आठवणीत जपलेली माझी दापोली

2
352

माझ्या आठवणीत रेंगाळलेली दापोली मला रोज आठवते. ती दापोली आहे पन्नास-साठच्या दशकातील. माझे एस एस सी होईपर्यंतचे सारे आयुष्य दापोलीत गेले. मी एस एस सी नंतर दापोलीत कॉलेजची सोय नसल्यामुळे मुंबईत आले. मुंबई-दापोली किंवा दापोली-मुंबई हा प्रवास खेड-पोलादपूर-महाड मार्गे होत असे, त्यामुळे प्रवास सकाळी सहा वाजल्यापासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत, जवळ जवळ बारा तास चाले. काही लोक दादरला उतरत, पण मुंबई सेण्ट्रल हे शेवटचे स्थानक होते. परळ वगैरे स्थानके झाली नव्हती. बस पनवेल-मुंब्रा-ठाणे-मुलुंड मार्गे येई.

तिकडे दापोलीची हद्द सुरू झाली, की काळकाईच्या कोंडावरची असंख्य थडगी दिसू लागत. त्याचप्रमाणे, आजुबाजूच्या शेतांचे दगडी बांध दिसत. काळकाईचा उतार संपला की डाव्या हाताला मशीद आणि मशिदीच्या खालच्या अंगाला खळखळ वाहणारा ओढा होता. थोडे पुढे आले, की दापोलीचे प्रसिद्ध आझाद मैदान दिसे. दापोली-मुंबई रस्त्याला लागून मैदानाच्या रस्त्याजवळील भागात एस टीचे स्थानक होते. तीन विस्तीर्ण मैदानांची देन दापोलीला होती. पैकी आझाद मैदानाचा विस्तार टिकून आहे. त्या मैदानाच्या एका बाजूला सध्याच्या एस टी स्थानकाच्या मागच्या बाजूला खूप मोठे सुरूचे बन होते. सुरूच्या बनाला लागून आंब्याच्या बागा होत्या. त्या मैदानाची एक आठवण म्हणजे, मोरारजी देसाई मुख्यमंत्री असताना, हेलिकॉप्टरने त्या मैदानात उतरले होते ! आख्खा गाव हेलिकॉप्टर पाहण्यास लोटला होता. शाळेला मैदान नव्हते. आझाद मैदान हेच शाळेचे मैदान म्हणून वापरात होते. शाळेच्या सर्व स्पर्धा, खेळ, सामने त्या मैदानात खेळले जात. मैदानाच्या एका बाजूला व्हॉलिबॉलची तीन-चार नेट कायम लागलेली असत. शाळा सुटली की मुले आणि शिक्षक खाली मैदानात खेळण्यास येत. पावसात फुटबॉल खेळत. मैदाने लंगडी, हुतूतू यासाठी कायमची आखलेली असत. आता मात्र सर्वत्र क्रिकेटच दिसते ! त्या मैदानाचे दोन भाग एका छोट्याशा ओढ्याने झाले आहेत. उर्दू हायस्कूल दुसऱ्या भागात एका छोट्या टेकडीवर आहे. त्या शाळेच्या खालच्या भागात त्या शाळेची मुले वेगवेगळे खेळ खेळत. तेथेही व्हॉलिबॉलचे नेट लागलेले असे.

आझाद मैदान आमच्या घराच्या आवाराला लागूनच असल्यामुळे आम्ही ते आम्हा मुलांना जणू काही आंदण दिले असल्यासारखे वापरत होतो. मैदानाला लागून जुना सरकारी रहदारी बंगला आहे. तो 1828 साली बांधण्यात आला. तो त्याचे बांधकाम मजबूत असल्यामुळे चांगला वापरात आहे. पावसाळ्यात मैदानात जाता येत नसे, मग आम्ही त्या बंगल्यामध्ये खेळत असू. पूर्वी त्या बंगल्याकडे फारसे कोणी फिरकत नसे, कारण तो जंगलात असल्यासारखा होता ! बंगला आता मात्र कायम भरलेला असतो.

