मनोरुग्णांकडे बघण्याची बोथट नजर हे सर्वपरिचित सत्य. स्वतःच्याच मल-मूत्रात सभोवतालचे भान हरवलेल्या आणि दिवसेंदिवस खितपत पडलेल्या लोकांना मनोरुग्ण म्हणणे अतिश यांना खटकते. मनोरुग्णांबद्दल विचार करत असताना, अभ्यास करताना त्यांचे स्वतःशी हातवारे करणे, गप्प राहणे, कधी उद्रेक होणे या वागण्याला ते ‘स्वतःच्या मनाबरोबर प्रवास करणारे प्रवासी’ म्हणतात. म्हणून त्यांनी या लोकांना ‘मनोयात्री’ असे नाव दिले आहे. त्यांची ते अत्यंत मायेने, आस्थेने सेवा करतात.
– अपर्णा महाजन
——————————————————————————————————————————–
संभव फाऊंडेशन : ‘मनोयात्रीं’ना मानवी प्रवाहात आणणारा अवलिया
वाढलेले केस, अंगावर जखमा आणि नग्नावस्थेत; रस्त्याच्या कडेला फुटपाथवर, एखाद्या उकिरड्याच्या बाजूला; एस टी स्थानक किंवा रेल्वे-स्टेशनवर असलेल्या मनोरुग्णांकडे नुसते पाहणेही त्रासदायक होते. मात्र, सोलापूरचे अतिश आणि त्यांची पत्नी राणी या दांपत्याने अशा लोकांना दिलासा देत मुख्य प्रवाहात आणण्याचे काम 2016 साली सुरू केले. अतिश कविता लक्ष्मण यांनी रस्त्यावर फिरणाऱ्या आणि समाजाला नको असणाऱ्या सुमारे अडीचशे मनोरुग्णांशी संवाद साधून त्यांचे पुनर्वसन केले आहे.
या कामाची सुरुवात झाली, ती एका प्रचंड अस्वस्थतेतून. अतिश सांगतात, ‘सगळे मनोरुग्ण वेडेच असतात, असे मला वाटायचे. महिनो न् महिने अंघोळ न केलेले, कळकट शरीराचे आणि देहावर झालेल्या जखमांतील किडे घेऊन कपड्यांच्या लक्तरात वावरणारे मनोरुग्ण पाहिले, की माझेच स्वास्थ्य हरपत असे. मी रस्त्याच्या कडेला उभे राहून त्यांच्या हालचाली, स्वतःशीच हसणे-रडणे, बोलणे पाहू लागलो. घरी आलो की झोप लागत नसे. त्यांच्यासाठी काहीतरी केले पाहिजे, असे वाटत होते. मग मी त्यांच्याशी बोलायला लागलो. त्यांच्याशेजारी मांडी घालून बसून संवाद साधण्याचा प्रयत्न करू लागलो. त्यांना अर्थातच काही कळत नसे. कित्येक जण माझ्या अंगावर थुंकायचे, मारायला धावायचे. पण मी हिंमत सोडली नाही. अनेक दिवस त्यांच्या मागावर राहून संवादातून त्यांना आपलेसे करण्याचा प्रयत्न करे. या प्रकारात माझी नोकरी सुटली. त्यांना घरून नेलेले अन्न खाऊ घालत असे. त्यांना भूक लागलेली कळत नसे, शौच किंवा मूत्रविसर्जन यांचे भान नसे. कित्येकांच्या डोक्याचे केस वर्षभर वाढलेले असत. त्यांच्या अक्षरशः जटा झालेल्या असतात. मग, मीच त्यांची कटिंग करे. त्यांची दाढी करे. त्या मंडळींना ‘मनोरुग्ण’ म्हणण्याऐवजी मी ‘मनोयात्री’ म्हणू लागलो. पुढे मी माझीही कौटुंबिक परिस्थिती बिकट झाल्याने अनेकांची भेट टाळू लागलो. पण त्या-त्या परिसरातील माझे मित्र संबंधित ‘मनोयात्री’ माझी आठवण काढत असल्याचे मला सांगू लागले. मग मात्र मी त्यांच्या सेवेचा चंग बांधला आणि त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी प्रयत्न सुरू केले.’
