वडपिंपळाचा पार ही कल्पना पारंपरिक म्हणूनच तिचा समावेश आपल्या नगररचनेत होत आला आहे. आपण वृक्षांना देवासमान मानत असल्याने त्यांची स्थापना दगडाच्या पारावर करतो. तुळशीला वृंदावनात स्थापन करतो. नगररचनेत पार हा अविभाज्य भाग बनत असे. तसे पाश्चात्य संस्कृतीत नसल्याने आधुनिक नगररचना शास्त्रात त्याचा उल्लेख नसतो.
गेल्या साठ वर्षांत अनेक नगरांचे विकास नकाशे बनले, पण कोणीही पाराचा समावेश नगररचनेत केला नाही. मुंबई , कोलकाता, दिल्ली या, इंग्रजांनी रचलेल्या नगरांत पार नाही. अनेक गावांतले पार डोळ्यांत भरतात. वटपौर्णिमेला सजलेल्या सुवासिनी वडाभोवती जमतात आणि त्यावेळी पारावर इंद्रधनुष्य अवतरते!
माझ्या आठवणीतला पार कल्याणचा. मुंबई, बेळगाव, कारवार, डांग, दादरा, नगरहवेलीसह संयुक्त महाराष्ट्र मिळालाच पाहिजे ही चळवळ जोमात होती, तेव्हा आचार्य अत्रे यांचा दैनिक ‘मराठा’ आग ओकत होता. तो वाचल्याशिवाय कल्याणकर जेवत नसत. तेव्हा दैनिक ‘मराठा’ कल्याणपर्यंत येण्याआधीच संपून जायचा. कोणीतरी रात्रपाळीवाला ‘मराठा’ घेऊन येई आणि त्याचे पारावर उभा राहून सार्वजनिक वाचन करे. ते ऐकायला गर्दी होत असे. तो पार कल्याणच्या जन्मापासून असावा. पाराचे नगराच्या भावनिक जीवनात महत्त्वाचे स्थान होते.
पाराची भारतीय संकल्पना संपूर्ण गावात आणणारे महाराष्ट्रातल्या जळगाव जिल्ह्यात पारोळा हे छोटे गाव आहे. तिथे चौरस्त्यांमध्ये अथवा कडेला ‘पारांच्या ओळी’ असल्याने पारओळी असे नाव पडले. पुढे त्याचे पारोळा झाले. गावातले रस्ते काटकोनात शिस्तशीर आहेत. धुळ्याहून जळगावकडे जाणा-या राष्ट्रीय महामार्गावर पारोळा आहे. २००१च्या शिरगणतीनुसार पारोळ्याची लोकसंख्या ३४,८०० आहे.
नगररचनेत भारतीय मनाचा वेध घेणारे पारोळा हे एकमेव गाव आहे. ‘लेकसिटी’ म्हणून उदयपूर प्रसिध्द असले तरी त्याचे नाव सरोवरनगर नाही. नैसर्गिक वैशिष्ट्यामुळे पडलेले ‘उदकमंडल’ म्हणजे उटकमंड हे नाव आहे. पार अनेक जुन्या गावांत दिसतात. पार, पुष्करणी, तलाव, नद्यांचे घाट या सगळ्या एतद्देशीय सुरेख कल्पना आहेत. इंग्रज काय किंवा मोगल काय, त्या कल्पना त्यांच्या संस्कृतीत नसल्याने त्यांनी त्यांचा समावेश त्यांच्या रचनांत केला नाही.
चिरेबंदी पार आणि त्यावरचे वड -पिंपळ शेकडो वर्षे जगतात. मी १९६१ साली वेरूळच्या लेण्यांच्या अभ्यासासाठी एकटा गेलो होतो. घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाचे पुरोहित धोंडोशास्त्री देवीदास उपाध्ये यांच्याकडे मुक्काम होता. सूर्यास्त झाला की लेणी बंद होत. गावात आले की मी तिथल्या विस्तृत पारावर बसत असे. बरेच लोक येऊन तिथेच बसत. त्यांच्याशी गप्पा होत. त्याकाळी करमणुकीची साधने नव्हती. त्यामुळे तिन्हीसांजेला लोक जमत.
पारोळा गावात पाराशिवाय पाहण्यासारख्या आणखी दोन-तीन गोष्टी आहेत. त्यात पारोळ्याचा भुईकोट किल्ला आणि बालाजीचे जागृत देवस्थान यांचा समावेश होतो. पारोळा हे झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचे माहेर असल्यानेही सर्वांना परिचित आहे. बालाजीचे मंदिर असण्याचे कारण तेथील भक्त गिरिधर शिंपी यांना तिरुपतीच्या बालाजीकडून साडेतीनशे वर्षांपूर्वी मूर्तीचा प्रसाद मिळाला! ती मूर्ती चैतन्यमय होऊन वजनाने जड होण्याचा चमत्कार पाहण्यासाठी दरवर्षी लोक जमतात.
खानदेशातील विणकरांचे केंद्र म्हणूनही पारोळे प्रसिध्द होते. पुढे, कापड गिरण्या झाल्यावर त्यांचा धंदा बसला. गावात १७२७ साली बांधलेला भुईकोट किल्ला आहे. तटाभोवती पाण्याचे खंदक आहेत. पण किल्ला जीर्ण अवस्थेत आहे. त्याची डागडुजी करणे गरजेचे आहे.
पारोळ्याच्या मोठ्या महादेवाच्या मंदिराजवळ श्री. संत यांचे विठ्ठलमंदिर तीनशे वर्षे जुने आहे. ज्येष्ठ पौर्णिमेला अंमळनेरच्या सखाराम महाराजांसह सगळे वारकरी या मंदिराचे दर्शन घेऊन मगच ती वारी पंढरपुरला जाते. सखाराम महाराजांची समाधी अंमळनेरला नदीकाठी आहे.
पारोळा नगरपालिकेचे १८६४ साली कलेक्टरसह सतरा सभासद होते. त्यात बळवंतराव नारायण पेठे व माधवराव बळवंतराव पेठे हे बापलेक होते. बळवंतराव हे माझे खापर पणजोबा. त्यांनी तेथे १८२०च्या सुमारास कोकणातून स्थलांतर केले असावे. पुढे त्यांनी झाशीची राणी लक्ष्मीबाईंच्या सैन्यात अठरा वर्षे नोकरी केली. ते १८५७ च्या संग्रामानंतर बरहाणपूर मार्गे पारोळ्यास आले. त्यांनी खानदेशातली जमीन सुपीक म्हणून शेती केली. कुलकर्णी केली. घर बांधले. आता घर-शेती, काही नाही. पारोळ्यात शंकराचे एक मंदिर पाहिले. ते पेठ्यांचे आहे असे कळले, पण पुरावा शोधू शकलो नाही.
साठ वर्षें झाली, कोणी पेठे पारोळ्यात राहात नाही.
संदर्भ: पारोळा नगरपालिका शताब्दी महोत्सवानिमित्त १९७२ साली प्रकाशित केलेला विशेषांक.
– प्रकाश पेठे ९४२७७८६८२३ prakashpethe@gmail.com