दापोलीत एकच नाका होता. त्या नाक्यावरून एक रस्ता बाजारपेठेत जाई, एक  गिमव्हणे-मुरुड-हर्णे कडे, एक जालगाव-दाभोळ कडे जात असे. लोक मैदानातील असंख्य पायवाटांनी ये-जा करत असत. तालुक्याचे ठिकाण- तेथे कोर्ट, कचेरी, सरकारी दवाखाना असल्यामुळे दापोली गावात अखंड वर्दळ असे. तालुक्‍यातील सर्व गावांमधून लोक सरकारी कामासाठी, दवाखान्यासाठी, कोर्टाच्या कामासाठी येत असत. एस टी नव्हती, खाजगी एक टनी गाड्या असत. त्या प्रवासी वाहतूक करत. शिवाय, टमटम, छोट्यामोठ्या जीप असत. लोक चालत किंवा बैलगाड्या, टमटम या वाहनांनी प्रवास करत.

दापोलीतील सर्व शाळा सरकारी म्हणजे जिल्हा लोकल बोर्डाच्या. गावात मुलींची एक व मुलांची एक अशा दोन वेगवेगळ्या शाळा होत्या. आम्ही घरापासून एक मैल लांब असलेल्या जालगावच्या शाळेत शिकलो. ती शाळाही लोकल बोर्डाचीच होती. खाजगी शाळा नव्हत्याच.

दापोली-दाभोळ रस्त्याला लागून एका लहानशा टेकडीवर, आमची आल्फ्रेड गॅडने हायस्कूल. ती पूर्वी मिशनची, पण नंतर दापोली एज्युकेशन सोसायटीने चालवण्यास घेतलेली. ती पूर्ण दापोली तालुक्‍यातील एकमेव माध्यमिक शाळा होती. मुले त्यामुळे आजूबाजूच्या सर्व गावांमधून अगदी आंजर्ले, केळशी, आडे-पाडले या गावांमधून दापोलीला चौथीनंतर किंवा सातवीनंतर शिकण्यासाठी येत. शाळेचे वसतिगृह होते. त्याशिवाय गावात इतरही वसतिगृहे होती. त्यामुळे मुलांच्या शिक्षणाची सोय होत असे. मुलींची मात्र पंचाईत होती. एस टी बस सुरू झाल्यावर, मुले-मुली बसने शाळेला येत असत. जवळच्या गावांतील मुले बरोबर जेवणाचा डबा घेऊन चालत शाळेला येत. शाळेच्या विस्तीर्ण आवारात आंब्याच्या झाडाखाली बसून दुपारी डबा खात- संध्याकाळी चालतच घरी परतत.

आमच्या शाळेचे वैशिट्य म्हणजे शाळेच्या इमारती टेकडीवरच्या मोठ्या सपाट भागावर उभ्या आहेत. शाळेत जाण्यासाठी दोन-तीन रस्ते आहेत. एक सायकल किंवा गाडीसाठी, दुसरा पायठन्या असलेला आणि तिसरा मात्र डोंगरउतारावर जशी चढण्या-उतरण्यास पाऊलवाट असते तसा. कोठूनही गेले तरी टेकडी चढउतार करावीच लागते. पूर्वी सर्व रस्त्यांच्या दोन्ही बाजूंला आंब्याची झाडे हारीने लावलेली असत. त्याशिवाय गुलमोहर, आईन, किंजळ अशी इतरही झाडे बरीच होती. दापोली-दाभोळ रस्त्याच्या कडेला मुलांना खेळण्यासाठी मैदान तयार केले तेव्हा त्यासाठी बऱ्याच झाडांची कत्तल करण्यात आली. त्यामुळे तो भाग ओसाड झाला आहे. तेथील प्राण्यांचा अधिवास धोक्यात आला. मुलांना खेळण्यासाठी मैदान केले असले तरी मुले त्या मैदानात किती खेळतात हा प्रश्‍नच आहे !

