माणदेश : दंडकारण्यातील प्राचीन भूमी (Maharashtra’s land with ancient history)

मध्य भारतातील विस्तृत पठार हा भारताच्या पाच प्राकृतिक विभागांपैकी सर्वात प्राचीन भूभाग आहे. त्या भारतीय पठारात शंभू महादेव ही डोंगररांग आहे. दंडकारण्य हा भूभाग त्या डोंगररांगेमध्ये आहे. ‘माणदेश’ ही मेंढपाळ धनगर जमातीची भूमी त्यातच येते. ती भूमी पुण्य आहे असे ते मानतात. माण हा खडक त्या भूमीत विस्तीर्ण व सलग पट्ट्यात आढळतो. त्याची रचना बेसॉल्ट खडकाप्रमाणे असते. तो अग्निजन्य खडकाचा उपप्रकार आहे. तो सच्छिद्र असतो. तो खडकाचा काळाकुट्ट प्रकार मानतात. पावसाचे पाणी त्या खडकामुळे जमिनीत जास्त झिरपत नाही. त्याच्या विदारणापासून तयार झालेला माणमातीचा प्रदेश, म्हणूनही तो ‘माणदेश’ असा ओळखला जात असावा.

माणदेशाचा अक्षवृत्तीय विस्तार 17° उत्तर अक्षांश ते 17°51मी, 41° उत्तर अक्षांश आहे. तसेच माणदेशाचा रेखावृत्तीय विस्तार 74° 22मी 30° ते 75°30 मीटर पूर्व रेखांशांवर आहे. माणदेशाचा पूर्व-पश्चिम विस्तार116.8 किलोमीटर आणि दक्षिणोत्तर विस्तार 91.2 किलोमीटर असा आहे. माणदेशाचे एकूण क्षेत्रफळ अठ्ठेचाळीस हजार सातशे चौरस किलोमीटर आहे. माणदेश हा पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली आणि सोलापूर या तीन जिल्ह्यांच्या सरहद्दीवर पसरलेला आहे. तो सातत्याने दुष्काळग्रस्त आहे. माण आणि आटपाडी (संपूर्ण तालुके), सांगोला (एक्याऐंशी गावे), मंगळवेढा (बावीस गावे), जत (एकतीस गावे), कवठेमहांकाळ (तेरा गावे) आणि पंढरपूर (बारा गावे) या तालुक्यांचा समावेश माणदेशात होतो. तो भूप्रदेश भीमानदीच्या खोऱ्यातील महत्त्वाचा असा भूभाग. तो भीमा नदीला उजवीकडून येऊन मिळणाऱ्या माणनदीच्या खोऱ्यातील प्रदेश आहे. भीमा नदीखोऱ्यातील ‘भीमथडी’ आणि ‘माणदेश’ हे दोन्ही भूभाग पौराणिक व ऐतिहासिक दृष्ट्या महत्त्वाचे आहेत.

माणदेशी लोकसाहित्यात रामायण, महाभारत आणि इतर पुराणकथांचे अनेक संदर्भ आढळतात. माणदेशाची जीवनवाहिनी माणगंगा ही नदी आहे. त्या नदीच्या नामाच्या व्युत्पत्तीविषयीची कथा रामायणातील आहे. राम वनवासात दंडकारण्यात असताना तो शिकारीला गेला होता. लक्ष्मण सीतेसोबत थांबला होता. सीता थकली होती. ती झोपी गेली. तेथे पाण्याची सोय नव्हती. लक्ष्मणाने समोर असलेल्या डोंगरात बाण मारून पाणी काढले. वनस्पतीच्या पानांपासून द्रोण तयार केले. त्यात पाणी भरले, सीतेच्या उशाला आणि पायथ्याला ठेवले. लक्ष्मण निघून गेला. सीतेला जाग आली. तिने तशा अर्धवट झोपेत आळस दिला. तिचा मानेकडील भाग उशीकडेच्या द्रोणाला लागून तो द्रोण कलंडला आणि त्यातून पाणी वाहू लागले. ती माणगंगा नदी झाली. तर पायथ्याकडील द्रोणाला सीतेचा पाय लागून फलटणकडे जाणारी बाणगंगा नदी वाहू लागली. ‘माणदेश’ प्रदेश माणनदीवरूनही ओळखला जातो.

