महाराष्ट्राच्या परंपरेत निवृत्तिनाथ, ज्ञानेश्वर आणि सोपानदेव या भावंडांची एक अद्भुत त्रयी आहे. तसे नवल महाराष्ट्र देशी पुन्हा, सातशे वर्षांनंतर घडले ! कोकणात पेणजवळील गागोदे गावी (रायगड जिल्हा) विनायक, बाळकृष्ण आणि शिवाजी हे तीन भाऊ नरहर भावे यांच्या घरी जन्माला आले. विनोबा मोठे आहेत, बाळकोबा मधले आणि शिवाजीराव धाकटे. निवृत्ती-ज्ञानदेव-सोपान यांच्या मुक्ताबाईसारखी भावे बंधूंची एक भगिनी- शांता ही होती. शांताला तिच्या जीवनाची वाट स्वतंत्रपणे चालावी लागली.
तिन्ही भावेबंधूंनी लौकिकाला अभिवादन करून अध्यात्मवाटेवर वाटचाल केली. मोक्ष हे त्यांचे लक्ष्य होते. ब्रह्मजिज्ञासा हा त्यांच्या चिंतनाचा विषय होता. ते आत्मतत्त्वाचे विवरण सतत करत राहिले. महात्मा गांधी हे त्यांचा जीवनाधार होते. गीता ग्रंथ हे त्यांच्या चिंतनाचे बलस्थान होते. शंकराचार्य आणि ज्ञानेश्वर यांचे विचारधन हे त्यांचे पाथेय होते.
विनायक भावे विनोबा म्हणून ओळखले गेले. त्यांची कर्मभूमी वर्धा, परंधाम ही गावे होती. तेथे त्यांच्या नावाने त्यांच्या हयातीतच आश्रम उभे राहिले. त्यांनी भूदानानिमित्ताने पुऱ्या भारतात काम केले. बाळकृष्ण हे बाळकोबा या नावाने सर्वज्ञात आहेत. त्यांनी उरळी कांचन येथे निसर्गोपचार केंद्र स्थापले व तशी जीवनपद्धत विकसित केली. तिसरे शिवाजीराव ऊर्फ शिवबा हे धुळ्याच्या ‘महात्मा गांधी तत्त्वज्ञान मंदिरा’त स्थिरावले. ते तिघे बाबा, तात्या आणि आबा या कौटुंबिक संबोधनांनी ओळखले जात.
विलक्षण बुद्धिमत्ता, तरल संवेदना, स्वावलंबी जीवनशैली, अखंड ज्ञानसाधना आणि परमतत्त्वाशी जवळिक साधण्याची तितीक्षा या बाबी त्या तिघांच्या ठायी समानतेने होत्या. तिघांनी ब्रह्मचर्य, गीता व गांधी ही प्रस्थानत्रयी मानली. हिंदू अध्यात्मशास्त्रात ब्रह्मसूत्र, उपनिषदे व गीता या तीन ग्रंथांना मानाचे स्थान आहे. मोठ्या प्रवासाला (प्रस्थानाला) निघताना या तीन ग्रंथांचा आधार मानला जातो. म्हणून त्यांना प्रस्थानत्रयी संबोधतात. पुढे वारकरी परंपरेने ज्ञानेश्वरी, तुकोबांची गाथा आणि एकनाथी भागवत या तीन ग्रंथांनाही तसेच महत्त्व दिले गेले. तिन्ही भाऊ संस्कृतचे गाढे पंडित, सरस्वतीचे वरदपुत्र, वक्तृत्वकलेचे पारंगत ज्ञाते, संन्यासी असूनही आतिथ्यशील, भगवा न नेसताही अंतरंगी धगधगते वैराग्य जोपासणारे, सत्तास्थानांपासून दूर-दूर राहणारे, कोणाचाही गंडा न बांधता स्वतंत्र प्रज्ञेने जगले. ते गांधीजींच्या आश्रमीय जीवनव्यवस्थेचे उद्गाते होते, एकादश व्रताचे पालनकर्ते होते. तिघांनी कायावाचामनाने ‘सत्य’नारायणाची उपासना केली. तिघांच्या स्वभावाच्या छटा भिन्न-भिन्न, कार्यपद्धती विलग-विलग, अभिव्यक्ती वेगवेगळ्या प्रकारची; त्यांची कार्यस्थळेपण सारखी नाहीत. मातृभक्ती हे तिघांच्या ठायी आढळणारे समान सूत्र होते.
तिघा भावे बंधूंचे ज्ञान व आकलन राज्यशास्त्र, समाजशास्त्र, नीतिशास्त्र, मानवशास्त्र यांसारख्या अनेक विषयांना व्यापून टाकते. तिघांमध्ये भावसंबंध जागवणारे समान घटक म्हणजे त्यांचे माता-पिता, गांधीजी आणि जन्मभूमी गागोदे हा गाव.
त्यांच्यापैकी कोणी कोणाविषयीही सलगपणे काही लिहिले-बोललेले नाही. मात्र बाळकोबांची एक पुस्तिका बालवयातील आठवणी सांगणारी आहे आणि शिवाजीरावांनी ‘विनोबा जीवनदर्शन‘ नावाचे आठशेहून अधिक पृष्ठांचे विनोबा चरित्र लिहिलेले आहे. विनोबांनी तसे काही लिहिलेले नाही. त्या तिघांच्या सारख्या-सारख्या व सातत्याने भेटी होत नसत. ते त्यांनी एकमेकांना व इतरांना लिहिलेल्या पत्रांमधून मात्र परस्परांविषयी खूप बोललेले आहेत. बाळकोबा आणि शिवाजीराव हे दोघे एखादा सिद्धांत वा विचारप्रमेय समजावून सांगतात तेव्हा त्यांच्या कथनातून विनोबांच्या चिंतनाचा ठसा ठळकपणे जाणवतो. विनोबा त्यांच्या बंधूंबाबत क्षीणपणे बोलताना आढळतात.
गाव गागोदे- ऐंशी उंबरठ्यांचा गाव. कोकणातील रायगड (कुलाबा) जिल्हा. पेण तालुका. नदी बाळगंगा. डोंगराचा सभोवताल. छोटी-छोटी घरे. घरांवर कौलेही नाहीत. भिंती कारवीच्या. निवासी बहुतांश कुणबी. लंगोटीधारी. आजुबाजूला घनदाट किर्र झाडी. विनोबा, बाळकोबा आणि शिवाजीराव या तिन्ही बंधूंच्या लेखनात आणि पत्रव्यवहारात गागोदे गावाची आठवण सतत व्यक्त होताना दिसते. विनोबा हे एका पत्रातून 1935 साली लिहितात, “अगदी चार दिवस गागोदे येथे थांबलो. पंधरा वर्षांच्या दीर्घ काळानंतर तेथे जाणे झाले. इतिहासजमा आठवणी मन:पटलावर तरंगल्या. डोंगर, नद्या, शेतं, झाडं, पूर्वपरिचित दृश्यं… सारं नव्या दृष्टीनं न्याहाळता आलं.” त्याच काळातील (1936 ) वेगळी आठवण ते त्यांचे मित्र वल्लभस्वामी यांना दुसऱ्या पत्रामध्ये लिहितात- ”पंधरा वर्षांनंतर मायभूमीत आलो. डोंगरावर भटकून आलो. बाळकोबाच्या झोपडीची जागा बघून आलो. आता काही तिथे झोपडी नाही, जागा मात्र आहे. त्याची गरजही आता उरली नाही. नव्या नजरेने जुन्या सृष्टीला निरखून आलो. मायभूमीच्या साथीदारांची भजने ऐकल्याशिवाय राहवले गेले नाही. गुपचूप तिथे जाऊन बसलो. मौन तर होतेच. लोकांना अपार आनंद अन् आश्चर्य वाटले. कित्येक भजने ऐकली. त्यांचे उच्चार कमालीचे अशुद्ध होते. माझ्या व्याकरणविषयक प्रेमाला सारे असह्यच होते. पण भक्तिभावाच्या उमाळ्यामुळे तसे काही वाटले नाही.”