अनेक नररत्ने त्या शाळेत शिकून मोठी झाली. धोंडो केशव कर्वे. पां.वा. काणे, रँग्लर परांजपे, साने गुरुजी अशी काही नावे. आचार्य अत्रे यांनी ‘शामची आई’ चित्रपट करण्याचे ठरवले, त्यावेळी माझे काका- डॉ.पी.व्ही.मंडलीक; तसेच, अत्रेदेखील विधानसभेत आमदार होते. त्या दोघांची चांगली मैत्री होती. त्यामुळे अत्रे यांनी काकांना दापोलीला राहण्याची काही व्यवस्था होऊ शकेल का असे विचारले असता, काकांनी लगेच, माझ्या वडिलांना, चित्रपटातील मंडळींची राहण्याची व्यवस्था काय करता येईल असे कळवले. दापोलीला एकही हॉटेल नव्हते किंवा त्या मंडळींची व्यवस्था करता येईल असे ठिकाणही नव्हते. त्यामुळे अत्रे, वनमालाबाई, सुमती गुप्ते, वसंतराव जोगळेकर, वसंत बापट ही सर्व मंडळी आमच्या घरीच राहिली व त्यांची टीम आमच्या घराच्या शेजारी असलेल्या सरकारी बंगल्यात राहिली.

ही सर्व मान्यवर मंडळी आमच्या घरी अगदी घरच्यासारखी राहिली. घरातील कोणालाही त्यांचे दडपण आले नाही. ही गोष्ट आहे 1951 सालची. मी त्यावेळी जेमतेम दहा वर्षांची होते. इतकी मोठी, दिग्गज, विद्वान माणसे त्या काळात मी अनुभवली, त्यावेळी त्यांचे मोठेपण लक्षातही आले नाही, पण आता आयुष्याच्या उत्तरार्धात मात्र त्या लोकोत्तर मान्यवरांची आभाळाएवढी उंची मला जाणवत आहे. त्यावेळी ते त्यांच्या सर्व टीमसह जवळपास एक महिना दापोलीत राहिले. ती मंडळी दापोलीला भेट देऊन गेली आणि पर्यायाने, शाळेलादेखील ! चित्रपटात जशी शाळा दाखवली आहे ना तशीच ती आमच्या मनात अजूनही रेंगाळते ! चित्रपटात आजूबाजूच्या काही महत्त्वाच्या गावांचे चित्रणही केले आहे. उदाहरणार्थ लाडघरचे तामसतीर्थ, लाडघरला जाण्याचा वळणावळणाचा रस्ता, आदरणीय साने गुरूजींची जन्मभूमी पालगड गाव, त्यांची शाळा या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन चित्रण झालेले आहे.

दरवर्षीं गणेशोत्सव आणि शारदोत्सव मोठया प्रमाणात साजरा केला जात असे. गणेशोत्सवात शाळेतील मुलामुलींची नाटके आणि करमणुकीचे कार्यक्रम होत असत. अनेक मान्यवर लेखक, कवी, शारदोत्सवाच्या निमित्ताने शाळेला भेट देत व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत. वा.ल. कुलकर्णी, वसंत बापट, श्री.ना. पेंडसे, आचार्य अत्रे ही त्यांपैकी काही नावे आठवतात.

दापोलीच्या मध्यवर्ती भागात शाळेच्या वसतिगृहाच्या बाजूच्या आवारात मिशनरी लोकांनी बांधलेले खूप छान कॅथलिक, काळ्या कुळकुळीत दगडांतील, उंच चर्च होते. दापोलीत कोठेही उभे राहिले तरी ते दिसत असे. ते दापोलीत पाहण्यासारखे एक ठिकाण होते. त्याची पडझड हळूहळू झाली. गावातील लोकांनी त्याचे दगड काढून नेले. ते पूर्णपणे नामशेष झाले आहे.

दापोलीची बाजारपेठ म्हणजे काटकोनात असलेले दोन रस्ते. सर्व लहान-मोठी दुकाने त्याच दोन रस्त्यांवर. बाजारपेठेत दोन-चार खाणावळी होत्या. खाणावळीत मोजके पदार्थ मिळत. कामासाठी गावात आलेली माणसे त्या खाणावळीत जात. हॉटेलमध्ये जाऊन जेवणे, खाणे वगैरे प्रथा नव्हती. सीझनमध्ये ऊसाचे गुऱ्हाळ सुरू होई. ऊस संपल्यावर ते बंद होई. नाक्‍यावर थोडीशी वर्दळ असे. त्या नाक्याचे केळसकर नाका असे नामकरण झाले.