माणदेशाविषयीचा दुसरा पौराणिक संदर्भ हा आटपाडी तालुक्यातील कोळकरगणी गावातील लखमेश्वर मंदिर आणि रामदरा व घोडखूर या ठिकाणांविषयी आढळतो. लखमेश्वर मंदिरामागे असलेल्या डोंगरात सीतान्हाणी आणि रामदरा ही दोन ठिकाणे आहेत. शूर्पणखेचा पुत्र शंबरासुर हा तेथे अजिंक्य सामर्थ्य प्राप्त करण्यासाठी तप करत बसला होता. त्याच्या तपामुळे कालखड्ग दिव्य लोकांतून खाली उतरू लागले. त्या कालखड्गाला भूतलावर प्रथम रामबंधू लक्ष्मण दिसला. त्याने विचार केला, की खड्ग दुष्ट शंबासुराच्या हाती पडण्याऐवजी सत्त्वधीर लक्ष्मणाच्या स्वाधीन व्हावे. म्हणून कालखड्ग अकल्पित रीत्या लक्ष्मणाच्या हाती आले. लक्ष्मण आश्चर्यचकित झाला. त्याने त्या कालखड्गाचे सामर्थ्य अजमावण्यासाठी ते समोरच्या वेळूच्या बनावर मारले. त्यामुळे तेथे तप करत बसलेल्या शंबासूराचा खड्गाने वेध घेतला. वेळूच्या बनातून रक्ताचे पाट वाहू लागले. लक्ष्मण त्याच्या हातून निरपराध्याच्या हत्येचे पाप घडले म्हणून दुःख करू लागला. त्याचे अपराधीपण दूर करण्यासाठी साक्षात भगवान शंकर त्याच्यापुढे प्रगट झाले ! त्यांनी लक्ष्मणाला पापपुण्याचा विवेक सांगून आत्मलिंग भेट दिले. लक्ष्मणाने ते आत्मलिंग स्थापन केले. तेव्हापासून त्या ठिकाणाच्या शिवलिंग मंदिराला लखमेश्वर (लक्ष्मणेश्वर) असे नाव पडले. महापराक्रमी भीमाने बकासुराचा वध केल्याची लोककथाही जत परिसरात सांगितली जाते.

म्हसवडचा सिद्धनाथ, आरेवाडीचा बिरोबा, हुलजंतीचा महालिंगराया, जांभुळणीचा भोजलिंग, शिखरशिंगणापूरचा शंभुमहादेव, पंढरपूरचा विठोबा, फलटणचा धुळोबा, पांगरीचा सतोषाबिरोबा अशी लोकदैवते भगवान शंकराने राक्षसांचा संहार करण्यासाठी धारण केलेल्या अवतारांशी संबंधित आहेत. त्या लोकदैवतांनी मानवजातीच्या कल्याणासाठी कोण्यासूर दैत्यकुळाशी केलेला संघर्ष माणदेशाच्या भूमीशी संबंधित आहे. कोण्यासूर हा दैत्यकुळातील प्रमुख राक्षस होता. त्याला शंभर पुत्र होते. त्या प्रत्येक पुत्राने भूतलावरील साधुजन, ॠषीमुनी आणि मानव जात यांना त्रास दिला होता. त्यामुळे शंकराने दैत्य कुळातील त्या राक्षसांचा संहार करण्यासाठी विविध अवतार धारण केले. तशा लोककथा माणदेशात आढळतात. उदाहरणार्थ, मनी आणि मल्ल या राक्षसांचा संहार खंडोबा या क्षेत्रपाल देवतेने केला होता. मनी आणि मल्ल या कुळावरून त्याला मल्हारी मार्तंड असे नाव पडले असावे. महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील चिंचणी या परिसरात असणाऱ्या किल्ल आणि किट्ट या दोन राक्षसांचा वध विष्णुरूपे चिंचणी मायांकाने केल्यासंदर्भात लोककथा आहे.