नालवाडीहून मदालसा हिला लिहिलेले पत्रही (19 एप्रिल 1935) प्रत्ययकारी आहे. “या खेपेला गागोद्याला जाऊन आलो. 1920 साली सबंध एक दिवस राहून आलो होतो. आता, पंधरा वर्षांनी चार दिवस राहून आलो. मरणारे मेले होते. जगणारे जिवंत होते. आधणातले आणि सुपातले एवढाच फरक. नक्षत्र, तारका ज्या वर्ध्याला दिसत होत्या त्याच गागोद्याला दिसल्या. माझी वृत्ती जी वर्ध्याला होती तीच तेथेही होती, पण जुन्या आठवणी ताज्या झाल्या आणि ताज्या मागे पडल्या. तेथील डोंगर पाहून-पाहून मात्र तृप्तीच होईना ! मला वाटते, मी डोंगरावरचाच कोणी प्राणी एखाद्या योग्याच्या संगतीतील हरीण किंवा वाघ -कोणाला माहीत – असेन आणि चूकून या जन्मी माणसांत पडलो असेन. अजून पुरता माणसाळलो नाहीच. गांधीजींत तळला, जमनालालजींत घोळला तरी विनोबा तो विनोबाच ! एक डोंगर आणि दुसरी आई – या दोहोंच्या दरम्यान. बाकी सर्व सृष्टी आणि सोयरे बसवायचे. आईची आठवण चार दिवसांत चाळीस वेळा झाली असेल. गीता, आई, टकळी ही माझ्या जीवनाची त्रिमूर्ती. माझे सर्व विष्णुसहस्रनाम या तिहींत आले.”
भावे कुटुंबाचे आदिपुरुष- नरसिंह कृष्णराव भावे (खापरपणजोबा). ते गाव आंग्रे सरदारांनी त्यांना इनाम म्हणून दिले. नरसिंह कृष्णराव यांचे आजोबा शिवाजी नारायण भावे. त्यांनी स्वपराक्रम गाजवला होता. त्यांना अडूर गाव तसाच तर इनाम मिळालेला होता ! शिवाजी नारायण यांच्या लेकरांनी ज्ञानोपासनेसाठी वाई गाठली. नरसिंहरावांचे नातू शंभुराव वाईला बराच काळ स्थिरावले. त्यांचे अग्निहोत्र व्रत असायचे. ते शिवोपासक होते. शंभुरावांचे चार पुत्र. नरहरपंत हे तिसऱ्या क्रमांकाचे चिरंजीव. त्यांचे पुत्र विनोबा, बाळकोबा, शिवाजीराव आणि कन्या शांता.
विनायकचा जन्म गागोद्याचा. त्यांचे बालपण तेथेच गेले. विटांचे एकमेव घर. बैठकीवर गोपाळराव असत. ते विनायकचे काका. ओटीच्या बाजूला वाघ्या कुत्रा, दाणे टिपण्यास येणारा पांड्या कोंबडा; गोठ्यात हंबरणाऱ्या गाई; मंगळ्या-मोत्या बैल; मागे तुळस; परसदारी आंबा-पेरू-सीताफळ-रामफळ यांची झाडे; वळणा-वळणाच्या पायऱ्या उतरल्यावर लागणारी विहीर- त्याच्या पुढे स्वच्छ, छोटेसे तळे- तळ्यातील बेडूक… हे सारे त्या घरचे सदस्य होते. विनायक आठ-नऊ वर्षांचा होईपर्यंत त्या गोतावळ्यात राहिला, वाढला.
भावे बंधूंची आई कर्नाटकची, हावनूर गावची. बाळकृष्णबुवांची कन्या, नाव- रेणू. बुवा गवयांमध्ये परिचित होते. कन्येचा कंठ मधुर होता. तिला कानडी-मराठीतील भजने पाठ होती. रेणूची भावे यांच्या घरी रुक्मिणी झाली. आई सायंकालीन पूजा झाल्यावर नमस्कार करत असे. दोन्ही कान हाती धरून ‘अनंत कोटि ब्रह्मांडनायका, माझ्या अपराधांची क्षमा कर’ असे म्हणे. ते म्हणताना नेत्रांतून आसवांची अखंड धारा वाहत असे. ते दृश्य विलक्षण असावे. आई आणि विनायक यांच्यातील भावबंध उच्च कोटीचा होता. आई विनोबांच्या सबंध आयुष्याला व्यापून आहे. त्यांच्या मनात आयुष्याच्या संध्याकाळीसुद्धा मातृदेवतेच्या संदर्भातील कोवळिक दिसते. आई रोज भजने म्हणत असे. विनायकचा आग्रह असे, की ‘रोज नवीन भजन म्हण. कालचे आज नाही. आजचे उद्या नको.’ तो आग्रही क्रम सहा-आठ महिने चाले, इतकी भजने आईला तोंडपाठ होती. विनायक बालपणी भोजनापूर्वी रोज तुळशीला पाणी घालत असे. तो त्यांच्या कुटुंबात नियम होता.
विनायकचे ब्रह्मचर्य, वैराग्य यांबाबतचे आकर्षण बालवयातच जागे झाले. तो त्या संदर्भातील ग्रंथ वाचत असे, तसे आचरण करी. आई म्हणे- ”विन्या, तू वैराग्याचे नुसते नाटक करतोस. मी पुरुष असते तर खरे वैराग्य काय असते ते तुला दाखवले असते. विन्या, जो गृहस्थाश्रमाचे पालन नीट करील त्याच्या एका पिढीचा उद्धार होतो.” आईने रुजवलेले ते विचारबीज विनायकच्या मन-मेंदूत खोलवर रुजले गेले.
विनायकचे वडील नरहरपंत हे योगी होते. त्यांच्या आयुष्याचा मोठा काळ बडोद्याला नोकरीनिमित्ताने गेला. ते अखंड ज्ञानोपासक होते. त्यांचे शिक्षण इंटरमीजिएटपर्यंत पुण्यात झाले. पुढील शिक्षणाला परवानगी घरून मिळाली नाही. त्यांनी काही दिवस शिक्षकाचे काम केले. ते सयाजीराव गायकवाड यांच्या खासगी खात्यात बडोद्याला मुख्य कारकून होते. त्यांनी आयुष्यात द्रव्यलोभ मनी धरला नाही. त्यांची एक प्रयोगशाळा होती. प्रयोगशाळा घरीच होती. त्यात मातीची कुंडे, विविध रसायने, काचनलिका, निरनिराळ्या वनस्पती होत्या. त्यांच्या वैयक्तिक संग्रहात रसायनशास्त्र आणि रंग यांसंबंधी दुर्मीळ ग्रंथ होते. त्यांनी रंगांच्या विशेष अध्ययनासाठी कानपूर गाठले होते. ते घरचे कपडे घरीच शिवत. त्यांचे लक्ष होजियरी, कटलरी, फोटोग्राफी अशा कामांतही होते. नरहरपंतांना मधुमेह आणि मूळव्याध यांचा त्रास होता. त्यांचा आहार ठरलेला असे. त्यांनी आहारविषयक शास्त्रीय प्रयोगांनी आजारांना आटोक्यात ठेवले होते. ते पत्नी देईल तो आहार दुपारी घेत. त्यातही प्रमाण ठरलेले. ते पत्नीच्या निधनानंतर जवळपास दोन दशके फक्त दुधावर राहिले, थोडे सोयाबिन्सही घेत असत, बारा-बारा तास संगीतसाधना करत. त्यांना आधुनिक विचारांचे मोल फार वाटे. गांधीजी वर्धा येथे येण्यापूर्वी मगनवाडी येथे एक वर्ष थांबले होते. नरहरपंत गांधीजींच्या निमंत्रणावरून मगनवाडीलाही गेले होते. त्या दरम्यान, त्यांनी विनोबांना एका पत्रात लिहिले होते – “या पत्राच्या सर्व क्रिया माझ्या हातून झालेल्या आहेत. कागद मी बनवला आहे. जी शाई वापरली आहे ती मी बनवली आहे. पत्र ज्या लेखणीने लिहीत आहे, तीही मी बनवली आहे आणि पत्र मी स्वत: लिहिले आहे.” ते त्यांच्या अखेरच्या आजारात बडोदा येथेच होते. धाकटे पुत्र शिवाजीराव त्यांना, विनोबांच्या सांगण्यावरून धुळे येथे घेऊन गेले. त्यांनी देह 29 ऑक्टोबर 1947 रोजी योग्याप्रमाणे ठेवला. विनोबांनी त्यांचे अस्थी-विसर्जन अंगणातच एके ठिकाणी केले. तुळशीचे रोप लावले. वृंदावन बनवले. त्यावर लिहिले, ’अवघेचि सुखी असावे ही वासना.’
