नाशिकच्या नवरात्रीत ब्रिटिश साहेबांचा गोंधळ!

0
180

नाशिकमधील गोदाकाठच्या श्री बालाजी मंदिराच्या नवरात्रोत्सवात एका ब्रिटिश अधिकाऱ्याने 1839 मध्ये अडथळा आणल्याने शहरात गोंधळ निर्माण झाला होता. ब्रिटिशांना तो गोंधळ थोपवण्यासाठी लष्कर बोलावावे लागले. अखेर, काही नाशिककरांना सहा महिन्यांची कैद व दंड झाला! त्या निर्णयाविरूद्ध नाशिककरांनी लढा दिला आणि  ब्रिटिश अधिकारी व शिक्षा देणारा मॅजिस्ट्रेट यांना दोषी ठरवण्यात आले. ती घटना 1839 ची. ती नाशिकच्या नवरात्र उत्सवाशी संबंधित आहे.

त्या घटनेची नोंद श्री.र. पुरोहित यांनी नोंदवलेली आहे. श्री बालाजी मंदिर देवस्थानतर्फे नवरात्रीनिमित्त मोठा उत्सव साजरा करण्याची पद्धत आहे. त्या उत्सवात महत्त्वाचा कार्यक्रम म्हणजे भंडारा, म्हणजेच प्रसादाच्या भोजनाचा कार्यक्रम. ब्रिटिशांनी पेशवाई 1818 मध्ये खालसा केल्यानंतर नाशिककरांचा ब्रिटिशांशी संघर्ष कोणत्या ना कोणत्या कारणाने होत होताच. त्यात भंडारा हे निमित्त ठरले. बालाजी मंदिरासमोरील गोदावरी काठच्या रस्त्याच्या दुतर्फा भंडारा 20 ऑक्टोबर 1839 रोजी भरला होता. चार हजार पत्रावळी मांडून दोन्ही पंगतींत पदार्थ वाढण्यासाठी वाढप्यांची लगबग सुरू होती. सार्जंट थॉमस विल्यमसन घोड्यावर बसून तेथून जात होते. त्यांची नेमणूक गावातील रस्तेदुरूस्तीच्या कामासाठी करण्यात आली होती. सार्जंटसाहेबांनी भंडारा हा काय प्रकार आहे हे पाहण्यासाठी पंगतीत घोडा घातला. काहींनी पुढे होऊन घोडा अडवला. त्यांनी घोड्याच्या टापांमुळे जेवणात धूळ उडत आहे असे सांगत सार्जंटसाहेबांना पंगतीतून जाण्यास विरोध केला. मात्र, सार्जंट यांनी अडवणाऱ्यांना  हातातील चाबकाने मारण्यास सुरुवात केली. लोक चिडले अन् अधिक विरोध करू लागले. चार हजारांची पंगत मोडली गेली अन् सारे लोक सार्जंट विल्यमसनच्या मागे लागले. सार्जंटही घाबरले अन् जवळच्या एका बंगल्यात राहणाऱ्या सेल या ब्रिटिश अधिकाऱ्याच्या आश्रयाला गेले. नाशिककर सेल यांच्या बंगल्यासमोर जमले. त्यांनी ‘विल्यमसनला आमच्या हवाली करा’ अशा घोषणा सुरू केल्या. उलट, सेल व त्याचा भाऊ ग्रांट या दोघांनी लोक भडकतील अशी कृती केली. त्यांनी लोकांवर दंगेखोरीचा आरोप करत, लष्कराला बोलावून घेत जमलेल्यांना झोडपण्यास सुरूवात केली. त्यामुळे जमाव पांगला. वार्ता शहरात पसरली अन् तणाव सर्वत्र निर्माण झाला. लष्कराने बावीस जणांना ताब्यात घेतले. मॅजिस्ट्रेट चेंबर्स यांनी त्यांच्यावर आरोप निश्चित करून त्यांना सहा महिने सक्त मजुरी व प्रत्येकी शंभर रूपये दंडाची शिक्षा ठोठावली.

नाशिककरांनी त्या निर्णयाविरूद्ध 23 ऑक्टोबरला मुंबई सरकारकडे अर्ज केला. त्यात धार्मिक कार्यात अडथळा आणण्याचा अधिकार ब्रिटिशांना नसल्याचे म्हटले होते. त्यावरून 30 ऑक्टोबरला मुंबई कौन्सिलच्या बैठकीत चर्चा झाली. त्यावेळी जेवणाच्या पंगतीत अशा पद्धतीने जाणे योग्य नसल्याचे मत व्यक्त झाले. जी.डब्ल्यू. अँडरसन या उच्चाधिकाऱ्यांनी ब्रिटिश अधिकारी व दोन्ही बाजू समजून न घेता शिक्षा देणारे चेंबर्स यांच्यावर प्रकरणाचे खापर फोडले. गव्हर्नर जे. आर. कारनॅक यांनीही अंडरसन यांच्या निष्कर्षास दुजोरा देत प्रकरण चुकीच्या पद्धतीने हाताळल्याचे 11 नोव्हेंबरला निश्चित केले. त्यांनी सार्जंट विल्यमसनची नाशिकहून बदली 8 जानेवारी 1840 रोजी केली व नाशिककरांची शिक्षा व दंड माफ केला. तोपर्यंत त्यांची निम्मी शिक्षा भोगून झाली होती. त्या प्रकरणाचा धडा घेत नाशिककरांच्या धार्मिक बाबींत ढवळाढवळ न करण्याचे आदेश ब्रिटिश अधिकाऱ्यांना देण्यात आले. त्या घटनेनंतर काही दिवसांतच सार्जंट विल्यमसन व मॅजिस्ट्रेट चेंबर्स यांचा अचानक मृत्यू झाला!

रमेश पडवळ 8380098107 ramesh.padwal@timesgroup.com

———————————————————————————————-

About Post Author

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here