माणदेश या देशनामाचे उल्लेख प्राचीन आध्यात्मिक व ऐतिहासिक ग्रंथांतही सापडतात. किंबहुना, माणदेश ही संतांची भूमी आणि तीर्थक्षेत्र आहे. पंढरपूरचा विठोबा, शिखरशिंगणापूरचा शंभुमहादेव, हुन्नूर-हुलजंतीचा महालिंगराया व बिरोबा, धुळदेवचा धुळोबा, सांगोल्याची अंबिका अशा देवदेवता आणि गोंदवल्याचे गोंदवलेकर महाराज, नाझरेवझरे येथील श्रीधर नाझरेकर, खर्डीचे सीताराम महाराज, सांगोल्याचे रानोजीबुवा, जतच्या शिवलिंगअक्का, तेरढोकीचा गोरा कुंभार, मंगळवेढ्याचा संत चोखामेळा आणि दामाजीपंत, संत कान्होपात्रा असे संत यांची मांदियाळी माणदेशामध्ये होऊन गेली. तो प्रदेश मध्ययुगात माणपरगणा म्हणूनही ओळखला जात होता. तसा उल्लेख पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात सापडलेल्या चौऱ्याऐंशीच्या शिलालेखात (1273-1275) आहे, त्यात माणदेशातील देणगीदारांची नावे आहेत. पंडिती कवी श्रीधर यांच्या रचनांत माणदेशाचा उल्लेख आढळतो. श्रीधर स्वामी यांचा जन्म 1658 साली पिता ब्रह्मानंद नाजरेकर आणि माता सावित्री यांच्या पोटी झाला. ते सुबोध आणि रसाळ आख्यान कवितेसाठी ओळखले जातात – नाझरे नाम नगरी मानगंगेच्या तिरी. श्रीधर यांचा मुक्काम माणदेशातील नाझरे-वझरे गावी होता. त्या ठिकाणी श्रीधर स्वामी यांच्या गुरूंचा मठ आहे. संत नामदेवांनी शिखरशिंगणापूरविषयी उल्लेख ‘सार्थ गाथे’मध्ये केलेला आहे – धन्य धन्य माणदेश विठ्ठले केला रहिवास | नामा म्हणे विष्णूदास देई उल्हास भक्तीचा| किंवा कृष्णा-वेण्या संगे मी स्नाने करूनिया | नमन केले मावळे स्वरि | शंभू वंदिला पर्वत शिखरी | मग ती पावली पंढरी | समर्थ रामदास यांनी माणदेशाचा उल्लेख असा केला आहे- सोरटीचा देव माणदेशी आला | भक्तीशी पावला सावकाश | रा.चिं. ढेरे यांनी तशी नोंद केली आहे.

कृष्णा इंगोले हे माणदेशच्या इतिहास-भूगोलाचे अभ्यासक. ते म्हणतात, की राष्ट्रकूट घराण्यातील सर्वात प्राचीन राजा मानांक (इसवी सन 375) याने त्याचे साम्राज्य कृष्णा नदीच्या खोऱ्यात म्हणजे कुंतल देशात स्थापन केले होते. त्याची राजधानी सातारा जिल्ह्यातील माणपूर (माण) होती. मानांक राजाचा देश म्हणून ‘माणदेश’ हे नाव पडले असावे. मानांक राजाविषयी लोककथा अशी आहे, की तो शिकारीला जात असताना ज्या ठिकाणी त्याचा मौल्यवान खडा पडला त्या ठिकाणाला ‘माणिकदंड’ असे नाव पडले. तसे गाव आहे. मानांकाचा नातू गरुडराजा राज्य करत असताना म्हसवडच्या सिद्धनाथ मंदिरात पांढरा हत्ती वारला. तेव्हा गरुडराजाने परांड्याच्या किल्ल्यातून दगड आणून त्या हत्तीची प्रतिकृती घडवली. तो हत्ती सिद्धनाथाच्या मंदिरात नंदीप्रमाणे उभा आहे. प्रचंड आणि देखण्या अशा त्या हत्तीच्या पायातून रथसप्तमीला सूर्योदयाची किरणे सिद्धनाथाच्या मूर्तीवर पडतात.