विनोबांच्या कुलपरंपरेत ब्रह्माराधना होती. त्यांना आजोबांनी गणेशपाठ शिकवला. काकांनी वृत्तदर्पण शिकवले आणि इसापनीती वाचून घेतली- ती कायमची मनावर ठसली. पुढे त्यांचा प्रवेश गणितात झाला. त्यांना अनेक मैल अहेतुकपणे फिरत राहण्याचा छंद बालपणीच लागला. त्यांचे बालमन जिज्ञासेने सतत भरलेले असायचे. ते रानावनात रात्री-अपरात्रीही हिंडत- वृक्षवनस्पतींशी संवाद साधत- पशुपक्ष्यांची जीवनरीत न्याहाळत- वस्तूंचे कार्यकारणभाव तपासत.
विनोबांचे शरीर बाळपणापासून कृश. त्यांना वारंवार ताप येई. स्वादवृत्ती शिल्लक उरली नव्हती. पुढे तर विनोबा एरंडेल छान खळाळून चूळ भरून पिऊन टाकत ! शब्दकोष वाचत. त्यांची बुद्धी बालपणीही देश, धर्म, मानवी जीवन यांसारख्या गहन-गूढ विषयांत गुंतलेली असायची.
तिन्ही भावांनी नैष्ठिक ब्रह्मचारी राहण्याचा निश्चय केला. विनायकने उपनयन प्रसंगी घोषणा केली- ’मी आजन्म ब्रह्मचारी राहण्याची प्रतिज्ञा केली आहे. प्रत्यक्ष ईश्वर जरी येऊन उभा राहिला तरी त्यात यत्किंचितही बदल होणे शक्य नाही.’ या दिव्य वाक्यापुढे उपनयन विधीतील मंत्र बोबडे ठरले !
विनोबांचे शिक्षण बडोदे येथे झाले. विनायकचा त्याच्या सहा नंबरच्या मराठी शाळेबद्दलचा हा अभिप्राय विलक्षण बोलका व प्रत्ययकारी आहे. ते म्हणतात – “आमच्या वेळी शाळेच्या पाठ्यपुस्तकात एक अभंग असे- शाळेसि जाताना मुलांनी वाटेत तमाशा पाहत राहू नये. त्याचा अर्थ असा, की जर शाळेतच रोज पाच-पाच घंटे तमाशा पाहायला मिळत आहे, तर वाटेत कशाला पाहा !” विनोबांचा खूप वेळ स्टेट आणि सेंट्रल लायब्ररीत जाई. त्यांना फिरण्याचा छंद होताच, बडोदा म्हटले की विनोबांच्या स्मरणात पुढील गोष्टी उरल्या होत्या. ”ग्रंथालये, माणिकराव आणि मुजुमदार यांचे वाडे, दादा महाराजांचा मठ, सिद्धनाथ, आनंदबाग, मकरपुरा, गोवा गेट, स्मशान घाट यांसारख्या जंगम वास्तू.”
विनोबांचे प्राथमिक शिक्षण आटोपले. वडिलांनी मुलाला पुढे घरच्या घरीच शिकवावे असे ठरवले. त्याप्रमाणे विनोबांचे प्राथमिक शिक्षण घरीच झाले. नंतर मात्र ते हायस्कूलात गेले. त्यांचा हायस्कुलात नेहमी वरचा नंबर असायचा. त्यांना अभ्यासासाठी स्वतंत्र खोली होती. वडील गंभीर व मितभाषी होते. कडक आणि तापट होते. तशी मुलांची वडिलांशी जवळीक नव्हती, पण त्यांच्याबद्दल आदर अपरंपार होता. त्यांच्या ज्ञानमयतेची जाणीव मनात शिगोशीग भरलेली होती. विनोबा स्वत: विक्षिप्त आणि एककल्ली होतेच. आई शेवटी निभावून नेई. छात्रवृत्ती मिळायची. विनोबांनी वडिलांच्या अध्यापनकलेचा उपयोग पुढे सतत केला. विनोबांसोबत गणिताची पुस्तके घर सोडून काशीला जाईपर्यंत होती. ती त्यांनी गंगेत विसर्जित केली !
विनोबांच्या मनी घर सोडण्याचा विचार 1916-17 साली उसळी मारू लागला. आधी, तीन-चार वर्षे त्या विचाराची कसोटी घेतली गेली. पण मनीचे ब्रह्मजिज्ञासेचे आकर्षण वाढतच राहिले. त्या आकर्षणाने मातृ-वात्सल्यावर मात केली आणि त्यांनी घर सोडण्याचा निर्णय केला. ते 25 मार्च 1916 रोजी घराबाहेर निघाले. सोबत दोन मित्र शंकर तगारे व बेडेकर नावाचे होते. विनोबांनी वडिलांना पत्र लिहिले. त्यातून वडिलांना बोध झाला. पत्राचा मजकूर होता- “मी प्रवासास जात आहे. माझी काळजी करू नये. प्रवासाशिवाय शिक्षणाची पूर्तता होत नाही असे पाश्चात्य शिक्षणशास्त्रज्ञांचेही मत आहे. माझा हा प्रयत्न इतरांना कोणाला पसंत पडला नाही तरी निदान ‘दासबोधा’ला तरी तो खचित पसंत पडेल यात शंका नाही. आपण विश्वास ठेवावा, की मी कोठेही गेलो तरी माझ्या हातून कोणतेही अनैतिक काम होणार नाही.”
विनोबांनी त्यांचा गृहत्यागाचा विचार पक्का झाला तेव्हाच त्यांना मिळालेली सारी प्रमाणपत्रे जाळून टाकली. आई कष्टी झाली. पुढे, काही दिवस लोटले. विनोबांनी ब्रह्मजिज्ञासेने प्रेरित होऊन काशी गाठले. त्यांनी काशीहून वडिलांना तसे पत्र लिहिले- “आपण हा संसार सोडला आहे.” त्यांनी त्याच पत्रात ‘त्यांचे एकमात्र लक्ष्य ब्रह्मजिज्ञासा ही असल्याचे’ म्हटले होते. विनायकने एक पुस्तक घरातून निघताना बरोबर घेतले होते, ते म्हणजे ज्ञानेश्वरी. त्यांची श्रद्धा ज्ञानेश्वरीवर फार होती. एकदा रात्री त्यांच्या झोपेत स्वप्नाचे व्यत्यय आले. त्यांनी दुसऱ्या दिवसापासून ज्ञानेश्वरी उशाशी घेऊन झोपण्याला सुरुवात केली. स्वप्ने येणे बंद झाले !
