सदानंद रेगे, ढसाळ, डहाके यांच्यापर्यंतच्या अनेक कवींच्या शब्दांत सापडत होती. पण त्या मंडळींच्या कवितेत रमणारे बाबा अलीकडच्या कवितेबाबत मात्र नाराज होते. केशवसुतांचा वारसा नाकारणाऱ्या नव्या पिढीतल्या काही कवींनी मराठी कवितेचा चेहरा बदलेल असं नेमकं काय दिलं, हा प्रश्न असायचा त्यांच्या मनात. उत्तर-आधुनिकता आणि चौथ्या नवतेनं वगैरे जगण्यात आणि कवितेतही आलेलं कोरडेपण अस्वस्थ करायचं त्यांना. शब्दांतली ओल संपत चालल्याची खंत सतत व्यक्त करायचे ते. कविता म्हणजे केवळ राजकीय किंवा सामाजिक भाष्य नसतं, सरळसोट विधान नसतं. कविता ही करमणूक करण्याचं साधन नाही की मध्यमवर्गाच्या भावना सुखावण्यासाठी केलेला आविष्कार नाही, की मंचावर सादर करण्याचा प्रयोग नाही, हे टोकदार संवेदना बोथट करू पाहणाऱ्या नवीन काळातल्या ‘एन्टरटेनर’ कवींना सांगू पाहायचे ते. मग कधी कधी निराश होऊन म्हणायचे, ‘मीच आउटडेटेड होतो आहे का? मलाच जोडून घेता येत नाही का या नव्या कवितेशी?’ त्यांच्या दृष्टीनं चांगली कविता ती असते, जी आत्माविष्कार करतानाच जीवनाचा आणि स्वत:चाही शोध घेते.

खरं तर त्यांनी किती वेगवेगळ्या प्रतिभेच्या कवींवर लिहिलं! ज्ञानेश्वर, तुकाराम, केशवसुत, बालकवी, इंदिरा संत, कुसुमाग्रज, मर्ढेकर, शंकर रामाणी, सदानंद रेगे, ग्रेस, सुर्वे, महानोर, पुरुषोत्तम पाटील, कोलटकर, दया पवार, यशवंत मनोहर, केशव मेश्राम, ढसाळ, डहाके. प्रत्येकाचं तंत्र वेगळं, भाषा वेगळी, प्रतिमासृष्टी वेगळी. पण ते शोध घेत राहिले ते त्या कवींच्या सर्जनप्रेरणांचा, त्यांनी वापरलेल्या भाषेचा!

ते साहित्य अकादमीच्या मुंबईतील कार्यक्रमाच्या उद्घाटन सत्रात अध्यक्ष म्हणून 23 फेब्रुवारीला भाषण करणार होते. पण ते त्याआधीच पडले. त्यांची हिप जॉइंटची सर्जरी 13 फेब्रुवारीला झाली. त्यांनी सर्जरीच्या तिसऱ्या दिवशी हॉस्पिटलच्या बेडवर जवळजवळ दीड तास भाषण लिहिलं. त्या भाषणात त्यांनी म्हटलं होतं, ‘कोणत्या ना कोणत्या प्रकारची निर्मिती करणं, हे खरं तर मनुष्यत्वाचं लक्षण आहे. पण निर्मिती करायला वाव नसणं याचा अर्थ आपलं मनुष्यत्व अंशाअंशाने गमावत जाण्यासारखं आहे. आणि मनुष्यत्वाचं भान असणाऱ्या माणसासाठी ते अत्यंत वेदनादायक आहे.’

त्यांच्या म्हणण्याप्रमाणे, मर्ढेकरांच्या काळापर्यंत माणूस अशा अवस्थेपर्यंत पोचला होता. संवेदनशील माणसाला असं जगणं म्हणजे प्राणीपातळीवरील जगणं वाटतं. अशा परिस्थितीत माणसानं त्याचं मनुष्यत्व कसे टिकवायचे, हा एक पेचच असतो. मर्ढेकर, सदानंद रेगे, अरुण कोलटकर, वसंत आबाजी डहाके अशा काही कवींच्या मनात निर्मितीमध्ये येणारा अस्तित्वानुभव कवितेत येत नाही याची विलक्षण वेदना होती. बाबा त्या वेदनेला ‘अस्तित्ववेदना’ (pang of existence) म्हणायचे. त्यांच्या दृष्टीनं हे असे कवी एका अर्थानं त्यांची युगवेदना व्यक्त करणारे कवी होते.