राष्ट्रकूट, चालुक्य, शिलाहार आणि देवगिरीचे यादव या घराण्यांतील राजांनी माणदेशात राज्य केले. राजा मानांक, त्याचा पुत्र देवराज (त्याच्या नावावरून देवापूर), पणतू अभिमन्यू हे सर्व राष्ट्रकूट राजे होते. ते इसवी सन 375 ते 974 च्या दरम्यान माणदेशावर राज्य करत होते. पांडुरंगपल्ली व उटीवाटिका या दोन ताम्रपटांमध्ये माणदेशात अस्तित्वात असलेल्या प्राचीन राष्ट्रकूट घराण्यातील राजे आणि त्यांचा राज्यकारभार यांविषयी माहिती आहे. बदामीचा दुसरा पुलकेशी आणि उत्तरेकडून चाल करून आलेला राजा गोविंद हेदेखील राष्ट्रकूट घराण्यातील राजे.

कल्याण चालुक्य यांचे राज्य माणदेशावर बाराव्या शतकाच्या पूर्वार्धात होते. तसा शिलालेख म्हसवडच्या सिद्धनाथ मंदिराच्या उजव्या ओसरीवरील भिंतीवर कानडी लिपीत आहे. तो शिलालेख कल्याण चालुक्य चक्रवर्ती जगदेकमल दुसरा यांच्या दहा वर्षांच्या कारकिर्दीतील, म्हणजे 1146चा आहे. त्याचा महामंडलेश्वर बिजल याचा तळ मंगळवेढे येथे असताना बिजल याचा दंडनायक काळीमरस याने म्हसवड येथे येऊन सिद्धेश्वर देवाच्या अंगभोगासाठी आणि चैत्र उत्सवासाठी दान दिल्याची नोंद तेथील कोरीव लेखात आहे. महामंडलेश्वर व दंडनायक हे हुद्दे आहेत. जगदेकमल आणि बिजल हे दोघे पुढे मंगळवेढ्याच्या स्वतंत्र कलचुरी राज्याचे संस्थापक झाले.

माणदेश देवगिरीच्या यादव राजांच्या आधिपत्याखाली तेराव्या शतकात होता. यादव राजा भिल्लन याचा नातू सिद्धन याने शंभुमहादेव डोंगररांगेजवळ शिंगणापूर हे गाव वसवले. त्या संबंधीचा पुरावा वेळापूर आणि पंढरपूर येथील शिलालेखांत आहे. नृपती रामचंद्रदेव यादव यांचा सर्वाधिकारी ब्रह्मदेवराणा व त्याचा भाऊ बाईदेवराणा यांनी वटवेश्वर आणि जोगेश्वर देवळांचा भाग बांधून दिला. बाईदेवराणा हा माणदेशाचा सर्वाधिकारी होता. तसेच, रामचंद्रराव यादव यांचे प्रधान हेमाडपंत यांची मोडीलिपी, बाजरीचे पीक आणि चुना व खांब न वापरता बांधलेली मंदिरे माणदेशातील खेड्यापाड्यात आढळतात.

अल्लाउद्दीन खिलजीने विजयनगरच्या यादव साम्राज्याचा पराभव 1298 मध्ये केला. ती दक्षिणेतील मुघलांच्या राजवटीची सुरुवात होय. दिल्लीचा बादशाह मोहम्मद बिन तुघलक याने मुघल राजवटीच्या विस्तारासाठी दक्षिणेत पाठवलेल्या हसनगंगू बहामनी याने त्याच्या साम्राज्याची कुतुबशाही, निजामशाही, बरीदशाही, आदिलशाही आणि इमादशाही अशी पाच शकले केली. माणदेश आदिलशाही व निजामशाही यांच्या संघर्षात सतत धगधगत राहिला आहे. बुऱ्हाण निजामाने 1534-54 च्या दरम्यान आदिलशहाच्या प्रदेशावर हल्ले अनेक वेळा केले. ते सर्व आदिलशहाच्या सैन्याने परतावून लावले. आदिलशहाने माण या परगण्याचा प्रमुख म्हणून नेमलेल्या सैफ-ऐन-उलमुल व निजामाचा प्रतिनिधी इब्राहिम यांच्यांत संघर्ष झाला. सैफ-ऐन-उलमुल त्यामध्ये शिरजोर होताच त्याचा बंदोबस्त करण्यासाठी आदिलशहाने बिआस अली बेग व दिलावरखान हबशी यांना पाठवले. त्यांनी सैफ-ऐन-उलमुल याचा पाडाव केला. निजाम व आदिलशहा एका बाजूला आणि सांगोल्याचा किल्लेदार खवासखान हा दुसऱ्या बाजूला यांच्यात कमलापूरजवळ लढाई झाली. त्यात खवासखानाचा पराभव होऊन तो मारला गेला. त्याच्या नावावरून खवासपूर असे नाव सांगोला तालुक्यातील एका गावाला मिळाले. या संघर्षाविषयीचा इतिहास गोपाळ देशमुख यांनी लिहिलेला आहे.