विनोबांचे काशीच्या म्युअर सेंट्रल लायब्ररीतील संस्कृत-हिंदी धर्मग्रंथ जवळपास तमाम पाहून झाले. एकदा गंगातटाकी एक विद्वत्सभा होती. द्वैत-अद्वैतावर चर्चा सुरू होती. विवादात अद्वैताचा पक्ष जिंकला. विनोबांनी अध्यक्षांची परवानगी मागितली. विनोबा म्हणाले- “आताच अद्वैती का हरला हे आपण पाहिले.” लोकांना वाटले, की हे उलटे निवेदन कसे? विनोबा लागलीच पुढे म्हणाले, की “जो अद्वैती असेल तो विवादात उतरेलच कसा? जे द्वैताबरोबर चर्चा करतात ते आधीच हरलेले असतात. अद्वैत्यांच्या मनी अद्वैत नसून द्वैत आहे, म्हणूनच तर ते विवादात उतरतात.” एवढे बोलून विनोबा तेथून निघून गेले.
विनोबांना काशीला येऊन काही महिने झाले होते. त्याच सुमारास गांधीजी दक्षिण आफ्रिकेतून आलेले होते व त्यांनी कोचरब येथे आश्रम स्थापन केला होता. दक्षिण आफ्रिकेतून भारतात 1915 साली महात्मा गांधीजी परतले. भारतात आश्रम स्थापन करण्यासाठी गांधीजींना कित्येक मित्रांनी आग्रह केला. श्रद्धानंदांची मागणी होती, की गांधीजींनी हरिद्वार येथे आश्रमाची स्थापना करावी. कोलकात्याच्या मित्रांचा आग्रह होता की त्यांनी वैद्यनाथधाममध्ये आश्रम स्थापावा. राजकोटमध्ये राहण्याविषयी अनेक मित्रांचा आग्रह होता. अहमदाबादच्या जीवनलाल बॅरिस्टर यांचे कोचरब येथे एक घर होते. ते भाड्याने घ्यायचे ठरले. आश्रमासाठी अनेकांनी अनेक नावे सुचवली. कोणी म्हणाले ‘तपोवन’, तर कोणी ‘सेवाश्रम’ हे नाव सुचवले. मात्र गांधीजी व त्यांच्या सहकाऱ्यांनी एकत्रितपणे ‘सत्याग्रहाश्रम’ हे नाव मान्य केले. गांधीजींचे एक व्याख्यान काशीत झाले. त्या व्याख्यानाची प्रसिद्धी गावभर झाली होती. विनायकने हिंसा, अहिंसा, निर्भयता यांविषयी अनेक शंका गांधीजींना पत्रे पाठवून विचारल्या. उत्तरे मिळाल्यावर परत आणखी शंका विचारल्या. तेव्हा बापूंचे कार्ड आले, की अहिंसेविषयीच्या शंकांचे समाधान पत्रांतून होऊ शकणार नाही. त्यासाठी प्रत्यक्ष जीवनाचा स्पर्श हवा, म्हणून काही दिवस माझ्याजवळ येऊन राहा. म्हणजे हळू हळू बोलणे होईल. विनायकला त्यांचे ‘जीवनाचा स्पर्श हवा’ हे वाक्य फार आवडले. बापूंनी त्यांच्या आश्रमाची नियमपत्रिका त्यासोबत पाठवली होती. त्यात लिहिले होते – “या आश्रमाचे ध्येय विश्वहित-अविरोधी देशसेवा हे आहे आणि त्यासाठी पुढील व्रते आवश्यक आहेत.” पुढे लिहिले होते, ”सत्य, अहिंसा, ब्रह्मचर्य, अस्तेय, अपरिग्रह, शरीरश्रम, अस्वाद इत्यादी.”
विनायकला ती पत्रिका फारच आश्चर्यकारक वाटली. त्याने तोपर्यंत अनेक इतिहास वाचले होते, पण कोठे हे पाहण्यात आले नव्हते की देशाच्या उद्धारासाठी व्रतांचे विधान आवश्यक आहे. व्रतांचा संबंध योगशास्त्र, धर्मग्रंथ, भक्तिमार्ग यांच्याशी आहे. गांधीजी हा एक असा माणूस दिसतो, की ज्याला देशाची राजनैतिक स्वतंत्रता आणि आध्यात्मिक विकास, दोन्ही एकाच वेळी होण्याची अपेक्षा आहे. ते आकर्षण विनायकच्या जीवनात आणखी एक परिवर्तन घडवून आणण्यास कारणीभूत झाले. विनायकचे पाय बापूंच्या दिशेने वळले. तेव्हा विनोबांचे वय एकवीस वर्षे होते.
विनायक काशीहून अहमदाबादला पोचला (7 जून 1916). आश्रमात त्यांच्याकडून स्वयंपाक, दळणे, झाडणे, पाणी काढणे, भांडी घासणे, पायखाने साफ करणे यांसारखी नानाविध कामे सुरू झाली. तेथून विनोबांचा जीवनक्रम बदलला. विनोबा आईला आश्रमातून महिन्यातून एखादे पत्र लिहीत. पत्र संक्षिप्त असायचे. कधी पद्यात लिहीत, कधी पत्र संस्कृत भाषेत असायचे. कधी मित्रांना पत्रे. उल्लेख संक्षिप्त व त्रोटक असत- वर्षभराची सुटी आश्रमातून घेतली. अध्ययन, प्रवास आणि तब्येत सुधारणे असा कार्यक्रम होता. वर्ष संपले.
विनोबांना ’आचार्य’ ही पदवी गांधीजींच्या प्रयोगशाळेत लाभली. विठ्ठल लक्ष्मण तथा मामासाहेब फडके यांनी विनायकचे नामकरण विनोबा असे केल्याचे ’ऋषी विनोबा’ या पुस्तकात म्हटले आहे.
एक गोष्ट विनोबांच्या मनाला सतावत होती. विनोबांनी गृहत्याग करताना सांगितले नव्हते. मित्राची भेट घ्यावी हा गांधीजींचा सल्ला. हा सल्ला अर्थातच गांधीजींचा नंतरचा होता. हेतू उदात्त खरा पण सत्याला बाधा आणणारा होता. सोबतचा मित्र शंकरराव तगारे लवकरच बडोद्याला परतला. बेडेकर आजारी पडला. आजार गंभीर होता. त्याने घरी परतण्यास नकार दिला. त्याचे निधन झाले. त्याने त्याला विनोबांनीच अग्नी द्यावा अशी इच्छा व्यक्त केली होती. विनोबा बडोद्याला काही दिवसांसाठी परतले. विनोबांनी घर सोडले तेव्हा रात्रीचे साडेनऊ वाजले होते. परतले तेव्हाही तीच वेळ होती. घरात सामसूम होती. वडील बाहेर गेले होते. आई विसावली होती. एरंडी तेलाचा दिवा मिणमिणत होता. विनोबांनी आईसमोर शिरसाष्टांग दंडवत घातला. आई सानंदे निस्पंद बनली. तिच्या नेत्रांतून आसवांचा पूर वाहू लागला, विनोबांचा पोशाख बदलला होता. गुडघ्यापर्यंत पंचा. खांद्यावर उपरणे. विनोबा गांधीजींशी ठरवलेल्या वेळी आश्रमात परतले.
विनोबांच्या पाठोपाठ भाऊ बाळकृष्ण- म्हणजे बाळकोबा घर सोडून निघाले. ते विनोबांच्या पाठचे भाऊ. तेही गांधी आश्रमात दाखल झाले. त्यांनी मुख्यत्वेकरून कस्तुरबांच्या समवेत कार्य केले. ते वीणावादनात निपुण होते. मूर्तिकलेत प्रवीण होते. त्यांचा गळा मधुर होता. त्यांनी मुख्यत: गुजराती व हिंदी भाषांतून लेखन कार्य केले. त्यात ब्रह्मसूत्राचे संपादन, गीता भाष्य, पातंजल योगदर्शन असे विषय आहेत. त्या सोबत त्यांनी गांधीजींच्या तत्वचिंतनाचा सुगम परिचय करून दिला. त्यांचा मोठा पत्रव्यवहार उपलब्ध आहे.