अतिशचा प्रवास सोपा नव्हता. वृद्ध, जखमी आणि मानसिकदृष्ट्या हरवून गेलेल्या व्यक्तींवर उपचार करून त्यांना माणसात आणणे कठीण होते. मनोयात्रींशी सततच्या संवादामुळे, त्यांच्या भेटीगाठींमुळे त्या-त्या परिसरात अतिशची ओळख निर्माण झाली. मग, मित्रांकडून उसने पैसे घेऊन अतिश मनोयात्रींच्या गरजा भागवू लागले. मनोयात्री अतिशचे मित्र आहेत हे अनेकांना ठाऊक झाले होते. अतिशने मनोरुग्णांवर उपचार करणाऱ्या संस्थांशी संपर्क साधला. अनेक मनोयात्रींची घरे शोधून त्यांना त्यांच्या घरी पाठवले. कित्येक जण परगावातून सोलापुरात आले होते. त्यामुळे त्यांचा पत्ता शोधणे अत्यंत कठीण होते. मुळात मनोयात्रींना स्वतःविषयी काही सांगता येत नव्हते. त्यांची मुक्या जनावरांसारखी स्थिती. त्यातून त्यांचे घर शोधणे हे आव्हान होते. अतिश यांनी ते स्वीकारले. त्यांना त्यांची पत्नी राणी यांचीही साथ होती.
अतिशने त्याच्या कामाची व्याप्ती वाढवली. त्यांना एखादी संस्था स्थापन करून तिच्या माध्यमातून हे काम करण्याविषयी सांगितले गेले. तेव्हा त्यांनी ‘संभव फाऊंडेशन’ची स्थापना केली. स्वतःला या कामाचा विसर पडू नये, या जाणिवेसाठी अतिश यांनी मुलाचे नावही ‘संभव’ ठेवले आहे. राणी यांनीही रुग्णसेवेचे व्रत घेतलेले. त्यांची आणि अतिश यांची भेट सिद्धेश्वर हॉस्पिटलमध्ये झाली. मनोयात्रींची सेवा झपाटल्याप्रमाणे करणाऱ्या अतिशचे काम पाहून त्या प्रभावित झाल्या. त्यांच्या कार्यात साथ देऊ लागल्या आणि कालांतराने एकमेकांच्या प्रेमात पडून त्यांनी रेशीमगाठ बांधली. राणी स्वतःच्या नोकरीच्या पगारातील पैसे मनोयात्रींच्या जेवणखाण आणि उपचार यांसाठी अतिश यांच्या स्वाधीन करतात. त्या बऱ्याचदा पहाटे उठून मनोरुग्णांसाठी, फुटपाथवरील बेघर मनोयात्रींसाठी जेवणाचे डबे तयार करतात. अर्थात, जेवणाचा डबा नेला, तरी संबंधित मनोयात्री जेवत नाही. त्याला त्याचे भानच नसते. तेव्हा त्याला आईच्या मायेने समजावून जेवू घालण्याचे काम ते दोघे करतात.
अतिश आणि राणी यांच्या कामाची माहिती जसजशी मिळू लागली, तसे समविचारी तरुण त्यांच्या संपर्कात आले. त्यांचीही मदत मिळायला लागली. औषधोपचार, भोजन, कपडे आणि स्वच्छतेच्या खर्चासाठी लागणारे पैसे गोळा करणे हे जिकिरीचे काम होते. मात्र, अनेक तरुण जोडले गेल्यामुळे उपाय निघतोच. कोणाकडून कोठलीही अपेक्षा न ठेवता आपले काम मनःपूर्वक करणाऱ्या अतिशचे व्यक्तिमत्त्व लाघवी, प्रेमळ आहे. बरेच जण अतिशला या कामात गरजेनुसार मदत करायला पुढे सरसावत आहेत. तथापि, स्थायी स्वरूपात काही व्हायला हवे, असे अतिश यांना वाटते. ‘संभव फाऊंडेशन’ची व्याप्ती वाढत आहे, स्वयंसेवकही पुढे येत आहेत, ही चांगली गोष्ट आहे.
अतिश म्हणाले, “या मनोयात्रींवर प्रथमोपचार करून, पोशाख वगैरेची सोय करून पुढील उपचारांसाठी विविध रुग्णालयांत नेऊन सोडण्याचे काम मी करतो आहे. पण मनोयात्रींना सर्व प्रकारची मदत करणारे आपले उपचारकेंद्र असावे, असे मला वाटते. त्यादृष्टीने मी प्रयत्न करत आहे. तसे करता आले, तर एकाच छताखाली सगळ्या गोष्टी साध्य होतील. या मनोयात्रींना सार्वजनिक नळावर किंवा सार्वजनिक हातपंपावर स्नान घालण्यासाठीही लोक परवानगी देत नाहीत. ही घाणेरडी माणसे इथे धुतली, तर हा परिसर घाण होईल आणि आम्हाला अशा घाणीत पाणी भरून घरात न्यावे लागेल, असे म्हणून लोक विरोध करतात. तेव्हा त्यांना उलट उत्तरे न देता कित्येक वेळा स्मशानभूमीतील हातपंपावर किंवा तेथील पाण्याच्या टाकीवर मनोयात्रींना अंघोळ घातली आहे. असे प्रकार टाळण्यासाठी या रुग्णांच्या हक्काचे उपचारकेंद्र स्थापण्याचा माझा विचार आहे, अर्थात त्यासाठी लोकांनी पुढे येणे गरजेचे आहे.”
