पण आता असे भटके (ट्रॅव्हलर्स) राहिलेत कुठे – टूरिस्ट सारे! प्रवासी कंपन्यांच्या वेगवेगळ्या अवतारांना शरण. मला उच्चमध्यमवर्गीयांचे एक व्यवच्छेदक लक्षण ठाऊक आहे. भेटले की केलेल्या प्रवासाबद्दल किंवा खाल्लेल्या पदार्थांबद्दल बोलत राहायचे! आजारी मनाचे लक्षण आहे ते किंवा सारी कामप्रेरणा नष्ट झाल्याचे. हनिमूनचे फोटो दाखवण्याचा मूर्ख अश्लीलपणा हे पण याच वर्गाचे लक्षण! जर अनुभवाला मनापासून सामोरे जायचे तर फोटो कोण काढील? दारू पीत त्या संबंधीची वर्णने कोण सांगील? पण लग्नाच्या नात्यातला चार्म संपला, की ‘आमची युरोपची टूर’, ‘आम्ही ठेक्कडीला गेलो होतो तेव्हा’ अशा गप्पा सुरू होतात – बकार्डी पीत पीत…
‘आठवडाभर मी ट्विट करणार नाही’ असे जाहीर करत राजदीप सरदेसाई नाही का कर्नाटकात भटकायला गेला? आणि त्याची बायको सागरिका घोष लिहीत होती आठवडाभर जगाला ट्विट करत – नागरहोळे आणि काबिनी किती सुंदर आहे म्हणून! मनात आले, ‘अगे माझ्या बायो, जर ते इतके सुंदर आहे तर एंजॉय कर आणि गप बस की! ट्विट करून जगापाशी बोंबलतेस याचा अर्थ आतूनच काहीतरी चुकलेय!” आम्ही जगतो ती किती मज्जा असे मध्यमवर्गीय लोक जेव्हा ठासून सांगू लागतात – तेव्हा त्यांच्या कार्पेटखाली प्रचंड दांभिक कचरा साठतोय हे चाणाक्षपणे पाहता येते.
पु.ल. म्हणजे ‘अपूर्वाई’साठी परदेशी जाणारे पहिल्या धारेचे समाजवादी कार्तिकेयस्वामी; तर अनिल अवचट म्हणजे दुसर्या धारेचे पुण्यालाच अपूर्व करून प्रदक्षिणेचे पुण्य मिळवणारे पुणेरी गणपती! पूर्वी वाचकांचे जग दोन भागांत विभागले गेले होते. पुलं आवडणारे आणि पुलं नावडणारे; आता, नवीन जगात एकतर तुम्हाला अनिल अवचट आवडतात किंवा त्यांचा कंटाळा येतो. ‘नाही आवडावे’ असं त्यांच्या लेखनात काही नाहीच. पण कंटाळा येण्यासारखे खूप काही आहे. त्यांचा दंभ किती मोहक आहे ? उगीच का वर्णी लागते कॉर्पोरेट आणि एन आर आय जगात त्यांची ? अनिल अवचट मला बोअर करतात. माझा राग अनिल अवचटांच्या लेखनावर नाही. राग येईल असे ते लिहीतच नाहीत, मुळी! पण त्यांच्या बिनमिठाच्या नॅरेटिव्हजनी मला सुपरकंटाळा येतो. इयत्ता आठवीपर्यंत मुले किंवा नवीन मराठी शिकणारे परभाषिक यांनी अवचट अगत्यानं वाचावेत; मात्र नंतरही त्यांनाच कवटाळणार्या वाचकांचा पॅटर्न आता, मला प्रेडिक्ट करता येतो.
माझ्या एका माजी सहकारणीला मी सांगत होते “ च्यायला, जगात साबुदाण्याची खिचडी आणि पाळीत गरम पाण्याची बादली’ या दोन गोष्टींनी अनेक पुरुषांची आयुष्ये उध्वस्त झाली आहेत महाराष्ट्रात. ही पुरोगामी बाईची पुरुषाला पान्हा फोडायची ईर्षा अवचटांनी ताडून त्यांनी ‘लग्न’ या व्यवस्थेची जी पार्शल वर्णने केलीत त्यांना मी (विनोबांच्या भाषेत) वाचाचौर्याचे लक्षण मानते. कारण तसे ‘लग्न’ वास्तवात असताना त्यात खिचडीसोबात इतर कोणकोणत्या गोष्टी आणि नावडते विनिमयदेखील असतात त्या असुंदर भागाबद्दल अवचट अवाक्षर लिहीत नाहीत.
– ज्ञानदा देशपांडे
भ्रमणध्वनी : 9320233467
dnyanada_d@yahoo.com
बोंबलाच्या वासाने कुणाची भूक
बोंबलाच्या वासाने कुणाची भूक उद्दिपित होउन तोंडात लाळ गळते तर कुणाची भूक नाहीशी होउन मळमळते. वास तोच असतो. एखाद्याचा जगण्याचा आनंद हा एखाद्याच्या तुच्छतेचा विषय असू शकतो. एखाद्याचे अन्न दुसर्याचे विष वा टाकावू पदार्थ असू शकते. त्यामुळे एखाद्याच्या लेखनाने एखाद्याला आनंद मिळेल तर दुसर्याची चिडचिड होईल. आपण सोडून सर्व जग तुच्छ आहे असे समजणारी माणस ही याच जगाचा घटक असतात. तो मान्यही आहे.आपल्याला या जगाचे जणूकाही सर्व आकलन झाले आहे व बाकी लोक हे किती अज्ञानी! बेचारे गंदी नाली के किडे! हे असेच मरणार, त्यांची लायकीच ती. असा कीव युक्त तिरस्कार उत्पन्न व्हायला लागतो. मनोविकारांचा मागोवा या डॉ श्रीकांत जोशींच्या पुस्तकात अशा मॅनियाक व्यक्तिमत्वांवर ‘दुनिया मेरी जेब मे’ असे प्रकरण आहे.इतरांना तुच्छ लेखण्यातून आपण ग्रेट असल्याची भावना त्यांना सुखावून नेते.इतरांचा उपहास करण्याची वा तुच्छ लेखण्याची संधी ते सहसा सोडत नाहीत.पहिलवानांना जशी ‘रग’ जिरवण्यासाठी ‘आखाडा’ लागतो तशा या बुद्धीदांडग्यांना आपली बौद्धिक माज/खुमखुमी जिरवण्यासाठी वैचारिक आखाडे लागतात. दगडाला टक्कर देणारा एडका ज्या जोशात वावरतो त्याच जोशात ही मंडळी वावरतात. जर अचानक या एडक्याचा दगड काढुन घेतला तर तो जसा सैरभैर होतो तशी काही अवस्था यांना ‘खाद्य’ वा ‘टार्गेट’ न मिळाल्यावर होते.मग ही मंडळी मिळेल त्याला टार्गेट करण्याचा प्रयत्न करतात.
वैचारिक वाद प्रतिवादात या गोष्टी घडत असतात कारण भावना नावाचा फॅक्टर अस्तित्वात असतो. तो त्याला स्वस्थ बसू देत नाही.आपल्या विचारांशी सहमत नसणार्यांचे सहअस्तित्व त्याला खुपू लागते. तो त्यांना शत्रू मानायला लागतो. मग साम दाम दंड भेद वगैरे नीती वापरुन आपल्या बाजूला वळवण्याचा प्रयत्न करतो किंवा त्याला संपवण्याचा प्रयत्न करतो.
Comments are closed.