Home व्यक्ती आदरांजली कोळथरे येथील आगोमचे मामा महाजन

कोळथरे येथील आगोमचे मामा महाजन

दापोली तालुक्याच्या कोळथरे गावचे मामा महाजन यांनी राजकारण, समाजकारण आणि उद्योग या तिन्ही क्षेत्रांत स्वतःचा असाधारण असा ठसा स्थानिक पातळीवर उमटवला आहे. मात्र त्यांची ओळख ‘आगोमचे जनक मामा महाजन’ हीच आहे…

दापोली तालुक्याच्या कोळथरे गावचे मामा महाजन यांनी राजकारण, समाजकारण आणि उद्योग या तिन्ही क्षेत्रांत स्वतःचा असाधारण असा ठसा स्थानिक पातळीवर उमटवला आहे. त्यांचे नाव श्रीकृष्ण गोपाळ महाजन. मात्र त्यांची ओळख ‘आगोमचे जनक मामा महाजन’ हीच आहे. त्यांनी ‘आगोम’ हा आयुर्वेदिक औषधांचा व्यवसाय आणीबाणीच्या काळात 1977 साली सुरू केला. त्या संदर्भात मामा गंमतीने सांगत, “माझ्या व्यवसायाची सुरुवात झाली, ती इंदिरा गांधी यांच्या कृपेने.” त्यांना संघ स्वयंसेवक म्हणून आणीबाणीत स्थानबद्ध केले होते. त्यातून सुटल्यावर त्यांनी मुंबई सोडली. ते गावीच स्थिरावले. त्यांनी घरच्या एका छोट्याशा औषधालयाचे रूपांतर औषध कंपनीत केले. त्यातून स्थानिकांना रोजगार मिळाला ! म्हणून ती इंदिरा गांधी यांची कृपा !

मामा हे सेवाभावी सामाजिक कार्यकर्ता होते. ते व्यवसायाने प्रगतिशील शेतकरी होते. ते शैक्षणिक चळवळीचे पुरस्कर्ता आणि कोळथरे गावच्या पंचायतीचे सरपंचही झाले. गोपाळ आणि आनंदी महाजन हे त्यांचे आईवडील ! श्रीकृष्ण यांच्या जन्माच्या दोन महिने आधीच वडील गोपाळराव यांचे निधन झाले. आईने मुलांचे संगोपन केले. त्यांचे प्राथमिक शालेय शिक्षण कोळथरेत झाले. त्यांचे वडीलबंधू मुंबईला पोस्टात नोकरीला होते. श्रीकृष्ण मॅट्रिकपर्यंतच्या शिक्षणासाठी मुंबईला आले. ते दादरच्या छबिलदास विद्यालयामधून 1942 साली मॅट्रिक झाले. त्यांनी रुईया महाविद्यालयात असताना खेळात, तसेच मल्लखांब प्रशिक्षणात प्राविण्य मिळवले. सायंशाळेत शिक्षकाची अर्धवेळ नोकरी केली आणि इंटर सायन्सपर्यंतचे शिक्षण पहिल्या क्रमांकाने पूर्ण केले.

श्रीकृष्ण यांच्या संघकार्याची सुरुवात महाविद्यालयीन जीवनापासून झाली. ते पदवीचे तृतीय वर्ष पूर्ण न करताच संघप्रचारक म्हणून बाहेर पडले. संघ प्रचारकांचे जीवन खडतर असते. संघावर 1948 साली, गांधीजींच्या निधनानंतर बंदी आली. त्यांना सरकारने संघप्रचारक म्हणून तुरुंगात धाडले. डॉ. देवडीकर यांनी कारागृहात असताना कोकणच्या सुपीक जमिनीची महती श्रीकृष्ण यांच्या डोक्यात भरवली आणि त्यांना जन्मभूमीचा, कोळथरे गावचा उद्धार करण्याचे ध्येय गवसले ! तेव्हा श्रीकृष्ण त्यांच्या जन्मगावी परत आले !

मामांची बहीण गावातच मनोहर यांच्याकडे दिलेली होती. तिचा मुलगा राजा हादेखील मामांच्या कार्यात समरस झाला. तो त्यांना मामा म्हणत असे, म्हणून सारा गाव त्यांना मामा म्हणू लागला. मामा महाजन यांनी गावात इंग्रजी शाळा नसल्याने पहिलीचा वर्ग सुरू केला. मराठी पाचवी शिकलेली मुले त्या वर्गाला येऊ लागली. मामा त्यांना शिकवत असत. त्याचाच परिणाम म्हणून दुसऱ्या वर्षी ‘व्हिलेज अपलिफ्ट सोसायटी’तर्फे इंग्रजी शाळेचे पहिली, दुसरी व तिसरी असे वर्ग गावात सुरू झाले. ती छोटी शाळा दोन खोल्यांच्या दुमजली इमारतीत होती. ती शाळा इंग्रजी भाषाशिक्षण आठवीत सुरू करण्याच्या शासकीय धोरणामुळे बंद पडली.