शिवाजी महाराजांनी अफजलखानाच्या वधानंतर नेताजी पालकर यांना माणदेशाच्या स्वारीवर पाठवले. नेताजी पालकर यांनी सांगोले, कोळे, आरग, कमलापूर, अथणी येथपर्यंतचा, आदिलशहाचा प्रदेश लुटला. शिवाजी महाराजांच्या वंशाचे कुलदैवत हे शिखरशिंगणापूरचा शंभुमहादेव हे होते. बळीप ही शिखरशिंगणापूरच्या स्थानमहात्म्याविषयीची लोककथा प्रसिद्ध आहे. बळीप हा शंकराचा भक्त होता. त्या व्यक्तीचा संदर्भ शिवाजी महाराजांच्या भोसले वंशाशी जोडलेला दिसून येतो असे रामचंद्र चिंतामण ढेरे यांनी म्हटले आहे.

शिवाजी महाराजांच्या हालचालींच्या पाऊलखुणा माणदेशातील महिमानगड, भूपाळगड, सांगोला, मंगळवेढा, पिलीव, रामपूर येथील किल्ल्यांच्या अवशेषात जाणवतात. शिवाजी महाराजांनी आदिलशहाच्या मदतीने मुघलांच्या प्रदेशावर स्वारी केली. त्यावेळी मुघलांच्या ताब्यातील सांगोला किल्ला काबीज करून माणकोजी या सरदारास किल्लेदार म्हणून नेमले. इतकेच नव्हे तर म्हसवडच्या होनाजी व नागोजी माने यांना त्यांच्या पडत्या काळात संभाजी महाराजांनी माण परगण्यातील पेठ, वज्रादाबाद, वाडेगाव, चिंचोली, सोनद, मानेगाव, मेडशिंगी अशी अकरा गावे इनाम म्हणून दिली. संभाजी महाराजांनंतर मराठ्यांच्या सर्व सरदारांना साम्राज्य टिकवण्यासाठी मुघल सत्ताधीश औरंगजेबाच्या सैन्याशी निकराची झुंज द्यावी लागली.

संताजी-धनाजी घोरपडे यांना औरंगजेबाचा सेनापती लुल्फुलाखान याच्याविरूद्धच्या खटावच्या लढाईत अपयश आले. मात्र त्यांनी जतच्या सटवाजीराव डफळी यांच्याशी संधान साधले. त्यामुळे त्यांना म्हसवड येथे आलेल्या लुल्फुलाखान याला परत पाठवण्यात यश आले. छत्रपती राजाराम यांनी म्हसवडचे नागोजी माने या सरदारांना माण परगण्यातील सरदेशमुखी दिल्याची नोंद आहे. त्यांना बारा महालांच्या सनदा व सरदेशमुखी दिली होती. त्यातील काही गावे अशी – कासेगाव, ब्रह्मपुरी, सांगोले, नाझरे, म्हसवड, आटपाडी, अकलूज. औरंगजेबाने राजारामाच्या मृत्यूनंतर दिल्लीला नजरकैदेत असलेल्या संभाजी महाराजांच्या पत्नी येसुबाई आणि मुलगा शाहू यांची सुटका केली. त्यामुळे मराठा साम्राज्यामध्ये वाद निर्माण झाला. त्यावेळी सातारची गादी शाहू महाराज यांच्याकडे आणि कोल्हापूरची गादी महाराणी ताराबाई यांच्याकडे गेली. माण परगण्याचा भाग हा शाहू यांच्या आधिपत्याखाली आला. शाहू यांनी माण परगण्याची जबाबदारी कराडच्या पंतप्रतिनिधींकडे सोपवली होती. त्यांनी अंताजी शिवदेव चावरे या सरदाराची नेमणूक माण परगण्यासाठी केली. त्यांना सांगोला महालातील नाडगवंडीचे वतन दिले, शाहू महाराजांनी पांढरे या सरदारांना मंगळवेढ्याचे प्रमुख म्हणून नेमले व त्यांच्या मदतीने तेथे किल्ला बांधला. तो किल्ला मंगळवेढा या ठिकाणी आहे.