दापोलीच्या जवळ पाच-सात किलोमीटरवर स्वच्छ सुंदर समुद्रकिनारे आहेत, मुरुड, कर्दे, लाडघर, बुरोंडी, कोळथरे वगैरे… पूर्वी लोक समुद्रावर फिरण्यास कधीतरी जात.

दापोलीचे खरे वैशिष्टय म्हणजे तेथील हवा आणि पाणी. त्यामुळे दापोली पर्यटन क्षेत्र झाले आहे. दापोलीत वीज 1964 सालापर्यंत नव्हती. आम्ही अभ्यास कंदिलाच्या प्रकाशात केला. दापोली परिसरात जंगल खूप होते. जालगावच्या शाळेत जाताना फार  मोठे जंगल पार करून जावे लागे; भीतीच वाटे.

दापोलीचा नूर 1964-65 नंतर मात्र बदलू लागला. वीज आली, शेती महाविद्यालय आणि पाठोपाठ शेती विद्यापीठही झाले. त्यामुळे बाहेरचे अनेक लोक नोकरीनिमित्त गावात राहण्यास आले. आसपासच्या जमिनी शेती कॉलेजसाठी विकत घेतल्या. पूर्वीचे जमीन मालक त्यांच्याच जमिनीवर मजूर म्हणून काम करू लागले ! गावात अनेक नवीन नवीन कार्यालये सुरू झाली. दापोलीच्या फॅमिली (family) माळावर देखील खूप मोठे मैदान होते. पण त्याचे नामोनिशाणसुद्धा दिसत नाही. अनेक घरे उतरत्या छपराची आणि बैठी होती. बऱ्याच ठिकाणी तीनचार मजल्यांच्या नवीन इमारती उभ्या राहिलेल्या दिसतात. जंगल, झाडीही कमी झाली आहे. दापोलीची वाटचाल शहरीकरणाकडे झपाट्याने सुरू झाली आहे. दापोलीची ग्रामपंचायत बरखास्त होऊन दापोली नगर-पंचायत झाली आहे.

दापोलीला कोकणचे महाबळेश्वर म्हणतात. ते समुद्रसपाटीपासून एक हजार फूट उंचीवर असल्यामुळे तेथील हवामान कायम आल्हाददायक राहिले आहे. दापोलीला पूर्वी कांप-दापोली म्हणत. कारण इंग्रजांचा कॅम्प त्या ठिकाणी होता आणि कांप हा कॅम्पचा झालेला अपभ्रंश. जुन्या जमान्यातील लोक ‘मी जरा कांपात जाऊन येतो हो’ असे म्हणतात. तरी इतिहासाच्या बऱ्याच खुणा पुसल्या गेल्या आहेत.

दापोली खूप बदलली आहे, रोज नवे बदल होताहेत, होत राहतील. आम्ही पाहिलेली, अनुभवलेली दापोली मात्र आमच्या मनात कायम घर करून राहील. दापोलीला कधीही जाण्याची माझी तयारी असते. दापोलीचे माझे घर मला कायम खुणावत असते.

अजून येते सय गावाची, त्या मातीची, त्या शाळेची, मैदानाची |
शाळा सुटली, गावही सुटले, आठवणीत मात्र मन रेंगाळले ||

नीला पटवर्धन 9422595944 patwardhanneela6@gmail.com

———————————————————————————————

About Post Author

2 COMMENTS

  1. लेख दीर्घ आहे सविस्तर आठवणी आहेत.
    छान वाटले वाच्याळा.अनेक (दापोली संबधित)परिचितांना पुढे पाठविला (फॉरवर्ड केला).
    संध्या जोशी

  2. नीला पटवर्धन यांचा दापोलीवरील लेख छान आहे. दापोली गावचा विकास यात समजतो. निसर्गसौदर्य यापरिसरात जागोजागी दिसते. दोन्ही वेळा दापोलीला थंडीत जाण्याची संधी मिळाली.त्यामुळे आल्हाददायक वातावरण अनुभवता आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here