मामांनी कोळथरे गावी असताना शाळेबरोबर शेतीकडेही लक्ष दिले- प्रथम त्यांच्या ज्या जमिनी कुळांकडे होत्या, त्या कुळांना देऊन टाकल्या. त्यांनी स्वतः हाती नांगर घेतला आणि शेती केली. नारळ, सुपारी, आंबा, काजू यांच्या बागा जोपासल्या. त्यांनी कँनिंगचे शिक्षण घेतले आणि व्यवसाय सुरू केला. मामांचे कर्तृत्व पाहून मामांचे आतेभाऊ बाबा आघारकर यांनी त्यांना कऱ्हाटीला (पुणे) शिक्षक म्हणून नेले, मामांनी तेथेही शाळेत शिकवण्याबरोबर बोर्डिंग चालवणे, शेती करणे, धरणे बांधणे असे नाना उद्योग केले. शिवाय, वनस्पतींचे गुणधर्म अभ्यासून स्वत:चे आयुर्वेदातील ज्ञान वाढवले. मामा तेथे काही वर्षे काम केल्यावर जन्मगावी परत आले.

दरम्यान, मामा दापोली- जालगाव येथील दांडेकर यांची मुलगी शांताबाई यांच्याशी लग्न करून प्रापंचिक झाले. मामा गावात 1955 पर्यंत व्यवस्थित स्थिरावले. ते कोळथर्‍यात कोणावर अन्याय झाला तर तो दूर करत. ते हिंदुत्वाचे अभिमानी होते. परंतु, त्यांनी धार्मिक आधारावर भेदभाव केला नाही आणि गावच्या मुस्लिम बांधवांचे हित जपले. गावातील उर्दू शाळेची पक्की इमारत ही महाजन यांच्या प्रयत्नांचे फळ आहे. मात्र त्यांनी मशिदीवरून हिंदूंची सवाद्य मिरवणूक जाण्याच्या हक्कासाठी संघर्ष करून तो कायमचा प्रस्थापित केला. हिंदू धर्मातील जाती-उपजाती भेदांनाही मामांचा विरोध होता. त्यांच्या विद्यार्थी आश्रमात जेवण वाढण्याचे काम दलित विद्यार्थीही रोजच्या ठरवून दिलेल्या पाळ्यांप्रमाणे करत.

महाजन गावच्या राजकारणात सक्रिय होते. त्यांची सेवावृत्ती तेथेही प्रत्ययाला येई. ते सलग बारा वर्षे (1956 ते 1968) सरपंचपदी निवडून आले. मामांनी दापोली अर्बन बँक, खरेदी-विक्री संघ, पंचायत समिती यांवर निवडून जाऊन लोकांचे जिव्हाळ्याचे प्रश्न निकालात काढले. मामांनी गावातील मुलामुलींसाठी माध्यमिक शाळा काढली. त्यांच्या शाळेतील आठवीचा वर्ग 1959 साली सुरू झाला. मामांनी शाळेत पुरेशी विधार्थिसंख्या गावात वा पंचक्रोशीत नसल्यामुळे तालुकाभर फिरून तीन विद्यार्थी आणले आणि त्यांच्या राहत्या घरी ‘विद्यार्थी आश्रम’ सुरू केला. आश्रमातील विद्यार्थ्यांची संख्या वाढत गेली. नववी ते अकरावीचे वर्ग सुरू झाले. शाळेची इमारत उभी राहिली. शाळेची शिस्त, एस.एस.सी.चे उत्तम निकाल व उत्तम शिक्षण यांमुळे शाळेची व आश्रमाची ख्याती पसरली. विद्यार्थिसंख्या तीनवरून शंभरवर पोचली.

मामा महाजन यांनी राजकीय व सामाजिक जीवनातून संन्यास घेतला, तेवढ्यातच आणीबाणी लागू झाली. मामा पुन्हा तुरुंगवास नको म्हणून भूमिगत झाले. मामांनी मुंबईत औषधे विकण्यास सुरुवात केली. मामा आयुर्वेदिक वनस्पतींपासून सूक्ष्म पद्धतीने (आगम पद्धतीने) विकसित केलेली औषधे लोकांना देऊ लागले. मामांना वैद्यकीचा वारसा प्राप्त होता तो त्यांच्या आईकडून. मामांनी घरोघरी जाऊन औषधे विकण्यास सुरुवात केली. मामा त्या काळी सोळा तास काम करत. त्यांनी ‘घरचा वैद्य’ ही आयुर्वेदिक औषधोपचारांची माहिती देणारी पुस्तिका 1956 साली प्रकाशित केली होती. त्यांनी व्यवसायाचा आरंभ पुन्हा नव्याने 1977 साली केला, तेव्हा मामांचे वय पंचावन्न वर्षांचे होते. तोपर्यंत गावात मोफत औषधोपचार करणे आणि चुकून-माकून कोणी विकत घेतले तर औषध विकणे अशा स्वरूपात त्यांचा व्यवसाय चालू होता. त्यांनी आईच्या नावाची आद्याक्षरे घेऊन व्यवसायाचे नाव ‘आगोम’ (आनंदी गोपाळ महाजन) असे ठेवले.