शिवाजीराव वर्ध्याच्या घास बंगला या स्थळी दाखल झाले. एक शेड बांधायची होती. विनोबांनी शिवाजीरावांची नेमणूक सुताराच्या हाताखाली केली. विनोबांची दृष्टी त्यांनी एक तत्त्व सुतारांकडून शिकावे अशी होती. त्यांना आयुष्याच्या प्रभातकाळी कठोर परिश्रम हवेत, विद्या तशी संपादन करावी असे वाटे. शिवाजीराव 1923 च्या झेंडा सत्याग्रहात (गांधी आंदोलनातला एक देदिप्यमान टप्पा) सामील झाले. ब्रह्मविद्या मंदिर हे स्थळ स्थापन झाले. त्यावेळी शिवाजीराव ब्रह्मविद्या मंदिराच्या भगिनींसोबत होते. विनोबा दूर पदयात्रेत होते. बाळकोबादेखील नंतर दरवर्षी सहा महिने तेथे राहत. तो क्रम अनेक वर्षे चालला. बाळकोबा यांना आतड्याचा क्षय झाला. शिवाजीराव सेवारत होते. विनोबा म्हणत, की त्यांच्या बाबतीत चिंता नाही. देह जायचा असेल तेव्हा आनंदाने जाईल आणि जावो. ते त्यासोबत कर्माचा क्षय होईल अशी आशा व्यक्तवतात. असा भाऊ मिळणे नाही ही खूणगाठ मात्र त्यांच्या मनी होती.
विनोबांनी त्यांच्या वडिलांना 7 सप्टेंबर 1935 रोजी प्रदीर्घ पत्र लिहिले, त्यात ते म्हणतात- पूजनीय बाबांचे सेवेशी, मी तुम्हांस पुष्कळ दिवसांत लिहिले नाही. मी माझ्या वयाची चाळीस वर्षे नुकतीच संपवली. सामान्यत: जन्मदिवसाचे स्मरण मला नसते. पण अनेक कारणांमुळे ह्या गेल्या महिन्यांत तीव्र आत्ममंथन चालले आहे. मी माझ्यावर अनेक संस्थांचा आणि व्यक्तींचा भार मानलेला आहे. अशा माणसाला त्याची शक्ती तपासून घेण्याचा प्रसंग मधून मधून किंवा वारंवार आला तर त्यांत नवल नाही. तशा प्रसंगाचे सर्व भूत आणि वर्तमान ह्या वेळी तपासून घेतले. म्हणून चाळीस वर्षे संपल्याचे भान झाले. काळाच्या अनंत परिमाणात एका तुच्छ मनुष्याच्या जीवनात गणितशास्त्राच्या व्याख्येप्रमाणेही शून्याकार मानला जाईल. तथापि त्याच्याच पुरती सापेक्ष दृष्टी घेतली तर चाळीस वर्षे हे माप विचारात घेण्यासारखे मानले पाहिजे. वयाची साडेवीस वर्षें ही घरात गेली. आणिक एका वर्षाने तितकीच वर्षे बाहेर घालवली असे होईल. त्या पुढील कोठे घालवावी? मनुष्य भूतकाळासंबंधी पांगळा असतो. तो भविष्यकाळासंबंधाने आंधळा असतो. म्हणून दोन्ही बाजूंस सारून चालू वर्तमान प्रणामपूर्वक तुम्हास कळवण्यासाठी हे लिहीत आहे. तुमची तिन्ही मुले त्यांच्या त्यांच्या शक्तीप्रमाणे तपश्चर्या तुमच्या आशीर्वादाने करत आहेत. उपनिषदात एक वाक्य आहे ते मला फार गोड वाटते.
“एतद्वै परम् तपो यदव्या ही तस्प प्यतें।
एतद्वै परम् तपो यं प्रेतं अरण्य इरन्ति।
एतद्वै परम् तपो यं प्रेतं अग्नौ अभ्याद्दथति”
(व्याहित म्हणजे व्याधित म्हणजे रोगी. जो तप सहन करतो ते एक महान तप आहे. प्रेताला स्मशानात नेतात, ते दुसरे महान तप आहे. शेवटी, प्रेताला अग्नीत समर्पण करतात, ते तिसरे महान तप आहे)
दुसरे आणि तिसरे सर्वांचेच केव्हा तरी व्हायचे आहे. बाळकोबांचे आज पहिले चालले आहे आणि ते लाक्षणिक अर्थाने नव्हे; पण अक्षरश: म्हणजे तो त्याचा रोग ही त्याला तपश्चर्येची महान संधी मिळाली आहे असे जाणून त्या रोगाला भोगून राहिला आहे. विशेषच तकलीफ झाली म्हणजे आत्मभावना अधिक जागृत होत असते असे परवा म्हणत होता. सध्या त्याची प्रकृती साधारण बरी आहे.
शिवबा अखंड प्रचार करत बाहेर हिंडत असतो आणि चातुर्मास्यापुरता वर्धा येथे येत असतो. त्याचे गीता आणि गीताई यांचे सूक्ष्म अध्ययन करून तद्विषयक टाचणे करून ठेवणे हे काम चालले आहे. त्या शिवाय थोडे फार शिकवणे. शिवबाची स्थिती ह्या दोन-तीन वर्षांत फार पालटली आहे. त्याचा ज्ञानाकडे कल पहिल्यापासून होताच, पण तो आता गीताईच्या निमिताने अधिक अंतर्मुख झालेला आहे. प्रकृती साधारण बरी राखतो. बाळकोबाच्या तब्येतीकडे डोळ्यांत तेल घालून पाहत असतो.
अशा प्रकारे दोघे जपातपाला आणि ज्ञानाला वाहिले असता माझ्या वाटेला कर्माचा भाग आलेला आहे. शरीर परिश्रम व्रताच्या संतोषासाठी सुमारे तीन हजार आठशे गज सूत हल्ली रोज कातत असतो. त्यात सुमारे नऊ तास जातात. कातता कातता शिकवणे आणि पत्रादि लिहविणे करतो. तीही आमच्या मुलाकडून लिहवीत आहे. ह्या नऊ तासांशिवाय अन्य व्यवसायांत चार-पाच तास देण्याचा प्रयत्न करतो आणि सुमारे दहा तास देहकृत्याकडे जातात. दिवसा नालवाडीला असतो. रात्री कन्याश्रमात असतो. प्रकृती माझी नेहमीच बिनतक्रार असते. घर सोडल्यापासून डॉक्टरांचा किंवा वैद्याचा आश्रय शोधावा लागला नाही. पुढील अर्थात देव जाणे. घरी असताना, माझ्या अव्यवस्थितपणामुळे पारशी डॉक्टराचे औषध घेतले नाही असे वर्ष गेले नसेल. कोणाला माहीत, त्या औषधात काय काय असेल? पण आई म्हणे, ’औषधं जान्हवी तोयं वैद्यो नारायणो हरि’ (औषध काहीही असो तरी ते गंगाजळ समजावे आणि वैद्य तो कोणी असला तरी तो नारायण समजावा !). मी आमच्या आईच्या ह्या अर्थातही गोडी पाहतोच, पण मला मात्र त्याही वेळी ह्याचा अर्थ असा वाटे, गंगाजळ हे औषध समजावे आणि भगवान वैद्य. दुसरे औषध नको, दुसरा वैद्य नको. हा अर्थ जरी त्या वेळी सुचला होता तरी त्याचा अंमल करण्याची ताकद त्यावेळी नव्हती. आज ती ताकद मला आहे असे म्हणता येत नाही, पण कोणत्या तरी ताकदीने थोडा अंमल होऊन राहिला आहे.
पण आमच्या तिघांच्याही ह्या मोडक्या तपस्येपेक्षा आई वारल्यानंतरच्या ह्या सतरा वर्षांतील तुमची चाललेली अखंड बिनगाजावाजाची आणि निस्सीम तपस्या मला फारच मोठी वाटते. तिच्यापुढे आमची तपस्या काहीच नाही.
