मधु दंडवते – उत्स्फूर्त, विनोदी, तिरकस…

2
211

दिल्ली येथील संसद भवनात ठसा उमटवणाऱ्या महत्त्वाच्या काही मराठी व्यक्तींमध्ये प्रोफेसर मधू दंडवते यांचे नाव घ्यावे लागेल. मधू दंडवते लोकसभेवर 1971 ते 1990 या दोन दशकांत सातत्याने निवडून आले. सत्ताधारी पक्षात असोत अथवा विरोधी बाकांवर बसलेले असोतदंडवते यांनी त्यांच्या अभ्यासू वृत्तीने आणि कुशल वक्तृत्व कलागुणांनी संसद गाजवली. मधू दंडवते यांनी त्यांच्या उत्स्फूर्त आणि विनोदी परंतु मार्मिक भाषणांनी राजकीय वर्तुळात ठसा उमटवला.

मधू दंडवते यांनी त्यांचे Dialogue with Life हे आत्मचरित्र 2005 मध्ये प्रसिद्ध केले. त्यांच्या त्या आत्मचरित्रात त्यांच्या अनेक मार्मिक भाषणांचा उल्लेख आहे. त्यांतील काही प्रसंग या लेखात उद्धृत केले आहेत:

आणीबाणीनंतर, दंडवते मोरारजी देसाई यांच्या मंत्रिमंडळात रेल्वेमंत्री होते. परंतु मोरारजी देसाई यांचे सरकार अल्पकालीन ठरले. इंदिरा गांधी चिकमंगळूर येथून 1980 मध्ये निवडून आल्या. त्यांनी केंद्रात काँग्रेसचे सरकार पुन्हा स्थापन केले. त्यानंतर दंडवते आणि इंदिरा गांधी यांची संसदेत प्रथमच भेट झाली.

“इंदिराजी, निवडणुकीतील तुमच्या विजयाबद्दल हार्दिक अभिनंदन…” – दंडवते.

“धन्यवाद, दंडवते. तुमचे गेल्या सरकारमधील काम वाखाणण्यासारखे होते. हे माझे दुर्भाग्य, की तुम्ही माझ्या सरकारमध्ये नाही…” – इंदिरा गांधी.

“मॅडम, परंतु ते माझे सौभाग्य, की मी तुमच्या सरकारमध्ये नाही..” – दंडवते.

अर्थात, इंदिरा गांधी यांनी विषय खेळीमेळीत घेतला आणि दोघेही खळखळून हसले.

दंडवते यांच्या वाचण्यात ‘शिवांबुचे उपचार’ हे पुस्तक आले. मोरारजी देसाई यांनी त्या पुस्तकाला प्रस्तावना लिहिली आहे. त्या काळी, दंडवते मोरारजी देसाई यांच्या कॅबिनेटमध्ये मंत्री होते. दंडवते यांची मोरारजी यांच्याशी भेट झाली, तेव्हा झालेला संवाद…

“मोरारजीभाई, मी ‘शिवांबुचे उपचार’ हे पुस्तक नुकतेच वाचले. त्याला तुमची प्रस्तावना आहे. तुम्ही स्वतःदेखील शिवांबुचे उपचार घेता का?” – दंडवते.

“नक्कीच. मी स्वतःवर शिवांबुचे उपचार करतो आणि माझा सल्ला आहे, की तुम्हीदेखील ते करा, तुमचे आयुष्य वाढेल.” – मोरारजी.

“मोरारजीभाई, मला अनेक वर्षे जगायचे आहे. परंतु ते चवीने…”

झालेल्या विनोदावर दोघेही हसले…

इंदिरा गांधी सरकारने आणिबाणीमध्ये विरोधी नेत्यांना अटक केली. दंडवते यांनादेखील अटक झाली. दंडवते, लालकृष्ण अडवाणी आणि शामनंदन मिश्रा यांना पोलिसांनी जेलमध्ये एकत्र आणले. तिघांची झडती घेतली गेली. शामनंदन मिश्रा यांनी प्लास्टिकचे बूट घातले होते. जेलरने शामनंदन मिश्रा यांच्या बुटाची टाच उघडून पाहण्याचा प्रयत्न केला. तो बुटाच्या टाचेत काही लपवले तर नाही ना याची खात्री करून घेत होता.

योगायोगाने, इंदिरा गांधी यांनी वृत्तपत्रात दोनच दिवसांपूर्वी विधान केले होते, “Opposition must reach its soul”

दंडवते जेलरला म्हणाले, “Indiraji said in the newspaper, that opposition must reach its soul. She meant ‘soul’ and not ‘sole’…”

गंभीर वातावरण अचानक हलके झाले…

दंडवते त्यांचे मत आवश्यक तेव्हा परखड शब्दांत मांडण्यास कचरत नसत. दंडवते यांना आणीबाणीत बंगलोर कारागृहात ठेवले होते. तेथे त्यांना मृणाल गोरे आणि लॉरेन्स फर्नांडिस यांच्यावर झालेल्या अत्याचारांची बातमी कळली. त्यांनी एका कर्मचाऱ्याच्या हाती इंदिरा गांधी यांना त्याबाबत पत्र पाठवले. पत्राच्या शेवटी दंडवते म्हणतात, “हे निश्चित आहे, की या सर्व अत्याचारांविरुद्धचा लोकांचा राग एके दिवशी उफाळून येईल आणि जे काही घडले त्याला  लोक योग्य प्रत्युत्तर देतील.”

दंडवते संसदेत त्यांचे बजेट मांडत होते. तेवढ्यात त्यांचा चष्मा खाली पडला. काँग्रेसच्या बाकावर बसलेला एक सदस्य गमतीने म्हणाला, “दंडवते, माझा चष्मा हवा आहे का?” त्यावर दंडवते हसत म्हणाले, “नको, तुमचा चष्मा नक्कीच ‘short-sighted’ असणार. मला त्याचा उपयोग नाही…”

– गिरीश घाटे 9820146432 ghategp@gmail.com

About Post Author

2 COMMENTS

  1. मधु दंडवतेंचा वेगळा पैलू दर्शविणारा लेख.त्यांचे बंधू बाळ दंडवते यांचा आणीबाणीच्या वेळी सहवास लाभला होता. त्यांच्या बोलण्यातही विनोदाची पेरणी असायची.लेख वाचून त्यांच्या आठवणी ताज्या झाल्या.

  2. शिक्षक,समाजवादी संस्कार, वाचन, चौफेर निरीक्षण, उत्तम क्रिकेटपटू यामुळे प्रा.मधू दंडवते हे बहुआयामी व्यक्तिमत्त्व ठरले. कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात दंडवते यांचे भाषण झाले होते. यात त्यांनी वर्डस वर्थची कविता म्हणून दाखवली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here