महानगरपालिकेचे बेघर निवाराकेंद्र आहे, पण त्यामध्ये मनोरुग्णांना ठेवण्याची व्यवस्था नाही. मनोरुग्ण कोणालाही भीक मागत नाहीत. कोणाच्याही वाटेला स्वतः होऊन जात नाहीत. त्यांना कोणी डिवचले, तर मात्र त्यांची मानसिकता बिघडते. त्यावेळी ते ‘हायपर’ होतात. त्यांना शांत करणे हे कठीण काम असते. स्वतःची ओळख विसरलेली ती माणसे असंबद्ध बोलत राहतात. अशा वेळी त्यांच्याशी मैत्री करून संवाद साधणे ही एका दिवसाची गोष्ट नसते. मात्र, अतिश हे काम न कंटाळता करतात. शहराच्या कोठल्याही भागात नवा मनोरुग्ण आढळला, की ‘संभव फाऊंडेशन’ला कळवले जाते. त्याची शारीरिक स्थिती, आजारपण, जखमा वगैरे पाहून अतिश रुग्णवाहिकेतून सर्वोपचार रुग्णालयात न्यायचे की स्वतःच उपचार करायचे, ते ठरवतात. मनोरुग्णांची सेवा करून त्यांना जेवायला घालून घरी आल्यानंतर अतिश यांना कामाचे समाधान असते, पण आरंभीच्या काळात स्नान केल्याशिवाय त्यांना घरात प्रवेश मिळत नसे. मागच्या सहा वर्षांत कुटुंबातील सगळ्यांना या कामाचे महत्त्व पटले आहे. अतिश यांना लागेल ती मदत घरून केली जाते. पण समाजाने आता पुढे येणे गरजेचे आहे.
पंढरपुरात आषाढी यात्रा संपली, की अचानक शेकडो मनोरुग्ण अस्वस्थ होऊन रस्त्याने फिरताना दिसतात. त्यांना त्यांचे घर, गाव कोठले आहे, ते सांगता येत नाही. कारण ते त्या अवस्थेतच नसतात. बऱ्याचदा त्यांना त्यांचे कुटुंबीयच यात्रेच्या गर्दीत आणून सोडतात असे पोलीस सांगतात. हे विदारक सत्य आहे. सोलापुरातही अशीच स्थिती असते. या आव्हानाला तोंड देण्यासाठी अतिशचे हात बळकट करणे गरजेचे आहे. मनोयात्रींना हक्काचा निवारा मिळेल अशी वास्तू निर्माण करण्याचे अतिशचे स्वप्न साकार व्हायला हवे. समाजसेवेचे प्रदर्शन करण्याच्या आजच्या काळात निरपेक्ष भावनेने काम करणाऱ्या अतिशची योजना समजून घ्यायला हवी. अतिश सांगतात, “माझी कल्पना समजून घ्यायची असेल, तर तुम्हाला माझ्यासोबत काही दिवस यावे लागेल. माझे काम पहावे लागेल, मग त्याचे स्वरूप आणि गांभीर्य तुमच्या लक्षात येईल.”
2020-21च्या कोरोना काळात लोकांना घराबाहेर पडणे कठीण झाले होते. तशा वेळी रस्त्याच्या कडेला पडलेल्या मनोरुग्णांची उपासमार होत असे. अतिश यांनी पोलिसांची विशेष परवानगी घेऊन त्यांच्या भोजनाची व्यवस्था केली, आवश्यकतेनुसार सेवा केली. मनोरुग्णांची ओळख, त्यांचे नाव-गाव समजले, तरी ते उघड करणे न्यायोचित नसते. आर्थिकदृष्ट्या समृद्ध असणाऱ्यांनी या कार्यास मदत करायला हवी, असे सुचवावे वाटते.
अतिश कविता लक्ष्मण 9765065098
– रजनीश जोशी 9850064066 joshirajanish@gmail.com
———————————————————————————————————————–
राजमार्ग सोडून वेगळ्या वाटेवर जाऊन समाजकार्य करणाऱ्या अतिश व राणी या दांपत्याची ,त्यांच्या कार्याची ओळख करून देणारा चांगला लेख .