बाळकोबांनी तुमच्या भेटीला पावसाचा जोर असल्यामुळे येऊ नये असे सुचवले. विनाकारण त्रास पडेल हे सांगतानाच त्याची व माझी निरंतर भेट आहेच, असेही सांगतो. उलटपक्षी, त्याचे न येणे ठीकच आहे. पण विनोबा ’शिवाजीचे येणे उपयोगी आहे, काही गोष्टी बोलता येतील’ असे एका पत्रात लिहितात.
विनोबा त्यांच्या बाबांविषयी रामेश्वर पोद्दार यांना 22 फेब्रुवारी 1938 रोजी लिहितात, श्री रामेश्वरजी, सोबतचे पत्र बाबांना लिहिले आहे. त्यांच्यापासून घेता येण्यासारखे गुण घेणे हीच त्यांची मुख्य सेवा. त्यांचे स्वावलंबन हेवा करण्यासारखे आहे. ते लाचारीचे नाही. त्यांच्यापासून आणि आमच्या आईपासून आम्हांला जे मिळाले आहे ते वजा केले तर आमचे स्वत:चे म्हणून शून्यच शिल्लक राहायचे. म्हणून आम्हांला अहंकाराचे कामच नाही.
विनोबा त्यांचे बाबा निवर्तल्यावर आसामयात्रेतून 26 डिसेंबर 1961 रोजी रामेश्वरजींना लिहितात- “बाबांचे बहुतेक सगळे वागणे बापूंच्या पद्धतीचे होते. आपल्या मुख्य वस्तूचा आग्रह, बाकी सर्व बाबतींत अनाग्रह. त्यांचे जीवन दुसऱ्यास दु:ख देऊ नये, वृद्धांची मर्यादा सांभाळावी, शेजाऱ्यांची सेवा करावी असे होते. त्यांनी लहानपणी मला ‘दासबोधातील उपदेश-पाठ’ नावाचे पुस्तक दिले होते. त्यात ही सर्व शिकवण होती. ते मला माझ्या खोड्यांबद्दल मारत. हा मी त्यांचा माझ्यावर मोठा अनुग्रह समजतो. मला जेव्हा त्यांची आठवण होते तेव्हा आमच्या आर्इच्या मधुर भाषणांचा आनंद जसा मला होतो तसा त्याचा होतो. मी आईच्या आठवणी जितक्या बोलून दाखवल्या तितक्या त्यांच्या बोलून दाखवल्या नाहीत, ही गोष्ट खरी आहे. पण त्या माझ्या जीवनात खोल मुरल्या आहेत.”
विनोबा वडिलांच्या निर्वाणानंतर तिसऱ्या दिवशी म्हणाले होते, की बाबा काही प्रसिद्ध पुरुष नव्हते, पण जे थोरांतील थोर अप्रसिद्ध पुरुष होऊन गेलेत त्यांच्यामध्ये बाबांची गणना करावी लागेल. विनोबांना त्यांच्या बाबांसारखी सूक्ष्मदर्शिता गांधीजी आणि जमनालालजी यांच्या व्यतिरिक्त अन्यत्र कोठेही आढळली नव्हती.
शिवाजीराव त्यांच्या वडिलांची आठवण सांगताना म्हणतात, की आईचे निर्वाण 1918 साली झाले. बाबा एकट्यानेच त्यानंतर तीन दशकांपर्यंत त्या घरात राहिले. त्यांनी कमालीच्या धीरगंभीर वृत्तीने कालापव्यय केला. ते कमालीचे स्वावलंबी वृत्तीचे धनी होते. त्यांनी त्यांच्या घरातील अनेकांना गायन-वादनाचे बळ दिले. त्यांनी त्यांच्या देशातील मुस्लिम गानपरंपरा लुप्त होऊ नये यासाठी अत्यंत परिश्रमपूर्वक मृदंगबाज नासरखान आणि शेख राहत अली यांचे ठुमरी संग्रह प्रकाशित केले. त्यांच्यापाशी किमान दहा ग्रंथ प्रकाशित करता येतील एवढे साहित्य होते.
शिवाजीरावांची प्रकृती अस्वस्थ आहे (स्वस्थ म्हणजे चांगली व स्वस्थ नसलेली म्हणजे अस्वस्थ होय). विनोबा त्यांना शरीर मजबूत करण्यासाठी सुचवतात; पण धुळेनिवासी जनांची काही सेवा त्यांच्या हातून घडली तर तीही त्यांना हवी आहे. ते शिवाजीरावांनी कोठे राहवे याबाबत काही सल्ला देत नाहीत. शिवाजीराव जेथे कोठे असतील तेथील मित्रांना खूप ऐकण्यासारखे आणि शिकण्यासारखे आहे असे विनोबांचे मत आहे. शिवाजीसारखा माणूस जवळ असताना मुलांच्या शिकवणुकीची चिंता कोणालाही राहू नये. शिवाजीरावांच्या संदर्भातील भावमय कोवळिक विनोबांच्या पत्रांमधून प्रकटते. विनोबा रामेश्वरजी यांना 15 फेब्रुवारी 1936 रोजी वर्ध्याहून पाठवलेल्या पत्रात म्हणतात, “शिवाजीची प्रकृती जेलमुळे आणि जेलच्या आधीच्या व नंतरच्या प्रचारकार्यात घेतलेल्या परिश्रमांमुळे बरीच अशक्त आहे. माझी इच्छा अशी आहे, की जे काही 2-3 आठवडे जातील तेवढ्या वेळात प्रकृती मजबूत व्हावी. त्याप्रमाणे मी शिवाजीशी बोललो आहे. ह्या अवधीत तुम्हालाही त्याच्याकडून लाभ घेता येईलच.”
विनोबा स्वत: काळजीने शिवाजीरावांना पत्रातून कळवतात. “चि. शिवाजी, प्रवासात आहाराचे कसे चालते? गाईचे तूप येथून मिळू शकेल. जवळ राखले तर पुष्कळ अडचण दूर राहील. गीताई खाती खर्च टाकून देता येईल. माझी प्रकृती ह्यावेळी बरी नाही. सर्दी आहे. थोडा तापही. चिंताजनक नाही. वजन मात्र कमी आहे. बाळकोबाला बापू शेगावला घेऊन गेले आहेत. बापू कॉडलिव्हर ऑईल देणार आहेत. मी संमती दिली आहे. बाळकोबाने ते आमच्यावर सोपवले होते. धर्म-निर्णय नेहमीच सापेक्ष व सूक्ष्म असतो.”
शिवाजीराव बालपणी शांत व साध्यासोप्या व्यक्तिमत्त्वाच्या वळणाचे नव्हते. ते लाल मातीत कुस्त्यांच्या दंगलीत सामील होत. त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर त्यांच्या आईच्या संस्कारांचा खोल ठसा पडला होताच. शिवाजीराव आईने या नश्वर जगाचा निरोप घेतला तेव्हा तेरा वर्षे वयाचे होते. त्यावेळी घरात सारेच आजारी होते. त्यांनी आणि बाळकोबा यांनी मिळून सर्वांची सेवा केली. आई निघून गेल्यावर वडिलांचे अनुकरण करून कोणीही डोळ्यांत अश्रू येऊ दिले नाहीत. विनोबा तर आईजवळ बसून गीतापाठ करत राहिले होते.
शिवाजी विनोबा यांच्या आठवणी सांगत असताना त्यांच्या चित्तावर समर्थ रामदास स्वामींचा प्रभाव दिसून येतो. तो त्यांना आईकडून लाभला असावा. आईचा दिवस दासबोधाचे पठण केल्याशिवाय साजरा होत नसे. विनोबांचा स्वभाव बालपणापासून चिंतनशील होता. त्यांच्या सर्वसामान्य चर्चांनाही पारमार्थिक स्पर्श असायचा. त्यांच्या चिंतनात व्यत्यय येऊ नये म्हणून त्यांच्याशी बोलताना धाक वाटायचा. बाळकोबा एखाद्या शब्दाचा अर्थ जाणून घेण्यासाठी विनोबांकडे कधीतरी जात, जिज्ञासा व्यक्त करत, पण त्यांनी ’मला काही विचारू नकोस’ असे म्हटल्यावर बाळकोबांचा हिरमोड होत असे. मग आई मध्ये पडायची. शिवाजीरावांनी तर त्यांना काही जिज्ञासा विचारण्याची कधी मुळी हिंमतच केली नाही !