त्यांनी त्याच ‘आगोम पद्धती’चे उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवून औषधे सिद्ध केली. औषधे 1. दुष्परिणामरहित असली पाहिजेत, 2. कोणाच्याही सल्ल्याशिवाय स्वतःला घेता आली पाहिजेत, 3. परवडतील इतकी स्वस्त असली पाहिजेत, या तीन तत्त्वांमुळे ‘आगोम’ची पायाभरणी मजबूत झाली ‘आगोम पद्धती’ वैदिक काळापासून आहे. बटवा, आगोम तैलार्क, सुषमा मलम, महिलामृत, चपला असे त्यांचे काही ‘प्रॉडक्ट’ आहेत.

त्यांच्या व्यवसायाचा नूर पालटला तो केशरंजना गुटिकेच्या जाहिरातीतून. ‘आगोम’ची ओळख पूर्ण महाराष्ट्राला झाली. केशरंजना दुकाना दुकानांत दिसू लागले. जाहिराती वर्तमानपत्रांच्या पहिल्या पानांवर झळकू लागल्या; रेडिओ आणि दूरदर्शन या माध्यमांतही अवतरल्या. केशरंजना गुटिका व त्यासोबत ‘आगोम’ही महाराष्ट्राच्या घराघरात पोचले.

मामांनी वयाच्या योग्य टप्प्यावर राजकीय, सामाजिक बाबींमधून निवृत्त होऊन शाळा व आश्रम ग्रामस्थांवर सोपवले. शाळेचे कर्ज मात्र स्वतःच्या अंगावर घेतले. मामांशिवाय शाळा चालवणे ग्रामस्थांना जमले नाही. त्यामुळे शाळा अखेर जून 1974 पासून बंद पडली. बाबुराव जाधव यांच्या नेतृत्वाखाली आणि मामांच्या मार्गदर्शनाखाली गावकऱ्यांनी शाळा व आश्रम पुन्हा सुरू केला. सध्या शाळा व आश्रम यांचा कार्यभार बाबुराव जाधव आणि मामांचे पुत्र दीपक महाजन सांभाळतात. दीपक महाजन संस्थेच्या अध्यक्षपदी आहेत.

मामा ‘आगोम’चा कारभार मुलांकडे सोपवून 1992 साली निवृत्त झाले. मामांची लायसेन्ससाठीची लढाई 1964 पासून शासनाबरोबर होती. ‘आगोम’ला लायसन्स 2006 साली प्राप्त झाले. तेव्हा मामा हयात नव्हते. मामांचे निधन 15 सप्टेंबर 2000 रोजी, वयाच्या अठ्ठ्याहत्तराव्या वर्षी झाले.

मामांनी आयुष्याच्या अखेरीस शब्दशः वानप्रस्थाश्रम स्वीकारला होता. त्यांनी गावाजवळच्या वनात पर्णकुटीत स्थलांतर केले. ते त्या कुटीला मठी असे म्हणत. शिक्षण प्रसारक, दीनांचे कैवारी, सेवाव्रती, कठोर, निर्भय, शिस्तप्रिय, गीतेचे अभ्यासक, देशभक्त, प्रामाणिक राजकारणी, यशस्वी उद्योजक, सूक्ष्म आयुर्वेद संशोधक आणि कट्टर संघवादी म्हणून मामा दापोलीच्या पातळीवर परिचित आहेत.

मामा महाजन यांना पाच मुलगे व दोन मुली. त्यांपैकी माधव, दीपक व रामदास मामांची मूल्ये व तत्त्वे जशीच्या तशी जोपासून ‘आगोम’ सांभाळत आहेत. इतर दोघे विविध क्षेत्रांत कार्यरत राहून प्रगती करत आहेत. ‘आगोम’चा व्यवसाय कोळथऱ्यातून चालतो. त्यामागे मामांची दृष्टी आहे. अशा प्रकारचे उद्योग, व्यवसाय उभारणारे कर्तृत्ववान लोक गावागावात तयार होणे गरजेचे आहे. त्यातूनच रोजगारनिर्मिती वाढेल आणि कोकणातील पर्यायी राज्याराज्यांतील स्थलांतर थांबेल या मामांच्या विचारांनुसार ‘आगोम’ कार्यरत आहे.

आगोम – 9370848797 info@agom.co.in
दीपक महाजन deepak25mhajan@gmail.com

संकलन– अश्विनी भोईर 8830864547, ashwinibhoir23@gmail.com

——————————————————————————————

About Post Author

1 COMMENT

  1. श्री मामा महाजनांचे कार्य खरोखरच वाखाणण्यासारखे आहे! “आगोम” ला शुभेच्छा!!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version