शाहू महाराजांकडून बाळाजी विश्वनाथ यांना पेशवाईचे अधिकार मिळाल्यापासून ते राज्याची घडी बसवण्यासाठी राज्यभर हिंडत असत. त्यांनी माण दौऱ्यात दिघंची येथे नाझरे, कोळे, कवठेमहांकाळ या ठिकाणी मुक्काम केला होता. शाहू महाराजांच्या मृत्यूनंतर ताराबाई यांनी पानगावी सांभाळलेला रामराजा याला दत्तक घेऊन गादीवर बसवले खरे, पण रामराजे नानासाहेब पेशवे यांच्या हस्तक्षेपामुळे पेशवाईच्या तंत्राने वागू लागले. त्यामुळे ताराबाई व पेशवे यांच्यातील संघर्ष शिगेला पोचला. तेव्हा पेशव्यांनी ताराबाईची सत्ता कमकुवत करण्याच्या दृष्टीने त्यांचा प्रमुख आधार असलेले कराडचे दादोबा पंतप्रतिनिधी यांच्याकडून वऱ्हाड प्रांत काढून घेतला. शेवटी, ताराबाई यांनी यमादी शिवदेव यांच्या मदतीने 10 सप्टेंबर 1750 ला सांगोल्याची लढाई केली. त्यात महाराणी ताराबाई यांना अपयश आले व महाराष्ट्राच्या इतिहासाला कलाटणी देणारा सांगोल्याचा तह झाला. सांगोल्याचा तह ही महाराणी ताराबाई यांच्या कारकिर्दीतील अत्यंत महत्त्वाची घटना आहे. तो तह अंबिका देवीच्या मंदिरात पेशवे आणि पंतप्रतिनिधी यांच्यात झाला होता. त्या तहानुसार पेशव्यांनी त्यांच्या ताब्यात मराठा समाजाची पूर्ण सत्ता घेतली. माणदेशाच्या इतिहासात शिवकाळात आणि पेशवेकाळात म्हसवडचे माने, मलवडीचे घाडगे, औंधचे पंतप्रतिनिधी आणि जतचे चव्हाण-डफळे घराणे यांचे उल्लेख आहेत.

– महादेव दिनकर इरकर 7387194364 mahadeoirkar@gmail.com

About Post Author

2 COMMENTS

  1. मातीशी घट्ट नाते असलेला माद्या कधी महादेवराव झाला हेच कळले नाही.आपल्या आई बरोबर ठाणे जिल्हा आताचा पालघर जिल्ह्यातील वसई तालुक्यातील पश्चिम किनारपट्टी वरील गावामध्ये शेतीची,वाडीतील बागायती व घराच्या पायाभरणी पासुन इतर बांधकामाच्या सामानाची योग्य ठिकाणी मांडणी करून आपल्या कष्ठाचा जनमानसात ठसा उमटवला.लोकांच्या घराच्या ओटीवर या माय लेकाने जेवण करायचे तिथेच झोपायचे असे दिवस काढले.आज स्वतःच्या कर्तृत्वावर महादेवराव प्रोफेसर झाले.वेगवेगळ्या स्थरावर आपल्या वकृत्वाच्या जोरावर प्रबोधन करु लागले.लिहिण्या सारखे भरपूर आहे.पण मलाही मर्यादा आहे ह्याचे भान आहे.अशा ह्या महान माणसाला माझा नमस्कार.

  2. माणदेश बाबत विस्तृत लेखन आपल्या लेखातून वाचून मन तृप्त झाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here