विनोबांचे लक्ष जेवताना जेवणात नसायचेच. आई भजनानंदात तल्लीन असताना ती भाजीत वा वरणात मीठ घालण्यास कधीतरी विसरायची. विनोबा त्यावर कोठलीही प्रतिक्रिया न व्यक्तवता शांतपणे जेवत असत. बाळकोबा मात्र रस घेऊन चवीने जेवत; पदार्थासाठी आवडनिवड व्यक्त करत, पसंती-नापसंती दर्शवत. ते विनोबांना मान्य नसायचे. त्यासाठी बाळकोबांना विनोबांच्या हातचा मारदेखील खावा लागे. त्यामुळे दोन्ही धाकटे भाऊही काहीही न बोलता जेवत.
विनोबा घरात नळाखाली कधी-कधी दोन-दोन तास जाऊन बसत, तर अंघोळ कधी सलगपणे चार-पाच दिवस करत नसत. सतत नळाखाली बसल्यावर कोणी हटकले तर म्हणत की ‘ते समाधी अवस्थेत आहेत ! शंकर भगवान त्यांच्यावर अभिषेक करताहेत !’ विनोबांची मुंज दहाव्या वर्षी झाली. त्यांना यज्ञोपवित घातले गेले. ते त्यांनी नदीच्या प्रवाहात सोडून दिले !
विनोबा गांधी-आश्रमात होते. बडोदा येथे आईची प्रकृती ढासळली; गांधीजींनी विनोबांना घरी जाऊन आईची सेवा करण्याचा आदेश दिला. तर ते म्हणाले, ‘इथे काय कमी का आजारी आहेत? त्यांचीही सेवा करण्यास हवी ना !’ त्याउप्पर ते गांधीजींच्या आग्रहाखातर घरी बडोद्यात आले. त्या काळादरम्यान त्यांची तेथे प्रवचने आयोजित केली गेली होती. विनोबा सामान्यत: मोठ्याने बोलत आणि ते प्रवचन संपताच धावण्यास लागत. त्यांची भूमिका आणि भावना कोणी त्यांना प्रवचनानंतर चरणस्पर्शपूर्वक प्रणाम करू नये अशातील असे. एकदा गांधी आश्रमात प्रार्थना सुरू होती. एक काळसर्प येऊन गांधीजींच्या मांडीवर चढून बसला. सारे घाबरले. अकंप फक्त दोघे होते- एक गांधीजी आणि दुसरे विनोबा!
बाळकोबांचा जन्म कर्नाटकातील जमखंडीचा. त्यांचेही बाळपण गागोदे गावात गेले. बाळकोबांचे लक्ष बालपणी खेळण्या-बागडण्याकडे अधिक होते. त्यांना क्रिकेटची आवड होती. वडिलांनी त्याना त्यांचे प्राथमिक शिक्षण आटोपल्यावर चित्रकला आणि क्ले मॉडलिंग या शिक्षणासाठी ’कलाभवना’त टाकले. त्यांनी सात वर्षे अध्ययन करून त्या शास्त्रात पदविका संपादन केली. त्यांनी गांधी आश्रमात गेल्यावर गांधीजींच्या आग्रहाखातर त्या कलेचा विकास केला. गांधीजींची कल्पना बाळकोबांना मिस फेअरिंग या कलाविद डॅनिश महिला गुरूसमवेत डेन्मार्कला पाठवण्याची होती. स्वातंत्र्ययुद्धाचे पडघम निनादू लागले. त्यामुळे ती इच्छा अधुरी राहिली. बाळकोबा संगीताच्या वर्गातही बडोदा येथील वास्तव्यकाळात जात असत. त्यांनी सतार, व्हॉयोलिन आणि जलतरंग या वाद्यांवर प्रभुत्व मिळवले. त्यानी गांधीजींची स्नुषा निर्मला गांधी आणि गांधीजींचे पुतणे कृष्णदास गांधी यांना संगीताचे धडे दिले. ते साबरमती आश्रमात दैनंदिन प्रार्थनेच्या वेळी नित्य भजन गात असत.
त्यांना गांधीजींच्या वैयक्तिक सेवेचे काम सोपवण्यात आले होते. गांधीजींचा वरदहस्त त्यांच्यावर होता. बाळकोबा शिस्तीचे कट्टर पालनकर्ते होते. ते साबरमती आश्रमात कताई-विणकाम विभागाचे प्रमुख होते. त्यांना उशिरा येणे मान्य नसे. त्यांनी आळस सहन नाही केला. ते वर्धा येथील सत्याग्रहाश्रमात स्वयंपाक विभागाचे प्रमुख होते.
ते स्वत: क्षय रोगाने त्रस्त होते. ते आजारपणात चिंचवड, नाशिक व गुजरातेतील चोरवाड येथे गेले आणि अखेरीस, रोगमुक्त झाल्यावर उरळी कांचनला स्थिरावले. संस्थेपाशी द्रव्य नव्हते. त्यानी आफ्रिकेचा दौरा केला. भारतभर हिंडले, संस्थेसाठी पाच लक्ष रुपयांचा भरीव निधी जमवला. बाळकोबांनी मणिभाई देसाई, कृष्णचंद्रजी, होशियारीताई, गणेश बेहेडे, गोखले यांसारख्या अनेकांना तयार केले. त्यांनी ईहलोकाचा निरोप ओंकार जप करत पूर्ण सावध स्थितीत घेतला. त्यांची अपरंपार श्रद्धा गांधीजी व विनोबा यांच्या ठायी होती. ते व्रतनिष्ठा आणि ब्रह्मचर्य यांबाबतीत ठाम होते. ते व्रतस्थ साधक होते.
विनोबा आणि बाळकोबा गांधीजींच्या आश्रमात प्रदीर्घ काळ राहिले. शिवाजीरावही साबरमती आश्रमात राहिले. गांधी आश्रमात राहणे सोपे नव्हते. गांधीजी प्रत्यही नवे प्रयोग करत. त्यांची साधना अवघड होती. शिवाजीरावांना कस्तुरबांच्या हाताखाली कार्य करण्याची संधी मिळाली. गांधीजी ’तुम्ही कस्तुरबांच्या कसोटीवर उतरल्याशिवाय उत्तीर्ण होऊ शकत नाही’ असे म्हणत असत. स्वच्छता आणि व्यवस्था ही कस्तुरबांच्या कार्यशैलीची प्रमुख वैशिष्ट्ये. शिवाजीराव भांडी घासण्याचे काम करत. शिवाजीराव गांधीजींच्या विशेष अनुमतीने त्यांच्या कक्षात जाऊन बसत. तो बापूंच्या जीवनाला जाणून घेण्याचा मार्ग होता. एकदा गांधीजी त्यांच्या कक्षात व्यग्रतेने काही शोधत होते. ’काय शोधताय?’ असे विचारल्यावर ते म्हणाले, ’पेन्सिलचा तुकडा हरवलाय ! तू पाहिलास?’ तेव्हा शिवाजीराव निरुत्तर झाले. ’तू रोज इथे बसतोस ना? तुझी इथल्या सामानाला जपण्याची नाही का काही जबाबदारी?’ ते ऐकून शिवाजीराव घाबरले. मग दोघे मिळून पेन्सिलचा तुकडा शोधू लागले. अखेर, प्रयत्नांती पेन्सिलचा तुकडा सापडला. शिवाजीरावांना हायसे वाटले. पुढे मग त्यानी गांधी कक्षाचा निरोप घेतला.
