मी सरस्वती नाईकांच्या लेकीच्या लेकीची लेक आहे.
मुक्ता रेडकर ही माझी पणजी. माझ्या आईच्या आईची आई. ती कोकणातील शिरोड्यात जन्मली. तिचा जन्म 1880 आणि मृत्यू 1968 साली झाला. ती माहेरची मुक्ता रेडकर, लग्नानंतर झाली सरस्वती नाईक. मुक्ता आणि सरस्वती – दोन्ही नावे तिने सार्थ केली.
हे मी जसे आईकडून ऐकले, तसे लिहीत आहे. त्या काळात एक भीती जनमानसात प्रचलित होती, की सुंदर छोटी मुले इंग्रज पळवून नेतात ! त्या भीतीमुळे मुक्ता पणजी तिच्या एकुलत्या धाकट्या भावाला – दत्तात्रेय रेडकर यांना शाळेत लहानपणी पोचवत-आणत असे व तेथेच शाळेबाहेर बसून राही. ती त्या अवधीत शिक्षणाचे धडे ऐकू -गिरवू लागली. शिक्षकांनी तिची ज्ञानतृष्णा पाहून तिला शाळेत दाखल करून घेतले. छोटी मुक्ता सातवीपर्यंत शिकली. व्हर्नाक्युलर फायनलची परीक्षा पास झाली. मग, रीतीप्रमाणे, तिचे लग्न झाले.
सरस्वतीबार्इंना त्यांचा नवरा सुस्थितीत असला तरी दारूच्या आहारी गेलेला व्यसनी आहे हे समजले. तेव्हा त्यांनी नवऱ्याला स्पष्ट शब्दांत बजावले, की एक तर व्यसन सोडावे लागेल नाही तर संसार मोडावा लागेल ! तोपर्यंत एक मुलगी (माझी आजी इंदिरा) पणजीच्या पदरी आली होती. नवऱ्याने व्यसन सोडले नाही, म्हणून बाणेदार सरस्वतीबार्इंनी मुलीला घेऊन घर सोडले ! त्या पुन्हा धाकट्या भावाकडे – दत्तात्रेय रेडकर यांच्याकडे, शिरोड्याला माहेरी आल्या. दत्तात्रेय अकाली विधुर झाले होते. तेथे त्यांनी त्यांच्या सामान्य परिस्थितीतील भावाची दोन मुले (सदानंद आणि प्रमिला) आणि स्वत:ची एकुलती मुलगी इंदिरा असा जगावेगळा संसार सांभाळलाच; पण त्यांच्याच पुढाकारामुळे, शिरोड्यातील लोकल बोर्डाची मुलींची प्राथमिक शाळा स्थापन झाली. त्या तेथे मुख्याध्यापक झाल्या. ‘सरस्वतीबाई नाईक, मुख्याध्यापक, लोकल बोर्ड मुलींची प्राथमिक शाळा, शिरोडा’ अशी त्यांनी त्यांची ओळख स्वबळावर निर्माण केली !
त्यांनी गावातील विधवा, परित्यक्त स्त्रियांना त्या शाळेत कसली ना कसली नोकरी मिळवून दिली आणि त्यांना आर्थिक दृष्टया स्वयंपूर्ण केले. त्या खडतर प्रवासात त्यांच्यावर सनातनी गावात प्रचंड टीका झाली. त्यांची नवऱ्याला सोडून आलेली बाई म्हणून हेटाळणी झाली. त्यातच त्यांना कसलेही पाठबळ नव्हते. त्यांचा भंडारी समाज हा मागास मानला गेलेला, पण त्या डगमगल्या नाहीत.
त्यांच्या एकुलत्या एका मुलीचा विवाह झाला. तिचे पती- माझे आजोबा रघुनाथ मसुरकर मुंबईला नोकरीसाठी असत. त्यांना सहा अपत्ये झाली. त्यांनी ती शिक्षणासाठी पणजीकडे सोपवली. तेही कर्तव्य त्यांनी पार पाडले. त्यांच्याच तालमीत माझी आई – (लग्नापूर्वी सुमती मसुरकर) तयार झाली. ती तालुक्यात मॅट्रिकला पहिली आली. तिने पुढे, मुंबईत जयहिंद कॉलेजमधून अर्थशास्त्राची पदवी घेतली व ती मंत्रालयात नोकरीस लागली.
माझी आई गावी होती तोपर्यंत पणजीसोबत त्यांचे पेन्शन आणण्यास तालुक्याच्या गावी चालत जात असे. वाटेत टेकडी ओलांडावी लागे. पणजीला एसटी लागायची. पेन्शन सतरा-अठरा रुपये असावे ! ते पैसे तिला पुरत नसत, पण त्या समाधानी होत्या. मात्र त्यांच्या एकुलत्या एका मुलीचे (माझ्या आजीचे) निधन अकाली – चाळिशीत अचानक आणि चुकीच्या रोगनिदानामुळे झाले. तो धक्का मोठा होता. कहर म्हणजे त्यांचे व्यसनी, पुनर्विवाहित आणि निर्धन झालेले पती वृद्धापकाळी त्यांच्याकडून आर्थिक मदत घेत. ते पैसे नेण्यास पणजींच्या सवतीचा मुलगा (नात्याने आईचा सावत्र मामा) घरी येई.
मी शिरोड्याला गेले असताना पणजीला एकदाच पाहिले आहे. तेव्हा मी लहान होते. गोरीपान, करारी अशी, पांढरे ब्लाउज आणि गडद जांभळ्या बैंगणी रंगाचे नऊवारी लुगडे नेसलेली पणजी (हा त्यांचा नेहमीचा परिवेष) माझ्या स्मृतिपटलावर कोरली गेली आहे.
सावित्रीबाई फुले यांनी स्त्रियांत शिक्षणाचे फार मोठे काम केले, पण त्यांच्याच काळात अनेक अनाम एकाकी स्त्रियांनी देशाच्या कानाकोपऱ्यात राहून तसेच काम केले आहे !
– भारती बिर्जे-डिग्गीकर 8080744022 bharati.diggikar@gmail.com
———————————————————————————————————