घुमान – नामदेवांचे तीर्थक्षेत्र (Saint Namdev in Punjab)

पंजाबमधील घुमान ही संतशिरोमणी नामदेव महाराजांची कर्मभूमी. नामदेवांनी घुमान हे गाव वसवले. तेथे तब्बल चोवीस वर्षे तपश्चर्या केली. तो परिसर त्यांच्या वास्तव्याने आणि तपाचरणाने पावन झाला. घुमान हे गाव संत नामदेवांचे गाव म्हणून ओळखले जाते. ज्ञानदेवांची आळंदी, तुकाराम महाराजांचे देहू, एकनाथ महाराजांचे पैठण, रामदासस्वामींचा सज्जनगड; तसे नामदेव मात्र उपेक्षित राहिले होते. त्यांच्या कार्याची संत नामदेवांचे तीर्थक्षेत्र म्हणून घुमानची ओळख महाराष्ट्राला झाली आहे. नामदेव यांना सोपानकाका आणि मुक्ताई यांचा प्रत्यक्ष सहवास लाभला होता. नामदेव हे एकमेव संत असे आहेत की ज्यांचे तीर्थक्षेत्र महाराष्ट्राबाहेर आहे.

घुमान हे अमृतसर या शीख संप्रदायाच्या पवित्र ठिकाणापासून बावन्न किलोमीटर अंतरावर आहे. बियास ही नदी आणि गाव तेथून जेमतेम बारा किलोमीटर इतके दूर आहेत. ते ठिकाण पाकिस्तानच्या सीमेपासून बावीस किलोमीटर अंतरावर आहे. फाळणीच्या वेळी, ते गाव पाकिस्तानातच जाणार होते, पण नामदेवांच्या नावामुळे ते भारतात राहिले !

शीख संप्रदायाचे गुरू एकूण पन्नास. त्यांतील संस्थापक गुरुदेव नानक महाराज हे पहिले गुरू. नामदेव हे घुमान येथे नानकांच्या आधी दोनशे वर्षे गेले होते. नानकांच्या रचनांवर नामदेव यांच्या साहित्याचा परिणाम खोलवर झाला आहे. शीख संप्रदायानेही नामदेव महाराजांचे ते योगदान शिरोधार्ह मानले आहे. नामदेवांच्या एकसष्ट रचना पवित्र अशा ‘गुरू ग्रंथसाहिबा’मध्ये समाविष्ट आहेत. नामदेवांच्या त्या रचनांमध्ये काही मराठी शब्द आहेत, पण ते जसेच्या तसे स्वीकारले गेले आहेत.

घुमान या गावी मुख्य गुरूद्वारा आहे. त्यामध्ये नामदेवांची मूर्ती मोठी आहे. वास्तविक शीख संप्रदायात मूर्तिपूजा वर्ज्य मानतात. पण जगभरातील ते एकमेव गुरूद्वारा असे आहे, की जेथे या संताची मूर्ती आहे. तेथे बाबा नामदेवजी महाराज असे संबोधन त्यांना उद्देशून केले जाते. घुमान पंचक्रोशीत, बाबा नामदेवजी महाराज यांच्या आशीर्वादाशिवाय कोणत्याही कार्याला सुरुवात होत नाही.

बाबा नामदेव

घुमान या गावातील गुरुद्वारा हे मोठे विलक्षण आहे. त्याचा घुमट हा मुस्लिम मशिदीप्रमाणे, बाहेरील रचना शिखांच्या गुरुद्वाराप्रमाणे आणि आतील रचना ही मराठी मंदिराप्रमाणे आहे. त्याबद्दल असे सांगितले गेले, की नामदेव महाराजांना त्या काळचे शहेनशहा अल्लाउद्दिन खिलजी यांनी मुस्लिम धर्मात येण्यासाठी प्रचंड त्रास दिला व त्यांचा अनन्वित छळ केला; पण नामदेव महाराज त्यास बधले नाहीत. खिलजी यांचा नातू हा धार्मिक वृत्तीचा होता. त्याने नामदेव महाराजांचे मंदिर बांधण्याचा निश्चय केला आणि गुरुद्वारा उभे झाले.

संत ज्ञानेश्वर महाराजांनी संजीवन समाधी घेतल्यानंतर सोपानकाका, मुक्ताई आणि निवृत्ती महाराज यांनी एकापाठोपाठ निरोप घेतल्यावर नामदेव यांचे मन अस्वस्थ झाले. सर्व संत मंडळींनी तीर्थयात्रा केली. नामदेव विदीर्ण मनोवस्थेत उत्तरेकडे तीर्थयात्रेला गेले आणि अखेर घुमान येथे स्थायिक झाले. घुमानचे आणखी एक वैशिष्टय् म्हणजे घुमानपासून पाच-सात किलोमीटर अंतरावर मेहता नावाचे गाव आहे. पंजाबमध्ये खलिस्तानचा मोठा उठाव झाला, त्या वेळी खतरनाक अतिरेकी मेहता या गावात आश्रयाला होते, म्हणे. त्यांची सर्व कारस्थाने त्या गावातून चालत होती, पण एकही अतिरेकी घुमानकडे फिरकला नाही. नामदेव महाराजांच्या प्रती असलेला आदर आणि भक्ती यांपोटीच अतिरेकी त्या स्थानापासून दूर राहिले. ‘सरहद’ ही पुण्याची संस्था जेव्हा पंजाबमध्ये शांतताकार्य करत होती त्या वेळी ते बियासजवळ गेले असता त्यांना नामदेव महाराजांच्या या स्थळाचा शोध लागला आणि त्यानंतर घुमानचे नागरिक आणि ‘सरहद’ ही संस्था यांचे ऋणानुबंध निर्माण झाले. त्या वर्षानुवर्षांच्या दृढ नात्यांमध्येच अठ्ठ्याऐंशीव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची बीजे रोवली गेली असे म्हणण्यास हरकत नाही. ते संमेलन सदानंद मोरे यांच्या अध्यक्षतेखाली घुमान येथे अखिल भारतीय स्वरूपात पार पडले. राष्ट्रीय एकात्मतेची पहिली पताका खांद्यावर घेण्याचा मान संत नामदेव महाराज यांना दिला पाहिजे.

प्रकाश पायगुडे 9422012024 prakashpaigude@hotmail.com

(‘महाराष्ट्र साहित्य पत्रिका’, पुणे वरून उद्धृत)

———————————————————————————————-

About Post Author

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here