शिवाजीरावांनी वर्धा आश्रमात मुस्लिम बंधू नूर अली यांना गीता शिकवली. स्वातंत्र्यलढ्याच्या धामधुमीत कारावास पत्करला. ग्रामसेवेचा संकल्प मनाशी धरून तीनशेहून अधिक खेड्यांचा दौरा केला. चक्रवर्ती राजगोपालाचारी यांच्या समवेत वर्षभर भारतभ्रमण केले. गीताई प्रचारासाठी पदयात्रा 1932 ते 1942 या दशकभराच्या काळात महाराष्ट्रभर केली. ’गांधी तत्त्वज्ञान मंदिरा’ची उभारणी धुळे येथे केली. विपुल आणि सकस ग्रंथलेखन केले. बिहार-पंजाबात प्रवास केला. विनोबा त्याना ’मजूर’ मानत. बाळकोबा आणि शिवाजीराव, दोघांचे जीवन परमार्थ परायण होते. विनोबा म्हणतात, की ’असे बंधू मला लाभले. मी स्वत:ला याबाबत धन्य समजतो.’
शिवाजीरावांची दिनचर्या अखेरच्या काळातही (आयुष्याच्या उत्तरावस्थेत) अक्षुण्ण होती. त्यांची प्रार्थना आणि चिंतन अखंड चालू होते. ते कागदाच्या चिटोऱ्यावर काही मजकूर लिहून भेटीला आलेल्यांना देत असत. विनोबांच्या समाधीवर श्रद्धासुमन वाहण्यास जाण्याच्या त्यांच्या नियमात कधीच खळ पडला नाही. त्यांनी मित्रांच्या मदतीने अंतिम क्षणी समाधीला अभिवादन केले. त्यांची प्राणज्योत अवघ्या दहा मिनिटांत निमाली. ते त्यांच्या थोरल्या बंधूंच्या भेटीसाठी निघून गेले. त्यांचे मरण प्रसन्न ठरले.
त्या तीन बंधूंच्या भावबंधाचा सुरेख गोफ विनोबांच्या पत्रसंभारातून विणला गेला आहे. विनोबा बाळकोबांना एका पत्रात लिहितात, की ”तुमच्या भेटीनंतर पाच खेपेला प्रयत्नपूर्वक सर्व दात काढून टाकलेत. आता चेहरा छान सात्त्विक दिसतो. दातांना हिंसेचे प्रतीक मानले तर चेहरा अहिंसक दिसतो असे म्हणता येईल.” पंजाब प्रवासादरम्यान 4 डिसेंबर 1959 रोजी लिहितात- ”खूप दिवसांपासून पत्र दिले नाही. काल अचानकपणे लक्षात आले, की 1960 साली तुमच्या शारीरिक वयाची साठ वर्षें पूर्ण होताहेत (4 डिसेंबर 1959).” ते 19 जानेवारी 1960 च्या पत्रात म्हणतात- ”त्यावेळी (तुझ्या जन्माच्या वेळी) पावसाची रिमझिम सुरू होती असे स्मरण काहीसे मलाही आहे आणि आई वारंवार म्हणायची, की बाळूचा जन्म उन्हाळ्यात झाला तरी त्यावेळी पावसाची छोटी धारा ओघळली होती.” बालपणी, विनोबा बाळकोबांवर रागावायचे, त्यांनी बाळकोबांना क्वचित कधी मारही दिला. पुढे मात्र विनोबा त्यांच्या बाबतीत लोण्याहून मृदू बनले. विनोबांनी दयाघनाची प्रार्थना केली, “आमच्या बाळूला याच जन्मी आत्मसाक्षात्कार घडावा. त्याला पूर्ण आत्मिक समाधान लाभावे. त्याचा देहभाव गळून पडावा. मरणापूर्वी त्याने मरणाचा अनुभव घ्यावा.” बाळकोबांच्या संदर्भातील विनोबांच्या मनाच्या कोवळिकीलाही सहजच अध्यात्मस्पर्श झाला आहे.
ते शिवाजीरावांना कळवतात, की ताप आणि खोकला संपूर्णपणे जाऊन जोवर अंगात ताकद येत नाही तोवर गीताई प्रचारासाठी निघू नये हे श्रेयस्कर. त्यांचे समाधान प्रचारकार्य करताना तब्येत ढासळली नाही एवढ्यावरच होणार नव्हते. प्रचारकार्यात तब्येत उत्तरोत्तर स्वच्छ आणि बळकट व्हावी अशी त्यांची कल्पना होती. विनोबांनी प्रचारकार्यातील पदयात्रेतून उत्तम व्यायाम होतो असे त्यांचे आतील मत नोंदवले आहे, तब्येतीला जपून अधून-मधून सातत्याने फिरायला हवे. त्यांनी अनेकदा शिवाजीराव उत्तम शिक्षक असल्याबद्दल आनंद व अभिमान व्यक्तवला आहे.
महाराष्ट्राला ललामभूत अशा या तीन बंधूंनी जगभर त्यांच्या कार्य-कर्तृत्वाचा ठसा उमटवला. त्यांचे जीवन परलोकार्थ होते. त्यांनी ईहलोकी जनता-जनार्दन पूजला. ते तिघे आश्चर्य वाटावे असे सख्य एकमेकांप्रती जोपासत असताना प्रत्येकाला एकमेकांची विलक्षण ओढ होती. एकाच विचारप्रमेयाचे त्रिदलयुक्त आविष्करण त्यांच्या ठायी आकाराला आले. ते सेवा, त्याग, समर्पण आणि परोपकार या चतु:सूत्रीवर ठामपणे उभे ठाकले. एकमेकांच्या संदर्भातील तो भावबंध कमालीचा घनव्याकूळ आहे. आकाशीच्या बरसत्या धारांसारखा अनिवार, वायूसारखा गंधवाही, जळत्या पावकासारखा तेजोद्दीप्त. त्यांच्या भावसंबंधाला पंचमहाभूतांची अशी सुरेख झालर आहे. त्यात माता-पिता-काका अनुस्यूत आहेत.
टीप :
1. विट्ठल लक्ष्मण फडके हे मामासाहेब फडके या नावाने सर्वपरिचित आहेत. त्यांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्याच्या रत्नागिरी तालुक्यातील जांबुलआड या खेड्यात 2 डिसेंबर 1887 रोजी झाला. त्यांचे वडील लक्ष्मणराव एका व्यापाऱ्याकडे मुनिम होते. मामासाहेब फडके पुढे बडोदा येथील गंगनाथ भारतीय विद्यालयात शिक्षक झाले. ते सद्गुरूच्या शोधात गिरनार पर्वताकडे जानेवारी 1912 मध्ये निघाले. ते गिरनार पर्वत श्रेणींमध्ये तीन वर्षें थांबले. मामा त्यांचा अज्ञातवास पूर्ण करून महाराष्ट्रात 1914 च्या अखेरीस आले. त्यांनी गांधीजींची भेट 26 फेब्रुवारी 1915 रोजी पुण्यातील सर्व्हंट्स ऑफ इंडिया सोसायटीत घेतली. मामा क्रांतिकारक होते. ते गांधी आश्रमात दाखल झाले. 1942 च्या अखेरीस ’चले जाव’ चळवळीनिमित्त मामांना साबरमती येथे कारावास घडला.
2. विनोबाजींचे प्रेम गणित व संस्कृत या विषयांवर अपरंपार होते. काळाचे परिमाण तर अनंत आहे. त्यांच्या आयुष्याचा आलेख मांडताना त्यांनी साहजिकच गणिती परिमाणाचा उपयोग केला आहे. एक साधारण म्हणजे तुच्छ मनुष्य म्हणजे शून्य मनुष्य. त्याच्या जीवनात गणितशास्त्राच्या व्याख्येप्रमाणे शून्याची जी स्थिती आहे ती विनोबाजींची आहे.
– विश्वास पाटील 9767487483/9403848907 vishwaspatil52@gmail.com
कृष्णांबरी, सरस्वती कॉलनी, शहादा (नंदुरबार)