बाबांच्या मते, असा वेदनांचा अनुभव अलीकडच्या कवींच्या कवितेत क्वचितच येत होता. नव्या काळातील ट्रिका करणारे कवी त्यांच्या स्वत:च्या आणि दुसऱ्याच्या ट्रिकांचा आनंद घेतात. या ट्रिका म्हणजे एका अर्थानं जो विनोदामधील निकृष्ट विनोद मानला जायचा तो शब्दप्रधान विनोद किंवा कोटीप्रधान विनोद होय. त्यांची परिस्थिती निर्मितीला वाव देत नाही याची कळ, वेदना त्यामागे मुळीच नाही. त्यांच्या रचनेत वेदना क्वचित व केवळ रंजन अधिक असं झालं आहे. त्यामुळे आजचे बरेचसे तथाकथित कवी ट्रिक्स्टर म्हणजे ट्रिका करणारे होत चालले आहेत की काय असं त्यांना वाटायचं.

‘स्वभास दाउनी
परि ते झटदिनि
जाई लोपुनि
मग मी हाका मारितसे
न परि हरवले ते गवसे’

सुमारे शंभरहून अधिक वर्षांपूर्वी केशवसुतांच्या ‘हरपले श्रेय’ या कवितेमध्ये शब्दबद्ध केलेला असा ध्यास जो कवी धरतो, तो खऱ्या अर्थानं प्रामाणिक असतो असं त्यांना वाटायचं. आणि असा कवी हा आत्मसाधक असतो आणि त्याची काव्यरचना हा त्याच्या आत्मसाधनेचा मार्ग असं त्यांचं स्पष्ट मत होतं. म्हणूनच कदाचित कवितेच्या खोलात शिरून, तिची मीमांसा करून ते स्वत:ही त्या मार्गावर पोचण्याचा प्रयत्न सतत करत असावेत.

बाबांचे काम शेवटपर्यंत सुरू होतं. ते आगरी शब्दकोश तयार करत होते. बरंचसं काम झालेलं आहे. काही पुस्तकं प्रकाशकांकडे दिली आहेत. अत्यंत उत्तम अनुवाद त्यांनी केले आहेत. हे सारं ग्रंथरूपात यावं म्हणून प्रयत्न करूच; त्यांच्या नावानं मराठीतील उत्कृष्ट समीक्षाग्रंथाला पुरस्कार देण्यासाठी शिवाजी विद्यापीठाच्या मराठी विभागाकडे त्यांच्या हयातीतच आम्ही काही रक्कम सुपूर्द केली होती. उशिरा का होईना, पण साहित्य अकादमीसारखा पुरस्कार त्यांना मिळाला. मराठीत दि. पु. चित्रे आणि बाबा असे दोनच लेखक आहेत, ज्यांना साहित्य अकादमीचे प्रत्येकी दोन पुरस्कार मिळाले आहेत. एक मूळ लेखनासाठी व दुसरा अनुवादासाठी!

सारंच आयुष्य केवळ साहित्यसेवा करणाऱ्या त्यांच्यासारख्या व्यासंगी समीक्षकाच्या जाण्यानं मराठी साहित्याचं किती नुकसान झाले आहे याविषयी लोक बोलतात; पण माझं नेमकं काय हरवलं आहे याचा विचार करताना वाटतं, की ज्यांचं बोट धरून इथवर प्रवास केला ते बोट सुटलं आहे. कधी मायेनं, तर कधी कठोरपणे माझ्या शब्दांवरून फिरणारे हात आता राहिले नाहीत. आणि सतत भिरभिरत मला शोधणारे डोळे विझून गेले आहेत. ‘तू माझा अभिमान आहेस. तुझ्या लेखनातून मला जिवंत ठेवलंस..’असं सहज म्हणणारे बाबा माझ्या शब्दांच्या मागे उभे राहायला असणार नाहीत यापेक्षा कोणतं दु:ख मोठं असू शकेल, नाही सांगता येत काहीच.

– नीरजा 9969810896 Nrajan20@gmail.com

(‘लोकसत्ता’वरुन उद्धृत)

About Post Author

1 COMMENT

  1. असे अनेक क्षण सरांच्या समवेत घालविण्यात मिळाले, हे आमचे भाग्य.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here