दर्गा – दुला रहिमानशहा

‘दुला रहिमानशहा’ यांचा दर्गा (कबर) परतवाड्याहून अचलपूर शहराकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर, बिच्छन नदीकाठी आहे. तो गिझनीचा राजपुत्र. मुस्लीम धर्मीय मंडळी दुला रहिमानशहाला मोठा पीर मानतात. त्या ठिकाणी ‘उरूस’ वर्षातून एकदा भरतो. उरूस म्हणजे पवित्र यात्रा. तो उरूस रबीउल अव्वल महिन्याच्या 12 तारखेपासून भरतो आणि सात दिवस चालतो.

अचलपूर येथे ईल नावाचा जैन धर्मीय राजा इसवी सन 1058 च्या सुमारास होता. त्या ईल राजाच्या दरबारात एक फकीर नाराज झाला. तो अपमान ईल राजाने केला असे मानून त्या फकिराने गिझनीचा राजपुत्र दुला रहिमानशहा यांच्याकडे तक्रार केली. रहिमानशहा विवाहबद्ध होणार होता; तो लग्नाकरता नवरदेव (दुला) बनला होता. परंतु तो स्वतःचे लग्न टाकून तशा स्थितीत धर्माकरता लढाई करण्यास निघाला. म्हणून तो दुला रहिमानशहा !

दुला रहिमानशहा गिझनीहून सैन्यासह वऱ्हाडात अचलपूर येथे आला. ईल राजा आणि दुला रहिमानशहा या दोघांत लढाई झाली. त्या लढाईत दुला रहिमानशहाचे अकरा हजार लोक पडले. त्या सर्वांना एकाच ठिकाणी पुरले व त्यावर मोठी इमारत (कबर) बांधली, ती गंजीशहिदा. लढाईत पडलेल्या सर्व वीरांची कबर म्हणजे ‘गंजीशहिदा.’

त्या लढाईत राजा ईल व दुला रहिमानशहा हे दोघेही पडले. दुला रहिमानशहाची मोठी कबर करून त्यावर एक मोठी इमारत अचलपुरात बिच्छन नदीच्या काठी बांधली गेली. ती कबर दिल्लीचा सुलतान अल्लाउद्दीन खिलजी याने बांधली. त्या इमारतीलगतच ईल राजाचीही समाधी करण्यात आली. ही गोष्ट चौदाव्या शतकाच्या आरंभीची. अल्लाउद्दीन खिलजी याने बांधलेल्या इमारतीला नागपूरकर मुधोजी भोसले व रघुजी भोसले यांचेही हात लागले. त्या सर्व इमारती आहेत. त्या ईल राजा आणि दुला रहिमानशहा यांच्यामध्ये झालेल्या लढाईचे स्मारक ठरल्या आहेत. त्या लढाईनंतर दुला रहिमानशहा याला ‘गाझी’ हे नाव प्राप्त झाले. ‘गाझी’ म्हणजे लढाईत शौर्य दाखवून नाव कमावणारा अथवा जिंकणारा.

दुला रहिमानशहा याच्या कबरीच्या खर्चाकरता एलिचपूरच्या (अचलपूर) नबाबाने ‘कांडली’ गावाची जहागिरी दिली आहे. लग्न सोडून धर्माच्या रक्षणाकरता लढताना वीरमरण पत्करणाऱ्या ‘दुला रहिमानशहा’वर मुस्लिम बांधवांची श्रद्धा आहे. त्या ठिकाणी भरणारा उरूस हे त्याचे प्रतीक होय. उरूस (यात्रा) दरम्यान संपूर्ण विदर्भासह विदर्भाबाहेरील श्रद्धाळू व मुस्लिम बांधव त्या ठिकाणी प्रार्थना करण्याकरता मोठ्या संख्येने येत असतात. सात दिवस चालणाऱ्या त्या उरूसामध्ये कव्वाली, कुस्तीची दंगल यांसह अन्य सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रम पार पडतात. सर्व धर्मांचे लोक त्याचा आनंद घेतात. दर्ग्याचे स्थळ सर्व धर्मीयांचे श्रद्धास्थान ठरले आहे.

दर्गा त्याच्या सुंदर स्थापत्य कलात्मकतेसाठी प्रसिद्ध आहे. त्यात किचकट नक्षीकाम आणि सुंदर सुलेखन आहे. दर्ग्याची वास्तू झुंबर आणि रंगीबेरंगी काचेच्या खिडक्या यांनी सजली आहे.

– टीम थिंक महाराष्ट्र 9892611767 info@thinkmaharashtra.com

———————————————————————————————————————-

About Post Author

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here